११ : नरसिंगपुर (७ एप्रिल)
अमरकंटक सोडल्यावर थोडेच दुर “चितळे ताईंच्या ”आश्रमावर गेलो व त्यांच्या अनुभवाबद्दल गप्पा झाल्या. त्यांचे बरोबर नास्ता करुन निघालो. रस्ता डिंडोरी, मंडला जिल्ह्यातून जातो. वाटेत अर्थातच नर्मदा दर्शन व कुठल्याशा घाटावर स्नान झालेच. हा पुर्ण भाग विंद्य पर्वत रांगेमुळे घनदाट झाडीचा आहे. मंडल्याच्या दक्षीणेलाच प्रसिध्द कान्हा किसली अभयारण्य आहे. कान्ह्याचा हा भाग तसा नर्मदेच्या खुप जवळ नाही पण हे घनदाट जंगल पुर्वी असलेल्या समुद्राच्या जवळते मुळे असु शकते.
जेवणासाठीचा स्टॉप सोडतां दिवसभराचा सलग प्रवास करुन संध्याकाळी नरसिंगपुरला पोचलो. तिथे गेल्या गेल्या बरमान (ब्रम्ह) घाटावर स्नान व आरती झाली.
१२ : होशंगाबाद (८ एप्रिल)
नरसिंगपुरहुन नास्ता करुन सकाळी लवकरच निघालो. सोहागपुर, करेली पिपरिया वगैरे ओळखीच्या भागांतुन, अर्थात न थांबतां, वाटेत जेवणा, चहा करता थांबुन, संध्याकाळी होशंगाबादला पोचलो. हुशंगाबादला बरेचदा आलो असल्याने रेल्वे क्राॅस केल्याने उगीचच आपल्या भागांत आल्यासारखे वाटले. इथुनच पिपरीया मार्गे मध्य प्रदेशातले, सतपुड्याच्या महादेव पहाडी वरील हिल स्टेशन “पचमढी”ला जातात, जे खुप सुंदर व रमणीय आहे. एव्हाना खुप दिवस झाल्याने घरी जायची ओढ लागायला लागली.
कुठल्याशा घाटावर स्नानादी, नर्मदा आरती करुन “खर्रा “ घाटावरच्या, प पु टेंभेस्वामींनी स्थापन केलेल्या मंदिरांत एकमुखी दत्ताचे दर्शन घेतले व नंतर प्रसिध्द सेठिया घाटावर संध्याकाळी आरती केली. इथेच आम्हाला आमच्यातल्याच एका मुर्तींचे परिचित, पायी परिक्रमा करणारे जोडपे भेटले. त्यांचे पण अनुभव ऐकायला मिळाले. हा घाट खुप स्वच्छ असुन इथले पात्र तर फार च रूंद व खोल आहे. पावसाळ्यात पुर आल्यावर हा घाट तर बरेचदा पुर्ण बुडतो. एकदा ९६-९७ मधे शहरच जवळ जवळ बुडायला आले होते.
१३ : ओंकारेश्वर (९ एप्रिल)
होशंगाबादहुन हरदा मार्गे खंडव्याला जायला निघालो. नियमाप्रमाणे वाटेत नर्मदा स्नान, आरती झाली. साधारण १२-१ वा. पर्यंत खंडव्याला पोचलो. तिथे पु.दादाजी धुनीवाले यांच्या समाधीचे(छोटे व बडे ) दर्शन घेतले. इथे अखंड धुनी पेटलेली असते व तिच्यात नारळ टाकायची प्रथा आहे व भाकरी (टिक्का) चा प्रसाद देतात. वाटेत जेवण घेउन ओंकारेश्वर ला पोचलो. लगेच महादेवाचे (ममलेश्वर) दर्शन घेतले व घाटावर संकल्प पुर्तीची यथासांग पुजा, प्रायश्चित्त पुजा ( वाटेत चुकुन अजाणतेपणी काही पाप घडले असले वा चुक झाली असल्यास क्षमा करावी म्हणुन) व मातीच्या १००१ शिवलिंगांवर रुद्राभिषेक केला. अशा रितीने परिक्रमेची परिपुर्णता / सांगतां निर्विघ्नपणे पार पडली. सगळ्यांनाच आनंद झाला व समाधान झाले. आनंद व्यक्त केला “यशोधन “च्या टीमने, रांगोळ्या काढुन, दिवाळी सारख्या पणत्या लावुन व सगळ्यांना हार घालुन स्वागत करुन ! वर रात्रीच्या जेवणाला पुरणपोळी.
वापसी चा प्रवास :
दुसरे दिवशी म्हणजे १० ता ला सकाळचे प्रात:विधी,स्नानादी उरकुन ओंकारेश्वराचे दर्शन घेतले.मग शंकराचार्यांचे मंदिर,गजानन महाराजांचे मंदिर ,फोटो सेशन उरकुन ,प्रथमच “ब्रंच”घेतला.सगळे तयार होतेच म्हणुन लागलीच इंदोर साठी प्रस्थान केले.इंदोरला जाताना ,अर्थात “नर्मदा मैयाचा “पुल क्राॅस केला ,मैयाचे यात्रेतील शेवटचे दर्शन झाले व इंदोरला १ वा पोचलो.आमचे पुण्याचे २.३० वा चे विमान असल्याने ,धावपळ करत ते पकडले,इतरांची गाडी संध्याकाळची असल्याने ते खाऊ गल्ली,खरेदी करायला वगैरे गेलेत.
अशा रितीने यात्रा कम सहल कम भ्रमण , यशस्वीरित्या पार पडली. निर्विवाद ह्या सगळ्या चे श्रेय “यशोधन “ ला जाते .
— सतीश कृष्णराव परांजपे
Leave a Reply