७ : इंदोर ( २ एप्रील )
इंदोरला पहाटेच लवकर उठुन लगबगीने बडा गणेश, श्री अन्नपुर्णा मंदिरांत दर्शन करुन उज्जैन साठी प्रयाण केले. १ तासात पोचलो. लगेच महांकालचे दर्शनासाठी व्हीआय पी पास काढले व दर्शन लगेचच झाले. त्या नंतर बडा गणेश, कालभैरव, हरसिध्दी मंदिरात दर्शन घेउन संदापिनी ऋषिंचा आश्रम बघितला व पुढच्या प्रवासाला म्हणजे नेमावर साठी निघालो.
८ : नेमावर /खातेगांव (३ एप्रिल).
नेमावरचा घाट खुप स्वच्छ नसला तरी मोठ्ठा आहे. पात्र रूंद आहे. इथल्या घाटावर स्नान करण्याने विशेष पुण्य मिळते असे म्हणतात. बांद्राघाटावर स्नान करुन प्रसिध्द सिध्दनाथ शिवलिंगाचे दर्शन घेतले. जबलपुर चा पल्ला लांबचा असल्याने, पुढच्या प्रवासासाठी लवकरच निघालो. जबलपुर पर्यंत दर्शनायोग्य विशेष काही नसल्याने, मजल दर मजल जबलपुरला जरा उशिरा, म्हणजे ८-८.३० वा पोचलो. तिथल्या हॉटेलवाल्यानी परिक्रमावासी आले म्हणुन सगळ्यांचे हार घालुन, औक्षण करुन स्वागत केले.
९ : जबलपुर ( ४ एप्रिल)
इथे सरस्वती घाटावर पाणी जास्ती नसल्याने स्नान ग्वारीघाटावर केले. तिथे घाट व पाणी खुपच स्वच्छ होते. इथे पण स्वच्छतेच्या बाबतीत विलक्षण फरक जाणवला. प्रसिध्द भेडाघाट व इतर ठिकाण बघायला दक्षिण तटावर जावे लागले असते व नर्मदा तर ओलांडायची नाही म्हणुन काही न बघतां व अमरकंटक चा टप्पा पण मोठ्ठा असल्याने लागलीच पुढे निघालो. अमरकंटकच्या आधी “घुघवा“ गांव लागते तिथे थांबुन “जिवाश्म राष्ट्रीय उद्यान“ बघितला. इथे भुगर्भ विभागातर्फे भुखननानंतर आढळलेले दगड, त्यावर दिसणारी पुरातन काळातील चिन्ह, कोरीव भाग, खुणा इ. स्पष्ट दिसतात. अशा गोष्टी पुरातत्व विभागातर्फे संग्रहित करुन ठेवल्या आहेत. वेगवेगळ्या पध्दतींनी अशा गोष्टींच्या आयुष्याचा अंदाज बांधता येतो. झाडांचे दगडात रूपांतर झालेल्या शिळा, त्यावरील पानांच्या खुणा शिंपले वगैरें साधारण साडेसहा कोटी वर्षे जुन्या आहेत. ह्याचा अर्थ नर्मदेचे अस्तित्व तेंव्हापासुन आहे व त्या काळात अरबी समुद्र जवळपास इथपर्यंत होता कारण नर्मदेतुन “बेक वाटर” इतक्या लांब येणे शक्य नाही. दख्खन चे पठार तेंव्हा नसावे व भुचल हालचालींमुळे किंवा भुकंप आदीं मुळे जंगल, झाडे जमिनीत गाडल्या गेली, समुद्र सरकला, हिमालय व इतर पर्वत सद्य स्थितीत बनले. ह्या गोष्टींचा सखोल उल्लेख इथे असंदर्भीत होईल. तिथुन पुढे १-२ तासांत बहुप्रतिक्षीत अमरकंटक ला पोचलो.
१० : अमरकंटक (५ व ६ एप्रील )
आल्या आल्या जवळच असलेल्या रामघाटावर जाऊन नर्मदेची आरती झाली. घाट सुंदर बांधलेला असला तरी पाणी तुंबवुन ठेवलेले असल्याने घाण होते. जागा छोटी व शांत (आवडेल अशी) आहे. हा सर्व भाग मैकल पर्वतावर (जिथे सतपुडा व विंद्य पर्वत एकत्र आहे.)आहे त्यामुळे थंड, प्रेक्षणीय, घनदाट जंगल असा आहे. इथे आंब्यांची उंच उंच झाडे (वृक्षांऐवजी)
सर्वप्रथम रेवाकुंड (नर्मदेचा उगम)बघितले. इथुन पुढे नर्मदा दर्शनीय अशी दिसते, त्यामुळे शंकराचार्यांनी हे कुंड बांधले. खरा उगम १-२ कि मी आधी चरणोदक कुंड आहे तिथं झाला म्हणतात. तिथुन ती सुप्तावस्थेत (गुप्त रितीने )वाहते. ती पण ओलांडायची नाही म्हणुन आधी “तटपरिवर्तन” पुजा केली व उत्तर तटावरुन officially दक्षीण तटावर गेलो. आता ओंकारेश्वर पर्यंत ह्याच तटावर रहायचे. तद् नंतर माईचा बगिचा,जिथे ती बाल्यावस्थेत खेळते, कपीलधारा, कपीलमुनींचा आश्रम, धुनी, दुर्वासांची दुग्धधारा, शोन (सोन) नदीचा उगम, कबीर चबुतरा (इथे निरव शांतता, बिना पारंब्यांची वडाचे मोठमोठे व्रृक्ष आहे), कल्याण सेवा आश्रम बघितले. संध्याकाळी रामघाटावर पुन्हा आरती करुन दुसरे दिवशी नरसिंगपुर साठी निघालो.
— सतीश कृष्णराव परांजपे
(क्रमश:)
Leave a Reply