आज कैवल्याला कामाचा लोड आला होता. ती एका खाजगी हॉस्पिटलातील नर्स. आणि तिची ड्युटी आक्सिडेंट अँड इमर्जन्सीत होती. आपघातातला अत्यवस्थ पेशंट हॉस्पिटलमध्ये सर्व प्रथम, तेथील नर्सच्याच सम्पर्कात येतो. काम जोखमीचं, मानसिक आणि शारीरिक, ताण आणणार असते. जो हे काम करतो त्यालाच ते समजेल!
रिसेप्शन काउंटरवरून तिला निरोप मिळाला. कोणाचा तरी फोन आला आहे. या इमर्जन्सी वॉर्डात मोबाईल वापरता येत नाही. हॉस्पिटलचा तसा नियमच असतो. म्हणून तिला, तिचा मोबाईल लॉकर मध्ये ठेवावा लागला होता.
ती रिसेप्शनला गेली. लॅण्डलाइनचा बाजूला काढून ठेवलेला रिसिव्हर, तिने कानाला लावला.
“हॅलो?”
“कोण? कैवल्याचं ना?”
“हो बोलतीयय!”
“मी दामिनी, ‘विद्या विहार’ शाळेतून बोलतीयय! रेवा तुमचीच मुलगी ना?”
“हो! काय झालाय?”
“तुम्हाला ताबडतोब शाळेत यावं लागेल! गेल्या तासाभरापासून तुमच्याशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहोत आम्ही!” दामिनीचा आवाज, कैवल्याला कठोर वाटला.
“बापरे! रेवा, बरी आहे ना? आजारी वगैरे पडलेली नाही ना, का खेळताना पडून जखमी झालियय?”
“तसे काही झालेले नाही! ती अगदी खुशाल आणि टुणटुणीत आहे!”
“मग, काय प्रॉब्लेम आहे?”
“तुमच्या मुलीने मारा-मारी केलीय! प्रकरण गंभीर आहे. लवकर या!”
“हे पहा, दामिनी मॅडम, मी इमर्जन्सी वॉर्डात आहे. दोन तासात माझी ड्युटी संपेल. ड्युटी संपली कि लगेच येते शाळेत. प्लिज तोवर सांभाळून घ्या!”
“बघा! परिणामाची जवाबदारी तुमची असेल! मग आमच्या शाळेला दोष देऊ नका!” ती दामिनी तुसड्या आवाजात म्हणाली आणि फोन कट केला.
०००
कैवल्या खरे तर खूप दमली होती. पण शाळेत जाणे गरजेचे होते. या कार्टीने काय गोंधळ घातला कोणास ठाऊक? नाही तरी, हिची दादागिरी हल्ली वाढलीच आहे.
तिने शाळेच्या ऑफिस मध्ये प्रवेश केला.
टेबलाच्या समोर खुर्ची घेऊन, एक उर्मट माणूस ,सभ्य पोशाखात बसला होता. ते या शाळेचे प्रिन्सिपॉल शामराव होते. एकुलती एक बाई, म्हणजे फोनवर बोलणारी दामिनी असावी. एक, तरुण शिक्षक मागे हात बांधून उभा होता. एक जोडपे आपल्या सोळा-सतरा वर्षाच्या मुलाला घेऊन उभे होते. ते तिच्या कडे खाऊ का गिळू नजरेने पहात होते. मुलाचे नाक लाल भडक झाले होते. त्यातून रक्तही निघाले असावे. सकाळलेल्या रक्ताचा ओघळ दिसत होता. त्याचे मायबाप संतापलेले दिसत होते.
आणि एका कडेला आरोपी सारखी, रेवा खाली मान घालून, निरागसपणे उभी होती.
“या, कैवल्या मॅडम. शेवटी तुम्हास वेळ मिळाला तर?” दामिनी कुचकेपणाने म्हणाल्या.
“सॉरी, माझ्या मुळे तुम्हा सगळ्यांना तिष्ठत राहावे लागले. पण काय करू? एका सात वर्षाचा कोवळ्या मुलीवर, तिच्याच आईने संतापाच्या भरात चाकूने वार केले होते. चाळीस टाके पडलेत. वर पोलिसांची चौकशी, त्या मुले वेळ झाला.”
“ओके. हे, रेवाच्या वर्गावर असलेले शिक्षक! यांच्याच देखत सगळा प्रसंग घडलाय! मी, तुमच्या रेवाची क्लास टीचर, दामिनी. आणि हे शामराव सर! शाळेचे प्रिन्सिपॉल!” कैवल्याने सगळ्यांना हात जोडून नमस्कार केला.
“पण, झालंय काय?” कैवल्याने हळूच विचारले.
“तुम्हीच सांगा सर, तुमच्या समोरच सगळं घडलंय!” त्या तरुण शिक्षणाकडे निर्देश करत दामिनी म्हणाल्या.
“काय झालंय? तुमच्या या रेवाने माझ्या देखत, या मुलाच्या नाकावर, दोन जबरदस्त ठोसे मारले! त्याचा नाकातून रक्त आले. वरचा ओठ पण सुजलाय! पहा तुमच्या डोळ्यानेच पहा! मी मध्ये पडलो म्हणून, बरे झाले! नसता या बिचाऱ्याची काही खैर नव्हती! तुम्ही तुमच्या मुलीला नीट वळण का नाही लावत?”
“नाकावर ठोसा? पण का?”
“काही विशेष नाही! या पोराने तिच्या ब्रेशीयरच्या पट्टीला गमतीने हात लावला होता.”
“काय?” कैवल्या शॉक झाली. तिने एकवार सभोवतालच्या लोकांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवली. सगळ्यांची सहानभूती त्या जखमी पोराकडे होती, हे स्पष्ट तिला जाणवले. रेवाला, केवळ आरोपीचं नाहीतर शिक्षाहि, त्यांनी मनात ठरवली असावी.
नको ते होणार होते!
तिने रेवाकडे पहिले. पश्चतापाचा लवलेशहि तिच्या डोळ्यात नव्हता!
“रेवा! तू फाईट केलंस?”
“हो! दोनच मारले फक्त! अन सर मध्ये पडले!”
“आग, पण का?”
“आधी त्याने माझा ब्रा पाठीमागून ओढला. मी त्याला तसे न करण्यास सांगितले.”
“मग?”
“मग, त्याने पुन्हा तेच केलं! आणि घाणेरडं हसला!”
“मग?”
“मग, मी या सरांना सांगितलं!”
“मग?”
“ते म्हणाले, दुर्लक्ष्य कर!”
“मग?”
“मग तर त्याने इतक्या जोरात ओढलं कि, माझी ब्रा तुटून निघाली! मग मलाही राग आला, मी दिले दोन ठोसे ठेवून!”
“सर, हि म्हणते ते खरं आहे ना?”
“हो, म्हणजे त्याने गमतीने तसे केले असेल. बाकी मला माहित नाही, पण तिने ठोसे मारलेले मी पाहिलेत!” तो तरुण शिक्षक चाचरला.
कैवल्यला परिस्थितीची जाणीव झाली.
“गमतीने? काय लावलंय तुम्ही? गमतीने? मग गमतीने, या पोराला या दामिनी मॅडमचा ब्रा ओढायला लावा! नाहीतर माझा! ये पुढे ये, पोऱ्या! आम्ही आमच्या मुली तुमच्या विश्वासावर शाळेत पाठवतो. आणि येथे हे असे? आहो, शिक्षकाने हे असे घडू द्यायचे नसते. तुम्ही का नाही थांबवलंत, या टोणग्याला? वर म्हणे ‘दुर्लक्ष कर!’ मी फक्त या पोरावर ‘विनयभंगाचा’ FIR दाखल करणार होते! आता या शिक्षकाचेही नाव घालते! यांनी या बेलगाम कार्ट्याला प्रोच्छाहन दिले म्हणून!” कैवल्याचा अवतार पाहून तेथील शिक्षकाचे धाबे दणाणले. त्या पोराच्या आईने तर गळाच काढला. बाप संताप आणि अपमानाने होरपळून निघत होता!
“हे पहा, कैवल्या मॅडम! अश्या सिरीयस नका होऊ! नकळत वय असत. एक छोटीशी ‘सॉरी’ म्हणून हे प्रकरण आपण संपवू! शाळेच्या इभ्रतीचा प्रश्न आहे!”
“इतकी इभ्रत प्यारी असेल ना तर, ज्या शिक्षकाला ‘वळण!’ आहे असे जवाबदार, उमेदवार निवडत जा! लहान नकळत वय, म्हणून काही वर्गातल्या पोरींशी गैरवर्तणूक करायची परवानगी नसते!”
“मॅडम! प्लिज. काहीही झालं तरी रेवाने, एका मुलाला असं मारणं योग्य नव्हते! पण ते जाऊ देत! रेवाला! सॉरी म्हणायला सांगा! प्रकरण वाढवण्यात अर्थ नाही!” शामराव मोठ्या मनाने म्हणाले.
“नो! रेवा सॉरी म्हणणार नाही! ती अन्यायाशी लढली आहे! मी हेच ‘वळण’ तिला लावलय! आणि टोणग्या ऐक, पुन्हा माझ्या रेवाच्याच काय, कोणत्याही पोरीची छेड काढली तर याद राख! पोलीस कोठडीत घालीन! आणि स्वतःला शिक्षक म्हणवणाऱ्यानो, या पवित्र पेशाला कलंक लागू देऊ नका!”
रेवा, आणि कैवल्या ऑफिसातून केव्हा निघून गेल्या कोणालाच कळले नाही.
कैवल्याने शाळेच्या बोर्डऑफ डिरेक्टर्सना रीतसर कळवले. त्या तरुण शिक्षकास नारळ मिळाला होता. रेवाची तुकडी बदलून दिली होती.
आता पोलिसांच्या रडारवर ती शाळा आली होती.
हि झाली गोष्ट.
खरेच आज अश्या ‘आई’ गरजेची आहे काय?
प्रत्येक पोराला ‘पराठे’ आणि मुलींना ‘कराटे’ आले पाहिजेत. हि आजची गरज होऊ पहात आहे.
बेफिकीर मायबाप, मोकाट पोर, नवतारूण्याचा माज(जोश असायला हवा!) हे कोण अन कस आवरायचं? प्रश्न आपलेच आहेत. आज दारात असतील. उद्या घरात येतील! उत्तर शोधायला हवीत.
— सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे. पुन्हा भेटूच. Bye.
(मूळ कल्पना नेट वरून)
Leave a Reply