जीवनांच्या चक्रांत, आयुष्याच्या मार्गांत कोणतीही एखादी गोष्ट, संकल्पना परिपूर्ण असूच शकत नाही. कोणतीही घटना घडते त्याला तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक वातावरण जे निसर्ग निर्मीत असते. दुसरे परिस्थिती जी मानवनिर्मीत असते. आणि तीसरे कारण मानवी वैयक्तीक स्वभाव. याचाच परिपाक म्हणजे घटनांची निर्मिती. त्यामुळे त्यांत भिन्नता आणि मर्यादा असेलच. भले ते केवढे महान व जीवनाला यशस्वी करणारे असो. त्यांत मानवी मर्यादा येतीलच. फक्त ईश्वरी तत्त्वच परिपूर्ण असते. असे म्हणतात की प्रत्येक व्यक्ती ही एक वैशिष्ठपूर्ण ईश्वरी निर्मिती असते. कोणतेही कार्य मग ते केवढेही महान असो. जर मानवी मर्यादांच्या क्षमतेमधील असेल तर ते कुणीही करु शकतो. ही नैसर्गिक देणगी आहे. फक्त दुर्भाग्याने हे तत्वज्ञान व्यक्ती समजत नाही. अंगीकारत नाही. तसा त्याचा प्रयत्न होत नसतो.
इतरांचे विचार, इतरांची समज ही तुमच्यासाठी फक्त ‘ मार्गदर्शक ‘ ह्या संकल्पनेंत असावी. एखाद्याचे त्या प्रांतातले यश देखील एक उदाहरण म्हणून असावे. मात्र हाच केवळ एकमेव सत्याचा मार्ग सर्वासाठी असू शकत नाही. जर प्रत्येकजण आपल्यापरी वैशिष्ठपुर्ण आहे, तर व्यक्तीने आपला मार्ग, ध्येय हे स्वतःच्या आत्म्याला साक्षी ठेवितच चेतवावे. कारण ते आन्तरीक सत्य, हेच फक्त त्याच्यासाठी एकमेव सत्य असेल. इतरांसाठी मार्ग दर्शनपर. कदाचित तो मार्ग आगदी त्याच पद्धतीने हाताळता येणे शक्यच नसते. त्यांत कोठेतरी कांहीतरी भिन्नता येणारच.
‘सदैव ईश्वरी नामस्मरण करावे’ हा संदेश माझ्या बुद्धीने, विचारांनी त्याला मान्यता दिली. कां कुणास ठाऊक माझा आत्मा मात्र शासंक होता. कुणाचे नामस्मरण ? कुणी त्याना बघीतले ? कुणी हे सत्य अनुभवले ? व जर हा अनुभव असेल तर हे फक्त त्याचे त्याच्यासाठीचे सत्य असेल. हे नैसर्गिक सत्य कसे असेल. हा एक मार्ग ठरु शकेल. पण पुन्हा तोच मार्ग चालणे केवळ अशक्य. उत्पन्न होणारे अनुभव देखील भिन्न असतील ना ?. जरी ध्येय ( Aim ) हे एकच असले तरी.
पुन्हा प्रश्न उत्पन्न होतो की कोणते ध्येय ? ईश्वर दर्शनाचे, अनुभवाचे, सान्तवनाचे, ईश्वरांत एकरुप होण्यांचे. खुप द्विधा मनस्थीती झाली. ईश्वराने, निसर्गाने मला त्याच्यापासून वेगळे काढले ते कशासाठी ? पुन्हा त्याच्यांतच मिसळण्यासाठी. एकरुपता तर होतीच की. मग भिन्नता कशासाठी निर्माण केली गेली. निसर्गाचे त्या जीवाचे चक्र पुर्ण करण्यासाठी. हेच ते प्रयोजन. मुल. ते आईच्या सान्नीध्यांत फार अल्प काळासाठी असते. पोटचा तो गोळा. आईचे एक अंग. तीच्याशी एक रुप झालेला. वाढत वाढत मातेच्या शरीरामधून वेगळे अस्तित्व निर्माण केले गेलेला. काळाच्या चक्रांत संपुर्ण वेगळा केलेले. आता तर त्याचे सर्व व्यवहार, दैनंदिन अस्तित्व भिन्न होऊन जाते. आपले जीवन स्वतंत्र व आपल्याच पद्धतीने ते जगते. सर्व जीवनाचा खेळ खेळून व्यक्ती बनुन शेवटी विश्रांतीसाठी त्याच ईश्वरी तत्वात विलीन होऊ इच्छीते. हेच त्याचे ध्येय असते. विश्रांति, पुन्हा खेळणे, अर्थांत आता खेळ वेगळा, वातावरण भिन्न. सारेच निराळे.
नामस्मरणाचा उद्देश कोणता ? लयबद्धता (वा मग्नता) आणि आठवण. त्या ईश्वराची आठवण काढीत एका लयबद्धतेमध्ये विलीन होणे. इष्ठ देवतेच्या सतत आठवणीत राहणे. परंतु खोलवर विचार केला तर हे दोन्ही साधणे आवघड नव्हे , अशक्य वाटते.
Leave a Reply