नवीन लेखन...

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ८ – पानझडी जंगलातील फुलांच्या ज्योती – पांगारा वृक्ष

हा वृक्ष रक्त मंदार; हि. फराद, पांगारी, दादप, मंदार; गु. बांगारो; क. हळीवन, हालिवाळ; सं. मंदार, रक्तपुष्पा, पारिजात, परिभ्रदा; इं. इंडियन कोरल ट्री, इंडियन कोरल बीन, मोची वुड; लॅ. एरिथ्रिना इंडिका, नावांनी ओळखला जातो. हा सुंदर वृक्ष सु. १८ मी. उंच, काटेरी, पानझडी, शिबांवंत (शेंगा येणारा), मध्यम आकारमानाचा व जलद वाढणारा असून समुद्रकिनाऱ्यावरील जंगलात निसर्गतः आढळतो.

तसेच रस्त्यांच्या दुतर्फा वा बागेत, शोभेकरिता किंवा शेतांच्या कुंपणाकडेने लावलेलाही आढळतो. जावा, ब्रह्मदेश, अंदमान व निकोबार बेटे, पाकिस्तान व भारत इ. प्रदेशांत त्याचा प्रसार विशेषतः पानझडी जंगलांत भरपूर आहे. या वृक्षांची साल गुळगुळीत, पातळ करडी किंवा पिवळट असून पातळ ढलप्यांनी सोलून जाते. लहान फांद्यांवर तीन-चार वर्षे टिकून राहणारे, काळपट, शंकूसारखे काटे येतात. पाने संयुक्त त्रिदली, एकाआड एक, पातळ व झडणारी असून प्रत्येक दल १०-१५ सेंमी. लांब व तितकेच रुंद असते. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात सु. ५-७ सेंमी. लांब, पतंगरूप, लाल पोवळ्यासारखी (त्यावरून इंग्रजी नाव व लॅटिन वंशनाव ही पाडली आहेत), मोठी, बिनवासाची फुले सु. १०-३० सेंमी. लांब मंजऱ्यांवर फांद्यांच्या टोकास येतात. फुलात भरपूर मध असल्याने अनेक पक्षी व भुंगे व फुलपाखरे त्याभोवती सदैव गर्दी करतात व परागण (पराग एका फुलातून दुसऱ्या नेणे) घडवून आणतात. फुलांची सर्वसाधारण संरचना अगस्त्याच्या किंवा गोकर्णाच्या; गोकर्ण फुलाप्रमाणे अथवा लेग्युमिनोजी कुलातील पॅपिलिऑनेटी उपकुलात वर्णिल्या प्रमाणे असते. संवर्त टोकाशी पंचदंती, महाछदासारखा लालसर परंतु प्रदले (पाकळ्या) तळापर्यंत चिरलेला, गर्द लाल, ५-७ सेंमी. लांब आणि केसरदले दहा व लाल असतात. शिबा (शेंगा) १३-३० सेंमी. लांब गोलसर, गाठाळ, काळी असून मे-जुलैमध्ये पक्व होते; त्यात सु. ६-८ पिंगट किंवा गर्द लाल, आयताकृती गुळगुळीत बिया असतात. पिकलेल्या शेंगा काळ्या पडतात नी त्यात तपकिरी बैंगणी तांबडट रंगाच्या बिया पिकून तयार होतात. पण या बिया विषारी असतात.

पांगारा वसंत क्रतुत जंगला मद्धे फुलतो तेंव्हा जणू कांही ज्वालाच फुलल्या आहेत असा भास होतो. त्यामुळे याला फ्लेम ऑफ फॉरेस्ट असेही म्हणतात.नवीन लागवड बिया किंवा कलमे (१.८ मी. x ७.५ सेंमी.) लावून करतात.
महाराष्ट्रात हा वृक्ष कोकण किनारपट्टीवर भरपूर प्रमाणात आढळतो. तसेच पश्चिम घाटात मलबार पर्यंत ही तो दिसतो. दौंड जिह्यात लेकीचे झाड या प्रकपाखाली याची मुद्दाम लागवड केली आहे.

मूळचा हा वृक्ष भारतीय आहे फुलांच्या रंगांनुसार पांगाऱ्याचे तीन प्रकार आढळतात. लाल, शेंदरी आणि पांढरा. त्यांपैकी पांढरी फुले येणारा पांगारा हा दुर्मिळ असून लाल फुले येणारा पांगारा सर्वत्र आढळून येतो. या वंशातील सुमारे ८ जाती मूळच्या भारतातील असून सु. १० जाती आयात केलेल्या आढळतात.

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यास नाजुक, सुन्दर लाल फुले येतात. पांगारा पर्णसंभार असल्यावर हिरवी शाल पांघरल्यागत वाटणारा हा वृक्ष आपल्या हिशेबी जरी हा फारसा महत्त्वाचा नसला तरी त्याच्या सर्व अंगोपांगाच्या उपयुक्ततेचा विचार केला तर याचे महत्त्व पटते. पर्णसंभार नसताना येणारी लाल सॅटीनसारखी फुले मिरवणारा उघडा-बोडका पांगारा एखाद्या उघड्या अंगाच्या, कपाळावर लाल मळवट भरलेल्या पोतराजासारखा वाटतो. ही लाल फुले फुलपाखरे, पक्षी यांना आपल्याकडील मधामुळे आकर्षून घेतात आणि या पोतराजाचा खेळ पाहायला आपणही नकळत क्षणभर त्याच्या सन्निध थांबतोच थांबतो. आपल्याकडे पांगारा जंगलात खडकातला, शहरातील बागेमध्ये, शेताच्या कुपणाला लावतात. चहाच्या मळ्याला सावलीसाठी लावलेला असतो. या वृक्षाचा प्रसार पश्चिम द्वीपकल्प भागातील कोकण व उत्तर कारवार येथील पानझडी व मिश्र जंगलात विशेषकरून आहे. पांगाऱ्याचा प्रवास तसा निसर्गातच होतो. पक्षी भुंगे फुलातील मध घेताना परागीकरण करतात. त्यातून धरलेल्या शेंगांमधील बी पडूनही रोपे होतात. पांगारा फांद्या लावूनही जगतो. पांगारा याच्यावर एकही पान नसताना लाल मनमोहक फुलांनी बहरतो. याच्या फुलांना गंध नसला तरी आपल्या मनाला त्याचा रंग मोहिनी घालतो. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात पांगाऱ्याला फुले येतात. फुलांचा लाल रंग आणि मखमली वाटणाऱ्या पाकळ्या कुणालाही आपल्याकडे पाहायला लावतात. अंगावर जरी काटे असली तरी या ५०-६० फुट उंच वृक्षाच्या पानाच्या हिरवाईने त्याचा फुलाच्या लाल रंगाने आसमंत रसरसून उठतो. पांगाऱ्याला फार महत्त्वाचे स्थान आहे.
हे भारतीय झाड देशात बहुतांश राज्यांमध्ये आढळतं. मात्र लक्षणीय गोष्ट अशी की, समुद्रालगत असलेल्या जंगलांमध्ये याची वाढ जोमाने होते. जर या झाडाला नीट बघितलं तर लक्षात येईल की हे झाड प्रचंड वृक्ष या सदरात मोडत नाही. साधारण मध्यम उंचीचा होणारा पांगारा ६० ते ७० फ़ुटापर्यंत वाढतो. पानझडी सदरात मोडणारा पांगारा दणकट समजला जातो. सुरुवातीस लहान वाटणारं पांगारा, झपाझप वाढतो. पांगाऱ्याच्या खोडावर, झाड लहान असताना अणुकुचीदार काटे असतात. जसजसं झाडं मोठं होत जातं, तसतसे हे काटे नाहीसे होत जातात. बाल्यावस्थेतल्या झाडाचं पशुंपासून संरक्षण होण्यासाठी निसर्गाने केलेली ही सोय असते. हे काटे काळ्या वाघ नखांसारखे असतात व पांगाऱ्याच्या मऊ काळपट हिरवट सालीच्या खोडाचं रक्षण करतात.

पानगळ होत असतानाच जानेवारीत झाडाच्या निष्पर्ण डहाळ्यांवर भडक शेंदरी फ़ुलं यायला सुरुवात होते. डहाळीच्या अगदी टोकावर कळ्यांचा आणि फ़ुलांचा गुच्छ येतो. हे भडक फ़ुलं पाच पाकळ्यांच असतं नी यातली एकच पाकळी मोठी असते. या भडक रंगाच्या फ़ुलांमुळे पांगारा सुशिभिकरणाचा वृक्ष म्हणुन ओळखला जातो. आपल्याला हा भडक पांगारा माहित आहे पण पांगाऱ्याच्या फ़ुलांना सुगंध अजिबात नसतो. पण त्यात तयार होणाऱ्या मधाकडे अनेक पक्षी आणि किडे आकर्षित होतात.

उपयोग:

पांगाऱ्याच्या सालीचा लेप व्रण, सूज व सांधेदुखी यांवर लावतात. साल पित्तरोधक आणि कृमिनाशक आहे. ताज्या पानांचा रस कानदुखी तसेच दातदुखी यांवर वापरतात. कोकणात ताज्या पानांचा रस कृमिनाशक म्हणून वापरतात. लाल पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून लाल रंग, तर शेंदरी पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून शेंदरी रंग मिळवितात. या वृक्षाचे लाकूड हलके व टिकाऊ असल्यामुळे त्याचा उपयोग खेळणी, हलक्या वस्तू (उदा., फळ्या, खोकी, तक्ते, आगकाड्या, पळ्या, चाळणीच्या चौकटी इ.) बनविण्याकरिता करतात. चहाच्या किंवा कॉफीच्या मळ्यांत आणि बागांमध्ये सावलीसाठी तसेच मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल इ. वेलींना आधार देण्यासाठी मुद्दाम पांगारा वृक्षाची लागवड करतात.

विहीर बांधताना विहिराच्या पायाच्या घोळभागाला पांगाऱ्याची फळी वर्तुळाकार बसवतात. सालीतील धाग्यापासून दोर बनवतात. अशा पद्धतीने पांगारा हा अत्यंत महत्त्वाचा वृक्ष आहे. पांगारा हा उष्ण अग्निदीपक व कफ–कृमी-मेद नाशक आहे.

त्यांच्यापासून हिरवे खतही बनवितात. मुळे, साल व बिया यांपासून कीटकनाशके तयार करतात. काहींची खोड आणि मुळे चेचून मासे गुंगविण्याकरिता वापरतात. ‘हाई तुंग पी’ हे चिनी द्रव्य सर्व जातींच्या सुक्या सालीपासून मिळते; ते स्टॅफिलोकॉकस ऑरियसया सूक्ष्म जंतूविरुद्ध जंतु-वृद्धिरोधक म्हणून उपयुक्त आहे.

मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल व जाईजुई इत्यादींवा आधार देण्यास आणि चहा व कॉफीच्या मळ्यांत सावलीकरिता ही झाडे लावतात. पाने सारक (पोट साफ ठेवणारी), मूलत्र (लघवी साफ करणारी), कृमिघ्न (जंत वगैरे मारणारी), सांसर्गिक रोगातील सांधेदुखीवर व गाठीवर पाने बाहेरून लावतात. कानदुखीवर व दातदुखीवर पानांचा ताजा रस गुणकारी असून जखमांतील किडे मारण्यासही उपयुक्त असतो. साल ज्वरनाशक, पित्तनाशक, कृमिघ्न असते; नेत्रदाहात (डोळ्यांची जळजळ होण्यावर) तिचे अंजन घालतात. कच्च्या बिया विषारी असतात; परंतु उकळून व भाजून खातात. लाकूड पांढरे, हलके व टिकाऊ असल्याने पालखीचे दांडे, नक्षीकाम, फळ्या, खेळणी, पेट्या, नौका-बांधणी, तराफे, पडाव इत्यादींसाठी उपयुक्त असते. पोहावयास शिकताना याचे लाकूड वापरतात. साल कातडी कमाविण्यास व रंगविण्यास आणि त्यातील धागे दोऱ्याकरिता वापरतात. फुलांपासून लाल रंग काढतात. हा वृक्ष सुमारे २ मी. उंच वाढल्यापासून फुले येऊ लागतात. याच्या लागवडीमुळे जमीन सुपीक होते. गावाकडे या लाकडाचा मुख्य वापर जळणासाठी करतात.

पांगाऱ्याची मुळं फ़ार खोल जात नाहीत पण जमिनीचा कस सुधारण्यासाठी हे झाड काम करतं. याची केशमुळे हवेतला नत्र वायु शोषुन जमिनीत पुरवतात. समुद्रसपाटीवरच्या गावांमध्ये रस्त्याच्या सुशोभिकरणासाठी, दागिन्यांच्या आधारात या पांगिऱ्याच्या लाकडाचा वापर करतात. गोव्याकडे पांगिऱ्याच्या कोवळ्या पानांची आमटी केली जाते. याच्या फ़ुलांच्या पाकळ्या उकळून नैसर्गिक लाल रंग केला जातो. पांगारा लावायलाही सोप्पा असतो. ह्याची रोपं बियांमधून येतात. बाळ रोपं कुठेही चटकन रुजतात. रोपं मिळाली नाही तर याच्या फ़ांद्यांमधुन फुटवे येतात. त्यातूनही नवीन झाडं तयार होतात. शोभेसाठी हे झाड अत्युत्तम.

औषधी उपयोग:
१. ह्याची पाने साल व फुलांचा उपयोग आयुर्वेदामद्धे केला जातो.
२. पानांचा उपयोग भूक वाढविण्या करता व मूत्ररोगावर केला जातो.
३. गाठ व सांध्याच्या समस्यात सुद्धा याचा उपयोग होतो.
४. सालीचा उपयोग यकृताच्या रोगामद्धे व डोळ्याच्या औषधात करतात.
५. फुलांचा उपयोग पित्तदोष व कानांच्या समस्यांत होतो.
६. आदिवासी लोक ह्याच्या पानाच्या रसात कपडा भिजवून त्याचा शेक सांध्यांना देतात.
७. लिंबाच्या रसात ह्याच्या बियांचे चूर्ण एक आठवडा जखमेवर लावतात.
८. कोकणात ताज्या पानांचा रस कृमिनाशक म्हणून वापरतात
९. आर्तवजनक (विटाळ सुरू करणारी) आणि दुग्धवर्धक असतात.

मराठी साहित्यातील पांगारा:

पांगारा म्हणजे बोलायचे काम नाही! एकदा फुलला की, बहराशिवाय झाडावर काही नसते. फुललेल्या पळसाला काही पाने लगडलेली दिसतात. पांगारा आणि काटेसावर यांच्या बाबतीत बहर म्हणजे बहर! पण काटेसावरीपेक्षा पांगाऱ्याचा बहर जास्त गडद असतो. पांगारा म्हणजे केवळ लाल रंगाची एक अपूर्व दंगल असते. लाल रंगात चमकदार भगवा मिसळला की, जी मजा येईल ती या फुलांवर पसरलेली असते.

उतरत्या उन्हात पांगारा जणू चमकतो आहे असे वाटते. आपण तळवा पसरला आणि त्यावर जर लाल-भगव्या रंगाच्या ज्योती उमलून आल्या, तर जसे दिसेल तशी पांगाऱ्याची फुले दिसतात! एका रांगेत पाच-पाच फुले. तपकिरी, सोनेरी आणि लाल रंगाच्या कळ्यांमधून ती उमलून येतात. फुलांइतकीच या फुलांची बाह्यदले सुंदर असतात. पण, ती बघणाऱ्याच्या पटकन लक्षात येत नाहीत, कारण फुलांच्या ज्योती म्हणजे सौंदर्याची एक दंगल असते, आणि हे बाह्यदलांचे सौंदर्य अतिशय शालीन आणि मृदू असते. तपकिरी, सोनेरी आणि लाल छटा असलेली ही बाह्यदले एखाद्या सुंदर निरंजनासारखी असतात आणि त्यातून या लाल भगव्या ज्योती उमलून आलेल्या असतात.

पाच फुलांची एक रांग उमलून आली की, पुढच्या कळ्यांची रांग वर येऊ लागते. आधीची फुले पक्व होऊन गळून पडतात आणि त्यांना नाजूक गवारीसारख्या शेंगा लागतात. तोपर्यंत पुढची रांग रसरसून उठते. एकूण रचना फुलांची वेणी करतात तशी असते. अर्धचंद्राकार. एकूण लाल तेज बघता अर्धसूर्याकार म्हणावे लागेल.

पांगाऱ्याच्या फुलण्याला ‘फुलणे’ हा शब्द कितीही सुंदर असला तरी जरा सौम्य ठरेल. पांगाऱ्याची आतषबाजी असते. संध्याकाळचे सोनेरी ऊन पांगाऱ्याच्या तपकिरी आणि पांढूर फांद्यांवर पडलेले असते. संपूर्ण झाडाला एक सोनेरी छटा आलेली असते. सोनेरी झाड आपल्या सर्वांगावर चमकदार ज्योतींचे तुरे लेवून उभे असते. डोळ्याचे पारणे फिटेल अशी ही आतषबाजी असते.

रेनर मारिया रिल्केने लिहिले आहे –

सगळेच फुलते आहे भन्नाट बेपर्वाईने, फुलांवर सजवले गेले असते आवाज जर रंगांऐवजी, तर रात्रीच्या हृदयातून ऐकू आला असता बेफाम कोलाहल!

रात्री उडणारी फुलांच्या उमलण्याची धांदल ही कविता वाचली की, डोळ्यासमोर येते. रिल्के हा थोर कवी आहे तो त्याच्या या दृष्टीमुळेच!

किती लगबगीने लाल रंग भगव्या रंगात मिसळला जात असेल. त्यावर अद्भुत चमक कशी जाऊन बसत असेल. स्टेजवर एंट्री घेण्याच्या वेळी एखाद्या सुंदर आणि सेन्सिटिव्ह नटीची धांदल उडते, ती या वेळी माझ्या डोळ्यासमोर येते. तिचे ते ग्रीन रूममधील मेकअप करणे, तिची ते वेशभूषा सावरणे, तिचे ते संवाद आठवणे, तिचे ते आपली एंट्री येण्याची वाट पाहणे. हा सर्व गोंधळ सुरू राहतो आणि मग एंट्रीची वेळ आली की, सगळी धांदल सावरून ती स्टेजवर अवतरते. सगळ्यांना बेभान करते ती आपल्या रूपाने,  ‘ग्रेस’ कवीने लिहले आहे.

रिल्के वाचला की वाटते- सूर्य उगवला की पांगाऱ्याच्या कळ्या रात्रीची सौंदर्यरचनेची धांदल बाजूला ठेवून अशाच अवतरत असतील विश्वाच्या या स्टेजवर लाल-भगव्या चमकदार ग्रेसने उत्फुल्ल होऊन! पांगाऱ्याच्या या सगळ्या आतषबाजीच्या मागील धांदल-नाट्य समजून घ्यायला रिल्केच पाहिजे. येरागबाळ्याचे काम नाही हे! संध्याकाळी पक्षी किलबिलाट करत असतात. नटीच्या अभिनयाला जशी संगीताची पार्श्वभूमी असावी लागते, तशी पांगाऱ्याच्या या आतषबाजीला पक्ष्यांच्या किलबिलाटाची पार्श्वभूमी असावी लागते. आतषबाज पांगरा, सोनेरी ऊन आणि किलबिलाट करणारे पक्षी… संपूर्ण टेकडी आनंदून गेलेली असते. का नाही घेणार?

यौवन, वसंत आणि सौंदर्य एक आदिम त्रिकुट आहे! पांगाऱ्याची फुले कित्येकांना एखाद्या सुंदर स्त्रीच्या ओठांसारखी दिसतात. योगी अरविंद यांच्या ‘नाईट बाय द सी’ या कवितेतल्या ओळी अशा वेळी आठवतात. पुढे मोठे योगी झालेले श्री अरविंद, फुले, यौवन, स्त्रीत्व, वसंत आणि प्रेम यांना किती सहजपणे एकत्र आणतात हे बघण्यासारखे आहे!

या फुलांच्या मनमुराद सोहळ्यात, या मुग्ध समयी,
प्रेमाच्या उगवत्या सूर्यप्रकाशात लाजून चूर होतात मुली;
ज्यांच्या गालांवर चमकत राहते लज्जेची लाली,
ज्यांचे ओठ आहेत लाल माणकांसारखे आणि
ज्यांच्या ओठात भरून राहिला आहे काठोकाठ.
मध वसंताच्या यौवनाचा.

या सौंदर्याच्या सानिध्यात राहिले की, मन प्रसन्न होते, शांत होते. अशा वेळी जाणवते की, आपण शहरात राहून कशा कशाला मुकलो आहे. सौंदर्य नसेल तर आयुष्यात बाकी म्हणून फार कमी उरते. उरते ते बेगडी स्थैर्य आणि त्यातून येणारे बेगडी समाधान!यौवन, वसंत आणि प्रेम हे सर्व गोड वादळे तयार करतात. ही वादळांची नशा काढून टाकली आणि सौंदर्याकडे एक तत्त्व म्हणून पाहिले तर सौंदर्य आपल्याला नशेकडून शांततेकडे नेते.

सौंदर्याचे, फुलांचे, माणसाचे आणि पृथ्वीचे नाते जॉन कीट्सने त्याच्या ‘एन्डिमियन’ या कवितेत फार सुंदर सांगितलेले आहे –
‘A thing of beauty is a joy for ever:

उन्हातान्हात पोळून आणि तावून सुलाखून निघालेला पळस एखाद्या संसारात पोळलेल्या संतासारखा वाटतो. कारण शिशिराने या झाडांची झाडाझडती घेतलेली असते. त्यामुळे पिकली पाने त्याला सोडून जातात व अश्रू ओघळावे तशी पानगळ सुरू होते. पळसाच्या पानसंभाराला अवकळा येते आणि पळस जणू काय जगापासून निवृत्त होतो.

हिवाळयात घुसमटलेली झाडे उन्हाळयाची चाहूल लागताच मोकळा श्वास घेतात आणि मग तो श्वास लाल, गुलाबी, हिरव्या पालवीच्या रूपाने बाहेर येतो. या हिरव्यागार श्वासामुळे झाडे ताजी व टवटवीत होतात. त्यांच्यामधून एक प्रकारचा जिवंतपणा सळसळत असतो. अशा झाडांपैकी आपल्याच पानांच्या टाळ मृदंगाच्या तालात दंग असतो. तो सालस पळस! उन्हातान्हात पोळून आणि तावून सुलाखून निघालेला पळस एखाद्या संसारात पोळलेल्या संतासारखा वाटतो. पळसाच्या पानसंभाराला अवकळा येते आणि पळस जणू काय जगापासून निवृत्त होतो.

असा निष्पर्ण वृक्ष संसार त्यागाची तयारी करत असतानाच त्याच्या हिरवट काळया कळया लोंबतात व त्या कळयातून आपला विचार बदलून पळस हळूहळू पालवीबरोबर भगव्या रंगाच्या कळया नि फुले जेव्हा धारण करतो त्यावेळी हा सालस पळस जणू काय खांद्यावर भगव्या पताका घेऊन कुठे तरी वारीला निघालेला वाटतो.

कोकणात जसे वा-याने झपाटलेले माड सागरकिनारी आपले हिरवे रुमाल डोक्याला बांधत जणू काय मक्केस निघाल्यासारखे ओळीने सागर किना-यावर उभे असतात तसाच हा पळस आपल्या फुलांच्या भगव्या पताका घेऊन पंढरीस निघाल्यासारखा वाटतो.

नाशिकच्या आदिवासी किंवा खंडाळयाच्या पळस दरीत हा भगवाधारी आपल्याला दर्शन देतो. आदिवासी पोरं ही पळस फुलांचा रंग तयार करून होळीला रंग खेळतात. काही तर भाजीसाठी या फुलांचा वापर करतात. पण यावेळी पळसावरील कावळे मात्र पोट भरून फुलांचा रस अमृतासारखा पित असतात. कोण म्हणतो कावळे घाणच खातात?

उन्हाळयात झाडे गरम झाली की त्यांची डोकी भडकतात. अशाच झाडांपैकी पांगारा हे झाड फारच भडक आहे. हे पांगारकर वसंत ऋतूची चाहूल लागताच गरम होऊ लागतात, त्यामुळे हिवाळयात यांना पालवी फुटत नाही तर लाल फुलंच फुटतात. उन्हाळयात तर पांगारकराचे डोके भडकते आणि त्यांच्या फांद्यातून लालभडक ज्वाळा निघाव्यात अशी लालभडक फुले उमटतात. त्यामुळे हिवाळयात शिशिर ऋतूत हातापायावर आलेले काटे उन्हाळयातही बोचत असतात. त्यामुळे त्याच्या जवळ पब्लिक जरा कमीच येतात. पण पांगारकर जेव्हा लालभडक निशाणे खांद्यावर घेऊन काटेरी थाटात उभे राहतात तेव्हा रानात आता क्रांती जवळ आली, असे वाटते.

फुले इतकी लालभडक असतात जणू पांगारकर ज्वाळेसारखा धगधगीत श्वास घेतात. हे जरी खरे असले तरी त्यांची फुलं तेवढीच रसपूर्ण व गोड असतात आणि येथेही कावळे, इतर पक्षी त्यांच्यावर ताव मारतात. पण या पांगारकरांना कसला वंशाचा विधिनिषेध नसतो.

गंधाच्या बाबतीत हा अरसिक असतो इतर क्रांतिकारका सारख्याच पण नुसते लाल झेंडे खांद्यावर घेऊन क्रांती होत नाही. त्यासाठी माणूस अंतरबाह्य बदलायला हवा. नुसता पांगारकरासारखे नुसते लालभडक झेंडे (फुलांचे) घेऊन उपयोगी नाही. पांगारा वसंत ऋतूत फुलला तरी त्यांच्या अंगावर काटे येतात. हे काटे रोमांचाचे नसतात तर ते क्रांतीचे भाले असतात. म्हणूनच म्हणतात,

पांगारा फुलला
लाल लाल बावटा
परि क्रांतीचा काटा
देहावरी!

म्हणूनच पांगाऱ्याला भारतीय पोष्टाच्या तिकिटावर मान मिळाला आहे.

— डॉ. दिलीप कुलकर्णी.

संदर्भ:
१. मराठी विकिपीडिया
२. श्रीनिवास जोशी Tue, 13 April 2021
३. मिलिंद हळबे यांचे विविध लेख.

४. श्रीकांत इंगळहळीकर यांचे विविध लेख.

५. April 24, 2016 01:30:36 AM dainik prahar

६. गुगल वरील अनेक लेख

 

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 78 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

4 Comments on ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ८ – पानझडी जंगलातील फुलांच्या ज्योती – पांगारा वृक्ष

  1. खूप छान अभ्यासपूर्ण माहिती सहज सोप्या पण गोड भाषेत लिहिली आहे. पंगारा संग्राह्य माहिती.

  2. इतकी सहज वाचत राहावी अशी पांगरा ची माहिती आपल्या डोळ्यासमोर ते लालबुंद झालेले पांगर झाड त्याचे वेगळपण समोर उभे राहते. आपण हे पाहिलेल्या पांगारा झाडाला आता लेख वाचला की कुठे पहिले असे प्रश्न पडतो.मी ओंकारेश्वर शनवर पेठ येथे पाहिले. उत्तम आवडणारी अभ्यासपूर्ण लेख.

  3. डॉ.कुलकर्णी ह्यांचा हा लेख सुध्धा वाचनीय तसेच माहितीयुक्त आहे. पांगारा वृक्ष हा जंगलातला जणू एक बोलका वृक्ष वाटतो. त्यामुळे साहित्यकारांनी त्यांच्याविषयी भरभरून लिहिलेय. गुजरात मध्ये आम्ही असताना रंगपंचमीला पाण्यात ह्यांची फूलं रात्री भिजवतात व त्यांच्या पाण्याने खेळतात. हा रंग पक्का असु अजिबात फिक्का पडतं नसतो. राजस्थानमध्ये मुसलमानांशी लढताना निकाली लढ्याला ‘केसरीया करो’ असे म्हटले जाते, ते ह्या फुलांच्या रंगावरूनच.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..