गलेलठ्ठ नोटांच्या गठ्ठ्यांनो
आणि खणखणीत आवाज उमटवणाऱ्या
तालेवार, चमकदार नाण्यांनो…
डॉलर, पौंड, युरो, दिनार, रुपये ही तुझी
दिमाखदार, लोभस, राजस रूपे
विविध रंगांनी, ढंगांनी नटलेली, सजलेली.
डिजिटल क्रांतीत गोठलेली, मात्र 24X7 टक्के जागी,
सदैव तत्पर असलेली आणि…
माणसाचं अवघं आयुष्य प्राणपणाला लावणाऱ्या,
त्याला थकवणाऱ्या, आणि सतत पळायला लावणाऱ्या
क्रिप्टोकरन्सी नामक आभासी चलनांनो…
तुमचे चाल-चलन आता आम्हाला चांगलेच
उमजू लागले आहे!
जेव्हा त्याचा तेजस्वी हात पडतो
एखाद्या सामान्य, दिनवाण्या डोळ्याच्या माणसाच्या टाळूवर.
तेव्हा तो उजळून निघतो एका क्षणात
होतो निर्भय, ताकदवान आणि राज्य करतो साऱ्यांवर!
तो कवेत घेतो जुन्या वास्तूंना, नापीक जमिनींना
हळूहळू खेड्यांना, गावांना, महानगरांना. मग…
माणसांनाही!
मजले चढू लागतात दरवर्षी एकावर एक
अपुरी पडू लागतात महाकाय कप्पे गठ्ठ्यांना ठेवण्यासाठी
तो होतो सर्वशक्तिमान
पुराणकथेतल्या सार्वभौम राजासारखा!
मात्र.. मात्र तोच तेजस्वी हात जेव्हा पडतो निसटून
एखाद्या राजाच्या टाळूवरून
तेव्हा तो उठतो भर बाजारातून
उतरतो लोकांच्या नजरेतून
इन्व्हेस्टमेन्टच्या भांड्याला पडते भलंमोठं भोक
आणि गळू लागतो अहंकार, माज, मस्ती
गोड्यातेलाच्या चिकट धारेसारखा!
गुंतून जातो भूतकाळात
अचानक आठवतात बालपणीचे दिवस, सगेसोयरे, मित्र.
तरीही तो टाळू लागतो प्रत्येकाला
आणि जाऊन बसतो एकटाच
अरण्यात, तपश्चर्येला!
आठवतोय ना तो दिवस… नोटबंदीचा,
होत्याचं नव्हतं झालं क्षणात
रद्दीच्या भावात गठ्ठयांनो तुम्ही विकला गेलात
लोकं टाळू लागली तुम्हाला
तुमचा स्पर्शही नकोसा झाला.
तेव्हा नोटांनो, उतू नका, मातू नका. घेतला वसा टाकू नका.
किमान तो दिवस तरी विसरू नका!
नोटांच्या गठ्ठ्यांनो आणि वाजणाऱ्या नाण्यांनो
तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हाची गोष्ट…
आम्ही सारेच सुखनैव नांदत होतो, बार्टर सिस्टीममध्ये !
तिथं नव्हती ईर्षा, हुकूमत आणि जीवघेणी स्पर्धा
होती केवळ देवाणघेवाण
निष्कपट, पारदर्शी, निखळ मैत्रीची, नात्यांची
आणि शुद्ध माणुसकीची!
इतकं असूनही तुम्ही आम्हाला हवे आहात
असं म्हणतात, ‘तुमच्या येण्यानं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात’
मग.. आकाशातलं थंडगार चांदणं,
शुभ्र लाटांची गाज, रानगंध आणि कौलारू घराच्या पडवीत
ऐटीत विसावलेली समाधानाची आरामखुर्ची
विकत घेता येईल?
गलेलठ्ठ नोटांच्या गठ्ठयांनो, नाण्यांनो
नक्की विचार कराच!
-रामदास खरे, ठाणे (सेवानिवृत्त बँक मॅनेजर)
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply