ही घटना आहे कोरोना काळातील. त्यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणून बँका नेहमीप्रमाणे पूर्णवेळ नसून काही तास म्हणजेच दुपारी 2 वाजेपर्यंत चालू असायच्या. दुपारी साधारण पावणेदोन वाजता 30 ते 35 वयाची एक महिला बँकेत आली. त्यांच्या प्रश्नांवरून त्यांना बँकेच्या व्यवहाराबद्दल तशी जास्त माहिती असलेली दिसत नव्हती. त्या महिलेला त्यांच्या बहिणीला अर्जंट रु. 5000/- पाठवायचे होते असे त्यांच्या सांगण्यावरून समजलं. बँकेतील अधिकाऱ्यांनी योग्य ती मदत केली. कोरोनाचे दिवस होते, कदाचित त्यांची बहीण किंवा नातेवाईक आजारी असावेत, म्हणून ह्या पैसे पाठवत असतील अशी माझी समज होती.
दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला पुन्हा एकदा गडबडीत त्या बँकेत आल्या. मला पुन्हा एकदा माझ्या बहिणीला रु. 45,000/- पाठवायचे आहेत, असं सांगून फॉर्म भरायला सुरुवात केली. का कुणास ठाऊक, मला थोडी शंका आली म्हणून त्यांना मी केबिनमध्ये बोलावून ह्या संपूर्ण व्यवहारासंदर्भात चर्चा केली. कारण त्या महिलेला मी यापूर्वी कधीच बँकेत पाहिलेले नव्हते.
सुरुवातीला त्या काहीही व्यवस्थित सांगायला तयार नव्हत्या. त्यांच्या बोलण्यातून काहीतरी माहिती लपवत असल्याचा संशय येत होता. माझ्या बहिणीने मला लंडनवरून कुरिअर केले आहे, त्यात खूप महत्त्वाच्या आणि किंमती वस्तू आहेत. एअरपोर्टवरून ते कुरिअर सोडत नाहीत म्हणून मला हे पैसे भरायला सांगितले आहेत. काल मी जे पैसे भरले तेसुद्धा ह्याच कारणासाठी होते. कृपया तुम्ही मला हे पैसे लवकरात लवकर पाठवण्यासाठी मदत करा अशी त्यांनी मला विनंती केली.
मला जी ऑनलाईन फ्रॉडची शंका होती ती खरी ठरत होती. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु लोभापोटी त्या काही खरं सांगायला तयार नव्हत्या. एवढेच नाही तर त्या माझ्यावर चिडल्या, वैतागल्या. तुम्ही फ्रॉड कसं काय बोलता? माझे पैसे मी कुठेही पाठवीन तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारची भाषा वापरली. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला व विचारले, ‘ठीक आहे… आपण पैसे पाठवूया परंतु, तुम्ही फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. सगळ्या देशभरात गेल्या महिन्यापासून संचारबंदी आहे, विमान, कुरिअर सेवा, पोस्टलसेवा सगळं काही बंद असताना तुम्हाला कुरिअर कसं आणि कुठून येऊ शकेल???’
हे ऐकल्यावर त्या थोड्या शांत झाल्या. आपली फसवणूक होत आहे असा थोडासा संशय त्यांनासुद्धा आला. तेव्हा हळू हळू त्यांनी खरी माहिती मला सांगायला सुरुवात केली. ‘काल सकाळी मला एक कॉल आला व माझ्या नावाने कोणीतरी कुरिअर पाठवले आहे त्यात काही लाखांचा ऐवज आहे असं सांगण्यात आलं. परंतु कुरिअर पाठवताना त्यांनी फॉर्मलिटी पूर्ण न करता तुमच्या नावाने ते पाठवले आहे. त्यासाठी तुम्हाला रु. 5000/- दिलेल्या अकाऊंट नंबरवर अर्जंट पाठवून द्यावे लागतील, नाहीतर तुमचं कुरिअर परत जाईल. म्हणून काल मी लगेच पैसे पाठवून दिले. आज सकाळी ते कुरिअर एअरपोर्टवर अडवण्यात आले आहे तिथून सोडवण्यासाठी रु. 45,000/- भरावे लागतील असं सांगण्यात आलं. मी माझ्या आईकडून खोटं बोलून हे पैसे आणले होते.’
सगळी खरी माहिती समोर आल्यावर, त्या महिलेला ज्या माणसाने पैसे पाठवायला सांगितले होते, त्यांना ह्या महिलेच्या मोबाईलवरून कॉल केला. तो कोणीतरी इंग्लिश बोलणारा होता. मी त्यांच्याकडून कुरिअरचे डिटेल्स घेण्याचा प्रयत्न केला, काही उलट सुलट प्रश्न विचारले. जेव्हा समोरच्या माणसाला तो करत असलेली चोरी आमच्या लक्षात आली असं कळलं तेव्हा त्याने गलिच्छ भाषा वापरून रागाने फोन ठेवून दिला. नंतर फोन स्विच ऑफ लागत होता.
आपली पाच हजारची आर्थिक फसवणूक झाली आहे, हे त्या महिलेच्या लक्षात आलं, परंतु रुपये 45,000/- वाचले ह्यासाठी मनोमन आशीर्वाद देऊन त्या निघून गेल्या.
–अतिश म्हात्रे
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply