नवीन लेखन...

ऑलिम्पिक तुमच्या यशाचे तुमचं गाईड

आपल्या पैकी प्रत्येकजण स्वप्न पाहतो पण ती स्वप्नं साकार करण्यासाठी गरज असते ती निर्धार, शिस्त आणि प्रयत्नांची. ऑलिम्पिक म्हटलं की आपल्या मनात विचार येतात ते जबरदस्त मनोरंजनाचे. पण जरा विचार करता आपल्या हे लक्षात येईल की ऑलिम्पिक खेळांमधून आपल्याला जीवनात यश मिळवण्यासाठी बऱ्याच गोष्टी शिकता येतील..

तुम्हांला जे करायला आवडतं ते करा.

“सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हांला तुमचा खेळ आवडायला हवा. दुसऱ्याला खूश करण्यासाठी एखादी गोष्ट करू नका. ती तुमच्याच आवडीची असायला हवी” पेगी फ्लेमिंग, फिगर स्केटर, १९६८ विन्टर ऑलिम्पिक्स.

जर तुम्हांला तुम्ही जे करता ते आवडत नसेल तर ते करण्यामागची प्रेरणा हळूहळू संपुष्टात यायला लागते. इच्छाशक्तीही फार काळ तग धरू शकत नाही. बाह्य प्रेरणांचा काही काळासाठी फायदा होतो, पण नंतर मनाचा कोंडमारा होतो आणि दुःखी अंतर्मनाने तुम्ही उत्कृष्ट कामगिरी कधीच करू शकत नाही.

तुम्ही जे करता त्याबद्दल असलेलं प्रेम हे अंतःप्रेरणा ठरतं. तुमच्या आयुष्यात चढउतार तर येतातच; पण तुम्ही पुन्हा उमेदीने उभे राहू शकता. हीच अंतःप्रेरणा तुमच्याकडून अविश्वसनीय कामगिरी करून घेऊ शकते.

आपल्याला काय आवडतं, याचं उत्तर म्हणजे प्रयोग. बऱ्याच गोष्टी करून बघणं, जरी काही गोष्टी करून बघणं तुम्हाला आवडणार नाही असं वाटलं तरी त्या करून बघा तुम्हांला काय आवडतंय ते.

नकारात्मक विचारांच्या जाळ्यात अडकू नका.

“जेव्हा मला कोणी सांगतो की मी एखादी गोष्ट करू शकत नाही, तेव्हा मी सरळ त्याकडे दुर्लक्ष करतो.” फ्लॉरेन्स ग्रिफीथ, स्प्रिंटर १९८८ समर ऑलिम्पिक्स

इतर लोक जेव्हा तुमच्याशी नकारात्मक गोष्टी बोलतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करा; कारण बहुतेक वेळा ती फक्त मतं असतात. अशी वेळ आल्यास स्वतःला खालील प्रश्न विचारा…. त्यांनी कधी ती गोष्टी करून पाहिलीय का किंवा त्यांना त्याबद्दल काही माहिती आहे का?की ती फक्त त्यांची निराशावादी मते आहेत की त्यांना बदल आणि नवीन गोष्टीची भीती वाटत आहे?

बऱ्याच वेळेस तुमच्या लक्षात येईल की लोक योग्य आणि अनुभवी सल्ला देण्याऐवजी त्यांच्या वैयक्तिक अडचणी व्यक्त करतात. लोकांना काय म्हणायचं आहे ते ऐकून घ्या. जर ते म्हणत असतील त्यात तथ्य असेल तर त्याबाबत कृती करा. इतरांचं ऐकून चेंडूसारखं इथून तिथे जाण्यापेक्षा स्वतःचे निर्णय घ्या. 

अपेक्षांचं ओझं बाजूला करा.

नकारात्मक मतांप्रमाणेच अपेक्षाही माणसाला कमजोर करू शकतात. आपली इतरांच्या मनातील प्रतिमा सांभाळण्यासाठी आपण त्यांच्या अपेक्षांवर खरं उतरण्यावर लक्ष देऊ लागतो. त्यामुळे तुमच्यावर त्या अपेक्षापूर्तीचा दबाव येतो. तुम्हांला तसं करण्याची अजिबात गरज नाही. तुमचं जीवन हे तुमचं आहे.

हे स्वीकारायला लोकांना कदाचित कठीण होऊ शकतं. त्यांना वाटतं त्यांचा हक्कच आहे कारण त्यांनी तुमच्यासाठी वेळ आणि पैसा खर्च केलेला असू शकतो. तुमच्या जीवनाचं नियंत्रण हे तुमच्याच हातात असायला हवं कारण तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही जबाबदार आहात.

स्वतःला मोठं होण्याची मुभा द्या. स्वतःला मर्यादा घालू नका.

तुमच्या जीवनात कोण अडचणी निर्माण करतं? ८०-९० वेळा ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः! अंतिम निर्णय हा नेहमी तुमच्या हातात असतो, पण तुम्ही इतरांच्या मतांना अधिक महत्त्व देता आणि त्याप्रमाणे निर्णय घेता.

तुमच्या मनातील विचार हेच तुम्हांला जीवनात मर्यादा घालत असतात. यासाठी जाणीवपूर्वक विचारांना सकारात्मकतेकडे वळवणं गरजेचं आहे. स्वतःला इतरांच्या किंवा आपल्या भूतकाळाच्या नजरेतून पाहणं थांबवा आणि तुम्हांला हवी असलेली स्वतःची एक नवीन प्रतिमा घडवण्याच्या दिशेने पावलं उचला.

गोष्टी असू शकतात त्यापेक्षा कठीण, मोठ्या आणि गुंतागुंतीच्या करून ठेवू नका.

“मी फक्त जोरात घावलोय. मला कळत नाही की लोक याचा गवगवा का करतात” फूनी ब्लॅकर्स- कोएन, धावपटू, १९४८ समर ऑलिम्पिक्स्

बऱ्याच वेळेस आपण साध्या गोष्टींना अवाजवी महत्त्व देऊन मोठ्या करून ठेवतो. सिनेमांमध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की हिरो यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो, त्याला खूप संकटांना तोंड द्यावं लागतं. यात दाखवलेली परिस्थिती जरी खरी असली तरी त्याला आपण जे गांभीर्याचं स्वरूप देतो ते अवाजवी असते.

आपण त्यावेळेस परिस्थितीशी लढतो, ज्यावेळेस ती आपल्या तोडीची किंवा वरचढ असते. पण खरे पाहता अशी कुठलीही परिस्थिती अस्तित्वात नाहीए जी आपल्याला इतका संघर्ष करायला लावेल. तुमचा त्या परिस्थितीबद्दलचा दृष्टिकोन हो तुम्ही तिला कशा प्रकारे अनुभवता हे ठरवत असतो आणि त्याप्रमाणे तुम्ही कृती करता. यामुळे गोष्टी उगीचच कठीण होऊन बसतात. सिनेमांमुळे किंवा इतर कारणांमुळे परिस्थितीशी झुंज देऊन यश मिळवण्याचा झालेला हा संस्कारच त्या परिस्थितीला महाकाय स्वरूप देतो. जर गोष्टी किंवा परिस्थिती कठीण वाटत असेल तर ती तुमच्या डोक्यात आहे. हा विचार डोक्यातून काढून टाका. गोष्टी खूप सोप्या होतील.

कामावर लक्ष केंद्रित करा

“मी जेव्हा बर्फावर जाते तेव्हा मी फक्त स्केटिंगबद्दल विचार करते. ती शर्यत असल्याचं मी विसरून जाते.” कॅटरिना विट, फिगर स्केटर, १९८४ साराजेवो विन्टर ऑलिम्पिक्स.

तुमच्या कामात उत्तम कामगिरी करण्यासाठी तुम्हांला कामावर चित्त एकाग्र करणं आवश्यक आहे. यशापयशाबद्दल विचार किंवा लोक काय म्हणतील, काय विचार करतील या गोष्टींची काही गरज नाही.

जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा स्वतःला त्याच्या परिणामापासून वेगळे ठेवा. तुमच्यासमोर जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. गोष्टी खूप सोप्या होतील. त्यामुळे चिंता आणि ताण बराच कमी होईल आणि तुमची कामगिरी छान होईल. नंतर तुम्ही विचार करू शकता की काय व्यवस्थित झालं आणि कुठे सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

काही दिवस असेही असतील ज्यावेळेस गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाहीत.

“आयुष्यात तुम्ही नेहमी प्रयत्न करायला हवेत आणि आज मी जरी यशस्वी झालो नाही तरी माझा विक्रम मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याचा मला आनंद आहे” मोर्सेली, अॅथलिट, १९९६ समर ऑलिम्पिक्स

तुम्ही अपयशी व्हाल. काही वेळेला तुमच्या मनासारखं घडणार नाही. पण त्याला काही पर्याय नाही. पण स्वतःच्या अपयशाला किंवा चुकीला अतिमहत्त्व देऊ नका. आपल्या अपयशातून किंवा चुकांतून शिका आणि पुढे व्हा. जसा काळ पुढे सरकतो तसा त्या चुकांचा किंवा अपयशाचा परिणाम कमी किंवा नाहीसा होतो.

‘हिरो’ या संकल्पनेला धरून बसू नका.

“हे समजायला मला वेळ लागला की जे ऑलिम्पिकमध्ये मेडल्स् जिंकतात ते माझ्यासारखेच एक माणूस आहेत.”-डून ओ ब्रायन, डक अॅथलीट, १९९६ समर ऑलिम्पिक्स.

जेव्हा तुमच्यासमोर एक हिरो असतो ज्याच्यासारखं तुम्हांला व्हावंसं किंवा असावंसं वाटतं तेव्हा तुम्ही स्वतःला त्या प्रतिमेत बसवण्याचा प्रयत्न करता, स्वतःकडून अपेक्षा ठेवता. पण त्या पूर्ण झाल्या नाही तर तुम्ही स्वतःला कमी लेखता. तुम्हांला वाटतं की तो माणूस माझ्यापेक्षा वेगळा आहे. त्याच्यात प्रत्येक हिरो हा अगोदर एक माणूस आहे हे लक्षात घेतल्यास तुमच्यातील क्षमतेची जाणीव तुम्हांला होऊ शकते.

प्रत्येक जण अपयशी होतो, चुका करतो हे समजल्यावर इतर मानसिक अडथळेदेखील दूर होतात. तुम्ही लोकांशी खूप चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकता.

तुमच्या कामात जास्तीत जास्त काळ घालवा.

तुम्ही एखाद्या कामात प्रावीण्य कसे मिळवता?त्या कामात जास्तीत जास्त वेळ देता. तुम्ही हुशारीने तुमची ऊर्जा आणि प्रयत्न वाचवू शकता; पण जे लोक त्यांची पुरेपुर क्षमता वापरतात ते वर्षानुवर्ष त्या कामाला झोकून देताना दिसतात. कारण, इतरांकडून मिळणारं सहकार्य.

त्यांना आव्हान हवं असतं. ते स्वतःला मर्यादा घालू इच्छित नाहीत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते जे करतात ते त्यांना करायला आवडतं म्हणून.

संकलन – अमोल सातपुते

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..