कोकीळ गातो गाणे
चैत्राची चाहूल बाई
कैऱ्यांच्या आडून दडणे
तो दिसत द्वाड नाही
हुरहूर उठवी जाणे
कुजने अंगांग शहारे येई
तो बोलावतो का कोणे
साद पल्याड ऐकू येई
तप्त धरणी आणि राने
नकोशी कामावरची घाई
वाटे झुलून हिंदोळ्याने
थंड झुळूक शांतता देई
पळस – बहाव्याचे सोने
पानपानांवर बहरत जाई
गूढ ग्रीष्म ऋतूचे येणे
रानफळांची रेलचेल होई
या सृष्टीचे सुंदर लेणे
लेऊन सजली आमराई
विसावू थोडं सावलीने
माय सृष्टीची होऊ उतराई!!
— वर्षा कदम.
Leave a Reply