प्रत्यक्ष कर्म केल्याने जो आनंद मिळतो तो कदाचित त्याचे फळ मिळाल्यानंतर मिळतोच असे नाही. म्हणूनच निष्काम कर्माला जास्त महत्त्व आहे.
एक राजा होता. त्याने राज्यातील शेतकऱ्यांना सांगितले, तुम्ही शेतात फुकटचे का राबता,, वर्षाला जेवढे धान्य लागेल ते देण्याची जबाबदारी माझी. या निर्णयाने जवळजवळ सर्वच शेतकरी सुखावले ते म्हणाले की, बरे झाले. नाही तरी आपण शेतीत मरमर मरतो त्या मानाने आपल्याला धान्य मिळेलच याची खात्री नसते. आता राजाच आपणास वर्षअखेर आयते धान्य देणार आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकर्यांनी हा प्रस्ताव मान्य केला.
मात्र त्यामध्ये एक हाडाचा शेतकरी होता. त्याला हा राजाचा विचित्र सौदा आवडला नाही. त्याने या प्रस्तावाला विरोध केला. तो म्हणाला, ”मला तुमचे धान्य नको. माझ्या शेतात जे काही उगवेल तेवढेच मी माझे मानून घेईन. राजाला अर्थातच त्याचा राग आला नाही. फक्त त्याने आपल्या काही सेवकांना त्याच्यावर पाळत ठेवायला सांगितले. फुकटचे धान्य मिळणार म्हणून बरेचसे शेतकरी आनंदित झाले होते. त्यामुळे त्यांनी शेतावर जाणे तर सोडलेच पण इतरही कामधंदे सोडले.
हा शेतकरी मात्र रोज भल्या पहाटेच शेतावर जायचा. पाखरांची मंजुळ गाणी ऐकायचा. गाई-गुरांना ओंजारायचा. शेतीची सर्व कामे त्या त्या वेळी करायचा. त्यामुळे त्याचा सारा दिवस आनंदात जायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने व आनंदाने तो कामे करायचा.
दुर्देवाने त्या वर्षी पाऊस फार पडला नाही. त्यामुळे त्याच्या शेतात कमीच धान्य आले. राजाला ही गोष्ट कळली. त्याने त्याला बोलावून घेतले व म्हणाला, ‘बघ तू माझे म्हणणे मान्य केले असतेस तर तुला निश्चितच जास्त धान्य मिळाले असते.
त्यावर तो शेतकरी राजाला म्हणाला, ”मला जरूर थोडेसे जास्त धान्य मिळाले असते, मात्र शेती करताना जो आनंद मला मिळायचा तो इतर कोणालाही मिळाला नाही. उलट बरेचसे शेतकरी राजा आपल्या शब्दाला जागून आपणास धान्य देईल काय? याच विवंचनेत होते”.
त्या शेतकयाने जणू राजाला निष्काम कर्माचे महत्त्व पटवून दिले होते. त्यामुळे राजाने त्याचा सत्कार करून त्याला परत पाठविले.
Leave a Reply