रंगमंचावर शाही शालू परिधान केलेली महिला सराईतपणे वावरू लागते. बालगंधर्वाचे नाट्यपदांचे स्वर कानी येऊ लागतात. सारे वातावरण मोहमयी होऊन जाते. जणू काही पुराणामधला तो प्रसंगच रंगमंचावर उभा राहतो. एक कलाकार आपल्या वाणीने आणि अभिनयाने हजारो रसिकांच्या डोळ्यासमोर हे सारे उभे करू शकतो का, असा कोणालाही प्रश्न पडेल. परंतु ओमप्रकाश चव्हाण रंगमंचावर येताच याची सारी उत्तरे मिळू लागतात आणि रसिक त्यांच्या प्रेमात पडतो. दशावतार जिवंत होतो. बक्षिसांची खैरात सुरू होते. हेच तर रंगभूमीचे यश आणि हाच कोकणातला अस्सल दशावतार याची ओळख पटू लागते.
बालगंधर्वानी ज्याप्रमाणे रंगभूमीवर सेवा केली. आपले अभिनयकौशल्य दाखवताना भल्याभल्यांना चकित तर केलेच, पण सामान्यांच्या तोंडचे पाणीही पळवले. आज बालगंधर्वाप्रमाणे दशावतारी रंगमंचावर तेवढय़ाच अस्खलितपणे एखाद्या अभिनय सम्राज्ञीला लाजवेल, असा लाजवाब अभिनय करत ओमप्रकाश चव्हाण जेव्हा वावरू लागतात तेव्हा शिट्टय़ा, टाळय़ांबरोबरच अनेकांची तोंडे उघडीच राहतात. आमडोस, ता. मालवण ही जन्मभूमी असलेले ओमप्रकाश नांदरूख-चौकेच्या शाळेत क्रमिक अभ्यासक्रम पूर्ण करताना रंगमंचावर वावरू लागले. पुढे दशावतारासाठी त्यांनी स्वत:ला पूर्णत: झोकून दिले. त्यांनी केलेल्या ‘वत्सलाहरण’ या नाटकतील वत्सलाची भूमिका भविष्यात रंगभूमीला एक बालगंधर्वाचा वारसदार मिळणार आहे, असेच सांगणारी होती.
आपल्या दशावतारी कारकिर्दीबाबत बोलताना ओमप्रकाश म्हणतात, मला आव्हानात्मक गोष्ट आवडते. घरात पहिल्यापासूनच कलेची जोपासना झाली. वडील बालगंधर्वाचे चाहते होते. त्यांची नाटय़गीते वडिलांच्या तोंडपाठ होती. बालगंधर्वाच्या प्रयोगाचे किस्से ते सांगायचे. या वेळी राहून राहून वाटायचे बालगंधर्व जर हे करू शकतात तर मी का नाही..? वयाच्या १९व्या वर्षीच रंगकर्मी म्हणून संधी मिळाली आणि मग दिशा सापडली. प्रश्न भुकेचा होताच. परिणामी दशावतारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. घरात कलेचे पाईक असल्याने आडकाठी झाली नाही आणि मला वालावलकर दशावतारी नाटय़मंडळाचे बाबी नालंग भेटले.
त्यांच्याबरोबर पहिला ‘सती महानंदा’ हा प्रयोग करण्याची संधी मिळाली. यातील सतीची भूमिका साकारताना त्यांनी दिलेल्या टिप्स आणि कोणतीही कठीण गोष्ट सोपी करून सांगण्याची त्यांची हातोटी मला या क्षेत्रात स्थिरस्थावर करणारी ठरली. कालांतराने नाईक-मोचेमाडकर कंपनीचे गोविंद तावडे हे दुसरे गुरू मिळाले. कोणतेही नेपथ्य नसताना हजारो रसिकांच्या समोर भीषण दु:खी प्रसंग कसा साकारायचा, समोर बसलेल्या रसिकांच्या डोळ्यातून अश्रू कसे आणायचे, या अभिनयकौशल्याची माहिती दिली आणि माझे यश अधिकच उजळले.
आज वयाच्या ४८ व्या वर्षी मागे वळून पाहताना अनेक बरे-वाईट प्रसंग डोळ्यासमोर दिसतात. बाबी नालंग म्हणायचे, पुराण वाचून तू मोठा होणार नाही, तुला अभिनय समजून घ्यायला हवा. प्रत्येक वेळी समाजातील व्यक्तिमत्त्वांकडे पाहा. बाजारपेठेत दशावतारी कलाकारां ची गाडी थांबली की ते सांगायचे, समोरची वृद्धा बघ, महिला बघ, त्यांचे कौशल्य बघ आणि हळूहळू अभिनय करणे सोपे वाटू लागले. नव्हे तर ते रक्तातच भिनत गेले.
दशावतारात कुठलीही तालीम होत नाही. जे होईल ते थेट रंगमंचावर. नाटय़प्रयोगापूर्वी सूत्रधार एखादी पुराणकथा सांगतो, आज आपल्याला हा प्रयोग करायचा आहे, अशी सूचना होते आणि मग पात्रे रंगू लागतात. संवाद आपले आपण तयार करायचे असतात. पटकथा आपलीच आणि दिग्दर्शनही आपलेच..अशा दशावतारात आपला निभाव लागेल का, अशी शंका ओमप्रकाश चव्हाणांच्या मनात होती. परंतु गुरूंनी दिलेल्या सूचनांमुळे सारे काही सोपे होत गेले आणि आज दशावतारात एक महत्त्वपूर्ण स्थानी ते पोहोचले आहेत. त्यांच्या अभिनयाची दखल नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांनी घेतली आहे.
दिल्ली, हैदराबाद आणि इंदौर येथे नाईक-मोचेमाडकर दशावतार नाटय़मंडळाला विशेष पाचारण करण्यात आले होते. या वेळी ओमप्रकाश चव्हाण यांच्या स्त्रीपात्राचे भरभरून कौतुक झाले. अनेकांनी तर तुम्ही अभिनय सम्राज्ञी आहात, असे गौरवोद्गार काढले. त्यांच्या कलेची दखल घेऊन २००२ मध्ये संगीत कला अकादमीचा वसंत स्मृती पुरस्कार, २००३मध्ये आदित्य बिर्ला कलाकिरण पुरस्कारांसह आतापर्यंत जवळजवळ ३०हून अधिक विविध राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत. कामगार कल्याणची सलग १५ वर्षे अभिनयाची पारितोषिके त्यांनी मिळवली. त्यांचे ‘नासिकेजन्यी’ मधील चंद्रप्रभा, ‘अभिमन्यूवध’मधील उत्तरा, ‘द्रौपदी वस्त्रहरण’ मधील द्रौपदी, ‘वृंदाजलंधर’मधील वृंदा यासारखी अनेक स्त्रीपात्रे गाजली आहेत. सध्या सुधीर कलिंगण यांच्या कलेश्वर दशावतारी नाटय़मंडळात रंगमंचाची सेवा करत आहेत.
वर्षाला २००हून अधिक प्रयोग करत असतात. आज जिल्हय़ात ओमप्रकाश चव्हाण यांचे अभिनयकौशल्य सर्वश्रुत आहे. तसे अभिनयकौशल्य आपल्याला आत्मसात करता यावे यासाठी अनेक कलाकार प्रयत्नशील असतात. ओमप्रकाशही त्यांना मार्गदर्शन करत असतो. मी करतो तसे करू नका, माझी नक्कल न करता तुमचे असे कौशल्य निर्माण करा. रंगभूमी तुम्हाला स्वीकारेलच. ओमप्रकाश यांना व्यावसायिक रंगभूमीवर जायचे होते. मात्र दोन वेळच्या पोटाचा प्रश्न होताच म्हणून ते दशावताराकडे वळले.
आज दशावतारात आपला असा ठसा उमटवल्याने त्यांना अनेक व्यावसायिक मंडळांनी निमंत्रण दिले. व्यावसायिक रंगभूमीवर येणा-या ऑफर स्वीकारणे त्यांना शक्य झाले नाही. दशावतारी रंगभूमीसाठीच त्यांनी आता झटून काम करण्याचे ठरवले आहे. आपण व्यावसायिक रंगभूमीवर काम करू शकलो नाही, याची मनात खंत आहे. पण हे सारे दशावतारासाठी आहे, याचा अभिमान आहे, असे ते सांगतात. त्यांच्या अभिनयकौशल्याबाबत दूरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवर सातत्याने त्यांच्या मुलाखती होत असतात.
दशावतारी नाटकात स्त्री भूमिका करणारे सुप्रसिध्द कलाकार ओमप्रकाश यशवंत चव्हाण यांना अलिकडेच गोव्यात कासारपाल येथे नाट्यप्रयोग चालू असतानाच हृदयविकाराचा झटका आला. तशाच स्थितीत या निष्ठावंत कलाकाराने तीन तास नाट्यप्रयोग चालू ठेवला व नाट्यप्रयोग संपल्यावरच मालकाला आपल्याला बरे वाटत नसल्याची कल्पना दिली.कोल्हापूर येथील सिध्दीविनायक हार्ट हॉस्पिटलात तात्काळ एंजिओप्लास्टी केल्यामुळे एका नामवंत तथा सच्चा कलावंताचे प्राण वाचले.
ओमप्रकाश चव्हाण हे एक मोठे कलाकार असले, तरी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. संपूर्ण कुटुंबात तेच एकटे कमावते. पत्नी प्रणाली गृहिणी, मोठा मुलगा प्रथमेश डिझेल मॅकानिकची तीन वर्षांची पदविका घेऊनही बेकार, मुलगी मयुरी वाणिज्य शाखेत द्वितीय वर्षाला आहे. शिवाय कथक नृत्याचेही शिक्षण घेते. छोटा मुलगा गौरव सातवीत शिकतोय आणि वृध्द आई गेल्या अनेक वर्षांपासून हृदयविकाराने आजारी आहे.महिना भरावर येऊन ठेपलेला दशावतारी नाटकांचा मोसम आणि पुढील दोन मोसमात काम करता येणार नाही हे वास्तव आणि त्यामुळे कुटुंबाचं कसं होणार ही चिंता आणि त्यात आजारपणातील वैद्यकीय उपचारांच्या लाखो रुपयांचा खर्च या चिंतेत खाटेवर झोपलेले ओमप्रकाश चव्हाण त्यांच्या कलेवर प्रेम करणार्यांना बघवणार नाही. गेल्या दि. १७ सप्टेंबरला गोव्यात साहित्य संगम’ या संस्थेने त्यांच्याशी गप्पांचा एक कार्यक्रम संत सोहिरोबा नाथांच्या पालये या गावी आयोजित केला होता. त्यानंतर अवघ्या चौदा दिवसांनी म्हणजे दि. १ ऑक्टोबरला त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ’साहित्य संगम’ च्या सदस्यांनी त्याना अल्पशी आर्थिक मदत केली.
” कोकणचा बालगंधर्व” असा ज्याचा उल्लेख केला जातो, देशभरातील अनेक मान्यवरांनी ज्यांची प्रशंसा केली, देशभरातील प्रतिष्ठेचे कैक पुरस्कार ज्याच्या अभिनयाने आपल्याकडे खेचून आणले, झगमगत्या दुनियेतील मोठमोठी यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतील अशा अनेक संधी पायाशी चालत आल्या असतानाही दशावतारी कलेवरच्या नितांत श्रध्देने ज्याने त्याकडे पाठ फिरवली, त्या कलाकाराच्या आजारपणाच्या खर्चासाठी आपलं सौभाग्यलेणं गहाण ठेवायची पाळी सौभाग्यवती वर यावी यासारखे ’सांस्कृतिक दुर्दैव’दुसरे कोणते असू शकते..?
’बालगंधर्व’ चित्रपटासाठी ओमप्रकाश चव्हाणांचं नाव प्रथम चर्चेत होतं. परंतु कोकणात संपर्क न झाल्यामुळे ती संधी हुकली.दिल्लीच्या संगीत कला अकादमीचा आदित्य बिर्ला फाऊंडेशन पुरस्कृत ’कलाकिरण पुरस्कार’ देताना स्त्रीवेशातील ओमप्रकाशना बघितल्यावर शाहरुख खानसारखा अनुभवी अभिनेता हा पुरुष आहे यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. व्यासपीठावरील इतरांनी पटवून दिल्यावर शाहरुख खानने संपूर्ण भरलेल्या सभागृहात ओमप्रकाश चव्हाणांना नमस्कार केला.
दिल्लीच्या भारत रंगमहोत्सवात गुजरातमधील “जयशंकर सुंदरी” आणि महाराष्ट्रातील “बालगंधर्व ” यांच्या समीप जाणारा कलाकार म्हणून तज्ज्ञांनी त्यांची प्रशंसा करून प्रशस्तीपत्रक दिले कोकणचा ऊर अभिमानाने भरून यावा, अशा अनेक घटना सांगता येतील. पण आज त्या सांगून काय कामाच्या..? आज गरज आहे ती या कलाकाराला पुन्हा लवकरात लवकर दशावतारी रंगभूमीवर उभे करण्याची आणि त्यासाठी त्यांच्यावरील आर्थिक संकटाचे कोसळणारे आभाळ दूर करण्याची. आपलं ’सांस्कृतिक देणं’ काही अंशी तरी फेडण्याची..!
आपल्या सहजसुंदर अभिनयामधून सिंधुदुर्गच्या घराघरात पोहचलेले दशावतारी कलाकार ओमप्रकाश चव्हाण यांना मुंबईतील पारिजात संस्थेचा प्रतिष्ठेचा ‘पारिजात नाटय़ पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. ओमप्रकाश चव्हाण हे हृदयविकाराने त्रस्त असल्याने त्यांच्या आंबडोस येथील घरी प्रसिद्ध छायाचित्रकार इंद्रजीत खांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चाळीस हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
ओमप्रकाश नेहमी म्हणतात, ” कलावंत हा नेहमी साधाच असतो, माझ्या सौंदर्याने आणि कलेने मला लोकांत ओळख दिली. एकदा तोंडाला रंग चढविल्यानंतर मी त्यांचा होऊन जातो…!” दशावतार कोकणची एक कला ही जीवंत ठेवण्यात ओमप्रकाशचा हात मोलाचा आहे. जास्त धनाची अपेक्षा न बाळगता कलेची श्रीमंती त्यांच्या चेहर्यावर तरळत असते. सततची जागरणं आणि लोकांचे मनोरंजन आयुष्यभर या रंगमंचाची सेवा.
खरंच ग्रेट ओमप्रकाश..! तुझ्यातील कलावंताला माझा सलाम…!
— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग
Leave a Reply