ओळख नर्मदेची – नर्मदे हर !
नर्मदेची माझी तशी ओळख, खुप खुप जुनी आहे.सातवी,आठवी त असताना,भूगोलात पहिली ओळख, नकाशातली, निघते अमरकंटक हुन, मिळते अरबी समुद्राला, वगैरे. आमच्या पांढुर्ण्याची जांब नदी मिळते कन्हानला, ती मिळते वैनगंगेला, ती पुढे मिळते नर्मदेला वगैरे, म्हणजे केवढी मोठी नदी, म्हणुन अभिमान वाटायचा ! अगदी गंगा,यमुना या लाईनीतली !
दुसरी ओळख स्तोत्रातली—
गंगे च यमुने चेव गोदावरी सरस्वती।
नर्मदे सिंधु कावेरी जले ।
अस्मिन् सन्निधम् कुरू॥
हा मंत्र म्हणत आंघोळ केली की त्या नद्यांमध्ये आंघोळ केल्याचे पुण्य मिळते,म्हणतात.इतके महत्व नर्मदेचे की बर्याच स्त्रियांचे नांव पण “नर्मदा” ठेवायचे,हांक मारल्यावर तेवढेच पुण्य .ह्या संदर्भात आजी काही काही पौराणिक कथा,गोष्टी सांगायची पण त्या विस्मरणात गेल्या.नर्मदेच्या काठावर असणार्या आदिवासींची सेवा करायला ओंकारमांधाता ला गेलेल्या आमच्या मावशीचे यजमान तारूण्यात वारले ही एक कटु आठवण मनांत कोरल्या गेली एवढेच .
नंतर ची ताजी(?) म्हणजे आता जुनी,ओळख म्हणजे मी सर्वप्रथम घर सोडुन बी एस सी करायला १९६० मधे जबलपुर ला गेलो तेंव्हा पुलावरून जाताना नर्मदा नदी प्रत्यक्षात दिसली.खुप कुतुहल होते,आस्था होती तर ती दिसली! इतकी मोठी नदी ,रुंद पात्र,दुथडी भरून वाहत जाताना (जुलै महिन्यात म्हणजे ऐन पावसाळयात) पहिल्यांदाच पाहिली.नंतर नेहमी जबलपुरला बसने जाताना दर्शन,रेल्वेने पुलावरुन जाताना नदीत १रू चा सिक्का टाकून ,मानस पुजेसारखे अभिवादन करायचे हा नित्यक्रम असायचा.भेडाघाटला नातेवाईकांसमवेत बरेचदा जायचो,धुवांधार ला खालपर्यंत उतरायचो,बोटींग करायचं ,बंदर कुदनी,बोटींग करणार्यांचे घाबरवणे(१००’ खोल आहे) आता थकलो- १००/-रू द्या वगैरे,नेहमीचेच झाले.एकदा इंजी.काॅलेज ते भेडाघाट ३५-४०कि मी सायकल ने (तेही भाड्याच्या,खटारा)व तेवढेच अंतर वापसी(एकुण ७०-७५ कि मी )असे थ्रिल केले.एकदा धुवाधार च्या upstream ला आंघोळ करताना माझा भाचा(सोपान) वाहायला लागला (पुढे धबधब्यातच पडला असतां) तेंव्हा शिताफिने त्याला पकडले (मला पण पोहायला येत नव्हते) अशा बर्याच बर्या/वाईट आठवणी नर्मदेशी निगडीत आहेत.
नर्मदेच्या संबंधात दोन गोष्टी अजुन ऐकिवात आहेत.i
- नर्मदेच्या तिरावरच्या भाज्या विषेशत: वांगी ,भोपाळा,दुध्या ,ढेणस,टरबूज,खरबूज ,पेरू,खुप चविष्ट असतात.महाराष्टांत इतरत्र तसेच गंगे तिरावरच्या भाज्यांना पण ती चव ,गोडी नसते.
- नर्मदे काठचे लोक खुप काबाडकष्ट करायला तयार असतात
आजचे स्वरूप:
मध्यंतरीच्या काळात भोपाळला व अन्यत्र कुठे जाताना नर्मदेचे दर्शन व्हायचेच.जबलपुर च्या वास्तव्यात नर्मदेचे भयावह रूपच ,पुराच्या पाण्यात बुडणे,कारच्या कारच वाहुन जाणे,वेगवेगळ्या घाटात परिचितांचा म्रृत्यु, इ.ऐकिवात यायचे.वाटायचे आपण तिला देवी,मैया समजतो मग तिचे उग्र रुप कां ? म प्र च्या विभिन्न भागांत दौरा केल्यावर होशंगाबाद च्या पुढे डॅम वगैरे झाल्यावर,शांत सोज्वळ रूप भावले.तेंव्हापासुन च मनांत नर्मदा म्हणजे एक कुतुहल वाटायचे व तिचा उगम ,सागराला मिळते तो डेल्टा भाग वगैरे ची एक उत्सुकता मनांत उर धरून बसली होती,अर्थात ते बघणे तेंव्हा तरी अशक्यप्राय च होते.
कालमानाप्रमाणे नर्मदेचे पात्र आटलेले,त्यात घाण,वगैरे दयनीय स्थिती बघुन मन उदास व्हायचे.त्याचा उलगडा पण होत गेला,तिच्या उदगम बाजुला मोठे बांध बांधल्यामुळे पाणी अडवल्यामुळे,नदीचे रुप च केविलवाणे झाले.ही स्थिती केवळ नर्मदेचीच नाही तर अनेक नद्यांची तीच गत झालेली.मनुष्याचा स्वभावच मुळत: शोषण करण्याचा आहे.धुष्टपुष्ट गाईला आपल्या वासराला पुर्ण दुध पण पिऊ देत नाही ,स्वत:च जास्तीत जास्त दुध काढायचे.वासरू रोड,गायपण हाड दिसणारी,रोड,केविलवाणी.तर काय मनुष्य स्वार्थासाठी काहीही करू शकतो.बांध पण थोडेथोडके नाहीत,मग हे होणारच ! ह्या सगळ्या मुळे सुश्री मेघा पाटकरांनी “नर्मदा बचाव “आंदोलन राबवले.डुब मध्ये जाणार्या क्षेत्रातील लोकांना न्याय मिळावा म्हणुन,श्री माधव दवे तसेच बरेचजण प्रयत्नशील होते .(म्हणजे मुआवजा).नर्मदा नदी मुख्यत: म प्र ,व गुजराथ राज्यांमधुन वाहाते म्हणुन राज्या राज्यां मध्ये पाण्याच्या वाटपावरुन वादविवाद,तंटे,कोर्ट कचेर्या. ह्या सगळ्या समस्यांचे यथा समय निराकरण झाले,व अजुन होतेच आहे.मुख्य म्हणजे नर्मदेवर १-२ नाही तर तब्बल ८ मोठमोठे डॅमस बांधले आहे,म्हणुन दुथडी भरून वाहणारी नदी फक्त पावसाळयात २-३ म.च दिसते!
भौगोलिक दृष्ट्या नर्मदा
भौगोलिक दृष्ट्या नर्मदा दुर्गम अशा मैकल पर्वतातुन अमरकंटक हुन उगम पाऊन,सतपुडा व विंद्य पर्वतांमधुन पश्चिम दिशेला वेगवान वाहते.पुढे पठारावर ती रूंद व थोडी संथ,नंतर निमाड व गुजराथ मधे ती विस्तीर्ण होऊन अरबी समुद्राला भडोच जवळ त्रिभुज (delta)बनून मिळते.तिथे ती जवळ जवळ २०-२१ कि मी रूंद भागांत ,३-४ कि मी आंत पर्यंत वाहुन सागराला समर्पण करते,जणू सागर तिला आपल्याकवेत घ्यायला आपले हात रुंद करून समावुन घेतो.ह्याला प्रमाण म्हणजे तिथल्या भागातले पाण्याचे केलेले रासायनीक विश्लेषण.अर्थात नदी क्रॉस करायची नसेल तर समुद्रात बरेंच आत जाऊन समुद्रातुन पैलतीरावर जावे लागणार. नर्मदेचे दुर्गम खोरे,घनदाट जंगल,विषम हवामान,हिंसक प्रांणीमात्र,आजुबाजुची दलदल, आदिवासी म्हणजे अशिक्षित जनमानस,त्यांच्या अंधश्रद्धा ,जोखिमेचा (अविकसित ) समुद्र प्रवास,इ. मुळे “नर्मदा परिक्रमा” ही जरी पुर्वापार उल्लेखीत ,पौराणिक द्रृष्ट्या फार महत्वाची यात्रा समजली जाते/जायची.तरी ती एक आवाक्याबाहेरची,धोकादायक परंतु चुनौतीपुर्ण,मानल्या जाते.मग तिचा सहजासहजी विचार करणे तर दुरच.
— सतीश परांजपे
( क्रमशः )
ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या देशात लोकांना धरणा पासून होणारे थेट फायदे, जसे सिंचन, वर्षभर पाणी पुरवठा वीज निर्मिती, पूर नियंत्रण; अप्रत्यक्ष फायदे, जसे वाढीव शेतमाल उत्पादन, रोजगार निर्मिती, हे काहीही दिसत नाही. प्रगत देशात लोकांना धरणांचे कौतुक असते, तंत्रज्ञानाचा एक आविष्कार म्हणून. अभिमान असतो. अमेरिकेत हुवर धरण; इजिप्त मध्ये आसवाण धरण, या लोकांच्या पर्यटनाच्या जागा आहेत.
बरे, असे ही नाही की हे लोक विनोबा भावे सारखे, तंत्रज्ञाना पासून होणारे सर्व फायदे त्यागून जगतात. सर्व फायदे उपभोगतात. आणि तरी वर भाषा काय – मनुष्य स्वार्था साठी काहीही . . . .