माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील चलनात असलेल्या रुपये ५०० आणि १०००च्या नोटा अधिकृत चलनातून रद्द करून जो धाडसी निर्णय घेतला त्याचे सर्वच स्थारातून सकारात्मक स्वागत आणि अभिनंदन होत आहे.
देशातील भ्रष्टाचार आणि अन्य मार्गाने मिळविलेल्या काळा पैसा उघड होऊ लागला आहे. देशातील भ्रष्टाचार, काळाबाजार आणि काळा पैसा यांचा नायनाट करण्याचा पंतप्रधानांनी जणू पणच केला आहे असे त्यांच्या आग्रा येथे केलेल्या भाषणातून जाणवले.
नोटा बंदीच्या धाडसी आणि समयसूचक निर्णयामुळे आतंकवादी, उल्फा, माओवादी संघटना आणि पाकिस्तानातील नकली नोटांच्या धंद्याचे कंबरडे मोडले आहे. ड्रग्ज माफिया उध्वस्त झाले आहेत. हवाला धंद्यावर मंदी आली आहे. बेटिंग आणि सटा यांचे हाल झाले आहेत. यातून सर्व जगाला एक चांगला संदेश गेला तो म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही असून देखील भारत कठोर निर्णय घेऊ शकतो आणि सर्वसामान्य जनता त्याचे मनापासून स्वागत करते. काही प्रगत राष्ट्रातील बड्या व्यक्ती त्यांच्या मनोगतातून या निर्णयाचे स्वागत करीत आहेत. त्यात बिल गेट्स, मार्केटिंग गुरु फिलीप कोटलर, वर्ल्ड बँक चेअरमन वगैरे. असो.
नोटाबंदीमुळे देशातील सर्वसामान्य जनता, किरकोळ व्यापारी आणि रत्यावर अधिकृत धंदा करणारे यांना पुरेपूर कळून चुकले आहे की येणाऱ्या काळात जर आपण काळाबरोबर बदललो नाही, ई-पेमेंटचे तंत्रज्ञान शिकलो नाही, त्याची सुविधा ग्राहकाला दिली नाही तर व्यापार उदीम मनाजोगता होणार नाही. अर्थात यासाठी केंद्र आणि राज्य शासनांनी वरील सर्व मोठया आणि किरकोळ व्यापाऱ्यांना ई-कॉमर्स आणि स्वस्त दरात इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी. अश्याने देशात थोडयाफार प्रमाणात का होईना पण एका नव्या पर्वाला सुरवात होऊन चलन विरहित व्यवहार सुरळीत होण्यास नवीन मार्ग दिसू लागेल ‘हे ही नसे थोडके’ यामुळे सरकारला अपेक्षित असलेल्या भ्रष्टाचार, काळाबाजार आणि काळा पैशाला पायबंद बसू शकतो. यासाठी देशातील सर्व प्रभावी माध्यमाचा उपयोग वरील नवीन विषयांच्या प्रचार आणि प्रसारा करता करून घेणे जरुरीचे आहे. तसेच खेडोपाडीच्या व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना समुपदेशनाची गरज आहे. नोटाबंदीमुळे सर्व सामान्य माणसांना ई-कॉमर्स आणि पेमेंटचे आता दैनदिन व्यवहारातील महत्व हळूहळू पटायला लागले आहे.
देशातील सामान्य जनता आणि व्यापाऱ्यांना इंटरनेट द्वारे ई-कॉमर्स आणि इतर व्यवहार करतांना काय काळजी घ्यावी, काय करावे आणि करू नये तसेच त्याचे फायदे आणि तोटे आणि वेळेची बचत कशी होते यातून आपल्या मालाच्या आयात व निर्यातीला कशी गती देता येते हे नीट समजावून सांगितले आणि त्या बद्दलचे विज्ञान आणि तंत्रज्ञान स्वस्तात आणि अखंड उपलब्ध करून दिले तर वरील गोष्टी सुसह्य आणि गतिमान होण्यास चालना मिळेल. मुख्य म्हणजे भारत देशातील जनतेबद्दलचा इतर देशात असलेला गैरसमज दूर होण्यास मदत होईल. भारत देश इतर प्रगत देशांच्या बरोबरीला घेऊन जाण्यास सरकारला मदत होईल. यामुळे आपल्या देशाचा इतर देशांशी असलेला व्यापार, आर्थिक आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढीस लागण्यास मदत होईल.
येथे एक गोष्ट नक्कीच नमूद करावीशी ती म्हणजे चांगल्या सवयी, विचार, गुण, स्वभाव आणि गोष्टी आत्मसात करण्यास विलंब लागतो कारण कष्ट, मेहनत, श्रद्धा आणि सबुरी लागते त्याची तशी बऱ्याच जणांना (नागरिकांना) सवय असतेच असे नाही पण वाईट गोष्टीचे अनुकरण पटकन होते कारण ते विनासायास होते कष्ट पडत नाहीत आणि त्यात बराच आर्थिक फायदाही असतो पण स्वत:चे आणि देशाचे नुकसान होते हे त्या स्वार्थात आणि उन्मादात कळत नाही पण नंतर वेळ गेल्यावर उलगडते.
जगदीश पटवर्धन
Leave a Reply