चंदनपुर हे शहर शिक्षणासाठी प्रसिद्ध होत. शहरात अनेक शिक्षण संस्था होत्या. आजू बाजूच्या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी चंदनपुरमधे येत असत. विविध शाखांमधे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गावाबाहेर एक मोठे होस्टेल होते. होस्टेलची पाच मजली इमारत आता जुनी झाली असली तरी लिफ्ट आदि सोयीनी युक्त होती. मात्र ही इमारत शहरापासुन दूर आणि तशी एकाकी होती. शहरातून येणाऱ्या मुख्य रस्त्या पासून होस्टेलच्या कॅम्पस पाशी येण्यासाठी एक छोटी थोडी जंगलातून जाणारी वाट तुडवावी लागत असे. या वाटेवरच एक बाजूला स्मशानभूमी होती. हे स्मशान होस्टेलच्या इमारती मधून दिसत असे. होस्टेलच्या आवारात अशोकाची तसेच इतर अनेक उंच वाढलेली झाडे होती. या झाडांभोवती पार बांधले होते. त्यावर बसून मुलांच्या गप्पा चालत. होस्टेलचे आवार खूप लांबवर पसरलेले होते त्यामुळे सर्व परिसर झाडांनी वेढलेला आणि शांत असा होता. पण स्मशानाच्या सान्निध्यामुळे तसेच होस्टेल कॅम्पस पर्यंत येणारया जंगली आणि एकाकी वाटेमुळे होस्टेलचा परिसर थोडा गूढ व भीतीदायक वाटत असे.
होस्टेलच्या इमारतीचे मेन गेट बरोबर ११ वाजता बंद होत असे व त्यानंतर पहाटे ५ वाजल्याशिवाय गेट उघडत नसे. तसा नियमच होता. जर कोणाला लेट होणार असेल तर त्यासाठी रेक्टरची लेखी पूर्व परवानगी आवश्यक असे. आता रात्रीचे बारा वाजून गेले होते. बहुतेक मुले झोपी गेली होती. काही तुरळक रूम मधे लाईट चालू होते. बाकी सगळीकडे नीरव शांतता होती. अशा वेळी शांततेचा भंग झाला कोणाच्या तरी किंकाळीने.कोणाच्याही जीवाचा थरकाप व्हावा अशा त्या किंकाळीने बहुतेक सर्वांनाच जाग आली. रूम्स मधले लाईट लागले. गेटवर होस्टेलचा रखवालदार हणम्या खुर्चीत बसून पेंगत होता तो पण जागा झाला. किंकाळी होस्टेलच्या इमारती मधूनच आली होती. तो लिफ्टच्या दिशेने धावला आणि त्याने लिफ्टचे बटन दाबले पण लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर अडकलेली दिसत होती अखेर जिने चढत चढत तो तिसरया मजल्यावर आला. एव्हाना होस्टेल मधले बहुतेक जण जागे झाले होते. तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट अडकली असल्याने साहजिकच सर्व जण जिन्याने तिसऱ्या मजल्यावर येऊ लागले. हणम्या तिसऱ्या मजल्यावर पोचला तेव्हा त्याला दिसले की लिफ्टची दोनही दारे सताड उघडी आहेत आणि एक मुलगा उपडा पडलेला आहे. त्याचा पायापासून गुडघ्या पर्यंतचा भाग लिफ्ट मधे तर बाकी शरीर बाहेर होते. तो तोंडावर आपटला होता. सर्वांनी मिळून त्याला प्रथम लिफ्ट मधून बाहेर काढून त्याला नीट बसवलं. तो होस्टेल मधला एक सिनियर विद्यार्थी मोहित होता. तोंडावर आपटल्या मुळे त्याच्या नाकातून रक्त येत होते. अजूनही तो भीतीने थर थर कापत होता. त्याचे डोळे विस्फारलेले होते. अंग इतके गरम होते की त्याला धरणाऱ्या मुलांना पण ते चांगलेच जाणवत होते. “तो बघा राघव त्याने मला ढकलले…..” एका रुमच्या दिशेने हात दाखवत तो पुट पुटला आणि त्याची शुद्ध हरपली. मोहित ज्या रूम कडे हात दाखवत होता ती होस्टेल मधली रूम तर गेले काही दिवसापासुन बंद होती. त्यात त्याच्या तोंडून राघवचे नाव ऐकताच सगळेच दचकले पण मोहितची अवस्था बघून मुलांनी ज्यास्त काही न बोलता त्याला त्याच्या रूम मधे घेऊन कॉटवर झोपवले. कोणीतरी रेक्टरना कळवले. थोड्याच ते डॉक्टरांना घेऊन मोहितच्या रूम मधे आले. मोहित अजूनही बेशुद्धच होता. डॉक्टरांनी मोहितला तपासलं आणि त्याची एकंदर अवस्था पाहिल्यावर त्याला हॉस्पिटल मधे दाखल करायचा सल्ला दिला. थोड्याच वेळात होस्टेलच्या आवारात रुग्णवाहिका येऊन दाखल झाली आणि मोहितला घेऊन चंदनपुरच्या दिशेने निघाली पण दुदैव असे की हॉस्पिटल मधे पोचण्या आधीच वाटेतच मोहितने या जगाचा निरोप घेतला होता. त्या बातमीने साऱ्या होस्टेलवर शोककळा पसरली. मोहितच्या अशा आकस्मिक मृत्यूने होस्टेल मधे सर्वाना धक्का बसला होता. त्यातून मोहितच्या तोंडचे “राघवने मला ढकलले” हे वाक्य सर्वाना हादरवणार होत कारण तीन महिन्यापूर्वी राघवने त्याच्या रूम मधे गळफास लावुन आपले जीवन संपवले होते………
************
राघवच्या आत्महत्येच्या घटने नंतर मोहितच्या वागण्यात फरक पडला होता. तो कुठल्या तरी दडपणाखाली असल्यासारखा वाटत होता. त्याला आपल्या रूम मधे काहीतरी वेगळे जाणवत होते. भास होत होते. त्याला असे वाटत होते की आपल्या रूम मधे कोणी तरी वावरतेय. त्याला समजेना की असे भास आपल्याला का होता आहेत. एका रात्री त्याला जाग आली कसल्याशा आवाजाने. त्याने पाहिले खिडकीचे तावदान उघडे होते वाऱ्यामुळे हलत होते. त्याचाच आवाज येत होता. मोहित उठला त्याने खिडकीचे तावदान बंद केले. त्याच वेळी त्याला जाणवलं की आपल्या रुमच्या बाहेर कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतोय. दरवाजा उघडून तो बाहेर आला पण बाहेर कोणीच नव्हतं. तसाच चालत चालत तो जिन्या पर्यंत गेला. तिथून त्याने होस्टेलच्या आजू बाजूला पाहिले. स्मशानातील प्रेत जळण्याच्या ज्वाळा रात्रीच्या अंधारात स्पष्ट दिसत होत्या. त्यानंतर त्याची नजर होस्टेलच्या गेट वर गेली. गेटवर हणम्या खुर्चीत बसला होता. बाकी सर्वत्र शांतता होती. रात्रीची वेळ असल्याने रातकिड्यांची किर कीर आणि वाऱ्यामुळे झाडांची सळ सळ ऐकू येत होती. विचारांच्या तंद्रीत असतानाच त्याला दिसले की दुरून कोणीतरी होस्टेलच्या दिशेने येतेय. एवढ्या रात्री कोण येत असेल गेट तर ११ वाजताच बंद होते. जस जशी ती व्यक्ती होस्टेलच्या गेट जवळ येऊ लागली तेव्हा मोहितचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तो राघवच होता. गेट जवळ आल्यावर त्याने गेट ढकलले आणि तो आत शिरला. म्हणजे हणम्याने गेटला कुलूप घातले नव्हते का.
मोहितला हे सर्वस्वी अनपेक्षित होते. त्याला समजेना की आपण पाहतोय ते सत्य आहे की भास आहे. काय करावे त्याला समजेना. त्याच्या रूम शेजारी प्रवीण व राकेशची रूम होती. त्यांना उठवावे असे त्याच्या मनात आले पण त्याने तो विचार सोडून दिला. राघव गेट मधून आत आलाय आता खात्री करायला पाहिजे म्हणुन तो लिफ्टने पटकन खाली आला. त्याने इकडे तिकडे पाहिले. पण त्याला कोणी दिसले नाही. गेटवर हणम्या खुर्चीत बसून पेंगत होता. मोहितने त्याला उठवले. “अरे हणम्या तारेत आहेस का ? गेट उघडे ठेऊन पेंगतो आहेस. एक मुलगा शिरला आता होस्टेल मधे. छान ड्युटी चालली आहे तुझी.”
एक तर झोप मोड झाल्याने हणम्या वैतागला आणि म्हणाला “ मोहित भाऊ ज्यास्त झालीय तुम्हाला. अहो बघा गेट बंद आहे कोण कसा येईल आत ?” मोहितने पाहिले गेटला कुलूप होते. मग आपणाला भास झाला का काय समजेना त्याला. तरी पण स्वतःला सावरत तो म्हणाला “ नाही हणम्या मी खरोखरच पाहिले एका मुलाला गेट मधून आत येताना”
“मोहित भाऊ, तुम्ही इथले सिनियर, तुम्हाला तर माहित आहे आपल्या होस्टेल जवळ शमशान आहे. असच काही बाही दिसतं इथ. मला सवय आहे त्याची. तुम्ही ओळखलं का कोण होता तो ? ” हणम्याने विचारले. त्यावर मात्र मोहित गप्प झाला. त्याने राघवचे नाव घेतले नाही.
त्यानंतर तो लिफ्टने वर आला आणि आपली रूम गाठली आणि डोक्यावर पांघरूण घेऊन झोपला पण किती तरी वेळ राघवचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता.
दुसरे दिवशी त्याने हा प्रकार राकेश व प्रवीण यांना सांगितला. त्यावर राकेश त्याला म्हणाला “ अरे काल काय ज्यास्त झाली होती का तुला ? अरे राघव कसा दिसेल ? तो आहे का जिवंत ?”
“बॉस त्याला राघवची आठवण येत असेल” प्रवीण हसत म्हणाला आणि राकेशने पण त्याला हसून दाद दिली.
“अरे मी खरच सांगतोय हसण्याची गोष्ट नाही आहे ही. तो राघवच होता. खूप रागाने बघत होता माझ्याकडे.” मोहित म्हणाला
“हे बघ मोहित तुला माहित आहे की राघव या जगात नाहीये. हे तुझ्या मनाचे खेळ आहेत तेव्हा थोडा खंबीर हो आणि हो जरा कमी घेत जा, चल नाश्ता करायला जाऊया” राकेश त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला.
तो विषय तिथेच संपला असला तरी मोहितचे समाधान झाले नव्हते. आता रात्रीचे ११ वाजून गेले होते. मोहित झोपायच्या तयारीत होता. त्याच्या डोक्यात विचार चक्र चालू होते. राघवला आपण खूप त्रास दिला या जाणीवेने त्याचे मन खात होते. राघवचा आत्मा आता होस्टेल मधे भटकतोय तो आपल्यावर सूड उगवायला असा त्याने समज करून घेतला होता. कालचा प्रसंग सारखा डोळयासमोर येत होता.
तेवढ्यात त्याच्या रूमचे दार वाजले. मोहित रूमचे दार उघडून बाहेर आला पण बाहेर कोणीच नव्हते. त्याने कॅरीडोर मधे नजर टाकली पण कोणीही दिसले नाही. तेवढ्यात त्याला लिफ्ट आपल्या फ्लोअरवर थांबल्याचा आवाज आला. लिफ्ट आपल्या मजल्यावर थांबली म्हणजे कोणीतरी आलंय पण बराच वेळ झाला तरी लिफ्टचा दरवाजा उघडल्याचा आवाज येईना. तो लिफ्ट कडे गेला. त्याने पाहिले लिफ्ट थांबली होती पण आत मधे कोणीच नव्हतं. त्याला आश्चर्य वाटले. तेवढ्यात लिफ्ट सुरु झाली आणि ती तिसऱ्या मजल्यावर थांबली. आता दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मोहित बुचकळ्यात पडला. आपल्या डोळ्यादेखत रिकामी लिफ्ट खाली गेली. मग तिसऱ्या मजल्यावर कोण उतरले. काही समजेना. त्याने मोठ्या धीराने लिफ्टचे बटन दाबले पण काहीच रेस्पोंस मिळेना लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर अडकली असावी. मोहित वैतागला. मगाशी आपले दार कोणी तरी वाजवले पण बाहेर मात्र कोणीच नव्हते. हे सर्व कोणीतरी आपणाला मुद्दाम घाबरवण्या साठी हे सर्व करत नसेल ना ? तेवढ्यात त्याला जाणवलं की जिन्यातून कोणीतरी उतरतंय. आता मात्र मोहित वैतागला. याचा काय तो सोक्ष मोक्ष लावायचाच असे त्याने ठरवले. त्याच्या मनात आले की राकेश आणि प्रवीणला बोलवावे पण हा सर्व भास निघाला तर ते आपली मजा उडवतील म्हणून त्याने तो विचार सोडून दिला. हातातल्या मोबाईलच्या प्रकाशात तो हळू हळू जिना उतरू लागला. आता त्याला जिन्यात पावलांचा आवाज स्पष्ट जाणवत होता. जिने उतरत मोहित तिसऱ्या मजल्यावर आला. प्रथम त्याने लिफ्ट बघितली. लिफ्टचा दरवाजा तर व्यवस्थित बंद केलेला होता. लिफ्टमधे मात्र कोणीच नव्हते. मग लिफ्ट का वर येत नव्हती त्याला काही समजेना तेवढ्यात त्याची नजर लिफ्ट बाजूच्या राघवच्या रूम कडे गेली आणि तो दचकला कारण त्या रूम मधे लाईट दिसत होता. खर तर राघवच्या मृत्युनंतर ती रूम बंद होती. मोहित थोडा घाबरला . त्याने कोरिडोर मध्ये नजर टाकली. सगळीकडे शांतता होती. हळू हळू तो राघवच्या रूम कडे गेला. दरवाजाला कुलूप होते. आता मध्ये मात्र लाईट दिसत होता. त्याच वेळी त्याला आपल्या मागे काहीतरी हालचाल जाणवली आणि त्याचा हात कोणीतरी पकडला. त्याने मागे वळून पाहिले मात्र आणि तो भीतीने गारठला.राघवने त्याचा हात पकडला होता.राघवला पाहुन त्याच्या अंगावर काटा आला पाय कापायला लागले. कसे बसे त्याच्या तोंडातून शब्द निघाले “ त …त तू कसा इथे पण उत्तर नाही मिळाले. राघवचा चेहरा खुप कृद्ध दिसत होता. त्याचे डोळे आग ओकत होते. मोहितला खूप घाम फुटला. राघव आता आपल्याला सोडणार नाही या जाणीवेने मोहितचे पायाला कापरे भरले. जीवाच्या आकांताने आपला हात सोडवून घेऊन तो धडपडत लिफ्टच्या दिशेने धावला. लिफ्ट जवळ येताच त्याने एकदा मागे पाहिले त्याला राघव दिसला नाही. मोहित अजूनच घाबरला त्याने लिफ्टचा दरवाजा उघडला आणि त्याला दिसले की राघव लिफ्टमधेच उभा आहे. त्याचा चेहरा आता इतका भयानक आणि अमानवी दिसत होता की मोहितची पाचावर धारण बसली. ती अमानवी शक्ती आता आपल्याला सोडत नाही ही जाणीव झाल्यावर जीव वाचवायला तो जिन्याच्या दिशेने धावण्याच्या विंचारात होता पण त्याला ती संधीच मिळाली नाही. लिफ्ट मधुन राघव बाहेर आला आणि त्याचे दोन्ही हात मोहितच्या गळ्याजवळ आले. ते अमानवी हात आपला गळा आवळणार या जाणीवेने तो जीवाच्या आकांताने किंचाळला आणि तसाच खाली कोसळला…..
***********
मोहितच्या मृत्युच्या घटनेला आता एक आठवडा झाला होता. आता रात्रीचे अकरा वाजून गेले होते. होस्टेलच्या गच्चीत राकेश आणि प्रवीण बसले होते. दोघांच्याही हातात दारूचे ग्लास होते. एकीकडे ते स्मोकिंग पण करत होते. ती त्यांची नेहेमीची ड्रिंक घेण्याची ठरलेली जागा होती. एक तर रात्री ११ नंतर गेट बंद होई त्यामुळे बाहेरून कोणी येण्याची शक्यता नसे.
“बॉस राका, तुला काय वाटत भूत आत्मा अस्तित्वात आहे ? होस्टेल मधे सर्व बोलतात की मोहितला राघवच्या आत्म्याने मारलं. “
“बकवास आहे रे सगळ. माझा नाही विश्वास असल्या भाकड कथांवर. मोहित घाबराट होता. त्याला मी सांगितलं होत की बिनधास्त रहा. पण त्याने धसका घेतला होता की राघवच्या मृत्यूला आपण जबाबदार आहोत. आता पोलीस आपल्याला पकडतील. पण मी म्हटल्याप्रमाणे केस क्लोज झाली की नाही” राकेश म्हणाला.
“पण बॉस आता मोहितच्या डेथचा पोलीस तपास करता आहेत. मला पण भीती वाटू लागली आहे की पोलिसांनी राघवची केस परत ओपन केली तर ?”
“छोड दो यार मी सांगतोय ना माझ्यावर विश्वास ठेव तसं काही नाही होणार. चल आता बस झाली झोप यायला लागली” राकेश म्हणाला.
“राका तू जा झोपायला मला झोप येत नाहीये आणि वारा पण छान सुटलाय. बसतो थोडा वेळ इथे . आता कुठे बारा वाजताहेत.” प्रवीण म्हणाला.
“ओके तुझी इच्छा.मी बॉटल घेऊन जातो. अजून प्यालास तर राघव येईल तुला भेटायला” राकेश हसत बोलला.
“मजाक नको ना यार, मी ज्यास्त नाही पिणार काळजी नको करू. आज तू लवकर आवरलंस मला अजून प्यायाचीय ” प्रवीण म्हणाला.
“ओ के मी जातो. सॉरी यार आज थोड डोक चढलय नाही तर दिली असती तुला कंपनी. गुड नाईट” असे बोलुन राकेश निघाला. राकेश गेल्यावर प्रवीणने एक सिगारेट शिलगावली आणि तो ड्रिंक एन्जॉय करू लागला. गच्चीत तसा अंधार होता. गच्चीच्या दाराशी एक छोटा दिवा मिणमिणत होता. गार वारे अंगाला झोंबत होते. प्रवीणच्या मनातून राघवची आत्महत्या, नंतर मोहितला राघव दिसणे आणि नंतर मोहीतचा झालेला मृत्यु या गोष्टी काही केल्या जात नव्हत्या. राघवच्या आत्म्याच अस्तित्व मानलं तर आपल्याला पण धोका आहे या जाणीवेने तो मनातून घाबरला होता. मोहितच म्हणन आपण उगाच हसण्यावारी नेल अस त्याला वाटल. आता दारू आणि जोडीला सिगारेट याची नशा त्याला चांगलीच चढली होती. त्याच वेळी त्याला जाणवलं की वारे खूपच जोरात वाहता आहेत. कारण झाडांची सळ सळ जोरात ऐकू येत होती. गच्चीच दार वाऱ्याने जोरात आपटत होते. त्यामुळे परत त्याचे लक्ष दाराकडे जात होते. याच वेळी त्याला गच्चीच्या दारात एक धूसर पांढरी आकृती दिसली.प्रवीणला समजेना की नेमका काय प्रकार आहे. तो जागे वरून उठला हातातला ग्लास त्याने खाली ठेवला आणि तो दाराच्या दिशेने येऊ लागला. मात्र जसजसा तो गच्चीच्या दाराकडे येऊ लागला तास तशी ती आकृती दिसेनाशी झाली. गच्चीच्या दारात आल्यावर त्याने जिन्यात वाकून पाहिले पण कोणीच नव्हते.तो बुचकळ्यात पडला. आपल्याला ड्रिंक ज्यास्त झाले नसेल ना. त्याने ठरवले आता ज्यास्त रिस्क नको घ्यायला. बाकी आहे ते ड्रिंक संपवून आपल्या रूम मधे झोपायला जावे. म्हणून तो परत आपल्या जागी बसला आणि त्याने उरलेले ड्रिंक प्यायला सुरवात केली.त्याला आता वातावरणात थोडा बदल जाणवला. एक अनामिक भीतीची भावना त्याच्या मनात आली. कदाचित हातुन घडलेल्या चुकीची जाणीव त्याला होत होती. आता वाऱ्याचा वेग एवढ्या जोरात होता की त्यामुळे गच्चीच्या दरवाजाची जोरात उघड झाप होत होती. त्याच वेळी अचानक गच्चीताला दिवा विझला. प्रवीणला वाटले लाईट गेले असावेत. त्याने मोबाईल मधली टोर्च लावली मात्र त्याचवेळी गच्चीच्या दारामधे परत त्याला एक पांढरी आकृती दिसली. यावेळी ती आकृती धूसर नव्हती. ज्यास्त स्पष्ट होती . हळू हळू ती आकृती त्याच्या दिशेने येत होती. जस जशी ती आकृती त्याच्या जवळ येऊ लागली तेव्हा त्याला ओळख पटली. तो राघव होता. त्याचा चेहरा खूप भेसूर होता आणि लाल मोठे डोळे आग ओकीत होते. आता त्याची दारू पुरती उतरली. त्याच्या सर्वांगाला घाम फुटला, छातीतील धड धड वाढली. काय करावे त्याला सुचेना. जोरात ओरडून कोणाला तरी मदतीसाठी बोलवावे असे वाटले पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. त्याच्या हातातील ग्लास खाली पडला.आता राघव त्याच्या पासून काही फुटांवर होता. त्याच्या पासून जीव वाचण्यासाठी धावतच त्याने गच्चीचा दरवाजा गाठला पण त्याला दरवाजा बंद असल्यासारखे वाटले आणि त्याला तो काही केल्या उघडता येईना. आता त्याचा धीर खचला. आपला जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने गच्चीच्या कठड्याकडे गेला. तिथुन त्याला आता होस्टेलचे गेट दिसत होते. त्याने मागे वळून पाहिले. आता राघव दिसेनासा झाला होता. त्याला थोडे आश्चर्य वाटले आणि धीरही आला. त्याने आता गच्चीतून गेटवर पहारा देणाऱ्या हणम्याला मदतीसाठी हाक मारायला सुरवात केत्या. रात्रीच्या शांततेत त्या हाकांनी गेटवर पहारा देणारा हणम्या जागा झाला त्याने वर पाहिले. रात्रीच्या अंधारामुळे त्याला नीट दिसत नव्हते पण गच्चीतून कोण तरी हाक मारते आहे हे त्याला समजले. तो गोंधळून गेला कारण आता रात्रीचा एक वाजून गेला होता. तेवढ्यात प्रवीणला आपल्या मागे हालचाल जाणवली आणि मागे वळून पाहिल्यानंतर आपल्या मागे उभ्या राघवला पाहून तो हादरून गेला. पण त्याला काही हालचाल करायची संधीच मिलाळी नाही. तो गच्चीतुन खाली फेकला गेला.परत एकदा रात्रीच्या वेळी सर्व होस्टेल खाली आल. प्रवीणचा छिन्न विछिन्न झालेला मृत देह बघवत नव्हता. मोहित पाठोपाठ होस्टेल ने दुसरा मृत्यु पहिला होता………..
***********
मोहित आणि प्रवीणच्या लागोपाठ झालेल्या मृत्यु नंतर होस्टेलवर सन्नाटा पसरला होता. चंदनपुर पोलीस स्टेशनचे इनचार्ज इन्स्पेक्टर राणे या दोन्ही मृत्यूंची चौकशी करीत होते. मोहीतचा मृत्यु ‘cardiac arrest म्हणजे र्हुदयक्रिया बंद पडल्या मुळे’ झाला होता. काहीतरी भीतीदायक त्याने पाहिले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रवीणचा मृत्यु होस्टेलच्या गच्चीतून खाली पडल्यामुळे झाला होता. पोस्टमार्टेम मधे तो अल्कोहोलच्या अमला खाली असल्याचे स्पष्ट दिसत होते. साधारण १ वाजल्याच्या सुमारास त्याने गेट वरच्या रखवालदाराला हाक मारल्या होत्या. त्यानंतर थोड्याच वेळात तो गच्चीतून खाली कोसळला होता. गच्चीत प्रवीण बरोबर ड्रिंक घेत बसल्याच राकेशने मान्य केल होत. मात्र आपण खाली आल्यावर प्रवीण एकटाच गच्चीत पीत बसला होता. त्यामुळे तो नशेच्या अमलाखाली गच्चीतून खाली पडला असावा किंवा त्याला कोणितरी मुद्दाम खाली ढकललं असण्याची पण शक्यता होती. इन्स्पेक्टर राणे सर्व दृष्टीने विचार करीत होते. होस्टेल मधे या दोन्ही घटनेत अमानवी शक्तीचा सहभाग असावा असे बोलले जातं होते. राघवाचा आत्मा हे सर्व घडवतोय अस बोललं जात होत. इन्स्पेक्टर राणेंना प्रश्न पडला होता की राघवचा आत्म्याने मोहित आणि प्रवीणला मारण्याच काय कारण. त्यासाठी त्यांनी राघवच्या आत्महत्येच्या केसचा बारकाईने अभ्यास केला होता. त्या केसचा तपास दुसरया अधिकाऱ्याने केला होता आणि केस क्लोज पण झाली होती. इन्स्पेक्टर राणेनी होस्टेल मधील इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यातून एक गोष्ट स्पष्ट होती की होस्टेलमधे raging चालायचं. राकेश, प्रवीण आणि मोहित हे raging चे सूत्रधार होते. त्यानंतर त्यांनी होस्टेल मधे जाऊन राकेश, प्रवीण आणि मोहितच्या रूमची झडती घेतली होती. त्यांनी राघवच्या रूम मधील वस्तूंची पाहणी केली. त्यामधे राघवने त्याच्या वडिलांना लिहिलेले एक पत्र त्यांच्या हाती लागले. त्यात राकेश , प्रवीण , मोहित यांनी केलेल्या अत्याचारा संबधी सर्व लिहिले होते आणि आपण याची पोलिसात तक्रार करणार आहे असे पण लिहिले होते. या पत्रावर राघवच्या मृत्युच्या एक दिवस आधीची तारीख दिसत होती. हे पत्र पोस्ट करायच्या आधीच राघव या जगातून निघून गेला होता. त्यामुळे पोलिसात तक्रार करण्याची तयारी केलेला राघव अचानक आत्महत्या करण्याचा निर्णय घेईल हे पटण्यासारखे नव्हते. राकेश प्रवीण आणि मोहित यांच्या विकृत सवई आणि त्यापोटी राघव वर झालेले अत्याचार याचा शोध घेणे भाग होते. आता मोहित व प्रवीण जिवंतच नव्हते त्यामुळे राकेशला ताब्यात घेणे भाग होते. त्यासाठी ते होस्टेल मधे राकेशची वाट बघत थांबले होते. रात्री १० वाजेपर्यंत राकेश बरोबर काहीच संपर्क होऊ न शकल्यामुळे त्याच्या साठी होस्टेलवर आवश्यक त्या सूचना देऊन इन्स्पेक्टर राणे होस्टेल मधून निघाले होते………
त्याच वेळी इकडे राकेश होस्टेलची वाट तुडवत होता.आज बरेच दिवसानंतर एका महत्वाच्या कामासाठी तो शहरात गेला होता. त्याला निघायला थोडा उशीर झाला होता. आता रात्रीचे १० वाजत आले होते. त्याला लवकरात लवकर होस्टेल गाठायचे होते. त्याच्या डोक्यात विचाराचे चक्र चालू होते.त्याच्या डोळयासमोर प्रवीणचा छिन्न मृतदेह येत होता. त्या दिवशी आपण जर लवकर झोपायला आलो नसतो तर कदाचित आपली पण अशीच अवस्था झाली असती या नुसत्या कल्पनेने तो हादरून गेला होता. राघवच्या आत्म्याच अस्तित्व आता त्याने मनोमन मान्य केल होत. त्याचा सर्व निडर पणा आता गळून पडला होता. राघव आता आपणाला सोडणार नाही असे त्याच्या मनाने घेतले होते. त्यातून होस्टेल मधे ज्याच्या त्याच्या तोंडी राघवच्या आत्म्याचा विषय होता. राकेशच्या मनातून राघवाचा विषय प्रयत्न करून पण जात नव्हता. रात्री एकट्याने बाहेर पडायची पण त्याला भीती वाटत होती. त्याच्या डोळयासमोर सारखा राघवाचा चेहरा येत होता. आपल्या आजू बाजूला राघव आहे असे त्याला वाटत होते. रात्री झोप येत नव्हती. त्यामुळे त्याचे दारू पिणे पण कमालीचे वाढले होते. आता का कोण जाणे त्याला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होत होता. अपराधीपणाची भावना त्याचे मनाला जाचत होती. राघवच्या बाबतीत आपण केलेलं पाप आता त्याच्या डोळयासमोर नाचत होत……………
राकेश मोहित व प्रवीण हे होस्टेल मधे सिनियर विद्यार्थी होते. त्यातून राकेश हा कॉलेजच्या चेअरमनचा नातलग. त्यामुळे त्यांची टीम चांगली जमली. Raging सुरु झालं. राकेश हा मुळात विकृत मनोवृत्तीचा होताच पण त्याच्यात होमोसेक्शुअल प्रवृत्ती होती. होस्टेल मधे नवीन असलेली जुनियर मुल नेहेमी raging ची शिकार होत. राघव होस्टेल मधला एक जुनियर विद्यार्थी. होस्टेल मधे तिसऱ्या मजल्यावर राहायचा. त्याला कोणी ज्यास्त मित्र नव्हते. तो एकटा एकटा असायचा. तो एका छोट्या खेडे गावातून आलेला. घरची गरिबी, अजून शहरी वातावरणाला रुळला नव्हता. राकेशच्या टीमने त्याला आपली शिकार बनवली. राघवने सुरवातीला खूप विरोध केला पण त्या तिघांसमोर त्याच काही चालल नाही. राघव बरेच दिवस त्यांचा त्रास भोगीत होता. जेव्हा राघव पोलिसांकडे जाण्याची शक्यता आहे असा राकेशला संशय आला तेव्हा त्याचा काटा काढायचा प्लान राकेशने आखला. एका रात्री राकेश बरोबर मोहित आणि प्रवीण राघवच्या रूम मधे गेले. प्रथम त्यांनी आपली विकृत इच्छा पूर्ण केली. त्यानंतर त्याच्या गळ्यात फास अडकवून त्याला पंख्याला लटकवून दिले. राघवने raging ला कंटाळून आत्महत्या केली असावी असेच सगळ्यांना वाटले. पोलिसांनी राकेश मोहित प्रवीण यांना raging बाबतीत वार्निंग देऊन केस क्लोज केली. पण ती आत्महत्या नसून हत्या असावी याचा पोलिसांना संशय आला नाही……..
त्याच्या विचाराची तंद्री तुटली ती कोणाच्या तरी रडण्याच्या आवाजाने. त्याने आजू बाजूला पाहिले. आता तो होस्टेल कॅम्पसच्या जवळ आला होता तरी पण अजून बरेच अंतर चालायचे होते. त्याला दिसले की होस्टेल कॅम्पस मधे असणाऱ्या एका झाडाच्या पारावर एक मुलगा मांडीत डोके खुपसुन बसला आहे. तोच रडत असावा. राकेशला खूप आश्चर्य वाटले. तसा तो मुलगा होस्टेल मधला नसावा कारण तो वयाने लहान दिसत होता. तो इथे कुठून आला असेल कारण त्या परिसरात माणसांची वस्ती नव्हती. राकेशच्या मनात थोडी शंकेची पाल चुकचुकली. तरी पण धीर करून त्याने विचारले “कोण आहेस रे तू ? कशाला रडतो आहेस ?” पण काहीच प्रतिसाद आला नाही. रडण्याचा आवाज मात्र थांबला. काय करावे त्याला समजेना. त्या मुलाकडे जायचा त्याला धीर होई ना कारण भीतीने त्याच्या मनात घर केले होते. पण अखेर धीर करून त्याने त्या मुलाच्या जवळ जाण्याचे ठरवले. जवळ गेल्यावर त्याने पुनः विचारले “अरे कोण आहेस तू ? कशाला रडतो आहेस ? काही बोलशील की नाही. या त्याच्या प्रश्नानंतर थोडा वेळ शांततेत गेला. त्याचे रडणे थांबले. आणि त्याने हळूच मान वर करून राकेश कडे पाहिले. त्याचा तो भेसूर चेहरा पाहून राकेशला भीतीची जाणीव झाली, त्याच्या सर्वांगावर काटा आला. त्याला दूरवर होस्टेलची इमारत दिसत होती तसेच वाटेवरील स्मशान पण आपल अस्तित्व दाखवत होत. भीतीने तो जागच्या जागी गारठला होता.त्याला काही सुचे ना. शेवटी धावतच होस्टेल गाठावे असे त्याने ठरवले आणि होस्टेलच्या दिशेने धावायला सुरवात केली. थोड्या वेळाने त्याने सहज मागे वळून पाहिले आणि त्याचे उरले सुरले अवसान गळाले कारण त्याला दिसले की राघव त्याच्या मागे शांतपणे चालत होता. राघवला पाहून तो हादरला, भीतीने त्याचे शरीर घामाने डबडबले, घशाला कोरड पडली. राघवच्या तावडीतून आपण वाचत नाही याची जाणीव त्याला झाली आणि जीवाच्या आकांताने धाऊ लागला. आता होस्टेल चे गेट जवळ आले होते. तेवढ्यात त्याच्या नजरेला हेड लाईटचा प्रकाश दिसला. समोरून एक जीप जोरात येत होती. धावणाऱ्या राकेशला आता धोका जाणवला. जीपचा ड्रायवर जोरात होर्न देत होता कारण राकेश रस्त्याच्या मधून पिसाटासारखा धावत होता. तेवढ्यात राकेशला जाणवले की कुठल्या तरी शक्तीने आपल्याला जोरात ढकलले आणि तो सरळ जीपवरच आदळला. जीपच्या ड्रायवरने ब्रेक लावण्याचा आटो काट प्रयत्न केला पण तो राकेशला वाचवू शकला नाही. जीप राकेशला धडकली आणि त्याचा देह जीपखाली आला…………..
इन्स्पेक्टर राणे जीप मधून खाली उतरले. त्यांनी जीपखाली आलेल्या राकेशचा ओळखले. त्याचा खेळ संपला होता.राणेंना समजले नाही की राकेश असा पिसाटासारखा का धावत होता ? त्याला समोरून येणारी जीपचेही भान राहिले नाही. शिवाय तो एवढा अचानक समोर येऊन जीपवर आदळला होता की जगातील कोणताही ड्रायवरला त्याला वाचवणे शक्य झाले नसते……
इन्स्पेक्टर राणेंनी यापूर्वी अनेक कठीण केसेस सोडवल्या होत्या, पण होस्टेल मधील या मृत्युच्या केसेसनी त्यांना एक नवीनच अनुभव दिला होता. त्याना पटल की खरच काही गोष्टी आपल्या बुद्धीच्या,तर्काच्या पलीकडे असतात. राघवच्या आत्म्याने त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला असे सर्व होस्टेल वासियांचे मत होते. मुळात राकेश, मोहित प्रवीण यांनी raging करून अनेकांना त्रास दिला होता पण राघवला ज्यास्तच त्रास सहन करावा लागला होता. तो या अन्यायाची दाद पोलिसांकडे मागणार होता पण त्या आधीच त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागला होता. त्याच्या आत्महत्येच पण गुढ आता कधीच उलगडणार नव्हत तर राकेश, मोहित आणि प्रवीणचे मृत्यु पोलिसांच्या लेखी अपघाती मृत्यु म्हणून नोंदले जाणार होते. राघवाचा सूड पूर्ण झाल्यामुळे होस्टेल मधे मात्र शांतता नांदणार होती. राघवला पोलिसांकडून न्याय मिळाला नसला तरी कळत नकळत नियतीने मात्र राघवला न्याय मिळवून दिला होता…….
(कथेतील सर्व पात्रे प्रसंग, स्थळ पूर्णतः काल्पनिक आहे)
— विलास गोरे.
Leave a Reply