हिंदी चित्रपटसृष्टीत संगीतकार ओंकार प्रसाद नय्यर म्हणजेच ओ. पी. नय्यर याचं एक स्वतःच वेगळ असं स्थान आहे. ओ पी च्या वेगळ्या वाटेने जाणाऱ्या सुरेल व लयबद्ध चाली नकळत आपल्याला खिळवून ठेवतात, ठेका धरायला लावतात. ओ पी वर जीवापाड प्रेम करणारे अगणित आहेत. मी पण त्यातलाच एक, त्याच्या संगीतावर प्रेम करणारा. माझ्या लहानपणी रेडीओ हे करमणुकीचे मुख्य साधन होते. लहानपणापासून सिनेमा संगीत कानावर पडायचं पण खरी हिंदी चित्रपट संगीत ऐकण्याची समज आली मी कॉलेजला जायला लागल्यावर. तो काळ होता साधारण १९७५-७६चा. रेडीओवर विविध-भारतीवर “बिनाका गीतमाला” हा अमीन सायानीचा कार्यक्रम खूप प्रसिद्ध होता. कुठल्या संगीतकाराच गाण पहिलं येतंय याची उत्सुकता असायची. गाणी ऐकून ऐकून समजलं की प्रत्येक संगीतकाराची एक खासियत किंवा स्टाईल असते त्यामुळे लवकरच आम्हाला गाण्याच्या धून वरून संगीतकार ओळखायला येऊ लागले. उडत्या चालीची, एका वेगळ्या ह्रीदमची सहजपणे डोलायला लावणारी गाणी म्हणजे ओ.पी. नय्यर हे समीकरण ठरलं. हे पण जाणवलं की लहानपणी कानावर पडलेली आपल्याला आवडत असलेली बरीचशी गाणी ओपी ची आहेत. मग ओपीच्या संगीताचा मागोवा घ्यायला सुरवात केली. जसं जसं ओपी चे संगीत ऐकत गेलो तसं समजलं की ओपी केवळ उडत्या चाली देणारा संगीतकार नाही तर त्याच्या संगीतात एक अवीट गोडी आहे, मेलडी आहे. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा ओपी ऐकत गेलो आणि त्याच्या संगीतात रमत गेलो. त्याच्या विषयी जास्तीत जास्त माहिती गोळा करू लागलो. या महान संगीतकाराबद्दल अनेक दिग्गजांनी भरभरून लिहिलंय. गाण्यांबद्दल, खाजगी गोष्टीबद्दल, त्याचे कोणाशी वाद झाले याबद्दल देखील. मुळात रफी व आशा हे माझे अत्यंत आवडते गायक गायिका आहेत. त्यांची अनेक अजरामर द्वंद्व गीते आहेत. त्यात ओपी ने या दोघांना भरभरून गाणी दिली आहेत ती पण एकापेक्षा एक सरस. मी ओपीचा खूप चाहता आहे आणि त्याच नात्याने माझ्या या आवडत्या संगीतकाराबद्दल लिहितोय, फक्त त्याच्या संगीताविषयी, त्याने दिलेल्या अवीट अशा चालींच्या गीतांविषयी……….
आपल्या अनोख्या चालींनी व ठेका धरायला लावणाऱ्या संगीताने रसिकांना मोहिनी घालणाऱ्या या महान संगीतकाराचा जन्म १६ जानेवारी १९२६ ला लाहोरला झाला. ओपी ने १९५२ साली “आसमान” या चित्रपटापासून हिंदी चित्रपट सृष्टीत संगीत द्यायला सुरवात केली. या पाठोपाठ त्याने “छम छमा छम” आणि “बाझ” हे चित्रपट संगीतबद्ध केले पण हे चित्रपट फरसे यशस्वी झाले नाहीत. विख्यात चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार गुरुदत्त याने ओपीला “आर पार” (१९५४) साठी करारबद्ध केले. “आरपार” ची गाणी खूप हिट झाली. या चित्रपटात जॉनी वॉकर या विनोदी नटाला पूर्ण गाणं देऊन त्यानंतर विनोदी नटांवर चित्रपटात गाणी चित्रित करणे ही पण ओपीची खासियत ठरली. अगदी सहज आठवणारी “ऐ दिल है मुश्कील जीना यहां (सी आय डी ), जाने कहा मेरा जिगर गया जी (मिस्टर आणि मिसेस फिफ्टी फाईव) व मै बंबई का बाबू नाम मेरा अंजाना (नया दौर ) सुनो सुनो मिस चटर्जी (बहारे फिर भी आयेगी) ही काही ठळक गाणी. त्यानंतर ओपीने गुरुदत्त साठी “मिस्टर आणि मिसेस फिफ्टी फाईव” (१९५५) आणि “सी आय डी” या चित्रपटाना संगीत दिले आणि ओपी आपल्या खास ढंगाच्या संगीताचा ठसा उमटवण्यात यशस्वी झाला. “सी आय डी” मध्ये देव आनंद हिरो होता. त्यानंतर १९५७ साली आलेल्या “नया दौर” साठी ओपीला फिल्म फेअर अवार्ड मिळाले. ‘नया दौर’ ची सर्वच गाणी खूप हिट झाली. या पाठोपाठ ओपी ने “तुमसा नही देखा” मध्ये ठेका धरायला लावणारं संगीत दिलं व त्याला शम्मी कपूरने पडद्यावर पण खूप न्याय दिला. नया दौर आणि तुमसा नही देखा यांच्या यशानंतर ओपी ने मागे वळून पहिलेच नाही, त्याने एकाहून एक हिट संगीत देत रसिकांना अगदी तृप्त केले. साधारण पणे १९५८ ते १९७२ ह्या काळात ओपीने संगीतबद्ध केलेल्या काही चित्रपटांवर नजर टाकली तरी ओपी च्या संगीताची उंची जाणवते.
१९५८ ते १९७२ या काळातील हावडा ब्रिज, फागुन, रागिणी, सोने की चिडिया, दो उस्ताद, कल्पना, मिट्टी मे सोना, एक मुसाफिर एक हसीना, फिर वोही दिल लाया हुं, काश्मीर की कली, मेरे सनम. बहारे फिर भी आयेगी, मोहब्बत जिंदगी है, सावन की घटा, ये रात फिर न आयेगी, हमसाया, कही दिन कही रात, किस्मत, संबध ,एक बार मुस्कुरा दो, प्राण जाये पर वचन न जाय हे ते सर्व चित्रपट.
ह्या चित्रपटातून ओपी ने श्रवणीय व ठेकेबाज संगीताची लयलूट केली आणि रसिकांच्या मनात एक स्थान मिळवले. हिंदी चित्रपटाच्या त्या सुवर्णकाळात एस. डी. बर्मन, नौशाद, रोशन, सी. रामचंद्र, शंकर जयकिशन, लक्ष्मिकांत प्यारेलाल, खय्याम आदि अनेक एकापेक्षा एक सरस असे संगीतकार होते पण या सर्वांच्या स्पर्धेत ओपी च्या संगीताचा बाज हा वेगळा जाणवे. संगीत देताना ओपीने हिरो, हिरोईन, निर्माता यांचा विचार केला नाही तर मुक्तपणे संगीताची उधळण केली. अनेक चित्रपट केवळ ओपी च्या संगीतामुळे तरुन गेले. त्याच्या चालींना मेलडी होतीच पण एक रिदम होता. त्याला “रिदम-किंग” हे सार्थ नाव रसिकांनी दिले होते. घोड्यांच्या टापांचा त्याने खूप छान वापर केला तसेच लोकसंगीताचा त्याने आपल्या संगीतात चांगला वापर केला. त्याने केलेली उडत्या चालींची गाणी, त्यातील पंजाबी ढंग नकळत श्रोत्यांना ताल धरायला लावीत .”सुभानल्ल्ला हसी चेहरा” (रफी) तसेच “हाय रे हाय…. बल्ले बल्ले” (रफी-आशा) “काश्मीर की कली” चित्रपट. उडत्या चालीची नाचायला लावणारी नखरेल गाणी देणाऱ्या ओपी ने शास्त्रीय संगीताचा पण आपल्या संगीतात खूप चांगला वापर केला हे आपल्याला पटकन जाणवत नाही. ओपी च्या “रागिणी” या चित्रपटात विख्यात शास्त्रीय गायक अमीर खान सारख्या मातब्बर गायकाने गायलेली एक बंदिश आहे.(जोगिया मेरे घर आओ) ओपीने रागदारीवर आधारित दिलेली खालील निवडक गाणी पहा. शोधली तर अजून पण सापडतील.
गाण्याचे बोल | गायक /गायिका | चित्रपट |
छोटासा बालमा | आशा भोसले | रागिणी |
मन मोरा बावरा | रफी | रागिणी |
जोगिया मेरे घर | अमीर खान | रागिणी |
तू है मेरा प्रेम देवता | रफी मन्नाडे | कल्पना |
रातोंको चोरी चोरी | आशा | मुहोब्बत जिंदगी है |
जान सके तो जान | रफी | उस्ताद |
मेरा प्यार वो है | महेंद्र कपूर | ये रात फिर न आयेगी |
तुम्हारे चाहने वाला | महेंद्र कपूर आशा | कही दिन कही रात |
देखो बिजली डोले | आशा | फिर वोही दिल लाया हू |
आंचल मे सजा देना | रफी | एक मुसाफिर एक हसीना |
छन छन घुंगरू | आशा | फागुन |
पिया पिया | आशा | फागुन |
ओपी च्या कारकीर्दीच्या सुरवातीला शमशाद बेगम व गीता दत्त या दोन गायिकांचा त्याने खूप चांगला वापर केला. ”कही आर कही पार’ (आरपार) “कही पे निगाहे कही पे निशाना” (सी आय डी) “रेशमी सलवार” (नया दौर) – शमशाद बेगम, “बाबूजी धीरे चलना” “येलो मै हरी पिया” “सुन सुन जालीमा” (आरपार) ”मेरा नाम चीन चीन चू” (हावडा ब्रिज) “थंडी हवा काली घटा”-(मिस्टर एंड मिसेस फिफ्टी फाईव) “जाता कहा है दिवाने” (सी आय डी) “रात नशीली” (छु मंतर) – गीता दत्त.
त्यानंतर आशा भोसले आल्यानंतर तीच ओपीची लीड गायिका राहिली. लताचा आवाज व मदनमोहनची धून याची जशी वेगळीच मजा आहे तसच ओपीची धून व आशाचा त्याला झालेला परीस स्पर्श म्हणजे जणू बावनकशी सोनेच! आश्चर्य म्हणजे महान गायिका लता मंगेशकर हिने ओपी कडे एकही गाणे गायलेले नाही. त्याकाळात प्रत्येक संगीतकाराला लताने आपल्याकडे गावे असे वाटे. पण लताशिवाय ओपी आपले संगीत यशस्वी करू शकला. त्याच्या संगीत वाटचालीत आशा भोसले यांचे फार मोठे योगदान आहे. आशाने ओपीकडे एकंदर ३२४ गाणी गायलीत, यात १०० हून अधिक सोलो आहेत. त्यातल्या काही निवडक गाण्याची लिस्ट माहितीसाठी खाली दिलीय. आता ओपी आशा यांच्यात का दुरावा आला यावर भाष्य करणे आपण टाळलेले बरे. या दोन्ही महान व्यक्ती आहेत. त्यांना त्यांचे खाजगी आयुष्य असू शकते. आपण रसिकांनी त्यात न पडता त्यांनी जी अवीट अशी संगीत निर्मिती दिलीय, जी चिरंतर टिकणारी व आनंद देणारी आहे तिचा आस्वाद घेऊया.
आशा भोसले – सोलो गाणी
गाण्याचे शब्द | चित्रपट |
आईये मेहरबान | हावडा ब्रिज |
ये क्या कर डाला तुमने | हावडा ब्रिज |
जाईये आप कहा | मेरे सनम |
ये है रेशमी | मेरे सनम |
पिया पिया | फागुन |
छोटासा बालमा | रागिणी |
रातोंको चोरीचोरी | मुहोब्बत जिंदगी है |
होल्ले होल्ले साजना | सावन की घटा |
मेरी जान तुमपे | सावन की घटा |
आओ हुजूर तुमको | किस्मत |
चैनसे हमको कभी | प्राण जाये पर वचन ना जाये |
मै शायद तुम्हारे लिये | ये रात फिर न आयेगी |
आंखो से उतरी है दिलमे | फिर वोही दिल लाया हू |
बालमा खुली हवामे | काश्मीर की कली |
फिर ठेस लगी दिलको | काश्मीर की कली |
बेकसी हदसे जाब गुजर जाये | कल्पना |
जाये जहां मेरी नजर | कल्पना |
पुछो ना हमे | मिट्टी मे सोना |
वो हसीन दर्द दे दे | हमसाया |
ओ कन्हैय्या | हमसाया |
आशा भोसले निवडक ड्यूएटस
गीताचे बोल | चित्रपट | गायक |
लेके पहला पहला प्यार | सी आय डी | आशा रफी शमशाद |
रेशमी सलवार | नया दौर | आशा शमशाद |
उडे जब जाब झुल्फे | नया दौर | आशा रफी |
मांग के साथ तुम्हारा | नया दौर | आशा रफी |
आये है दुरसे | तुमसा नही देखा | आशा रफी |
देखो कसमसे | तुमसा नही देखा | आशा रफी |
सरपर टोपी | तुमसा नही देखा | आशा रफी |
देख के तेरी नझर | हावडा ब्रिज | आशा रफी |
एक परदेसी मेरा | फागुन | आशा रफी |
आप युंही अगर | एक मुसाफिर एक हसीना | आशा रफी |
बहोत शुक्रिया | एक मुसाफिर एक हसीना | आशा रफी |
मै प्यार का राही हुं | एक मुसाफिर एक हसीना | आशा रफी |
इशारो इशारो मे | काश्मीर की कली | आशा रफी |
दिवाना हुआ बादल | काश्मीर की कली | आशा रफी |
देखो बिजली | फिर वोही दिल लाया हू | आशा उषा मंगेशकर |
दिल तो पेहेलेसे | बहारे फिर भि आयेगी | आशा रफी |
फिर मिलोगी कभी | ये रात फिर न आयेगी | आशा रफी |
आपसे मैने | ये रात फिर न आयेगी | आशा रफी |
हुजुरे वाला | ये रात फिर न आयेगी | आशा मिनू |
हाथ आय है | दिल और मोहब्बत | आशा महेंद्रकपूर |
तुम्हारा चहाने वाला | कही दिन कही रात | आशा महेंद्रकपूर |
कजरा मोहबत वाला | किस्मत | आशा शमशाद |
मेल सिंगरमध्ये रफी हा ओपी चा लीड गायक होता. रफीने ओपीकडे एकंदर २०२ गायली आहेत, (सोलो व ड्यूएटस ) ओपी म्हणायचा की आशा व रफी या जोडीने माझं संगीत लीलया पेलले व रसिकांपर्यंत पोचवले. रफीची आशाबरोबरची गाणी वरती आली आहेत. खाली रफीची निवडक सोलो गाणी दिली आहेत.
रफीची सोलो गाणी
गीताचे बोल | चित्रपट |
ऐ दिल है मुश्कील | सी आय डी |
मै बंबई का बाबु | नाय दौर |
यु तो हमने लाख हसी | तुमसा नही देखा |
जवानिया ये मस्त मस्त | तुमसा नही देखा |
छुपने वाले सामने आ | तुमसा नही देखा |
रात भर का मेहेमा अंधेरा | सोने की चिडिया |
हमको तुम्हारे इष्कने | एक मुसाफिर एक हसीना |
आंचल मी सजा लेना कालिया | फिर वोही दिल लाया हू |
लाखो है निगहमे | फिर वोही दिल लाया हू |
ये चांदसा रोशन चेहरा | काश्मीर की कली |
है दुनिया उसीकी जमाना | काश्मीर की कली |
किसी ना किसीसे काही ना | काश्मीर की कली |
हमदम मेरे | मेरे सनम |
पुकारता चला हुं मै | मेरे सनम |
आपके हसीन रुखासे आज नया | बहारे फिर भी आयेगी |
झुल्फोन्को हटालो चेहरेसे | सावन की घटा |
दिल की आवाज भी सुन | हमसाया |
मन मोरा बावरा | रागिणी |
ज्येष्ठ गायक आणि अभिनेता किशोर कुमार याने ओपीकडे ३८ गाणी गायलीत हे पण बऱ्याच लोकांना माहित नसेल. पण ओपीचे सुरवातीचे चित्रपट ‘छम छमा छम’ ‘बाप रे बाप’, ‘नया अंदाज’ ‘रागिणी’, ‘श्रीमानजी’ या चित्रपटात किशोर लीड गायक होता. शमशाद, आशा व गीता दत्त यांच्याबरोबर त्याने द्वंद्व गीते पण गायली आहेत. आता ती तेवढी हिट झाली नाहीत ही गोष्ट वेगळी. “एक बार मुस्कुरा दो” “ तू औरोंकी क्यू हो गयी” रूप तेरा ऐसा दर्पणमे ना समाय” ही गाणी गाजली. महेंद्र कपूरने देखील ओपी कडे काही चांगली गाणी गायलीत “मेरा प्यार वो है – (ये रात फिर ना आयेगी), “मेरी जान तुमपे” (सावन की घटा) “लाखो है यहा दिलवाले” “ आंखो मी कयामत के काजल” (किस्मत) “ बदल जाये अगर माली” (बहारे फिर भी आयेगी). मुकेश “चल अकेला” (संबंध) व मन्नाडे यांनी रफिबरोबर “तू है मेरा प्रेम देवता” (कल्पना) अशी देखील काही गाणी ओपी कडे गायलीत.
“प्राण जाये पार वचन न जाये” ओपी-आशा जोडीचा शेवटचा चित्रपट. आशाला यातील “चैनसे हमको कभी आपने जिने ना दिया” या गाण्यासाठी फिल्म फेअर अवार्ड पण मिळाले होते.त्यानंतर मात्र आशा ओपीकडे गायली नाही.
यानंतर मात्र ओपीने “ खून का बदला खून” “बिन मा के बच्चे” “हिरा मोती” “मंगनी” “निश्चय” सारखे काही चित्रपट केले. वाणी जयराम, उत्तरा केळकर, पुष्पा पागधरे आदि नवोदितांना गाण्याची संधी दिली. हे अनेकांना माहित नसेल की १९९२ साली आलेल्या “निश्चय” या चित्रपटाला ओपीने संगीत दिले होते, ज्यात विनोद खन्ना, सलमान, करीना हे कलाकार होते यातील गाणी कविता कृष्णमुर्ती, एस पी बालसुब्रमण्यम यांनी म्हटली होती. पण ओपीच्या संगीताचा बहर ओसरत चालला होता हे खरे. ओपीने साधारण ७३ चित्रपटांसाठी संगीत दिले, काही खाजगी अल्बम पण केले त्यात रुना लैला, पिनाझ मसानी यांनी गाणी गायली होती. साधारण पणे १९९४ च्या सुमारास तो निवृत्त झाला. अधून मधून तो टी व्ही वरच्या सारेगामा या कार्यक्रमात दिसे. त्याचा मोजकाच मित्रपरिवार होता. २८ जानेवारी २००७ ला ओपीने या जगाचा निरोप घेतला. त्याला चित्रपट सृष्टीतल्या मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली यात ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर पण सहभागी झाल्या होत्या. ओपी आज नसला तरी त्याची गाणी आज नवीन पिढी पण मोठ्या आनंदाने म्हणते आहे. त्याच्या लाजबाब चालींनी आजही रसिकांना आनंद देतोय. ह्या महान मनस्वी संगीतकाराला माझा सलाम. त्याच्याच शब्दांत म्हणायचा झाले तर अस म्हणावसं वाटतं,
“बदल जाये अगर माली चमन होता नाही खाली
बहारे फिर भी आती है बहारे फिर भी आयेगी”…………………..
(सदर लेखासाठी ओ पी वरील उपलब्ध साहित्य व वेब साइटचा आधार घेतला आहे)
— विलास गोरे
छान आणि माहितीपूर्ण लेख आहे.
मी माझ्या ब्लॉगवर ‘पडदा न पाहिलेली ओपीची गाणी’ विषयावर दोन भाग लिहिले आहेत.
लिंक खालील प्रमाणे आहे:
भाग १ला: https://charudattasawant.com/2021/06/10/o-p-nayyars-unseen-songs-2/
भाग २ रा:https://charudattasawant.com/2021/06/15/o-p-nayyars-unseen-songs-2-2/
चारुदत्त सावंत
८९९९७७५४३९