नवीन लेखन...

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ३ – पृथ्वी वरील अमृत वृक्ष हिरडा

पृथ्वी वरील अमृत वृक्ष हिरडा:

हिरडा हा पर्णझडी जंगलामध्ये आढळणारा वृक्ष आहे. हा काँब्रेटेसी कुलातील आहे. याचे शास्त्रीय नांव Terminalia chebula आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिण भारतातील राज्यापर्यंत ही प्रजाती मुबलक आढळते. बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य भारत, महाराष्ट्र इ. ठिकाणी ही वनस्पती आढळते. महाराष्ट्रात कोकण प्रांत, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे, विदर्भ इत्यादी ठिकाणी हा वृक्ष नैसर्गिकरीत्या आढळून येतो. हिरडा वृक्ष आजरा, चंदगड, राधानगरी, गगनबाडा, पन्हाळा, शाहुवाडीच्या जंगली भागात दिसतो. उंच डेरेदार वाढणारा हा वृक्ष आहे. नव्याने येणारी पालवी, फांद्या इत्यादी भागांवर मऊ चमकणारे चांदीसारखे केस असतात. नवीन येणारी पालवी बदामी लालसर रंगाची असते. पाने अंडाकृती किंवा काहीशी आंब्याच्या पानांसारखी, एकाआड एक ८-२० सें.मी. आकाराची असतात. पाने थंडीच्या वेळी गळून पडतात. फुले मंद, पांढरट, सुवासिक, देठविरहित असतात, फळे अंडाकृती आकाराची असतात. फळांवर कधी कधी पन्हाळीसारख्या पाच रेषा असतात. कोवळ्या वाळलेल्या फळांस “बाळहिरडा’, तर परिपक्व फळास “सुरवारी हिरडा’ या नावांनी संबोधले जाते. समुद्र सपाटीपासून २ हजार मी. उंची पर्यंतच्या जमिनीत हिरड्याची झाडे भारतात सर्वत्र आढळतात.

आयुर्वेद व इतर पारंपरिक औषध पद्धतींमध्ये या वनस्पतींचा उपयोग रसायन म्हणून केला जातो. त्रिफळा चूर्णामध्ये आवळा आणि बेहडा या फळांसोबत हिरड्याच्या फळांच्या चूर्णाचा समावेश असतो. फळांमुळे शरीरातील सर्व क्रिया सुधारतात असे शास्त्र सांगते. चूर्ण, आसव, आरिष्ट, काढे, क्वाथ, गुटी, अर्क, मलम, भस्म, घृत इ. औषधे यांपासून बनविली जातात. औषधात व आरोग्य वाढविणाऱ्या द्रव्यात याचे स्थान महत्त्वाचे आहे.

एका लोक कथेनुसार एकदा इंद्र अमृत पीत असतांना त्यातील काही थेंब पृथ्वीवर सांडले. ते थेंब जेथे सांडले तेथे (त्या थेंबातून) हिरड्याची उत्पत्ती झाली.

हरीतकी मनुष्याणां मातेव हितकारणी ।
कदाचित्कुप्यते माता गोदरस्था हरीतकी॥

या वचनात हिरड्याला मातेची उपमा दिलेली आहे. हिरडा मातेसमान प्रेम करणारा आणि हितकारक आहे. आई सुद्धा काहीवेळा आपल्या मुलांवर रागवते परंतु हिरड्याचे सेवन केले असता त्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.
तसेच

यस्यां नास्ति माता, तस्य माता हरितकीः

अर्थात – माताविहीन लहान मुलांची माता हिरडा असतो असे एक संस्कृत मधील वचन आहे. त्यावरून याच्या उपयोगाची कल्पना येते.

हिरड्याचे महत्त्व विशारद करणारा आणखीन एक श्लोक-

हरिं हरीतकीं चैव गायत्रींच दिने दिने।
मोक्षरोग्यतपः कामाश्चिन्तयेद भक्षयेज्ज्पेत् ॥

अर्थात-

मोक्षाची इच्छा करणाऱ्याने प्रत्येक दिवशी विष्णूचे चिंतन करावे, आरोग्याची इच्छा करणाऱ्याने प्रत्येक दिवशी हिरड्याचे सेवन करावे व तपाची इच्छा करणाऱ्याने गायत्रीचा जप करावा.

आयुर्वेदात जेवढी म्हणून औषधे सांगितली आहे. तेवढ्या सगळ्या औषधात हिरडा श्रेष्ठ म्हटला आहे. स्वर्गात देवांसाठी साठविलेले अमृत पृथ्वीवर पडले आणि त्याचे हिरडे झाले. खरेच हिरडा अमृत आहे. ह्याच्या नित्य सेवनाने वृध्दत्वपणा जाणवत नाही.

हिरड्याला “हरीतकी” असे म्हणतात. हिरड्याची झाडे २५ ते ३० मी. उंच वाढणारी असतात. झाड झुपकेदार, पसरट व अनेक वर्षे टिकणारे असते. याचे लाकूड अत्यंत कठीण असते. खोडाची उंची ७ ते १० मी. (मध्यम जमीन) २४ ते ३० मी. (सुपीक जमीन) खोडाचे साल करड्या रंगाचे त्यावर असंख्य चीरा असतात. पाने १० ते ३० सें. मी. लांब, टोकदार, पानातील शिरा ६ ते ८ असून समोरा समोर असतात. पाने टोकाशी एकवटलेली असतात. कोवळेपणी पानांवर केस असतात.

फुले – ग्रीष्म ऋतुत येतात रंग पांढरा पिवळसर असतो. ती शाखाग्री व पानांच्या बगलेत असतात. नवीन फुलांना सुवास असतो तर जुन्या फुलांचा वास उग्र असतो.

फळ – लांबी साधारणपणे ३ ते ६ सें. मी. कोवळ्या फळांचा रंग हिरवा तर पिकलेल्या फळांचा रंग पिवळसर धूसर. आकार लंब वर्तुळाकार, प्रत्येक फळात एक बी असते, फळांवरून हिरड्याच्या अनेक जाती ओळखता येतात. बी लांबट आणि कठीण असते.

साधारण १० वर्षे वयाचे झाड झाल्यावर फळे मिळण्यास सुरुवात होते. २ ते २.५ महिन्यांच्या अपरीपक्व फळांना बाळ हिरडे म्हणतात.

फळांच्या रंगावरून हिरड्याच्या सात जाती आहेत,

१) विजया,

२) रोहिणी,

३) पूतना,

४) अमृता,

५) अभया,

६) जीवन्ती

७) चेतकी

बाळ हिरडा – फळात अठळी तयार होण्यापूर्वीच आपोआप गळून पडणारे फळ, याचा औषधात विशेष उपयोग होतो. लहान बालकात याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

चांभारी हिरडा – हिरड्याचे थोडे अपरिपक्व फळ म्हणझे चांभारी फळ, उपयोग कातडी कमविण्यासाठी होतो. मोठ्या प्रमाणात निर्यात होतो.

सुरवारी हिरडा – हिरड्याचे पूर्ण पिकलेले फळ म्हणजे सुरवारी, औषधी उपयोग अनेक.

रंगारी हिरडा – याचा उपयोग रंगासाठी होतो.

या वनस्पतीला संस्कृत भाषेत अनेक नावे आहेत –

• हरीतकी – शंकराच्या घरात (हिमालयात) उत्पन्न होणारी, सर्व रोगांचे हरण करते.

• हेमवती, हिमजा – हिमालय पर्वतावर उत्पन्न होणारी.

• अभया – हिरड्याचे नित्य सेवन केल्याने रोगाचे भय राहत नाही.

• कायस्था – शरीर निरोगी, धष्टपुष्ट करणारी.

• पाचनी – पाचन करणारी.

• प्रपथ्या – पवित्र करणारी.

• प्रमथा – रोगांचे समूळ उच्चाटन करणारी.

• श्रेयसी – श्रेष्ठ.

• प्राणदा – जीवन देणारी.

रोपनिर्मिती व लागवड

हिरडा वनस्पतीची रोपेनिर्मितीसाठी परिपक्व फळे गोळा करून सावलीत वाळवावी. उन्हात वाळविलेली फळे कमी उगवणक्षमता दाखवितात, त्यामुळे फळे सावलीतच वाळविणे आवश्यक आहे. चांगल्या वाळलेल्या फळांचा मगज काढून बिया बाजूला करणे आवश्यक असते. यासाठी लाकडी ठोकळा किंवा दगड याने फळाचा मगज काढावा. एका किलोत साधारणतः ४०-८० फळे आणि मगज काढलेल्या ६०-१२० बिया असतात. बियांना रोपवाटिकेत वाफ्यावर पेरण्याआधी कोमट पाण्यात चार-सहा दिवस ठेवून वाफ्यावर पेरणी करावी. दोन बियांतील अंतर पाच सें.मी. व दोन ओळींतील अंतर दहा सें.मी. ठेवावे २१ ते ३० दिवसांत बियाणे उगवते. साठ टक्के उगवण टक्केवारी संस्करण केल्याने आपणास मिळते. उगवलेल्या रोपांना ऊन, पाऊस, कडाक्याची थंडी इ. पासून संरक्षण करणे आवश्यक असते. यासाठी शेडनेटचे आच्छादन करावे लागते. बियाणे जानेवारी- फेब्रुवारीमध्ये मिळाल्यास रोपे जूनपर्यंत तयार होतात. गादीवाफ्यावर बियाणे उगविल्यानंतर ती पिशवीमध्ये टोकून घ्यावीत. दोन ते चार फूट वाढलेली रोपे लागवडीसाठी वापरावीत. काही ठिकाणी कलमे करून या वनस्पतींची लागवड केली जाते.

लागवडीसाठी २ x२ x२ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. दोन झाडांमधील अंतर ४x ४ मीटर आणि दोन ओळींतील अंतर ७x ७ मीटर ठेवून लागवड करावी. शेताच्या बांधावर पूर्व-पश्चिम लागवड केल्यास शेतातील मुख्य पिकाबरोबर या वनस्पतीपासूनही आपणास उत्पन्न मिळू शकते.

फळामध्ये अथ्रोक्यूनान, ग्लुकोसाईड, च्युबेलिनिक ऍसिड, टॅनिक ऍसिड, टारचेबिन, व्हिटॅमिन “सी’, च्युबेलीन, गॅलिक ऍसिड ही रासायनिक द्रव्ये असतात. लागवडीनंतर ८ ते १२ वर्षांनी उत्पादन सुरू होते. कलमे तयार करून लागवड केल्यास रोपे लवकर फळे देतात. साधारणतः पंधरा वर्षे वयाचे झाड २०किलो बाळहिरडा किंवा ५० किलो मोठा हिरडा देते.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत निरोगी राहणं हे एक मोठं आव्हानच आहे. निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहारासोबतच काही आयुर्वेदिक आणि घरगूती उपचार तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात. यासाठी एका नैसर्गिक आणि घरगुती औषधाबाबत माहिती देत आहे. ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. हिरडा या औषधी वनस्पतीबाबत तुम्ही सर्वांनी नक्कीच ऐकलं असेल. या नैसर्गिक औषधामध्ये अनेक आजारापणांना दूर ठेवण्याची ताकद असते. आर्युर्वेदात याबाबत अनेक संदर्भ आढळतात. प्राचीन काळापासून हे औषध विविध आजारांना दूर ठेवण्यासाठी वापरलं जातं. तुमचा वात, पित्त आणि कफ दोष नियंत्रणात राहण्यास मदत होते. या औषधी वनस्पतीची साल, फळं आणि मुळांचा औषधाप्रमाणे वापर केला जातो. हिरडाचे फळ पिकल्यावर त्याचा हिरवेपणा संपून ते काळसर दिसू लागते. मात्र हिरडा औषधासाठी वापर करण्यापूर्वी या वनस्पतीविषयी सारं काही जाणून घेणं गरजेचं आहे. कारण हिरडा जसा आरोग्यदायी आहे तसंच काही वेळा त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. म्हणूनच हिरड्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या. हिरडा या वनस्पतीमध्ये अनेक औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात. हिरडा आरोग्यासाठी अतिशय पोषक असतं. यामध्ये व्हिटॅमिन्स सी आणि पोषक घटक असतात. म्हणूनच जर तुमच्या शरीरात व्हिटॅमीन सीची कमतरता असेल तर हिरडा खाण्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

हिरड्याचे औषधी गुणधर्म:

हिरड्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यासोबत तुम्ही अनेक आजारपणांना दूर करण्यासाठी हिरड्याचा वापर करू शकता. तज्ञ्जांच्या सल्लानूसार तुम्ही काही आजारपणांवर हिरडाचा वापर करता येतो. हिरड्यातील औषधी गुणधर्मांमुळे अनेक आरोग्य समस्या दूर ठेवता येतात.यासाठीच खाली दिलेल्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी हिरड्याचा वापर करा.

लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणतात की ही एक अतिशय प्रसिद्ध कायाकल्पिक औषधी वनस्पती आहे. या झाडाची फळे, मुळे आणि साल आयुर्वेदिक औषधी तयार करण्यासाठी वापरतात. हिरड्यामध्ये मीठ वगळता पाच रस म्हणजेच गोड, तिखट, कडू, तुरट आणि आंबट सापडतात. या औषधामध्ये खनिज, जीवनसत्व, प्रथिने, जीवाणूच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ व प्रतिजैविक गुणधर्म आहेत. याचे बिया असलेले फळ खाल्ले जाऊ शकते. हिरड्या चे इतर फायदे जाणून घ्या.

१. आजकालच्या सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे आणि प्रदूषणामुळे तुम्हाला सतत सर्दी, खोकला आणि कफाचा त्रास होतो. मात्र या त्रासापासून वाचण्यासाठी तुम्ही हरड वापरू शकता. कारण तुमच्या शरीरातील कफदोष संतुलित राहण्यास मदत होते. यासाठी मधात हिरड्याची पावडर मिसळून त्याचे एक चाटण तयार करा. रात्री झोपण्यापूर्वी हे चाटण घ्या ज्यामुळे रात्री तुम्हाला निवांत झोप लागेल. नियमित हा उपचार केल्यामुळे हळूहळू तुमचा खोकला अथवा सर्दी कमी होईल. हिरड्यामध्ये तुमचे शरीर चांगल्या पद्धतीने डिटॉक्स होण्यास मदत होते. ज्यामुळे तुमचे पोट साफ होते आणि आतड्यांना आराम मिळतो. अनेक आजारपणं आपोआप कमी होतात. याशिवाय तुमचे वजन देखील संतुलित राहते. त्यामुळे जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर हिरडा तुमच्या फायद्याची वनस्पती आहे.

२. कधी कधी तेलकट पदार्थ, हवामानातील प्रदूषण अथवा दूषित पाण्यामुळे तुम्हाला घशाचे इनफेक्शन होते. ज्यामुळे घसा बसणे अथवा घसा खवखवण्याचा त्रास जाणवू लागतो. जर तुम्हाला वारंवार असा त्रास होत असेल तर तुम्ही हिरड्याच्या पाण्याने गुळण्या करू शकता.

३. मायग्रेनचा त्रास असेल तर जीवन जगणं अतिशय कठीण जातं. कारण या आजारपणात तीव्र डोकेदुखीला सामोरं जावलं जागतं. जर तुम्हाला सतत मायग्रेनचा त्रास होत असेल तर तुम्ही तो दूर करण्यासाठी हिरड्याचा वापर करू शकता. यासाठी कोमट पाण्यातून हिरड्याची पावडर घ्या आणि डोकेदुखी कमी करा.

४. मुळव्याध ही अशी एक समस्या आहे. ज्यामुळे तुम्हाला दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. मुळव्याधीमुळे पोट स्वच्छ होत नाही. पोट स्वच्छ न झाल्यामुळे शौचाला जाणं आणखी त्रासदायक होतं. मात्र जर तुमच्या घरी हिरड्याची पावडर असेल तर काळजी करण्याची मुळीच गरज नाही. कारण तुम्ही पाण्यात हिरड्याचे फळ उकळून ते पाणी घेऊ शकता. ज्यामुळे तुमचे पोट नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होईल आणि मुळव्याधीचा त्रास कमी होईल.

५. जर तुम्हाला युरीनरी विकार असतील तर तुमच्यासाठी हिरडा एक उपयुक्त औषधी आहे. युरीनला गेल्यावर जळजळ होणे, युरीनचे प्रमाण कमी असणे अथवा सतत युरीन इनफेक्शन होणे असे त्रास होत असतील तर हिरड्याचा वापर तुम्ही करू शकता. यासाठी मधातून हिरड्याची पावडर घातलेले चाटण दिवसभरात दोन वेळा घ्या.

६. जखमा बऱ्या करण्यासाठी अथवा सूज कमी करण्यासाठी तुम्ही हिरड्याचा वापर करू शकता. कारण हिरडा तुमच्या शरीरातील सूजेला कमी करून शरीराचा दाह कमी करण्यास मदत करतो. यासाठी जखम अथवा सूज कमी करण्ययासाठी हिरडा कोमट पाण्यातून पिण्याचा सल्ला दिला जातो. हिरडा आणि सेंद्रिय गूळापासून तयार केलेले लाडू खाण्यामुळे देखील शरीराचा दाह कमी होतो आणि जखमा बऱ्या होतात.

७. ज्यांना बद्धकोष्ठताचा त्रास होतो त्यांना हिरडा वरदान ठरू शकतं. संशोधनानुसार हिरड्यामधील औषधी गुणधर्मांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकतो. यासाठी तज्ञ हिरड्याचा कच्च्या फळांचा गर मीठासोबत खावा. दालचिनीसोबत हिरड्याचे चुर्ण घेण्यामुळे देखील तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. ज्यामुळे शरीरातील आतड्यांची शुद्धी होते.

८. आईचे दुध पिणाऱ्या तान्हा बाळांना बऱ्याचदा पोट दुखीचा त्रास होतो. पोटात गॅस झाल्यामुळे ही लहान मुलं रडतात. लहान असल्यामुळे ती बोलून त्यांचं दुखणं सांगूही शकत नाही. त्यांच्या रडण्यातून त्याच्या आईला आणि डॉक्टरांना त्याची ही समस्या समजते. मात्र बाळघुटीतील हिरड्याची मात्रा दिल्यामुळे बाळाच्या पोटातील गॅस कमी होऊ शकतो. मात्र हे चाटण देण्यापूर्वी बालरोग तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्या.

९. हिरड्यामध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुम्हाला सांधेदुखी अथवा पायदुखीपासून सुटका मिळू शकते. बऱ्याचदा सांधेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही एखादी पेनकिलर घेता मात्र त्यामुळे ते दुखणे तात्पुरते थांबते आणि पुन्हा थोड्यावेळाने सुरू होते. मात्र सांधेदुखीचा त्रास मुळापासून कमी करण्यासाठी तुम्ही हिरड्याचा वापर नक्कीच करू शकता.

१०. या औषधामध्ये खनिज, जीवनसत्व, प्रथिने, जीवाणूच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ व प्रतिजैविक गुणधर्म आहेत. याचे बिया असलेले फळ खाल्ले जाऊ शकते.

१२ लैंगिक समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदात हिरड्याचा वापर केला जातो. लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी, एका  महिन्यासाठी दररोज 1-2 ग्रॅम हिरड्याची पावडर खा. अकाली स्खलन होण्यावर याचा उपचार करणे फायदेशीर आहे. हिरड्याचा वापराबद्दल हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. की जर आपण जास्त काळासाठी त्याचा वापर केला, तर याचे गरम आणि तुरट गुणधर्मांमुळे लैंगिक शक्तीचा अभाव देखील होऊ शकतो.

हिरडा सेवनाचे साईड इफ्फेक्टस

हिरडा आरोग्यासाठी उत्तम आहे हे तर आपण जाणतोच मात्र हिरड्याचा वापर काही वेळा धोकादायकही ठरू शकतो. कारण हिरडा ही एक उष्ण प्रवृत्तीची वनस्पती आहे. म्हणूनच गरोदरपणात हिरड्याचा वापर मुळीच करू नका. त्याचप्रमाणे तान्हे बाळ आणि पाच वर्षांच्या खालील मुलांना हिरडा अतीप्रमाणात देणे धोकादायक ठरू शकते. यासाठीच स्तनपान देणाऱ्या मातेनेही हिरड्याचा वापर आहारात करू नये.

हिरडा व पर्यावरण

हिरडा या झाडापासून वजनाने जड व चांगल्या प्रतीचा कोळसा निघतो व हाच गुणधर्म या वृक्षाचा कर्दनकाळ ठरला आहे. महाराष्ट्रातील भोर तालुक्यात हिरडेशी भागात त्या झाडाची तोड विशेष करण्यात येते व त्याला बाहेरून भरपूर मागणी असल्याने दलाल लोक रोख पैशाचे आमिष दाखवून ‘अधिक कोळसा पिकवा’ या प्रकारची मोहीम सुरू करून त्यासंबंधी उत्तेजन व कारवाया सुरू करतात. याच मोहिमेची साथ शेजारील प्रदेश, विशेषत: भाटघर धरणावरील वेळवंडी खोरे यात पसरू पाहत आहे. भोर संस्थानात त्या काळात वावडुंग, किंजळ, ऐन, येलूर वगैरे वनस्पती तोडण्यास बंदी असे. हिरडा झाडाची तर फांदीदेखील खासगी वा सरकारी रानांतील तोडू देत नसत. याबद्दल लोकांना शिक्षाही होत असत.
आज या भागांत अगदी वेगळी परिस्थिती दिसत आहे. हल्ली जरी कोणीही पेठेच्या रस्त्यावरून निरीक्षण करेल अगर लोकांची बोलणी ऐकेल तर हिरडीचे व्यवहाराऐवजी कोळशाची आवक व त्यासंबंधीचे सौदे कानावर ऐकू येतील. जवळजवळ सर्व खासगी राने तुटत चालली असून, पुणे शहराच्या आसपास जशा रूक्ष टेकडय़ा दिसतात, तसा हिडरेशी गावासभोवतालचा प्रदेश दिसण्यास सुरुवात झाली आहे. हिरडी, किंजळ, ऐन या झाडांची सरसकट तोड सुरू असून त्याचा कोळसा करण्याच्या भट्टय़ा शेताशेतावर रचल्या जात आहेत. हिरडा गोळा करण्याचे उत्पन्न यावरून सोन्याचे अंडे देणाऱ्या हंसी पक्ष्याची आठवण होते. हे पैशाच्या भ्रमाने धुंद झालेले लोक हंसी पक्ष्यालाच मारत आहेत. सरकारी रानांतील झाडे तोडण्यास जरी बंदी असली तरी एकदा खासगी रानं तुटली की लोकांची वखवखलेली दृष्टी शेजारील जंगलावर जाणार व त्याचाही ऱ्हास होण्याचा धोका वाढू लागला आहे. जंगल खाते कितीही तत्पर असले तरी सर्व जनताच जर भ्रम पडून काही गुन्हे करण्यास प्रवृत्त होऊ लागली आणि खात्यातील लोकांना त्यांच्यातच चांगल्या रीतीने राहावयाचे असल्याने एकंदर सर्व प्रकार नियंत्रणाखाली आणणे फार जड जाणार आहे.

कोळसा तयार करण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की बऱ्याच शेतांतून कोळशाचे ढीग व तोडलेली लाकडे दिसतील. जंगलातून गावाकडे येणाऱ्या पायवाटेवर ठिकठिकाणी बांधाच्या कडेवर कोळशाची पोती आढळून येतील. अगदी डोंगरकपारीतून हे भोळे, अशिक्षित आदिवासी डोक्यावरून कोळशाची पोती घेऊन १० ते १५ मैल वाटचाल करून येतात. येथे रानावनातून प्रत्येक जण कोळसा करण्याचे उद्योगात असल्याचे आढळून येईल. लोकांची वृत्ती अस्थिर बनत चालली आहे. नवीन वृक्ष लावण्याचे ऐवजी चांगली जोमदार झाडे कशी तोडता येतील, सरकारी रानातील झाडे वठलेले (सुकलेले) वृक्ष कसे बनतील, यासंबंधीच्या कारवाया आत्तापासूनच काही उपद्व्यापी लोकांनी सुरू केल्यास नवल नाही. पूर्वी येथे धान्याची आवक क्वचितच होई; परंतु आता पाहिले तर हजारो रुपयांच्या ज्वारीची आयात करावी लागते. दिवसेंदिवस हिरडा पाठविण्याचे प्रमाण घसरत चालले आहे व कोळशाचे प्रमाण अनेक पटींनी वाढलेले दिसून येईल. येथील सुज्ञ लोकांस विचारले असता त्यांनाही पटते व कळते, की जंगल नाही की पाऊस कमी पडतो, जमिनीची धूप वाढते व त्याचेच शेवटी दुष्काळात रूपांतर होते. हे सर्व माहीत असूनदेखील या भोळ्या, परंतु आता पैशाच्या भ्रमात पडलेल्या लोकांस कसे पटवून द्यावे याचा त्यांस विचार पडला आहे, आणि त्यासंबंधी निर्भीड विचार बोलून दाखविण्यास ही मंडळी तयार नाहीत हे खेदाने म्हणावे लागते. एकंदरीत पैशाच्या भ्रमाने पछाडलेले लोक स्वत:चे हित न जाणता काही लोभी, आपमतलबी लोकांच्या सल्ल्याने विनाशाकडे खेचले जात आहेत, हे निश्चित. हीच जर स्थिती अशीच काही वर्षे चालू राहिली तर एक अत्यंत दुष्काळी प्रदेश म्हणून या भागाची गणना करावी लागेल.

अजूनही या प्रदेशाच्या काही भागांत अगदी अल्प प्रमाणात लोकांच्या झाडतोडी मोहिमेपासून वाचलेला भाग आढळतो. त्यास येथील लोक ‘रहाट’ असे म्हणतात.

कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा हिरडा वृक्षाचे प्रमाण जिल्ह्यातील जंगलात विरळ झाले आहे. शासनाच्या शतकोटी वृक्ष योजनेत तसेच स्थानिक पातळीवर हिरड्याचे संरक्षण अन् संवर्धन केले तर हिरड्याची झाडे अधिक प्रमाणात दिसू शकतील; मात्र एकेकाळी हिरड्याचे प्रमाण जंगलांत खूप होता मात्र सध्या ही स्थिती नाही. हिरड्यामध्ये टॅनिनचे प्रमाण जास्त असल्याने चर्म उद्योगात तसेच आयुर्वेदिक औषधांत मोठ्या प्रमाणात वापर होतो. घर बांधणीत लाकूड वापरले जाते. पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील जंगली भागांमधून रस्ते केले गेले. रस्त्याशेजारी असणारी हिरड्याची झाडे तोडली गेली. गवताळ कुरणे, शेताच्या बांधावर, शहरात, गावभागात कोणी हिरड्याचे झाड लावत नाही.

हिरडा फळे गोळा करावयाचा कालावधी ३-४ महिने चालतो. त्या काळात आदिवासी लोकांना चांगला रोजगार मिळतो. अशा हा बहुगुणी, बहुउपयोगी व औषधी गुणधर्मानी युक्त अशा हिरडा वृक्षाचे संरक्षण सर्वानी केले पाहिज

संदर्भ:

दैनिक सकाळ २४ नोव्हेंबर २०२१

मराठी विकिपीडिया

महाऔषधी हिरडा (२००६) डॉ. अंकुश जाधव, मनोविकास प्रकाशन, मुंबई

मराठी विश्वकोश (प्रथम आवृत्ती)

गुगल वरील बरेच लेख

सर्व फोटो गुगल वरून साभार

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 78 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ३ – पृथ्वी वरील अमृत वृक्ष हिरडा

  1. बरेच माहिती नसलेले हिरड्या चे औषधी गुणधर्म कळले. तसेच हिरडा पर्यायावरण साठी खूप उपयुक्त झाड हे वाचून आनंद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..