नर्मदेचे स्वरूप :
नर्मदेला कोणी कथाबध्द तर कोणी कादंबरी बध्द पण केले आहे असे म्हणतात.माझ्या वाचनात तर आले नाही पण तिला मान्यतेप्रमाणे,एक कुमारिका समज़ुन तिचे वर्णन खालील प्रमाणे केले आहे .मी पण जे अनुभवले ते पण हुबेहुब तसेच, त्यामुळे वेगळे असे शब्दांकन काय करणार ?
नर्मदा अमर कंटकला ,मैकल पर्वतावर उगम पावते तेंव्हा, आईच्या मांडीवर एखादे बाळ जसे निपचित पडून असते तशी,शांत वाहते की तिचे अस्तित्व कळतच नाही.पुढे २-३ मैलावरच ,ती नुकतेच रांगायला लागलेल्या एखाद्या नटखट बाळासारखी स्वैर संचार करते.पुढे तिचा अल्लडपणा वाढतच जातो.मैकल पर्वतावर शांततेसाठी बसलेल्या शंकराचे जणू न ऐकता ती कपीलधारेला २१ फुट खोल दरीत उडी मारते.दोन बाजूला शिवाचे दोन मानस पुत्र,उत्तरेला “सतपुडा”व दक्षीणेला “विंद्याचल” पहुडलेले आहेत.मंडला व जबलपुर पर्यंत ती इतकी अवखळ असते की तिचे पिता शंकर ,तिच्यावर होशंगाबाद पर्यंत जणू लक्ष ठेवायला सांगतात.एव्हाना तिला तिच्या अनेक मैत्रिणी ( उप नद्या )पण भेटतात,मग काय,भेडाघाटला तर ती ऐन यौवनात येणार्या कन्ये प्रमाणे वागते.नंतर तिला हळुहळु गांभीर्य येते व दोन्ही भाऊ तिला मोकळेच राहु देतात व माळवा,निमाड क्षेत्रांत प्रौढ स्त्री प्रमाणे ती धीर गंभीर होत जाते.प्रगल्भा जशी दाता असते तशी ती ,बांध बनवु देऊन ,सिंचना साठी लोकांना सहाय्यक बनते.ओंकारेश्वर च्या पुढे तर ती चक्क संन्यासिनी ,साध्वी गत आसक्ति विरहित सागरात समर्पणा साठी उत्सुक बनत जाते.आपण खावे तसे वागे,किंवा प्यावे तसे वर्तनावे ह्या उक्ती प्रमाणे ,तेथील जनमानस पण तिच्या स्वभावानुकुल,विरक्त झालेले दिसतात.हेच क्षेत्र साधु संतांनी नेमके तपस्येसाठी निवडले.नंतर अरबी समुद्र महाराजांचा उलटा प्रवाह (बेक वाॅटर) नर्मदेत निरोप घेऊन जणू येतो,पण त्यामुळे तिचे पात्र अधिकच विस्तिर्ण होऊन,डेल्टा प्रदेश बनतो व यथावकाश नर्मदा सागराला समर्पित होते.
तिचे सुंदर वर्णन तिच्या आरती त व नर्मदाष्टकांत पण व्यक्त झालेले आहे.
परिक्रमा एक संकल्पना:
ओंकारेश्वर(मप्र)ला नर्मदा नदीवर पुल आहे ,त्यामुळे तिथे दक्षिण व उत्तर दोन्ही तट आहे. परिक्रमा दक्षिण तटावरुन सुरू करतात. भारताच्या नकाशाच्या दृष्टीने डावीकडे जातात. वाटेत येणेप्रमाणे प्रमुख शहरे लागतात.
बडवानी(MP), शहादा(महाराष्ट्र), भालोद, अंकलेश्वर (गुजरात). मग समुद्र नांवेने क्राॅस करायचा (नदी न ओलांडता) किंवा बसने पुलावरून नदी ओलांडून उत्तर तटावर जायचे. मग (भारताच्या नकाशा प्रमाणे उजवीकडे ) जायचे तर वाटेत लागतात – भडोच, गरूडेश्वर, महेश्वर (MP), नारेश्वर (महाराष्ट्र), मांडवगड(MP), नेमावर, जबलपुर, घुघवा, शाहपूरा, अमरकंटक. इथे उगम आहे. थोडे पुढे जाऊन (नदी क्राॅस न करता) परत दक्षिण तटावर यायचे. मग परत डावीकडे प्रवास सुरू. शहरे लागतात – मंडला, डिंडोरी, नरसिंगपुर, होशंगाबाद व ओंकारेश्वर. अशी परिक्रमा पूर्ण होते.
सहसा ओॅकारेश्वर ला ज्योतिर्लिंगा चे दर्शन करून,नर्मदेची संकल्प पुजा करून परिक्रमेला सुरवात करतात. एका बाटलीत नर्मदेचे पाणी बरोबर घेतात, ज्यातून थोडे जल पुढे समुद्रात टाकतात, तितकाच भाग समुद्राचे पाण्याने पुन्हा भरून घेतात.नंतर असेच थोडे पाणी अमरकंटकला विसर्जित करून,पुन्हा भरून घेतात जे परिक्रमेची पुर्णता झाल्यावर ओंकारेश्वरला ममलेश्वराला अर्पण करतात,ओंकारेश्वरहुन दर्शवलेल्या दिशेने ,नर्मदेला उजव्या हाताला ठेवत पुढे पुढे जातात,म्हणजे देवळात देवाला जशी घड्याळाच्या दिशेप्रमाणे प्रदक्षिणा करतात,तशी नर्मदेला प्रदक्षीणा होते.बहुदा शंकराची मानस कन्या म्हणुन नर्मदातिरी सगळीकडे शंकराची असंख्य मंदिरे आहेत .दत्तप्रभुंच्या संप्रदायातले अनेक सिध्दपुरुष इथेच रमले व समाधिस्थ झालेत त्यामुळे नर्मदातिरी दत्ताची पण अनेक देवळे आहेत.पोराणीक कथांप्रमाणे प्रभु श्रीराम पण इकडे वास्तव्याला होते,म्हणुन रामाची ,मारुतीची देवळे बघण्यात येतात.हा झाला दक्षिण तट.ह्या तटावर अंकलेश्वर व उत्तर तटावर भडोच(मिठीतलाई) ही नर्मदेची पावल होत,अंकलेश्वर हुन समुद्र मार्गे भडोचला जातात व पुढे दर्शवल्यानुसार मार्गक्रमण करतात.त्या तटावर गरूडेश्वर,महेश्वर ही ठिकाणे पवित्र मानल्या जातात,थोडे पुढे नेमावर आहे ज्याला नर्मदेचे नाभिस्थान मानतात.नेमावर व ओंकारेश्वर जवळ जवळ म्हणजे पुल क्राॅस केला तर बसने ५-१०मि च्या अंतरावर आहेत,पण परिक्रमेत नदी ओलांडता येत नाही. शंकराचार्यांनी रागा रागात एका कमंडलुत समावुन घेतलेल्या नर्मदेला ओंकारेश्वरला ओतुन ॐ रूपात मोकळे केले,जणू तिथे तिचा पुर्नजन्मच झाला.नाभीस्थान व ज्योतिर्लिंगा व्यतिरिक्तह्यामुळेच ओंकारेश्वरला महत्व प्राप्त झाले व इथुन परिक्रमेची सुरवात करण्याची प्रथा पडली असावी.अन्यथा कुठून ही केलीतरी ती परिक्रमाच ! नेमावर हुन पुढे जबलपुर मार्गे अमरकंटक.तिथे तट परिवर्तनाची पुजा करुन पुन्हा दक्षिण तटावर.तिथचरणोदक कुंड (उद्गम स्थान),गुप्त मार्गानी जिथे येते ते रेवाकुंड,कपीलधारा,दुग्धधारा वगैरे दर्शनानंतर मंडलामार्गे होशंगाबाद व पुन:श्च ओंकारेश्वर.इथे ममलेश्वर ला नर्मदा पाणी अर्पण करुन सांगतां करायची.अर्थात पुन्हा संकल्प पूर्ती ची व परिक्रमेदौरान वाटेत कळत नकळत काही जीवहत्या ,पाप घडले असेल म्हणुन प्रायश्चित्त पुजा,ही आलीच.
— सतीश परांजपे
(क्रमशः)
Leave a Reply