अमेरिकेत गेल्यावर सुरुवातीच्या काळात मी टीव्हीसमोर बसून वृत्तनिवेदक ज्या पद्धतीनं उच्चार करेल त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करत अमेरिकन इंग्रजी उच्चार आणि idioms शिकत होतो. याचाच साईड इफेक्ट म्हणून मला CNN, ABC,FOX NEWS, BBC आदी वाहिन्या कशा विचार करतात त्याच्याबद्दल बरच नको ते ज्ञान प्राप्त झालं. 2003- 2004 ला आम्ही विचारपूर्वक आमच्या घरातल्या टीव्हीला हद्दपार केलं ते आजतागायत.
व्हायचं काय की सकाळी ऑफिसला जायच्या आधी बातम्या आणि मुख्यत्वे वेदर काय आहे म्हणून टीव्ही चालू केला की हेलिकॉप्टरमध्ये बसलेली वार्ताहार शिकागोच्या फक्त भयंकर बातम्या द्यायची. आमक्या ठिकाणी शूटआउट झालं, तमक्या ठिकाणी पोलीस चेस चालू आहे, इथे एक्सीडेंट झाला आहे वगैरे. त्यामुळे शिकागो फार भयंकर शहर आहे असाच गैरसमज होऊ लागला. हे म्हणजे हत्ती आणि आंधळ्याच्या कथे सारखं होत. टीव्हीला हद्दपार केल्यावर म्हणजेच न्यूज चॅनेलला काढून टाकल्यावर आमच्या घरी टीव्ही monitor होता तो मुख्यत्वे नेट फ्लिक्स DVD पाहण्या साठी वापरला जाऊ लागला. तेव्हा नेटफ्लिकस एकावेळी तीन DVD पोस्टाने पाठवायचं हे अनेकांना माहित नसेल. त्यांचा बिजनेस तशा पद्धतीने सुरू झालेला आहे. हे केवळ अमेरिकन पोस्टल सर्व्हिस आणि प्रामाणिकपणे डीव्हीडी परत करणारी लोक असल्याने होऊ शकले. आज Netflix हॉलीवुड पेक्षा देखील मोठे आहे. तसेच अमेरिकन लायब्ररीतून एकावेळी 14 डीव्हीडी आणि मला वाटतं तितकीच पुस्तक मिळू शकत. आमच्या दोघांच्या मिळून 28 डीव्हीडी एकावेळी आणता यायच्या. अर्थात एवढ्या आम्ही एका वेळी कधी आणलेल्या नाहीत. (कॉन्टिटी पेक्षा क्वालिटी महत्वाची असं क्लीशे वाक्य अाठवा) लायब्ररीतून मिळणारे जगाच्या पाठीवरचे ग्रेट ते फालतू असे कुठलेही सिनेमे व सिरीयल यांचा भरपूर खजिना आम्हाला मिळाला. आम्ही दोघांनी अमेरिकन लायब्ररीमध्ये उत्कृष्ट पुस्तक, DVD शोधण्याचं मेडिटेशन फार नियमित पणे केलं. माउंट prospect आणि डेस प्लॅन्सच्या भव्य लायब्ररी मी खूप मिस करतो. कितीही लोक असली तरी खूप शांतता असते. मन आपोआपच शांत होते. कुठल्याच लायब्ररीला मंथली फीस नसते. मात्र लेट फिस जबरदस्त. लायब्ररीहा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. माझ्या सिनेमा च्या डीव्हीडीज या लायब्ररीमध्ये आल्या तेव्हा मला जो काय आनंद झाला होता.
प्रत्येक खेपेला रॅकमध्ये डीव्हीडी नाही हे बघून मी खुश व्हायचो आणि असेल तर अर्थात… असो.
अमेरिकन न्यूज चॅनेल्स ला घराबाहेर काढलं आणि खरं सांगतो आमच आयुष्य समृद्ध झालं. विचार करा एखाद्या देशात तुम्ही नवीन आहात आणि जर पद्धतशीरपणे fear mongering चालू असेल तर तुमची मानसिक अवस्था काय होईल? लवकरच टीव्ही वाचून आमचं काहीच आडेना. उलट मी तर म्हणेन मानसिक स्वास्थ्य वाढलं. महत्त्वाच्या बातम्या तशाही आजूबाजूला इंटरनेटवर दिसायच्या. जगातले सर्व भाषांतील उत्कृष्ट सिनेमे, डॉक्युमेंटरी, विविध कला, माहिती यांचा खजिना अमेरिकेने आपल्या जनतेसाठी उपलब्ध करून दिला आहे. तुम्ही वाटेल ते मागा त्या लायब्ररीमध्ये असणार आणि नसेल तर ते दुसऱ्या लायब्ररीतून मागवून देतील किंवा विकत घेतील. आमच्या लायब्ररीमध्ये तबला शिकवणारी डीव्हीडी नव्हती, मी त्यांना सांगितलं की हे मिसिंग आहे त्यांनी ताबडतोब तबला शिकवणाऱ्या DVD विकत घेतल्या. अमेरिकन लायब्ररी सिस्टीम वर एक स्वतंत्र लेख लिहायला हवा.
आता कबीर मोठा होतोय त्याला कार्टून चॅनेल बघू देण्यासाठी मोठी स्क्रीन म्हणून टीव्ही चालू करावा का नाही याचा आम्ही विचार करतो आहोत. बघू.
मला एक नेहमी वाटतं आपण मराठी माणसं सकाळी घरामध्ये छान संगीत लावतो. अभंग लावतो. उत्तम स्वरांनी वातावरण पवित्र करतो. तेच आपण संध्याकाळी टीव्ही सिरीयल, सो कॉल्ड टीपेच्या आवाजातल्या बहुतांशी बिन बुडाच्या ईशू वरील चर्चा मधून भांडणाचे, द्वेषाचे विषारी स्वर घरात आणतो.
किती आणि काय बघायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एक मात्र खरे की मेंदू छान वाचून, ऐकून आणि पाहून पोसायचा की बिना बुद्धीच्या बैलांना बरळताना पाहून नासवायचा हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे.
@सत्यजित खारकर
Leave a Reply