८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री ८ च्या सुमारास विद्यमान पंतप्रधान माननीय श्री . नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटांची त्या मध्यरात्री पासून कायदेशीर मान्यता संपुष्टात येईल असे जाहीर केले . आणि ती संपुष्टात आलीही . नंतरच्या काळात आधी अस्तित्वात नसलेल्या २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या . ५०० रुपयांच्या नवीन नोटा ही यथावकाश सर्वसामान्य नागरिकांना हळूहळू मिळू लागल्या आणि त्या त्यांच्या आर्थिक व्यवहारात फिरू ही लागल्या . २००० रुपयांच्या नोटेचे सुटे मिळणे हा आधी त्रासाचा आणि नंतर काही प्रमाणात विनोदाचा असणारा विषय अनुभवाचा भाग झाला . १००० रुपयांच्या नवीन नोटा ही येणार अशी चर्चा जरी सुरु असली तरी त्याला अधिकृत सूत्रांकडून अजून तरी दुजोरा मिळालेला नाही .
दरम्यानच्या काळात रोकड – विरहीत अर्थव्यवस्थेकडे ( आपल्या नेहमीच्या मराठी मधे बोलायचे तर ” कॅश – लेस एकॉनमी ” ) भारतीय अर्थव्यवस्था नेण्याची चर्चा आणि प्रक्रिया ही जोमात सुरु झाली . ” कॅश – लेस एकॉनमी ” कि ” लेस – कॅश एकॉनमी ” असे शाब्दिक , तात्विक , बौद्धिक , व्यावसायिक , व्यावहारिक सामने खेळून झाले . त्यात कधी सहभागी होत , अनेकदा पूर्णपणे दुर्लक्ष करत सरकारी पातळीवर ही योजना अंमलात आणण्याचे ( राबवले जाण्याचे मुद्दामच म्हणले नाही )प्रयत्न सातत्याने केले जात आहेत . ” लकी ग्राहक योजना ” आणि ” डिजी धन मेळा ” या योजना देशभर अंमलात आणण्यात येत आहेत . UPI , USSD , AEPS , Rupay Card , Digital Wallets असले शब्द सर्वसामान्य भारतीय नागरीकांच्या आधी दररोजच्या वापरातील शब्द – कोशांचा आणि नंतर धीरेधीरे दररोजच्या व्यवहारांचा हिस्सा बनू लागले .
हा निर्णय एका अर्थाने ” क्रांती ” असला किंवा ” नसला ” तरी ही नवीन व्यवहार – पद्धति आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतली ” उत्क्रांती ” नक्कीच आहे .
आजमितिला याबाबत जाणवण्याइतका झालेला महत्वाचा बदल म्हणजे आता हा निर्णय हे आपले अटळ विधिलिखित आहे हे मान्य होत आहे . एखाद्याला सैद्धांतिक द्रुश्त्या ही गोष्ट कितीही अमान्य असली तरी आता हे अटळ आहे ही जाणीव मूळ धरू लागली आहे . सरकार आणि विरोधक या दोन्ही बाजूनी गेल्या दोन – अडीच महिन्यात हा विषय असा काही लावून धरला कि आता त्याची अंमलबजावणी हा एक प्रतिष्ठेचा मुद्दा बनला . त्यातून एक गोष्ट अशी झाली कि राजकारण हा पूर्णवेळचे काम नसलेले तुमच्या – माझ्या सारखे सामान्यजन हा निर्णय आपण आपल्या आयुष्यात कसा अंमलात आणू शकू याचा जास्त सक्रियतेने विचार करायला लागलो . त्यामुळे चर्चा कमी आणि काम जास्त हा प्रकार सुरू झाला . त्यामुळे ATM मधून पहिल्यांदा २५०० रुपये , नंतर ४५०० रूपये आणि आता १०००० रूपये एका वेळेस काढता येणॆ शक्य होणे आपण मोकळ्या मनाने स्वीकारू लागलो . यात ” गरजवंताला अक्कल नसते ” असे म्हणणारे नसतीलच असॆ नाही .
पण प्रा . वसंत कानेटकर यांच्या ” हिमालयाची सावली ” या जुन्या नाटकाचा नायक जसे ” विचारांती असॆ ठरते कि . . . ” असॆ म्हणतो तसेच सध्याचे केंद्र सरकार म्हणत आहे कि काय असे वाटू लागते . ते नाटक स्त्री – शिक्षणाचे मूलभूत काम करणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आयुष्यावर आधारित आहे . त्यावेळी हा विषय काळाच्या पुढे असणारा वाटत होता . निदान तत्कालीन समाजाच्या विचार – आचार आणि समज यांच्यापेक्षा वेगळा नक्कीच होता . पण त्यावेळी चिकाटीने आणि धाडसानी महर्षी कर्व्यानी ते केले . त्यातून नंतरच्या काळात आपला समाज बदलला . सुधारला . विद्यमान केंद्र सरकारच्या नोटा – बदलिच्या निर्णयाने आपली आर्थिक व्यवहारांची पध्दती बदलेल . बदलू शकेल . त्यामुळे हा निर्णय जाहीर झाल्यापासून माझ्या मनात सारखे येते कि कालांतराने नोटा – बदलीच्या या निर्णयाकडे बघताना , किंवा बोलताना , विद्यमान सरकार आणि / किंवा भाष्यकार ” विचारांती असे ठरते कि . . . . ” असे म्हणू शकतील का ? ( त्या नाटकात तो नायक ” विचारान्ती असे ठरते की . . . ” असे जरी वारंवार म्हणत असला तरी बहुतांश वेळी तो निर्णय त्याचा एकट्याचाच असायचा . . . . अर्थातच त्याचा तेवढा तजुर्बा ही . . . . )
असे वाटण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या निर्णयाने आपल्या सगळ्यांची व्यवहार करण्याची , आर्थिक व्यवहार करण्याच्या पद्धतीबद्दल विचार करण्याची सवय बदलावी लागेल . या निर्णयाने एखादा व्यवहार करू नका असे सरकार सांगत नाहीये तर तो व्यवहार अशा पद्धतीने करा इतकेच सांगत आहे . हा प्रकार आपल्या देशात काही पहिल्यांदाच होत नाहीये . आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्रात Depositoryचा कारभार सुरू होण्याआधी सर्वच भारतीय गुंतवणूकदार त्यांनी गुंतवणूक केलेले शेअर्स कागदी प्रमाण – पत्रांच्या ( Physical Share Certificates ) स्वरूपात सांभाळत होते . Depository चा कारभार सुरू झाल्यावर शेअर्स कागदी प्रमाण – पत्रात नसतात असे नव्हे ; फक्त ” डिमेट ” Dematerialised स्वरूपात सांभाळून त्यांचे व्यवहार करणे आणि त्यांची नोंद ठेवणे सर्वांनाच , अगदी सर्वच संबंधित मंडळीना सोयीचे जाते .
जे काम शेअर – बाजारातील शेअर्स सर्टिफिकेटस बाबत Dematerialisation ने केले तेच काम काही प्रमाणात इतर व्यवहारांबाबत Demonetisation करू इच्छित आहे . त्याच्या यशस्वी अंमलबजावणी साठी आधी आपली विचार करायची आणि नंतर प्रत्यक्ष व्यवहार करण्याची पद्धत बदलणे गरजेचे आहे .
असा बदल करायचा हा मुद्दा आला कि आपल्या देशाचे माजी पंतप्रधान माननीय श्री . अटलबिहारी वाजपेयी ( अटलजी ) यांच्या भाषणातल्या एका वाक्याची मला हमखास आठवण येते . ” हमे तारीख नही ; तवारीख बदलनी हैं ” हे ते वाक्य .
तवारीख म्हणजे विचार करायची पद्धत . तवारीख म्हणजे व्यवहार करण्याची पद्धत . तवारीख म्हणजे निर्णय घेण्याची पद्धत . तवारीख म्हणजे कारभार करण्याची पद्धत .
हे सगळे या नोटा – बदलीच्या निर्णयालाही तंतोतंत लागू पडते याबाबत कोणाचेच दुमत होण्याचे कारण नाही .
१९७५ साली लागू झालेली आणीबाणी उठल्यानन्तर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आमच्या डोम्बिवलिच्या सभेत अटलजीनी हे वाक्य म्हणले होते हे मला अजून आठवत आहे . त्यावेळी रात्री बारा वाजेपर्यंत प्रचाराची परवानगी असॆ . त्यादिवशी अटलजी डोम्बिवलिच्या सभेत पोचले तेंव्हाच रात्रीचे बारा वाजायला जेमतेम १५ – २० मिनिटे बाकी होती . त्या सभेत अटलजी भाषणाला उभे राहताच पोलीस आधिकार्यानी वेळेच्या मर्यादेची अटलजीना आठवण करून दिली . दिल्या वेळेत आपले भाषण पूर्ण करणाऱ्या त्या भाषणातले अटलजीन्चे भाषणातले पहिले वाक्य होत . . . . . ” तारीख नही ; तवारीख बदलनी हैं . ”
राजकीय आणीबाणी उठल्यावरच्या त्या भाषणातले हे वाक्य आर्थिक आणीबाणी येऊ नाही म्हणून वेळेआधीच घेतलेल्या निर्णयाला लागू पडणारच ना . . .
नोटा – बदलिच्या निर्यणाबद्दल तशी अपेक्षा निश्चितच आहे . आपले आर्थिक निर्णय आम्ही आमच्या सोयिने घेऊ ; परकीय दबावानी नाही हा वैचारिक बदल ( तवारीख ) सुचवनारा हा निर्णय आहे .
आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था आता सेवा – क्षेत्र प्रधान आहे आणि आपले सेवा – क्षेत्र हे तरुणाई – प्रधान आहे . त्यामुळे ते , त्यांच्या सवयी केंद्र – बिंदू मानून धोरणे आखली जातील हा व्यावहारिक बदल (तवारीख ) सांगणारा हा निर्णय आहे .
नोटा – बदलीच्या निर्णयांच्या संदर्भात अटलजी आणखीन एका कारणासाठी मला आठवतात . मोदी सरकारच्या या निर्णयांच वर्णन अनेकांनी अनेकदा ” सर्जिकल स्ट्राइक ” असॆ केले आहे . सध्या तो शब्द चलनात आहे . त्या शब्दाचा TRP सॉलिड आहे म्हणून तो वापरणे कदाचित बरोबर ही असेल . त्यात बड्या – बड्या मंडळीनी त्या निर्णयांच तसे वर्णन केल्यावर मी पामर माणूस काय म्हणणार ?
पण खरं म्हणजे , मोदी सरकारच्या नोटा – बदलीच्या निर्णयांची तुलना अटलजी ( वाजपेयी ) सरकारच्या ” पोखरण अणुचाचण्या ” च्या निर्णयाशी करणे जास्त सयुक्तिक होईल . या दोन्ही निर्णयाने जागतिक पातळीवर काही संकेत , संदेश जरूर पाठवले . पण या दोन्ही निर्णयांचा पाया देशांतर्गत होता आणि आहे . या दोन्ही निर्णयातले घटक , संदर्भ , साधने राष्ट्रीय जास्त , आणि आंतरराष्ट्रीय कमी आहेत . आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कोणत्या मुल्याच्या नोटा असाव्यात आणि कोणत्या नसाव्यात हा नोटा – बदलिच्या निर्णयांचा पाया आहे . त्याचा सर्जिकल स्ट्राइक शी काय संबंध किंवा साम्य ? सर्जिकल स्ट्राइक तर दुसर्याच्या भूभागात जाऊन करतात . उद्या जर मोदी सरकारने अमेरिकी डॉलर किंवा युरो च्या तुलनेत आपल्या भारतीय रुपयाचे मूल्य वाढवले (Revaluation ) तर तो ” आर्थिक सर्जिकल स्ट्राइक ” . आताचा मोदी सरकारचा नोटा – बदलिचा निर्णय म्हणजे Demonetisation . ना ते Rupee Devaluation असणे अपेक्षित आहे ना ते इतर चलनाच्या तुलनेत Rupee Revaluation असणे अपेक्षित आहे . मग ते सर्जिकल स्ट्राइक म्हणणे कितपत योग्य आहे ?
आताचा नोटा – बदलिचा निर्णय अणुचाचण्या सारखा आपल्याच भूभागात जमिनीच्या खाली पण महत्वपूर्ण आणि जिगरबाज स्फोट घडवून आणत आपल्या निर्णय – क्षमतेचा साक्षात्कार जगाला घडवणारा ! !
याबाबत अजून एक गोष्ट ” उल्लेख ” करण्याजोगी . अगदी नुकतेच ( जानेवारी २०१७ )एन . पी . उल्लेख यांचे ” The Untold Vajpayee : Politician and Paradox ” हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे . ( या पुस्तकाविशयी स्वतंत्र लेख नंतर कधीतरी . ) अटलजी काहींना Paradox ( विरोधाभास ) वाटत असतीलही ; पण अटलजी Pandora ‘s Box नव्हतेच नव्हते .
त्याच धर्तीवर मोदी सरकारचा नोटा – बदलिचा निर्णय काहिजनाना विरोधाभासी ( विशेषतः ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द ठरवत असतानाच २००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणणे हा भाग )वाटेल ही ; पण तो भारतीय अर्थव्यवस्थेसाठी Pandora ‘s Box ठरणार नाही हीच अपेक्षा आहे .
अटलजी , नोटा – बदलीच्या निर्णयांच्या संदर्भात आणि निमित्ताने आमचे आम्हालाच सांगणे आहे कि . . . . ” हमे तारीख नही , तवारीख बदलनी हैं ” .
चंद्रशेखर टिळक
१८ जानेवारी २०१७ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
एमेल . . . tilakc@nsdl.co.in
Leave a Reply