नवीन लेखन...

निस्सीम प्रेम

नेहमीप्रमाणे प्राध्यापक अविनाश सरांच्या लेक्चरला क्लास पूर्ण भरलेला होता. अविनाश संस्कृत विषय शिकवत.
सगळे विद्यार्थी तल्लीन होऊन ऐकत असत अविनाश सरांच संस्कृतवर प्रभुत्व होतंच पण त्याचं विवरण ते इंग्रजीतही फार सुंदर करत. अगदी सर्वांना समजेल अशा सोप्या इंग्रजीत. मेघदूत हे काव्य, शाकुंतल हे नाटक शिकवतांना तर ते नेहेमीच्या जीवनातील उदाहरणं देऊन आणि रंगवून सांगत. त्यामुळे त्यांच्या तासाला कोणी दांडी मारत नसे.
अविनाश सरांनी चाळीशी पार करून दोन वर्षे झाली होती पण ते वयाच्या मानाने तरूण वाटत. किंचीत सांवळा रंग, रेखीव चेहरा, त्यावर कोरलेली मिशीची रेषा यामुळे ते आकर्षक दिसत. त्यांचा पुरूषी आवाजही एखाद्या उत्तम नटासारखा कमावलेला वाटे. अनेक वर्ष शिकवून तो तसा झाला होता. शिकवतांना सर सर्व वर्गावरून नजर फिरवत. त्यांच्या वर्गांत विद्यार्थी कधीच दंगा करत नसत पण एखादा जांभई देतांना दिसला तरी सरांना ते बरं वाटत नसे. ते मन लावून शिकवत व विद्यार्थ्यांनीही समरस होऊन ऐकावं, अशी त्यांची इच्छा असे. मग ते एखादा संस्कृत वाङमयातला छान किस्सा सांगत.
आता ते शाकुंतलमधला कण्व मुनींनी शकुंतलेची राजाकडे जातांना आश्रमांतून केलेल्या पाठवणीचा भाग शिकवत होते.
अनुजा अविनाश सरांचे लेक्चर नेहमीच मंत्रमुग्ध होऊन ऐकत असे. ती शब्द न शब्द मनाने टीपत असे.

सरांचे हावभाव, पाणीदार डोळे, आवाज, बोलणे, शिकवणे, विद्वत्ता, इ. सर्वाचाच तिच्यावर पहिल्या वर्षापासूनच खूप प्रभाव पडला होता. संस्कृत तिचा आवडता विषय होता आणि पहिल्या दोन वर्षातच तिने आपलं संस्कृतमधलं प्रावीण्य उत्तम गुणांनी पहिला वर्ग मिळवून सिध्द केलं होतं. म्हणूनच तिने पदवीसाठी तोच विषय निवडला होता. ती आता पदवीच्या पहिल्या वर्षातून दुसऱ्या वर्षांत आली होती आणि तिने नुकतेच विसाव्या वर्षांत पदार्पण केले होते.
अनुजा दिसायला सुंदर होती.संस्कृत वाङमयांत अनेक सुंदरींची वर्णने असत. तशीच ती सुंदर होती. ती खूप सधन घरातली नव्हती पण सुखी कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे लाडात वाढली होती, हे खरं. तरीही ती सुस्वभावी होती. अविनाश सरांच्या शिकवण्यामुळे त्यांच्याबद्दल तिला वाटणाऱ्या आदराच कधी कोमल प्रेमभावनांत रूपांतर झालं, हे तिचं तिलाच कळलं नाही. आताही सरांच लेक्चर ऐकता ऐकता तिच्या मनांत पुन्हा तेच विचार येऊ लागले. मैत्रिणींशी बोलतांना अनुजाच्या तोंडी नेहमी अविनाश सरांच नाव येऊ लागलं. अनुजाला सरांची फारशी माहिती नव्हती. ती एक संस्कृतची हुशार विद्यार्थीनी असल्याने सर तिला व्यक्तीशः ओळखत होते. ती सरांशी अनेकदा बोलली होती पण ते कॅालेजमधील कार्यक्रमा संबंधी किंवा अभ्यासाविषयी. आता मात्र ती सरांशी बोलण्याच्या संधी शोधू लागली होती. शेवटी तिने तिच्या खास मैत्रीणीकडे म्हणजे प्रियाकडे तें बोलून दाखवलं. अविनाश सर ज्या भागांत रहात, तिथून जवळच प्रिया रहात असे. अनुजाने आपलं मन उघड करतांच प्रिया चक्क रागावली तिच्यावर आणि गंभीरपणे म्हणाली “अनु, तू काय करत्येयस याचं भान तरी आहे कां तुला. सरांच वय तुझ्या दुप्पट आहे.
ते असो पण सरांचा विवाह झालेला आहे.”
अनुजा म्हणाली, “विवाह झालाय, हे मला माहित नव्हतं पण झाला असणार, हे ठाऊक होतं प्रिया.
तरीही मन वेडं असतं ग ! तू माझी खास मैत्रीण म्हणून फक्त तुला सांगितलं.”
प्रिया म्हणाली, “तू कुणावरही प्रेम करायला आता अल्लड नाहीस.
शाळेंत असतांना हे असं होतं बऱ्याच जणींच. नंतर विसरूनही जातात.
आता डोळे उघडे ठेवून प्रेम कर.”
कॅालेजमधील वार्षिक संमेलनासाठी एक छोटी संस्कृत नाटीका बसवण्याचं जेव्हां ठरलं, तेव्हां त्यांतील मुख्य स्त्री भूमिकेसाठी साहजिकच अनुजाची निवड झाली.
नाटीकेच दिग्दर्शन स्वतः अविनाश सर करणार होते.
नाटीकेच्या तालमी सुरू झाल्या आणि अनुजा आणि अविनाश सरांच्या भेटीचे प्रसंग दैनंदिन येऊ लागले.
जसजसा तिला त्यांचा जास्त सहवास मिळत गेला तसं तसं तिचं त्यांच्यावरलं प्रेम दृढ होत गेलं.
तिला कळत होतं की हे योग्य नाही आणि अगदी अशक्यही आहे पण तिचं मन तिला जुमानत नव्हतं.
अविनाश सरांना मात्र तशी कांही शंका सुध्दा मनांत आली नाही.
एक दिवस अनुजा एका प्रणय दृश्याची तालीम करतांना तिच्या खूप चुका होऊ लागल्या.
तेव्हां त्यांनी तिला मृदू स्वरांत विचारलं, “अनुजा, आज तुझं लक्ष दिसत नाही तालमीत. घरी कांही अडचण आहे कां ?”
अनुजा म्हणाली, “नाही सर. डोकं मात्र थोडं दुखतंय. आता मी लक्षपूर्वक करते.”
नंतर सर एक सीन समजावत असतांना नायकाने व तिने कसा अभिनय करावा हे दाखवतांना त्यांनी जवळ येऊन तिला आलिंगन दिल्याचा आविर्भाव दाखवला तर तिने एकदम त्यांना जवळ ओढून त्यांच्या छातीवर मस्तक विसावलं.
जणू समाधी लागल्याप्रमाणे कांही सेकंद ती तशीच होती पण अविनाश सरांनी तिला हलकेच दूर केले.
ते म्हणाले, “आज तालीम पुरे. आता बाकी उद्या.”
त्या दिवशी ते आग्रहाने अनुजाबरोबर गेले.
तिला म्हणाले, “तुला मी आज घरापर्यंत कंपनी देणार आहे.”
सरांनी टॅक्सी थांबवली.
वाटेत जातांना त्यांनी तिला सांगितले, “अनुजा, तू एक हुशार आणि सुंदर मुलगी आहेस.
तुझ्या मनाचा मला इतके दिवस अंदाज आला नाही पण आज मला तुझ्या वागण्यावरून वेगळीच शंका यायला लागलीय.”
अविनाश सरांनी असे म्हणताच अनुजाच्या डोळ्यात पाणी तरळले.
ती कसं बसं म्हणाली, “सर, माझ्या मनांतल्या साऱ्या भावना पोचवायला शब्द अपुरे आहेत पण ह्याच भावनांना व्यवहारात आपण प्रेम म्हणतो.
होय, सर माझं तुमच्यावर प्रेम जडलंय.”
अविनाश सर म्हणाले, “अनुजा, तुला माझी काय माहिती आहे ! माझा विवाह झालेला आहे.
माझं वय तुझ्या दुप्पटीहून अधिक आहे.
असं आंधळ प्रेम करून तू तुझं सुंदर तरूण आयुष्य वाया घालवणं चुकीचं आहे.”
अनुजा स्फुंदत म्हणाली, “सर, मला हे सर्व समजतय पण माझा ताबा नाही माझ्या मनावर.”
अविनाश सर म्हणाले, “तुला माहित नाही पण माझी पत्नी गेलं दीड वर्ष पाठीला इजा झाल्याने अपंग होऊन झोपलेलीच असते पण तरीही मी तिला कधीच माझ्यापासून दूर करण्याचा विचारही केला नाही.
जमेल तेवढी तिची काळजी मी स्वतः घेतो.
एक बाई आहेत मदतीला पण त्या मी नसतांना तिला मदत करतात.
एऱ्हवी सर्व मीच करतो.
ती अशी अपंग झाली असली तरी माझं तिच्यावर प्रेम आहे आणि ती अशी असहाय्य असतांना तिला माझी सर्वात जास्त गरज आहे.”
अनुजाच्याच कॉलेजमधला दर्शन XXXXX हा कॉलेजमधे वांड मुलगाच समजला जाई.
तो एका अतिश्रीमंत बापाचा मुलगा होता.
कॉलेज हे मौजमजा करण्याची जागा आहे, असंच तो मानत असे व तसाच सर्वांशी वागे.
त्याच्याभोवती नेहमी कॉलेजातील वाह्यात मुलामुलींच कोंडाळं असे.
प्राध्यापकांचा त्याला मुळीच धाक वाटत नसे.
तो अनुजाच्या वर्गात कधीच नव्हता पण काॅलेजमधील संस्कृत नाटीकेनंतर तो तिच्या प्रेमांतच पडला.
अनुजाला वश करून घ्यायचा त्याने चंग बांधला.
त्याच्या वृत्तीनुसार त्याचे तिला वश करण्याचे मार्गही धसमुसळे होते, जे अनुजाला पसंत पडणे शक्यच नव्हते.
शिवाय अविनाश सरांनी नकार देऊनही तिचे मन अजून त्यांच्यात गुंतलेले होतेच.
तिने सुरूवातीला दर्शनाला टाळायचे प्रयत्न केले पण जेव्हां तो उघड उघड तिच्यावर हक्क सांगून कॅालेजमध्ये तसं पसरवू लागला तेव्हां तिने त्याला नकार तर दिलाच पण त्याने त्रास दिल्यास कॅालेजकडे तक्रार करीन अशी तंबी दिली.
अविनाश सरांनी सदतीस वर्षांच्या अपंग पत्नीच्या आजारावर उपाय करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.
अनेक प्रख्यात डॉक्टर्सन भेटून झाले होते पण अद्याप आशेचा किरणही दिसला नव्हता.
अलिकडेच एका डॉक्टरांनी ह्यावर आधुनिक शस्त्रक्रियेने उपाय होणे शक्य आहे असा सल्ला दिला होता.
अशी शस्त्रक्रिया फक्त युएसए मधील एका विशिष्ट हॉस्पिटलातच होईल व त्यासाठी अंदाजे पस्तीस-चाळीस लाख खर्च येईल असा अंदाज दिला होता.
एवढी मोठी रक्कम अविनाश सरांना परवडणारी तर नव्हतीच पण तेवढी रक्कम उभी करणेही त्यांना कठीण होते.
ते चिंतित होते.
कॅालेजमधील सर्वांना आता हे माहित झाले होते की सरांची पत्नी अशी बिछान्याला खिळलेली आहे.
सरांपुढला पैशांचा प्रश्न मात्र फारसा कुणाला माहित नव्हता.
अविनाश सरांच्या एका शेजाऱ्याकडून तो प्रियाला कळला.
ती अनुजाला म्हणाली, “अनु, सरांपुढे मोठी समस्याच आहे.
अंथरूणाला खिळलेल्या पत्नीसाठी तुझ्यासारखं रत्न त्यांनी नाकारलं.
आतां पत्नीचा उपाय करायला एवढे पैसे कसे उभे करणार ते ?”
अनुजाला प्रियाकडून सरांची अडचण समजली.
नेहमीप्रमाणे दर्शन अनुजाला सतावायला आला तर अनुजा त्याला म्हणाली, “दर्शन, मला तुझ्याशी एकट्याशी कांही बोलायचं आहे.”
दर्शनने बरोबरच्या सर्वांना जायला सांगितले.
तो नाटकीपणे म्हणाला, “बोल, काय हवंय तुला, मेरी जान ?”
अनुजा म्हणाली, “दर्शन, तू चाळीस लाख रक्कम उभी करू शकतोस ?”
दर्शन हंसला, “उभी करू शकतोस ? आडवी तिडवी करू शकतो.
माझ्या स्वतःच्या अकाउंटलाच मला नानीकडून मिळालेले कांही कोटी रूपये आहेत.
बाबांच्या वारसदार म्हणून मिळेल, ती संपत्ती वेगळी.
अनु, कां ग ? तुला काय जरूरी चाळीस लाखांची ?”
अनुजा म्हणाली, “तुझं माझ्यावर प्रेम आहे ना !”
दर्शन म्हणाला, “कसं पटवू हे तुला, बोल.”
अनुजा म्हणाली, “दर्शन, अविनाश सरांची पत्नी अंथरूणाला खिळलेली आहे.”
दर्शन म्हणाला, “मी ऐकलय त्याबद्दल.”
अनुजाने विचारलं, “त्यांना देशील पत्नीच्या आजारावर उपाय करण्यासाठी, एकरकमी चाळीस लाख ?”
दर्शनने क्षणभर विचार केला आणि म्हणाला, “अनु, ही तुझी विनंती आहे की त्यांची, मला माहित नाही.
तुझ्या शब्दाखातर मी त्यांना एक रक्कमी चाळीस लाख देईनही पण त्यांचा स्वाभिमान त्यांना ते घेऊ देईल कां ?”
अनुजा त्याला म्हणाली, “तीच तर तुझी परीक्षा आहे.
तू पास झालास तर मी तुझी व्हायला तयार आहे.”
दर्शन कसाही असला तरी तिच्या विनंतीमागचं कारण “तिचं सरांवरलं प्रेम” हे त्याच्या लक्षांत आल्याशिवाय राहिलं नाही.
त्याने तिकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं.
तो जाऊन अविनाश सरांना भेटला.
तो म्हणाला, “सर, तुम्हाला वहिनींच्या उपचारासाठी मोठी रक्कम हवी आहे, असं ऐकलय. खरं आहे कां ते ?”
सरांनी विषण्ण आवाजात सांगितले, “खरं आहे.”
दर्शन म्हणाला, “मी तुम्हाला मदत केली तर चालेल ?”
सर दर्शनविषयी ऐकून होते.
ते सावधपणे म्हणाले, “हा विचार तुझ्या मनांत कसा आला ?”
दर्शन उत्तरला, “चांगले विचार सुचतात कुणालाही !”
सरांनी सांगितलं, “घेईन तुझी मदत पण मी पैसे जमेल तसे परत करणार, ह्या अटीवर घेईन.”
दर्शन म्हणाला, “ठीक आहे जमतील तसे परत करा.
मी तरी कुठे दान करतोय ?”
लौकरच सर आपल्या पत्नीला घेऊन युएसएला गेले.
तिथल्या हॅास्पिटलमध्ये पत्नीची शस्त्रक्रिया झाली आणि सुमारे आठ महिन्यांनंतर सर परत आले.
विशेष म्हणजे त्यांची पत्नी स्वतःच्या पायांनी चालत त्यांच्याबरोबर आली.
ह्या आठ महिन्यात त्यांचा दर्शनबरोबर अधून मधून संपर्क होता पण तो फोनवरच.
दर्शनच त्यांना फोन करत असे.
सर कांही दिवसांनी कॅालेजमधील हजर झाले.
जेव्हा ते वर्गांत शिकवायला गेले, तेव्हां त्यांना अनुजाची गैरहजेरी जाणवली.
प्रियानेच त्यांना माहिती दिली, “सर, अनुजाने दर्शनबरोबर लग्न केलं आणि ती दोघं आता कॅनडात कायमची रहायला गेली आहेत.”
सर आश्चर्यचकीत झाले.
त्याच दिवशी त्यांना कॅनडाहून दर्शनचा फोन आला.
त्याने विचारलं, “सर, ॲाल वेल ना ?”
सर म्हणाले, “येस्स, ॲाल वेल. पण दर्शन तू आणि अनुजा…”
दर्शन म्हणाला, “सर, तुमचं तुमच्या पत्नीवरचं निस्सीम प्रेम आणि तसंच अनुच तुमच्यावरच प्रेम पाहून मीही माझ्या प्रेमाच्या सीमा वाढवल्या.
मी अनुजाला स्पष्ट सांगितलं, ‘सरांना मी मदत केली, त्या उपकारांतून मी तुला मुक्त केली आहे.
त्यासाठी माझ्याशी विवाह करण्याची जरूरी नाही.
तुझ्या आयुष्याचा निर्णय तूच कर.’ ती म्हणाली, ‘सरांनी आणि तू सुध्दा मलाच निरपेक्ष प्रेमाचे धडे दिलेत.
मीही तुझा स्वीकार नाईलाज म्हणून नाही करत, प्रेमाने करत्येय.’ बोला सर तिच्याशीच.”
तिच्याशी बोलता बोलता सर संस्कृत वाङमयात ह्या सत्त्यकथेशी जुळणारी कथा आहे कां, हे आठवू लागले.

*- अरविंद खानोलकर.*
सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. साम्य आढळल्यास योगायोग समजावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..