नवीन लेखन...

‘चलो इक बार फिर से’ च्या निमित्ताने

गीतें हा हिंदी सिनेमांचा अविभाज्य भाग आहे. विशेषकरून ‘गोल्डन इरा’ म्हणजे १९५० ते १९७०/७५ पर्यंतच्या काळातील सुमधुर गीतांची सगळ्यांना अजूनही भुरळ पडते. त्याकाळी विख्यात संगीतकार होतेच, एवढेच नव्हे तर श्रेष्ठ शायरही कार्यरत होते. त्यामुळे गीतांना नुसतेंच कर्णमधुर संगीतच नाही, तर अर्थपूर्ण शब्दही लाभलेले असत. अशाच एका गीतामधील शायरीचा हा आस्वाद, आणि त्यानिमित्ताने त्याच्या शायरवर एक नजर.

हें गीत आहे ‘गुमराह’ सिनेमातले ‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनों’. बी. आर्. चोपडांचा हा सिनेमा १९६३ मधे (मी आय्.आय्.टी.त शिकत असतांना) आला होता. संगीत होते रवी यांचे. शायर आहे साहिर लुधियानवी. (साहिर यांचा एकेरी उल्लेख केवळ लेखनाच्या सोयीसाठीच आहे). ५० वर्षे झाली तरी या गीताची गोडी अजूनही कायम आहे. रेडियो अथवा टीव्हीवर हे गाणे लागले तर अजूनही ऐकावेसे वाटते व ते अजूनही पूर्वीइतकाच आनंद देते. एवढेच नव्हे, तर मी ते नव्या पिढीतील जनांनाही ऐकतांना, व त्यांना ते आवडत असलेले, पाहिलें आहे.

साहिर लुधियानवी :
जसे देहलवी, लखनवी, हिंदवी वगैरे, तसे लुधियानवी. (‘हिंदवी’ या शब्दाशी आपण सगळेच शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्य’ या शब्दप्रयोगामुळे परिचित आहोत). लुधियानवी म्हणजे लुधियानाचा. साहिरचे नाव होते अब्दुल हयी. ‘साहिर’ हा त्याचा तख़ल्लुस (Pen-name, टोपण नांव) आहे. साहिर म्हणजे ‘जादूगार’. साहिर खरोखरच शब्दांचा जादूगार होता. साहिर जरी सिने-गीतकार बनला होता, तरी उर्दूभाषी लोक त्याला त्याआधीच शायर म्हणून ओळखू लागले होते. १९४५ मधे, तो २४ वर्षांचा असतांना व ‘कॉलेजियन’ असतांनाच त्याचे ‘तल्ख़ियाँ’ (कटुता) हे पुस्तक प्रसिद्ध झाले व तो शायर म्हणून सगळ्यांना माहीत झाला. पुढे काही काळ त्याने काही उर्दू मासिकांचे संपादकत्व सांभाळले. त्यानंतर साहिर मुंबईला
सिने-जगतात आला.

साहिरने सिनेमांसाठी गाणी लिहिलीच ; पण त्याची काही शायरीही हिंदी सिनेमांमधे वापरली गेलेली आहे, किंवा आपल्या मूळ शायरीच्या आधाराने त्याने काही सिने-गीते लिहिलेली आहेत. असे ऐकिवात आहे की, त्याची ‘चकले’ (वेश्यागृह) ही कविता वाचून गुरुदत्तने त्याला प्यासासाठी गीते लिहायला निमंत्रण दिले. प्यासामधील हीरो ‘विजय’ हा एक कवीच दाखवला आहे. त्या पार्श्वभूमीवर, साहिरच्या हिर्‍यासारख्या शायरीला आशयघन कथेचे कोंदण मिळाले. असे म्हणतात की, गुरुदत्त आधी, ‘प्यासा’च्या हीरो एक चित्रकार आहे, असे दाखवणार होता; पण साहिरच्या शायरीने प्रभावित होऊन गुरुदत्तने हीरोला एक शायर असे दाखवले. प्यासामधे एकापेक्षा एक सुंदर गीते होती. एस्. डी. बर्मनचे संगीत उत्तम होतेच, पण त्याहीपेक्षा हृदयाला अधिक भिडणारी गोष्ट म्हणजे गीतांचे शब्द. सिने-गीते कसली, उत्कृष्ट शायरीच ती ! ‘जिन्हें नाज़ है हिंदपर वो कहाँ हैं’, ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है !’ , ‘जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला’ ही काही उदाहरणे. ‘जाने वो कैसे’ या गीतामधील या ओळी पहा –
‘… किस को फ़ुर्सत है जो थामे दीवानों का हाथ !
हम को अपना साया भी अक्सर बेज़ार मिला !’
जगात कोणालाच माझा हात धरायला वेळ नाही, माझी साथ द्यायला फुरसत नाही, कुणालाही माझ्याबरोबर चालायला नको आहे ; इतके की, माझी सावलीसुद्धा माझ्यावर नेहमीच त्रासलेली असते !! (कारण, तिला बिचारीला माझ्याबरोबर चालायचे नसते, तरीही संगे चालावेच लागते. मग ती त्रासणार नाही तर काय ! ).
उत्कृष्ट शायरीचा हा एक नमुना आहे ! वा !! खरे तर, साहिरची शायरी हा ‘प्यासा’ सिनेमाचा आत्माच आहे.

साहिरची ही अन्य शायरी पहा – ‘कभी-कभी मेरे दिल में ख़याल आता है’. सिनेमा लगेचच ध्यानात आला ना? कवितेच्या या ओळीवर सिनेमातील नुसते गीतच आधारित आहे असे नव्हे, तर, सिनेमाचे शीर्षकही आधारित आहे – ‘कभी कभी’. मुळातली कविता, (जिच्यावरून सिने-गीत बेतले आहे), वाचून पहावी. या कवितेतील काही ओळी पहा –
‘कभी कभी मेरे दिल में ख़याल आता है ।
….
ये तीरगी जो मेरी ज़ीस्त का मुक़द्दर है ।
तेरी नज़र की शुआओं में खो भी सकती थी ।’
‘कधी कधी माझ्या मनात असा विचार येतो की ….. हा अंधार (तीरगी) जो माझ्या जीवनाचे (ज़ीस्त)
भाग्य (मुक़द्दर) आहे, तो तुझ्या नजरेच्या प्रकाशकिरणांमध्ये (शुआओं में) लुप्त होऊ शकला असता’.

‘ताजमहल’ सिनेमातली साहिरची गीते बिनाका गीतमालामधे टॉपला होती. या सिनेमातील काही गाणी
पहा – ‘पाँव छू लेने दो’, ‘जो बात तुझमें है तेरी तस्वीर में नहीं’, ‘जो वादा किया वो निभाना पड़ेगा’.
(सहज, जाता जाता म्हणून सांगतो की, ताजमहाल या वास्तूवरील, शकील बदायूनी याचे ‘लीडर’ सिनेमातील हे गाणेही प्रसिद्ध आहे : ‘एक शहनशाह ने बनवा के हसीं ताजमहल, सारी दुनिया को महब्बत की निशानी दी है’. ताजमहालचे निर्माण करणार्‍या कारागीरावरही एक उत्कृष्ट कथा लिहिली गेलेली आहे). या पार्श्वभूमीवर, ‘ताजमहल’ हे शीर्षक असलेल्या साहिरच्या कवितेच्या या काही ओळी बघा. ( ही त्याची शायरी आहे, हे सिनेमातील गीत नव्हे ). ताजमहालबाबत अशा वेगळ्या तर्‍हेचा विचार अजून तरी इतरत्र माझ्या वाचनात आला नाही. पहा –
‘अनगिनत लोगों ने दुनिया में मोहब्बत की है
कौन कहता है कि सादिक़ न थे जज़्बे उनके
लेकिन उनके लिए तश्हीर का सामान नहीं
क्योंकि वो लोग अपनी ही तरह मुफ़लिस थे
. . . . . .
इक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर
हम ग़रीबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक़
मेरी महबूब कहीं और मिला कर मुझसे ’.
(सादिक़ : खरे ; जज़्बे : भावना ; तश्हीर : जाहिरात ; मुफ़लिस : गरीब )
हे स्पष्ट आहे की, शायर साहिरनें आपली ताजमहालवरील नज़्म आधी लिहिली, व त्यानंतर साहिरने गीतकार म्हणून ताजमहालवर सिनेमाच्या आवश्यकतेनुसार गीतें लिहिली. आपल्या ‘फ़नकार’ (कलाकार) नावाच्या एका कवितेत साहिर स्पष्टपणे म्हणतोच –
‘मैंने जो गीत तेरे प्यार की ख़ातिर लिक्खे
आज उन गीतों को बाज़ार में ले आया हूँ ।’

बरसात की रात, धूल का फूल, नया दौर, हम दोनों, वक़्त, व आणखी अशा कितीतरी सिनेमांमधे साहिरने लिहिलेली गीतें म्हणजे उत्तम शायरीचा नमुनाच आहे. मग तें गीत ‘कभी ख़ुदपे कभी हालात पे रोना आया’ हे असो, किंवा ‘तू हिंदु बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा’ हे असो, किंवा ‘अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम’ असो, किंवा बरसात की रात मधील ‘ये इश्क इश्क है’ ही कव्वाली असो. ही यादी फार मोठी आहे, प्रत्येक नाणे म्हणजे एक मास्टरपीस आहे.

चलो इक बार फिर से :
साहिरच्या शायरीच्या पार्श्वभूमीवर, आता ‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनों’ हे (गुमराह सिनेमातील) प्रेमिकांविषयीचे गीत पाहू या. गाण्याची सिच्युएशन आठवते का ? सुनील दत्त हा माला सिन्हाचा लग्नापूर्वीचा प्रियकर असतो, पण माला सिन्हाला नाइलाजास्तव अशोक कुमारशी लग्न करावे लागते. नंतर अशोक कुमार व सुनील दत्त यांची इतरत्र ओळख होते. त्यानंतर एका प्रसंगात, अशोक कुमारच्या घरी सुनील दत्त पियानोवर हे गाणे गातो. समोर माला सिन्हा व अशोक कुमार. खरे तर, प्रेयसीचा नवरा समोर उभा असतांना कुठलाही प्रियकर ‘आपण पुन्हा अनोळखी बनू या’ (अनोळखी आहोत असे दाखवू या) असे प्रेयसीला उघडपणे म्हणेल का ? मनात म्हणेल, डोळ्यांच्या भाषेत म्हणेल फार तर ; पण शब्दांतून नक्कीच व्यक्त करणार नाही. अन् तरीही हे गाणे सिनेमात मनाला भिडते ! आजही, हे गीत ऐकल्यावर हृदयाला स्पर्श करून जाते.

मात्र, हे गीत साहिरने सिनेमासाठी लिहिलेले नाही, तर, त्याच्या शायरीतून ते सिनेमासाठी घेतले
गेलेले आहे, हे उघड आहे. (साहिरच्या शायरीच्या पुस्तकात हे गीत समाविष्ट असते) .

या संदर्भात थोडीशी पार्श्वभूमी : तरुण वयातच कॉलेजात असतांना साहिरचा प्रेमभंग झालेला होता. साहिर जहागीरदारीमधून गरिबीत आलेला होता, (कारण त्याच्या आई-वडिलांचा तलाक). गरिबी व सामाजिक बंधने यामुळे त्याने आपले प्रेम प्रगट करण्याचे साहस केले नाही. ही प्रेमिका कोण होती ?

प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम व साहिर यांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध होते. पण जिच्यामुळे साहिरला १९४३ ला कॉलेजातून बाहेर पडावे लागले, ती दुसरीच कोणी होती. अमृता व साहिर यांची ओळख फाळणीनंतर १९४९ मधे झाली. आपले साहिरवर प्रेम होते हे अमृताने उघडपणे सांगितलेले आहे. पण साहिर तिच्या जीवनातून बाहेर पडला व मुंबईला निघून आला. आधीच हात पोळल्यामुळे अमृताच्याही बाबतीत साहिर आपले प्रेम व्यक्त करू धजला नाही, असे असेल काय?

मुंबईला आल्यानंतरही साहिरचे आणखी एक प्रेमप्रकरण विफल झाले, असे म्हणतात. प्रेमाच्या अशा असफलतेमुळे असावे कदाचित, पण साहिर जन्मभर अविवाहितच राहिला.

या सर्व पार्श्वभूमीमुळे असेल, पण साहिरच्या लेखनात प्रेमिकेला उद्देशून लिहिली गेलेली बरीच शायरी आहे, आणि ती त्याची महत्वपूर्ण शायरी मानली जाते. साहिरचे जवळचे मित्र व त्याच्या निवडक शायरीचे संकलक-संपादक श्री. प्रकाश पंडित आपल्या ‘साहिर लुधियानवी और उनकी शायरी’ या पुस्तकात
म्हणतात – .. उसका व्यक्तिगत प्रेम विभिन्न मंज़िलें तय करता हुआ अन्त में उस बिन्दु पर पहुँच गया जहाँ व्यक्तिगत-प्रेम सामूहिक-प्रेम में बदल जाता है और शायर अपनी प्रेमिका का ही नहीं, मानव-मात्र का आशिक़ बन जाता है, और …. और फिर बड़े स्पष्ट शब्दों में कह उठता है, … ‘तुम्हारे ग़म के सिवा
और भी तो ग़म हैं मुझे’ .

मुंबईला आल्यावर साहिरचें एक जे प्रेम असफल झाले ते फिल्म-लाइनशी संबंधित एका तरुणीवर होते,
(गायिका सुधा मलहोत्रा), असें म्हणतात. ‘चलो एक बार फिर से’ या गीताच्या रचनेशी संबंधित घटना टीव्ही अँकर अनु कपूर यांनी त्यांच्या टी. व्ही. प्रोग्राममध्ये सांगितलेली आहे , ती अशी :
प्रोड्यूसर बी. आर्. चोपडा यांची व साहिरची फार जवळीक होती. एके दिवशी ते साहिरला म्हणाले, ‘चल माझ्याबरोबर‘. साहिरनें विचारलें, ‘कुठे ?’. चल तर खरं एक फंक्शनला, चोपडा म्हणाले. चोपडा आग्रहानें साहिरला आपल्याबरोबर फंक्शनला घेऊन गेले. तो समारंभ होता साहिरच्या त्या प्रेमिकेच्या लग्नाचा. तिथें तें पाहून साहिर उद्गारला, ‘चलो एक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनों’. तें ऐकून चोपडा म्हणाले, ‘साहिर. या ओळीवर तुला एक सुंदर गाणें लिहिता येईल.’ त्यानंतर साहिरने ‘चलो एक बार’ हे गीत लिहिलें व चोपडांनी तें ‘गुमराह’ या चित्रपटासाठी वापरलें.

पण, मला तरी, अनु कपूर यांनी वर्णलेली घटना खरी वाटत नाहीं, विश्वसनीय वाटत नाहीं, अफवा असावी अशा पद्धतीची वाटते. असा निष्कर्ष काढण्याचें कारण असें की : सिनेसृष्टीतील ज्या तरुणीवर साहिरचें प्रेम होतें असें म्हणतात, ती तरुणी (सुधा मलहोत्रा) फिल्म-जगतात प्रसिद्ध होती. तो काळ जरी जुना असला तरी, त्या काळीही सिनेमाशी संबंधित पब्लिकेशन्स् होती. म्हणजेच, त्या तरुणीच्या लग्नाची बातमी त्या पब्लिकेशन्समध्ये पसिद्ध झालेली असणार. तसेंच, कर्णोपकर्णी देखील ती बातमी नक्कीच पसरली असेल, आणि एकाच क्षेत्रात असल्यामुळे साहिरला ती बातमी आधीच समजली असेल. तसेच, साहिर हा स्वत: एक प्रथितयश शायर असल्यामुळे, कदाचित त्यालाही या समारंभाचें आमंत्रण मिळालेलें असू शकेल.
म्हणून, त्या तरुणीच्या लग्नाबद्दल साहिर अनभिज्ञ होता हें म्हणणें मान्य करतां येत नाहीं ; व तसें असेल तर, साहिरनें त्या लग्नाच्या समारंभाला जाण्याचें नक्कीच टाळलें असतें. या सर्व गोष्टींचा विचार करून, ‘चोपडा साहिरला एका समारंभाला, तो कुठला समारंभ आहे हें न सांगतां, बरोबर घेऊन गेले, व तिथें चकित होऊन साहिर ‘चलो एक बार फिर से’ ही ओळ उद्गारला, ही कथा खरी वाटत नाहीं.

तें कांहींही असो, साहिरनें ‘चलो एक बार फिर से’ हें काव्य आधी लिहिलें, व बी. आर्. चोपडांनी तें नंतर गुमराह सिनेमासाठी वापरलें, हें मात्र खरें.

‘ख़ूबसूरत मोड़’ : ‘चलो एक बार फिर से’ या कवितेचे शीर्षक आहे ‘ख़ूबसूरत मोड़’. ही कविता लिहितांना साहिरने कदाचित मनात अशी कल्पना केली असेल की, आपली पूर्वीची प्रेयसी आपल्यासमोर इतक्या काळाने पुनश्च उभी आहे ; आणि तिला उद्देशून साहिरने ही कविता लिहिली असावी.

आपण या कवितेतील शब्दांचा आस्वाद घेऊ या. (खालील शब्द कवितेतून घेतलेले आहेत).

‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनों ।’

चल, आपण दोघे पुन्हां एकदा अनोळखी बनू या. आपली पूर्वी ओळख होती हे खरे आहे, पण त्याआधी आपण जसे एकमेकांसाठी अनोळखी होतो, तसेच आतां पुनश्च होऊ या ; आपण जणू अनोळखीच आहोत असे वागू या.

न मैं तुमसे कोई उमीद रखूँ दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ़ देखो ग़लत-अंदाज़ नज़रों से
न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाए मेरी बातों में
न ज़ाहिर हो तुम्हारी कशमकश का राज़ नज़रों से ।

माझ्या हृदयावर तू कृपा करावीस अशी आशा मी तुझ्याकडून ठेवू नये. तूही माझ्याकडे अयोग्य-पद्धतीच्या दृष्टीने पाहू नकोस (जी भावना व्यक्त करणे योग्य नव्हे, ती तुझ्या नजरेतून दाखवू नकोस.) माझ्या हृदयातील धडधड माझ्या बोलण्यात मधेमधे अडथळा निर्माण न करो. आणि, तुझ्या ओढाताणीमागचे, तुझ्या घालमेलीमागचे रहस्य तुझ्या नजरेतून उघड न होवो.

तुम्हें भी कोई उलझन रोकती है पेश-क़दमी से
मुझे भी लोग कहते हैं कि ये जलवे पराए हैं
मेरे हमराह की रुसवाइयाँ हैं मेरे माज़ी की
तुम्हारे साथ भी गुज़री हुई रातों के साए हैं ।

तुलाही कसला तरी पेच, कसली तरी समस्या, कसली तरी चिंता, पुढे येण्यापासून अडवत आहे. मलाही लोक सांगतात की हे (तुझे) साजशृंगाराचे प्रदर्शन अन्य कुणासाठीतरी आहे, माझ्यासाठी ते परके आहे. (त्याच्याकडे मी पाहू नये). माझ्या सहप्रवाशाचे (म्हणजे तुझे) अपयश हे माझीही गतकाळची विफलता आहे. तुझ्याहीसोबत गत-रात्रींची, म्हणजेच गत-रात्रींच्या स्मृतींची, (उदास) छाया आहे.

तआरुफ़ रोग बन जाए तो उसको भूलना बेहतर
तअल्लुक़ बोझ बन जाए तो उसको तोड़ना अच्छा
वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन
उसे इक ख़ूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा ।
चलो इक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनों ।

ओळख (तआरुफ़) जर आजार बनली, जिवाला क्लेश देणारी व्याधी बनली, तर तिला विसरणेच बरे. संबंधाचे (तअल्लुक़), जवळिकीचे, नात्याचे, जर ओझे होत असेल तर ते तोडणेंच चांगले. जी कथा
अंतिम-परिणामापर्यंत नेणे शक्य नसेल, तिला एक सुंदरसे वळण (रूप) देऊन सोडून देणेच योग्य.
चल, आपण दोघे पुन्हा-एकदा अनोळखी बनू या.

गुमराह सिनेमातील परिणामकारक गीत : ‘चलो एक बार फिर से’ हें सिने-गीत महेंद्र कपूरच्या आवाजात रेडिओ-टीव्हीवर लागले तर सुनील दत्त – माला सिन्हा – अशोक कुमार ही त्रयी तर नजरेसमोर येतेच येते, पण त्याचबरोबर साहिर व त्याची अनामिक प्रेमिका हेही दृष्टीपुढे येतात ; एवढेच नव्हे तर, तुमच्या-आमच्यासारखा कोणीएक आशिक (प्रेमी) व त्याची माशूका (प्रेमिका) हेसुद्धा डोळ्यांपुढे उभे रहातात.
हेच या गीताचे यश आहे. विफल प्रेमाला असा आगळा सार्वत्रिक परिमाण देणारें असें हें गीत आहे.

सलाम साहिरला :
‘कभी कभी’ या सिनेमातील एका गीतात साहिर म्हणतो- ‘ मैं पल दो पल का शाइर हूँ । …. पल दो पल मेरी कहानी है’ . पण ते त्याला स्वत:ला मात्र लागू पडत नाही. ‘बरसात की रात’ सिनेमामधील
‘ये इश्क इश्क है’ या कव्वालीत साहिर प्रेमाबद्दलचे तत्वज्ञान सांगतो : ‘ईश्क़ आज़ाद है, हिंदु न मुसलमान है इश्क़ । आप ही धर्म है और आप ही ईमान है इश्क़ । ….. अल्ला ओ रसूल का फ़रमान इश्क़ है । … गौतम का और मसीह का अरमान इश्क़ है। … काइनात (सृष्टी) जिस्म है ओर जान इश्क़
है ।’ आणि एवढे म्हणून साहिर थांबत नाही, तर शेवटी तो म्हणतो की, ‘.. बंदे को ख़ुदा करता है
इश्क़’ . कबीराने म्हटले आहे की, ‘ढाई अच्छर प्रेम का पढ़े सो पंडित होय’. साहिर कबीराप्रमाणे संत किंवा तत्वज्ञ नव्हता. तरीही प्रेमाचे एवढे तत्वज्ञान त्याने सहजपणे सांगितलें. अशा साहिरला ‘पल-दो-पल का शायर’ कसे म्हणावे ? साहिरच्या मृत्यूला ३२ वर्षे होऊन गेली, तरी तो आजही आठवतो, तो अजूनही
ताजा-टवटवीत वाटतो, हेंच त्याच्यातल्या शायरचे मोठेपण आहे.

— सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..