लिथो पद्धतीने छपाई यशस्वी होऊ लागली पण तिचा वेग अत्यंत कमी होता. साधारण तीन दशकापूर्वीच लिथो छपाई नामशेष झाली.
ऑफसेट छपाईत दगडाची जागा जस्ताच्या पत्र्याने घेतली. यंत्राच्या ठरलेल्या आकाराला, ठरलेल्या जाडीचा जस्ताचा पत्रा बसवून त्यावर रासायनिक प्रक्रिया करुन त्याच्या ऑफसेट फ्लेट्स तयार होऊ लागल्या. या फ्लेटवर अशी प्रक्रिया केली जाते की, यावरील प्रतिमा म्हणजेच छापावयाच्या भागाला पाणी व शाई लावली असता तो भाग पाणी बाहेर फेकतो व शाई आकर्षून घेतो. कोरा भाग मात्र पाणी आकर्षून घेतो व शाई दूर फेकतो.
सामान्यत ऑफसेट यंत्राची रचना अशी असते की कागदाच्या उंचीच्या आकाराचे परिघ असलेले तीन सिलेंडर्स एकाला एक लागून असतात. एकावर प्रक्रिया केलेली फ्लेट गुंडाळली जाते. दुसऱ्या भोवती एक जाडसर रबर बसविलेले असते. या रबराला ब्लॅकेट म्हणतात. तिसरा सिलेंडर केवळ दाब देण्यासाठी असतो. त्याला इंप्रेशन सिलेंडर म्हणतात. रबर रोलच्या सहाय्याने प्रथम फ्लेटला पाणी देण्यात येते. याच फेरीत मध्ये दुसऱ्या रबर रोलने फ्लेटवर शाई फिरवली जाते. फ्लेटवरील सुलट प्रतिमेने शाई घेतलेली असल्याने शेजारील ब्लँकेटवर प्रतिमेचा ठसा उमटतो. तिसरा सिलेंडर इंप्रेशन सिलेंडर असतो. त्याच्या व ब्लँकेटच्या मधून कागद जात असल्याने त्यावर सुलट छपाई होते.
यंत्राच्या रचनेत एका बाजुला कागदाचे ताव रचलेले असतात. मधल्या भागात छपाई होते. त्यात शाईची टाकी व पाण्याची टाकी असते. शाईच्या टाकीतून फ्लेटला शाई देणारे रबर व तांब्याचे रोलर असतात. पाणी देणारे रोल रबर व स्टेनलेस स्टीलचे असतात. शाई व पाण्याच्या रोलरना लागुनच फ्लेट सिलेंडर, ब्लँकेट सिलेंडर व इंप्रेशन सिलेंडर असतात. छपाई झालेला कागद स्वयंचलित यंत्रात दुसऱ्या बाजुला व्यवस्थित रचला जातो. या प्रकारच्या शीट फेड ऑफसेट यंत्रात कागदाची एकच बाजू एका वेळी छापली जाते.
Leave a Reply