नवीन लेखन...

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग २- सदाहरित जंगलातील सोने, सागवान वृक्ष

सदाहरित जंगलातील सोने – सागवान वृक्ष

घराचे बांधकाम करायची चर्चा सुरू झाली, की प्रथम आठवणारे झाड म्हणजे सागवान. सागवानाचे लाकूड प्रत्येकाला हवे असते. घराच्या दरवाजाचे लाकूड सागवानाचे असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते.

सागवानाचे शास्त्रीय नाव टेक्टोना ग्रँडीस (Tectona grandis) आहे. हा Verbenaceae कुळातील वृक्ष आहे. सागवान हा मूळचा दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशिया, मुख्यतः बांगलादेश, भारत, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, थायलंड आणि श्रीलंका येथे आहे, परंतु आफ्रिका आणि कॅरिबियन देशातील अनेक देशांमध्ये या जातीची शेती आहे. म्यानमार (बर्मा) च्या सागवानच्या जंगलांमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट साग आढळतात. फार प्राचीन काळापासून (इ. स. पू. सु. २००० वर्षांपूर्वीपासून) उत्तम इमारती लाकडासाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. हा प्रामुख्याने सदाहरित जंगलातील वृक्ष क्वचित पानझडीच्या जंगलातही आढळतो.

‘शाक’ ह्या संस्कृत नावापासून ‘साग’ हे मराठी आणि इतर भारतीय भाषांतील तत्सम नावे आली असणे शक्य आहे. महाभारतात (इ.स.पू. ३१००–१०० वर्षे ) आणि सुश्रुतसंहितेत ‘शाक’ व चरकसंहितेत ‘द्वारदा’ असा उल्लेख आढळतो. याची इतर काही संस्कृत नावेही प्राचीन वैद्यक ग्रंथांत आढळतात. लॅटिन नावातील टेक्टोना हे नाव मूळचे ग्रीक भाषेतील टेक्टन म्हणजे सुतार या अर्थाचे असून ग्रँडिस हे गुणनाम त्यांच्या मोठ्या पानाला उद्देशून वापरले आहे. ‘टेका’ या पोर्तुगीज नावावरून इंग्रजी ‘टीक’ नाव पडले आहे. मलायी भाषेतील ‘टेक्कू’ या नावाचा इंग्रजी ‘टीक’ या नावाशी संबंध दिसतो. सागवानाच्या टेक्टोना या प्रजातीत एकूण तीन जाती असून त्या इंडोमलेशियन आहेत. टे. ग्रँडिस ही जाती भारतात सर्वत्र आढळते. टेक्टोना प्रजातीतील इतर जातींचा प्रसार दक्षिण व आग्नेय आशियात आहे; इतरत्र त्यांचे प्रवेश झालेले आहेत.

भारत, म्यानमार आणि प. थायलंड हे टे. ग्रँडिस या जातीचे मूलस्थान असून जावा व इतर काही इंडोनेशियन बेटे येथेही ती आढळते. भारतीय द्वीपकल्प व म्यानमार ही सागाची दोन प्रमुख क्षेत्रे असून त्यांचा आढळ सदाहरित/ पानझडी जंगलांत असतो; तथापि त्यांची वाढ सांघिक नसते. स्थानिक उपयोग व निर्यात या दृष्टींनी सागवानाला आर्थिक व भौगोलिक दृष्ट्या बरेच महत्त्व आहे.

सागवान हे ३० ते ४० मीटर (१३० फूट) उंच आणि हिरव्या-तपकिरी फांद्या असणार्‍या उंचवट्याचा वृक्ष आहे. त्याची पाने अंडाकृती असतात, १५-४५ सें.मी. लांबीची रुंदी १०-२५ सें.मी. रुंद असतात व ते २-४ सें.मी मजबूत देठावर लांब पाने वाढलेली, व त्यांच्या पानांच्या कडा गुळगुळीत असतात. सागवानच्या झाडाची मोठी, कागदी पाने बर्‍याचदा खालच्या पृष्ठभागावर केसदार असतात. काही दिवसात पाने पूर्ण पिवळी होतात आणि जानेवारीपर्यंत सर्व पाने गळून जातात. बहुतांश पाने पिवळी झालेला साग एखाद्या सुवर्णमुकुट घातलेल्या राजासारखा दिसतो. मात्र विज्ञानाच्या दृष्टीने ही त्यागाची तयारी असते. हिरवी, जाडजूड पाने पिवळी होत वाळत जातात, गळून जातात. जमीन ओलसर असेल किंवा काळ्या जमिनीतील सागाची पाने मार्चपर्यंत झाडावर टिकून असतात. सागाला पावसाळा सुरू झाल्यानंतरच नवी पालवी फुटते. ऐन उन्हाळ्यात सावलीची गरज असते, तेव्हाच याची पानगळ झालेली असल्याने सावलीसाठी साग उपयोगाचा नाही. हिरव्यागार पानांनी समृद्ध असणारा साग काही दिवसांतच सर्व पर्णपरित्याग करतो. एखाद्या सुखी, समृद्ध, समाधानी घरातील ज्येष्ठाने अचानक संन्यास घ्यावा, असेच हे असते.

जून ते ऑगस्ट दरम्यान ३० सें.मी रुंदीची २५-२४० सें.मी लांबीच्या सुवासिक पांढर्‍या फुलांचे तुरे दिसू लागतात. साग सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान फळ धरते. फळे गोल आणि १ – २. ५ सें.मी व्यासाची असतात. प्रामुख्याने कीटकांमुळे त्यांचे परागीभवन होते. क्वचित वाऱ्यामुळेही त्यांचे परागीभवन होते.

जून झालेल्या झाडांचे खोड काहीसे खोबणीदार होते व त्याच्या तळाशी आधारमुळे दिसतात. फांद्या लहान, काहीशा चौकोनी व त्यांच्या कडांशी उथळ पन्हाळी असतात. साल धागेदार, फिकट तपकिरी किंवा भुरकट असून तिची जाडी ४–१८ मिमी. असते; तिचे उभे लांबट व पातळ पट्टीसारखे तुकडे सुटून गळून पडतात. पाने समोरासमोर, साधी, रुंदट लंबवर्तुळाकृती किंवा व्यस्त अंडाकृती (तळाकडे थोडी निमुळती व टोकाकडे गोलसर) आणि मोठी ३०– ६० × २०–३० सेंमी. असून शेंड्याकडे लहान होत जातात व फुलोऱ्यावर छदाप्रमाणे (उपांगाप्रमाणे) असतात; ती चिवट, खरबरीत व खालच्या बाजूस पांढरट लवदार असतात; त्यांवर सूक्ष्म, लालसर व प्रपिंडीय (ग्रंथियुक्त) ठिपके असून नंतर ते काळे पडतात. सामान्यपणे जून ते ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सु. ४५ – ९० मिमी. लांब फुलोरे (परिमंजऱ्या ; ⟶ पुष्पबंध) फांद्यांच्या टोकांस येतात व त्यांवर असंख्य, लहान, सुगंधी, द्विलिंगी व पांढरी फुले असतात; अनेक फुले वंध्य असतात. कधीकधी अधिक ओलसर हवामान असल्यास एप्रिलमध्ये देखील फुलांना बहर येतो. आठळीयुक्त फळे नोव्हेंबर ते जानेवारीत पिकून गळतात; ती कठीण, गोलसर, वर टोकदार, काहीशी चतुःखंडी,

१०–१५ मिमी. व्यासाची व चार कप्प्यांची असून त्यांभोवती संवर्त फुग्याप्रमाणे वाढलेला असतो; फलावरण नरम असते व त्यावर तारकाकृती मऊ केसांचे आवरण असते. प्रत्येक कप्प्यात एक बी याप्रमाणे चार बिया क्वचित असतात; परंतु सामान्यतः १ ते ३, पांढऱ्या, स्वच्छ, अंडाकृती व ४–८ मिमी. लांब बिया आढळतात.

सागाच्या पानाची दंतकथा :

सागाचे कोवळे पान हातात कुस्करले, तर हाताला लाल रंग येतो. यासंदर्भात एक दंतकथा तयार झाली आहे. विशेष म्हणजे माणसाला सागाच्या एका पानावर पोटभर जेवू घालता येईल, असा त्याचा आकार असतानाही सागाची पाने जेवणासाठी, पत्रावळी म्हणून वापरली जात नाहीत. पळसाची पाने सागाच्या पानापेक्षा जास्त कुस असणारी असतात, तरीही ती पत्रावळीसाठी वापरली जातात. सागाची पाने न वापरणे आणि कोवळ्या पानाना कुस्करल्यानंतर लाल रंग येण यासंदर्भात एक दंतकथा ऐकावयास मिळते.

एका गावामध्ये एक गरीब तरूण राहात होता. गरीबीत जीवन जगणाऱ्या या तरूणाला एका धनवंताने काही गायी दान केल्या, मात्र त्याला एक अट घातली. या अटीनुसार त्याने त्याचेकडे कोणी काही मागितले आणि ते त्याच्याकडे असेल तर ते त्याने याचकाला दान केले पाहिजे. नसेल तर द्यायचे नाही. मात्र असताना दिलेच पाहिजे. काहीच नसणाऱ्या त्या तरूणाने ही अट मान्य केली. तो या गायींना चांगले सांभाळू लागला. गायी त्याला दूध द्यायच्या. तो ते दूध गावातील लोकांना द्यायचा, त्या बदल्यात लोक त्याला अन्नधान्य द्यायचे. त्याचे सर्व काही व्यवस्थित चालले होते. मात्र त्याला गायी देणाऱ्या धनाढ्य गृहस्थाला त्याची परीक्षा घ्यायची इच्छा झाली. वेश बदलून तो दुपारच्या वेळी त्या युवकाकडे गेला. त्याला म्हणाला, मला खूप भूक लागली आहे. मला काही तरी खाण्यासाठी दे.’ युवकांने त्या वृद्धास सांगितले, दुपारचे माझे जेवण झाले आहे. माझ्याकडे माझे भोजन असते, तर मी दिले असते. गाईंचे दूधही दुपारीच काढले आहे. आता त्या काही दूध देणार नाहीत. माझ्याकडे काहीच नाही.’ यावर तो वृद्ध म्हणाला, ‘तू विचार कर, मी स्नान करून येतो. तो वृद्ध आंघोळीसाठी म्हणून गेला. युवकाने खूप विचार केला. त्याने एका भाकड गाईचे मांस काढून, शिजवले आणि ते सागाच्या पानावर वाढून त्या वृद्धाची वाट पाहात बसला. तो वृद्ध आला. त्याने सागाच्या पानावरील मांसाहारी जेवण पाहिले. त्याची खाण्याची इच्छा झाली. तेवढ्यात त्याचे लक्ष लंगडणाऱ्या गाईकडे गेले. वस्तुस्थिती लक्षात येताच त्याने ते भोजन नाकारले आणि नाराज झाला. त्या वेळेपासून सागाचे पान भोजनासाठी वापरत नाहीत आणि सागाचे पान हातावर कुस्करल्यास हाताला लाल रंग गायीच्या रक्तामुळे येतो, असे मानले जाऊ लागले.

अभिवृद्धी –

सागाची नैसर्गिक अभिवृद्धी बियांपासून होते. साधारणपणे वीस वर्षांच्या वृक्षांना फळे व जननक्षम बिया येतात; परंतु छाटल्यानंतर नवीन आलेल्या फांद्यांना दहावर्षांत फळे येतात. त्यानंतर दरवर्षी फळे व बिया मिळत राहतात. बिया रुजण्यास भरपूर उष्णता (सूर्यप्रकाश) लागते व ती उष्णता वणव्यामुळेही मिळाली तरी चालते; तशा तापमानात रोपांची वाढही चांगली होते; मात्र वाढीसाठी प्रकाश, जमिनीतील ओलावा व हवेचा पुरवठा लागतो. पावसाच्या आरंभी बी रुजून रोपे बनतात तर काही बिया पाऊस सुरू असताना रुजून रोपे वाढतात. जमिनीच्या पृष्ठावरच्या बियांपासून अभिवृद्घी कमी होते; जमिनीत असलेल्यांना अग्नी (वणवा), कीटक व पक्षी यांपासून संरक्षण मिळते आणि त्यांची वाढ होऊन नवीन संख्यावाढ अधिक होते. हवा, पाणी, सूर्यप्रकाश, अग्नी, सावली, चरणारे प्राणी इ. घटकांचे बरे-वाईट परिणाम सागाच्या अभिवृद्धीवर होऊन त्याचा परिपाक त्यांची शारीरिक वाढ व संख्यावाढ यांवर बराच होतो. सुमारे १८४४ पासून सागाच्या लागवडीचे (कृत्रिम अभिवृद्धीचे) कार्य हाती घेतले गेले व अनेकठिकाणी त्यांची वाढ (नैसर्गिक वाढीच्या व त्याबाहेरच्या क्षेत्रात) कशी होते, याबद्दलचे संशोधन चालू होते. त्यासंबंधी बरीच नवीन माहिती संकलित करून नवीन लागवडी केल्या जात आहेत व विस्तार क्षेत्र वाढू लागले आहे.

उतिसंवर्धापासून अभिवृद्धी –

सुमारे एकोणीसशे नव्वदीच्या दशकात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी सागाचे उती संवर्धन द्वारे अभिवृद्धी करण्याचे आव्हान स्वीकारले. त्यावेळी जंगलातील वृक्षांचे उतिसंवर्धन हे खूप कठीण काम असे मानले जात असे. परंतु ४-५ वर्षाच्या अथक परिश्रमानंतर येथील प्रयोगशाळेत सागाच्या उतिसंवर्धन यावर प्रयोग करून ग्रीन हाऊस मद्धे यशस्वीरीत्या झाडे वाढवली. त्यासाठी महाराष्ट्र वनविभागाने सागाचे उत्कृष्ट अंकुर (Buds of Elite Trees ) पुरवले.

ती पुरवताना खालील प्रमाणे परिमाणे ठरवली गेली.

१. ठिकाण

२. जमिनीचा पोत

३ वृक्षाची उंची

४. खोडाचा घेर

५. वृक्षाची रोगप्रतिकारक शक्ती.

६. जमिनीपासून शाखाहीन सोटाची (पोल) उंची. ७. लाकडाची घनता.

ही सर्व परिमाणे लक्षात घेऊन त्या सागाचे वाढणारे अंकुर (Buds ) गोळा केले. नंतर ते प्रयोगशाळेत आणून त्यावर वेगवेगळे प्रयोग करून त्याची अभिवृद्धी प्रथम काचेच्या पात्रात व नंतर पॉली हाऊस व ग्रीन हाऊस मध्ये केली. व ती रोपे वन विभागाला वेगवेगळ्या नैसर्गिक जंगलात वाढवण्यास दिली.

त्याचे पृथ:करण केले असता असे दिसून आले की वरील सर्व परिमाणे नवीन वाढवलेल्या वृक्षात दिसून आली म्हणजेच नवीन वृक्ष हा नेहमीपेक्षा जास्त घनतेचे लाकूड व इतर चांगले गुण देतो. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हे अभिवृद्धीचे टेक्निक खूप साऱ्या प्रयोग शाळांना देण्यात आले. आज रोजी अशा बऱ्याच प्रयोगशाळा महाराष्ट्रात आहेत कि ज्या वर्षाकाठी ५-१० लाख सागाची रोपे प्रयोगशाळेत तयार करतात.

हल्ली शेतकरी सुद्धा सागाची लागवड करताना उतिसंवर्धित रोपांची आग्रही मागणी करतात.

सागवानाची लागवड व त्याचे अर्थ शास्त्र –

अलीकडच्या काळात शेतकरी सागवानाची लागवड करण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी कांही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

पहिली महत्वाची गोष्ट आपण केलेली सागाची लागवडीची नोंद तुमच्या सात बारा उताऱ्यावर तलाठ्याकडे करून घ्यावी. त्यामुळे झाडांची वाढ पूर्ण झाल्यावर ती तोडण्यास तुम्हास कायदेशीर परवानगी मिळण्यास अडचण येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त उतिसंवर्धन तंत्राने वाढवलेली ३-४ फूट उंचीचीच रोपे लावावीत. अशी रोपे कोल्हापूर व त्याच्या परिसरात प्रयोगशाळेतून ऊपलब्ध आहेत. ती झाडे उत्कृष्ट (Elite Tree) दर्जाची असल्यामुळे उत्पन्नही खुप मिळते.
एका एकरात साधारणपणे ४५०-५०० झाडे दहा फुटाच्या अंतराने लावतात.

अर्थ शास्त्र –

एक सागवानाचा वृक्ष साधारणपणे १२-१५ वर्षात तोडावयास योग्य होतो. त्याची उंची त्यावेळी १४-१८ फूट असते. व त्याचा घेर १५-२० इंच असतो. लक्षात ठेवण्याची बाब ही आहे कि तुम्हास त्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागते व तुमची गुंतवणूक (शेतीची जागा) अडकून राहते. पण त्याचे गोड फळ तुम्हास हमखास मिळते. साग १४-१५ वर्षात साधारणपणे १५ ते २० फूट उंचीचा होतो आणी १०-१७ क्युबिक फूट लाकूड देतो. आजमितीस एक क्युबिक फूट सागवानाची लाकूड १५०० – ३५०० रुपये आहे. (लाकडाच्या प्रतवारीवर अवलंबून). म्हणजे एक एकराच्या ५०० साग वृक्षांचे मूल्य १. २५ – ७. ०० कोटी रुपये होते. हेच तुमच्या लांबवर गुंतवणुकीचे फळ आहे. ह्या वृक्षास पहिली दोन वर्षे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास दुसरी कोणतीही गुंतवणूक नाही.

पहिली कापणी जमिनीपासून पाच फूट उंचीवर करतात. नंतर त्यास खोडवे फुटतात त्याचेही लाकूड तुम्हास पाच वर्षानंतर विकता येते. ते बांधकाम करताना टेकू देण्याकरता वापरतात. (बल्ल्या) अर्थात त्यास थोडी कमी किंमत मिळते. याशिवाय वीस वर्षानंतर संपूर्ण लागवड क्षेत्राची नांगरट करून त्याची मुळे बाहेर काढता येतात. मुळांचे अर्धवट ज्वलन (Incomplete combustion) पद्धतीने त्यापासून कांडी कोळसा मिळवता येतो. ह्याचे मूल्य आज ३५०० रुपये प्रति टन आहे. हा तुमचा ज्यास्तीचा बोनस आहे. यावरून असे दिसून येते कि तुमच्या धीराची परीक्षा घेऊन हा वृक्ष तुम्हास मालामाल करून सोडेल.

सागवान व मराठी साहित्य :

नवकवीना सागाने भुरळ घातली नसली तरी निसर्गालाच आपले सर्वस्व मानणाऱ्या आदिवासींच्या जीवनात सागाचे महत्त्व खूप मोठे आहे. आदिवासींच्या विविध उत्सवात, लग्नविधीमध्ये विविध गाणी येतात आणि त्यामध्ये साग येतो. या गाण्यांमध्ये सूर आणि ताल येतो. विंझना म्हणजेच पंखा हे गाणे खालीलप्रमाणे आहे.

‘सागू फुलेला एकू सागावं, चंदनू फुलेला एकू चंदनाव
येगू चंदनाची एखली भारजा, भारजा घाली विंझनवारा |
हातीचा विंझना खाली पडेला, खाली पडेला धुलीने माखला |
धुलीने माखला दुधाने धुवेला, दुधाने धुवेला सलदी ठेवेला |
सलद ग सोन्याची ढापना रूप्याचा, ढापना रूप्याचा बिखना मोत्याचा ||

सागाच्या आणि चंदनाच्या झाडाला मोहोर आला आहे. चंदनाची बायको पंख्याने वारा घालते आहे. हातातून पंखा खाली पडला आणि तो धुळीने माखला. तो धुळीने भरलेला पंखा दुधाने धुतला. धुतलेला पंखा पेटीत ठेवला. पेटी सोन्याची आणि तिचे झाकण चांदीचे आहे आणि त्याची कडी मोत्यांची आहे. अशा अर्थाचे गाणे वारली समुदायांमध्ये गाईले जाते.

सागाचे लाकूड व त्याचे उपयोग :

इमारती लाकडाच्या व्यापाराच्या दृष्टीने ह्या वृक्षाचे शाखाहीन खोड महत्त्वाचे असल्याने त्याच्या आकारमानाला महत्त्व असते.उत्तर कारवारात वृक्षांचा घेर सु. ५– ७ मी. व २४–२७ मी. उंची असलेले सोट आढळतात. सुमारे ५-६ मी. उंची व १•५–२ मी.घेर असलेले सोट आंध्र प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश व महाराष्ट्र येथील वृक्षांपासून मिळतात.
टिकाऊपणा व आकार-स्थिरता आणि इतर रासायनिक व भौतिक गुणधर्मांमुळे सागवानाला जगभर महत्त्व प्राप्त झाले असून जगातील उत्कृष्ट लाकडांपैकी ते एक असल्याचे मानतात. त्याचे रसकाष्ठ (बाह्यकाष्ठ) पांढरट-पिवळे ते तपकिरी असून मध्यकाष्ठ सोनेरी-पिवळे, गर्द रंगाच्या रेषांनी भरलेले व हळूहळू पिंगट होत जाणारे असते. ते मध्यम कठीण, मध्यम जड व बळकट; परंतु काहीसे राठ, अनियमित पोताचे व उग्र वासाचे असते. वाळवी, इतर कीटक व कवकांपासून सहसा त्याला इजा पोहोचत नाही. त्याला रसकाष्ठ अपवाद असते. समुद्रातील भोके पाडणाऱ्या प्राण्यांपासून मात्र ते अर्धसंरक्षित असते. सागवान पाण्यापावसात चिंबत नाही. कार्ल्याच्या लेण्यातील सु. २२० वर्षांपूर्वीच्या एका लाकडी तुकड्याचा भाग बाहेरून सुरक्षित, परंतु आतील भाग काहीसा खराब झाल्याचे दिसून आले आहे. सुमारे १,०००–२,००० वर्षांपूर्वीचे व चांगल्यास्थितीत असलेले जुने लाकडाचे तुकडे उपलब्ध आहेत. इतर लाकडाच्या मजबुतीची तुलना दक्षिण भारतीय (केरळातील नीलांबूर व तमिळनाडूतील कोईमतूर येथील) सागवानाच्या मजबुतीशी करतात. कारण ते प्रमाण स्वीकारण्याइतके उच्च दर्जाचे ठरले आहे. सागवान चांगले आम्लरोधक असून ते लोखंड, तांबे व अ‍ॅल्युमिनियम यांची झीज करीत नाही. कापण्यास, रंधण्यास व झिलई करण्यास ते सोयीचे असून काहीसे ठिसूळ असते; मात्र त्याची वाकण्याची क्षमता फार कमी असते. लाकडाचे वजन मध्यम असते. दर ०•०२८ घ. मी. सागवानाचे वजन सु. २० कि. ग्रॅ. असते. रोगणयुक्त विशिष्ट पदार्थांचा रंग त्यांवर चांगला बसतो. वाफेच्या साहाय्याने केलेल्या ऊर्ध्वपातनाने लाकडा पासून सु. ०•१५% एक तेलकट पदार्थ व त्याबरोबरच टेक्टोक्विनोन हा शेंदरी घनपदार्थ मिळतो. सागाच्या तेलाला ‘टीक ऑइल’ म्हणतात; तेल पिवळट पिंगट असून ते ९५ टक्के अल्कोहॉलामध्ये विरघळते. हे तेल म्यानमारमध्ये औषधांत आणि रंगांत जवस तेलाऐवजी वापरतात.

जगातील सर्वात महाग साग बर्मा टीक म्हणून ओळखले जाते. पूर्वी राजा महाराजांच्या राजवाडा सजवताना बर्मा टीकचा सढळ हस्ताने वापर केलेला आढळतो. साताऱ्याचे श्रीमंत थोरले प्रतापसिंह महाराज यांनी १८२४ मध्ये जुना राजवाडा बांधला. त्यांच्या पश्चात त्यांचे धाकटे बंधू अप्पासाहेब महाराज यांनी शेजारीच १८४४ मध्ये नवा राजवाडा बांधला. हा नवा राजवाडा बांधताना वापरण्यात आलेले संपूर्ण लाकूड सागवानाचे आहे. लाकूड दीर्घकाळ टिकावे, याकरिता सागवानाचे सोट काही दिवस करंजाच्या तेलात भिजत ठेवण्यात आले होते. केवळ सागवानाच्या लाकडाचे बांधकाम असल्याने हा वाडा टिकून आहे, हे मात्र खरे. फलटण भागात संस्थानकालीन नागेश्वर मंदिराला रेखीव कौलारू छप्पर आहे. त्यासाठी वापरण्यात आलेल्या सागाच्या लाकडावर सुरेख नक्षीकाम करण्यात आले आहे. याच भागात असणारे राम मंदिर बांधतानाही सागवानाच्या लाकडावर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. शेजारीच असणाऱ्या दत्त मंदिरातही सागवानाच्या लाकडाचा वापर करण्यात आला असून त्यावरही सुंदर नक्षीकाम आहे.

सागाचे महत्त्व ओळखूनच ब्रिटिशांनी वन कायदा बनवला. त्यांनी सागवानाच्या जंगलांची वर्गवारी केली. सागाच्या लाकडाच्या टिकाऊपणामुळे इंग्रज आश्चर्यचकित झाले होते. लाकडात लाकूड म्हणजे सागाचे ! सागवानाचे लाकूड इतर कोणत्याही झाडाच्या लाकडापेक्षा टिकाऊपणा, आकार आणि स्थिरतेबाबत सर्वोत्कृष्ट आहे. म्हणूनच त्याला लाकडातील सोने म्हणतात. सोन्याला वास नाही, मात्र लाकडातील सोन्याला एक मंद गंध असतो. सागाचे लाकूड पांढरट, पिवळे किंवा तपकिरी असते. लाकडाच्या फळ्या काढल्यावर त्यावर गर्द रेषा आढळतात. समुद्रातील भोके पाडणाऱ्या किड्यापासून मात्र ते अर्धसंरक्षित असते. सागावर पाण्याचा परिणाम होत नाही. हजारो वर्षांपूर्वीचे सागाचे लाकूड आजही सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. लाकूड मध्यम वजनाचे असते. सागाच्या लाकडाचा उपयोग जहाजे, नावा, पूल बांधणीसाठी केला जातो. बंदरातील खांब, रेल्वेचे डबे आणि इतर वाहनांचे भाग बनवण्यासाठीही सागवानाचे लाकूड वापरण्यात येते. घरातील सजावट, फर्निचर, लहानमोठे खांब, शेतीची अवजारे, खोकी, गिरणीतील काही उपकरणे इत्यादींकरिता सागवानाचे लाकूड वापरण्यात येते.

रासायनिक उद्योग आणि प्रयोगशाळांतील टेबलांचे पृष्ठभाग सागवानाच्या लाकडांचे बनवतात. वनस्पती तेल, फळांचे रस साठवण्याकरिता सागवान लाकडाच्या फळ्यापासून पिंप बनवले जातात. व्हायोलिन, सतार, हार्मोनियम बाजाची पेटी बनवण्यासाठी सागवान लाकडाच्या फळ्या वापरल्या जातात. विविध तक्ते, हार्डबोर्ड, गणित, चित्रकलेतील साधनसामुग्री बनवण्यासाठीही हे लाकूड उपयोगाला येते. भारतात लोहमार्ग टाकताना इंग्रजानी सागाच्या लाकडाचे स्लीपर्स वापरले. लाकडाचा वापर रेल्वेच्या डब्यांच्या निर्मितीतही केला. या लाकडाचा मौल्यवान नसणारा भाग कागद किंवा कोळसा बनवण्यासाठी वापरला जातो.

सागाचे आयुर्वेदामध्ये उपयोग सांगण्यात आले आहेत. धन्वंतरी निघण्टूमध्ये ‘साग: खरच्छदो भूमिसहो दीर्घच्छदो मत:l साग: श्लेष्मनिलास्रघ्नो गर्भसंधानदो हिम:ll’ अर्थात कोणत्याही भूमीमध्ये येतो, खरखरीत दीर्घ पाने असणारा साग, कफ, वात, रक्तदोषनाशक, गर्भसंधान करणारा आणि शीत आहे. लाकडाचे उर्ध्वपतन करून तेल मिळवले जाते. सागवान लाकडाची भुकटी कातडीच्या दाहावर बाहेरून लावतात. ही भुक्टी वस्त्रगाळ करून पोटातील दाहावरही वापरली जाते. बस्तर भागातील काही आदिवासी सागाच्या भुकटीपासून मिळणारा स्निग्ध पदार्थ त्वचारोगावर वापरतात. कोकणात हा पदार्थ जनावरांच्या जखमावर लावतात. त्यामुळे जखमामध्ये अळ्या होत नाहीत.

याखेरीज लाकडाचा उपयोग मूळव्याध, जळवात, पित्तप्रकोप आणि अमांशावर होत असल्याचे उल्लेख मिळतात. सागवानाच्या पानाचा क्षयरोगावरही उपयोग होतो. सागाची कोवळी पाने मोहरी आणि तिळाच्या तेलात गरम करून सूज आलेल्या भागावर चोळतात. यामुळे सांध्याची झीज कमी होते. साग वृक्षांच्या बियांपासून तेल काढले जाते. हे तेल कृमीनाशक म्हणून वापरले जाते. सागांच्या बियांचा औषधी वापर होतो. बियांपासून काढण्यात आलेले तेल खरूज, नायटा अशा त्वचाविकारावर उपयुक्त असते. हे तेल केशवर्धकही आहे. बिया भाजून पाण्यात भिजत ठेवल्या जातात. हे पाणी पिल्यानंतर मूत्रदोष नाहिसे होतात. काही आदिवासी कोवळ्या पानाची भाजी करतात. सागाची फुले चवीला कडू असतात. मात्र ती पित्तविकार, खोकला आणि मूत्रविकारावर उपयुक्त असतात.

सागवानाच्या पानात सहा टक्केपर्यंत टॅनिन असते. पानांमध्ये पिवळे किंवा लाल रंगद्रव्य असते. राळेत पाने मिसळून लाल रंग मिळवण्याची पद्धत अनेक वर्षांपासून वापरण्यात येते. पानांपासून रेशीम रंगवण्याची कलाही प्राचीन आहे. पूर्ण वाढ झालेल्या सागाच्या वाळलेल्या पानापासून ॲसिटोनच्या सहाय्याने क्विनॉईन मिळवले जाते. त्यातून गर्द लाल रंगाचे अँथ्रॅक्विनोन हे रंगद्रव्य मिळवतात. वाळलेल्या पक्व झाडाच्या पानापासून सोडियम कार्बोनेट विद्राव्याचा वापर करून रंग बनवण्याचे उद्योग निर्माण झाले आहेत.

हा रंग लोकर रंगवण्यासही उपयोगी पडतो. सुती कपडे रंगवताना यामध्ये रंगबंधक (कलर बाईंडर) वापरावा लागतो. या रंगामध्ये रासायनिक द्रवांचा वापर करून विविध छटा आणता येतात. खेड्यातील लोक पळसाप्रमाणेच सागाच्या पानाचा उपयोग झोपडीचे छत बनवण्यासाठी करतात. फणसाच्या जावा या देशात लाकडास झिलई देण्यासाठी सागाची खडबडीत पाने घासली जातात. सोयाबिनचे किण्वन घडवून आणण्यासाठी ते सागाच्या पानात गुंडाळून ठेवले जाते. सागवानाच्या सालीत ७.९४ टक्के टॅनिन असते. ते कातडी कमावणे आणि रंगनिर्मितीसाठी वापरतात. ते आकुंचन करणारे (स्तंभक) असते. सालीचा वापर घशाच्या विकारावर उपयुक्त असते. मुळांची साल चट्ट्यांवर लावतात.

सध्या दिल्लीमध्ये नवीन संसद भवन बांधताना उत्तर प्रदेशातील बाल्लारशाह जंगलातील सागवान वापरण्यात आले आहे.
म्हणूनच इतक्या महत्वाच्या वृक्षास जंगलातील सोने हे नाव पडले नसते तर नवलंच.

संदर्भ :        

१. विकिपीडिया

२. साग लागवड . प्रकाश देशपांडे व प्रो. मुकुंद गायकवाड, कॉंटिनेंटल प्रकाशन, पुणे. पाने ३२५.

३. साग. इये मराठीचिये नगरी, व्ही. एन. शिंदे.

४. सागवान कीमत और उत्पादन. ११ फेब्रुवारी २०२०, खेतीबिझ

५. Monograph of Teak, Dina Nath Tiwari, International Book Distribution, New
Delhi. (1992), pp 479

६. Gupta, P. K., A.L. Nadgir, A.F. Mascarenhas and V. Jagannathan (1988) Clonal
propagation of Tectona grandis (Teak) by tissue culture. Plant Science
Letters:17 (3) :259-268. [ from NCL]

७. Wealth of India 1976, vol.x , CSIR Publication

८. सर्व फोटो गूगल च्या सौजन्याने

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 76 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

3 Comments on ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग २- सदाहरित जंगलातील सोने, सागवान वृक्ष

  1. Extremely great information Sir, glad to know the medical uses of teak. Great work, and thank you for sharing

  2. डॉ. डी.के.कुलकर्णी ह्याने कष्टाने हा लेख लिहीलाय, म्हणून तो अतिशय तपशीलवार झालाय, शिवाय वाचनीय पण. त्यानं ऐन.सी.एल.ने केलेल्या कामाचा उल्लेख बरेचं लोकांना माहीत नसावा. ह्या कामा मुळे आज देशात सागाची भरपूर लागवड झालेली आहे. अभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..