नवीन लेखन...

नृशंसतेचा कडेलोट !

‘मानवप्राणी’ असा शब्द उच्चारून मानव देखील या पृथ्वीवरील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्धृत केले जाते. मात्र या प्राण्यातही माणूसपण जपले जावे, अशी अपेक्षा कुणी केली, तर ती वावगी ठरू नये. या माणूसपणात एक नैतिकता, सभ्यता, समजदारपणा, भल्या-बु-याची जाण, सद्सद्विवेकबुध्दी, हे विचार समाविष्ट करीत पूर्वापार मानवी वाटचाल होत राहिलेली आहे. मात्र  सध्या अवती-भवती सातत्याने घडणा-या विविध प्रकारच्या विकृत घटनांनी माणसाला माणसाचीच भीती वाटावी, अशी स्थती निर्माण केली आहे. नुकतेच कठुआ आणि उन्नाव येथील सामूहिक बलात्कारांच्या घटना उघडकीस आल्या. एका आठ वर्षाच्या चिमुरडीवर आठ जणांनी अत्याचार करत तिची दगडाने ठेचून नृशंस हत्या केली. तर दुसऱ्या घटनेत एका  १६ वर्षांच्या तरुणीवर भाजपाच्या आमदाराने व त्यांच्या बगलबच्च्यांनी अत्याचार केला. ’अमानुष’, ’अमानवी’, ’माणुसकीला काळिमा फासणारी’ हे शब्द सुद्धा जिथे तोकडे पडतील, अशा या घटनांचा जितका निषेध केला जावा तितका कमीच. मात्र या घटनांनाही धर्माचा रंग देऊन राजकारण करण्यात आले. बलात्काऱ्यांचा बचाव करण्यासाठी झुंडशाही रस्त्यावर उतरली तर दुसरीकडे अत्याचाराचे आरोप असलेल्या राजकारण्यांना वाचविण्यासाठी सत्ताधारी सरसावलेले दिसले. माणूसपण,माणुसकी आणि संवेदना स्वार्थी राजकारणासमोर थिट्या पडत असल्याचे समोर येत असल्याने आज माणसाला खरंच ‘माणूसपण’ ही संज्ञा वापरावी का? असा प्रश्न निर्माण होतो. हे विधान वाचून कुणालाही हे वाटेल की, आज शंभर टक्के माणसातील माणूसपण हरविले नसल्यामुळे इतकी वाईट परिस्थिती नक्कीच नाही. अर्थात, हे सत्य आहेच.. समाजातील फार थोडेच लोक विकृत प्रवृत्तीचे कृत्य करतात, मात्र त्या विकृतीवर दुर्लक्षितपणाची भूमिका घेऊन केवळ धर्माच्या आणि राजकारणाच्या नावाखाली त्या कृत्याला समर्थन करणाऱ्यांना काय म्हणावं? आपल्याला काय त्याचे, अशी मानसिकता ठेवून गैरकृत्याकडे डोळेझाक करणाऱ्यांच्या माणूसपणावरही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का?  वाढणारा स्वार्थ आणि कमी होणारी संवेदनशीलता हे एक आव्हानच आज समाजासमोर उभे राहिल्याचं वास्तव यानिमित्ताने समोर आलं आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

जम्मू व काश्मीर राज्यातल्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षांच्या आसिफाचे आठ नराधमांनी अपहरण केले. तिला गुंगीच्या गोळ्या खाऊ घालून तिच्यावर सामूहिक पाशवी अत्याचार करण्यात आला.  बलात्कार करणार्याची वृत्ती इतकी नीच होती कि मंदिर परिसरातच या बालिकेवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाची बाहेर वाच्यता होऊ नये म्हणून आसिफाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या गुन्ह्यात सरकारी अधिकारी आणि पोलिसांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. जानेवारीत घडलेल्या या घटनेला दडपण्यासाठी आटोकाट पर्यंत झाले. मात्र अखेर बिंग फुटले आणि आरोपींचे अमानुष कृत्य जगासमोर आले. सर्वसामान्यांचा संताप पाहून सरकारला या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी लागली. मात्र यालाही धर्माच्या राजकारणाचा रंग देण्यात आला. आरोपीविरोधात चार्जशीट दाखल होऊ नये म्हणून जम्मूमधील वकिलांची एक झुंडशाही भाजप कार्यकर्त्यांसह रस्त्यावर आली. न्यायालयासमोर घोषणा देण्यात आल्या. ‘कायद्याचे राज्य’ या संकल्पनेचे अक्षरशः धिंडवडे काढण्यात आले. दुर्दैव म्हणजे ज्यांच्यावर कायदे निर्माण करण्याची जबाबदारी आहे ते लोकप्रतिनिधी,कायद्यांचे रक्षणकर्ता ज्यांना संबोधले जाते ते उच्चशिक्षित वकील सुद्धा या झुंडशाहीचा एक भाग होते. वास्तविक राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या दृष्टिकोनातून अशा घटनांकडे बघायला हवे, मात्र हा सामंजश्यपणा ना राजकारण्यांना दाखविता आला ना नागरिकांना..

माणुसकीला काळिमा फासणारी दुसरी घटना आहे उत्तर प्रदेशातली. काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सरकार स्थापन केले, तेंव्हा गुंडगिरी आणि हिंसाचारासाठी प्रसिद्ध असलेल्या यूपीत आता ‘रामराज्य’च अवतरणार, असं चित्र उभे करण्यात आले होते. मात्र त्यातील फोलपणा उन्नावच्या घटनेने समोर आणला आहे. उन्नाव गावातील एक १६ वर्षीय मुलीवर उन्नावचेच भाजप आमदार कुलदीपसिंग सेंगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे.पीडितेवरील अत्याचाराबद्दल दाद मागण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या वडिलांना आमदाराचा भाऊ आणि त्याच्या काही गुंडांनी बेदम मारहाण केली. या वेळी पोलिस निव्वळ बघ्याच्या भूमिकेत होते. या मारहाणीची तक्रार त्यांनी करताच या गुंडांनीही त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी तिची तत्परतेने दखल घेत ‘पीडित’व्यक्तीलाच ‘आरोपी’ केले. अमानुष मारहाणीमुळे झालेल्या जखमांत संसर्ग होऊन ते कोठडीत मृत्युमुखी पडले.वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही आपले म्हणणे कोणी ऐकत नाही हे पाहून तरुणीने थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा निर्णय घेतला तेव्हा देशातल्या सर्व मीडियाचे तिच्याकडे लक्ष गेले.लोकदबाव आणि न्यायालयाच्या आदेशामुळे आमदाराविरोधात अनेक दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला, पण या आमदारांना अटक करण्यासाठी पोलीस गेले तेव्हा त्यांना रोखण्यासाठी आमदारांचे शेकडो समर्थक रस्त्यावर उतरले. इतकेच नाही तर योगी आदित्यनाथ यांचे सरकार सेंगर यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करताना आढळले. त्यामुळे ऊत्तर प्रदेशात फक्त “गुंडगिरी’चा ‘रंग’ बदलला असल्याचे सत्य समोर आले.

जम्मू मधील घटना असो कि उत्तर प्रदेशातील दोन्ही घटनांमध्ये रस्त्यावर उतरणाऱ्यांच्या डोक्यात सत्तेचा उन्माद घुसला असल्याचे दिसून आले. बलात्कारासारखे अमानवीय कृत्य करणारे नराधम राक्षसी वृत्तीचे आहेतच..त्यांना रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज आहेच. मात्र कुठल्याही नीती-नियमाची पर्वा न करता बलात्कारासारख्या जधन्य आरोपातील आरोपींच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरणारी झुंडशाही मनोवृत्तीही अत्यंत घातक म्हणावी लागेल. दिल्लीतील निभर्या प्रकरणानंतर संपूर्ण देश एकदिलाने निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी उभा ठाकला होता. परंतु आज कठुआ आणि उन्नाव घटनेचे राजकारण केले जात आहे. सत्ताधारी, प्रशासन या सर्वांच्याच भूमिका संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. माणसाचा स्वार्थ आज माणुसकी धर्मापेक्षा वरचढ ठरू लागला असून त्याला आता कायद्याचाही धाक उरला नसल्याचं वास्तव यानिमित्ताने समोर आलं आहे. अत्याचारांचा हा कुरूप आलेख नुसता देशाचं सामाजिक स्वस्थ बिघडविणारा नाही तर माणसाच्या माणूसपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे याला कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे. अपराधीक कृत्य करणारा नराधम जितका समाजासाठी घातक असतो, तितकाच त्या कृत्याकडे दुर्लक्ष करणारा किंव्हा त्याचं समर्थन करणारा गट देखील सामाजिक स्वास्थासाठी हानिकारक असतो. त्यामुळे माणसातील माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी यापुढे प्रयत्न करावे लागतील. विकृतीने बेभान झालेला माणूस जर असाच नृशंसतेचा कडेलोट करत राहिला तर मानव समाज मानवी मूल्यांच्या ऱ्हासाच्या तळाशी जाईल, यात शंका नाही.

— अॅड. हरिदास बाबुराव उंबरकर 

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..