नवीन लेखन...

प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक व कुशल धन्वंतरी भाऊ दाजी लाड

जन्म. ७ सप्टेंबर १८२२ गोव्यातील मांजरे या गावी.

त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. त्यांच्या वडिलांना दाजी म्हणत. भाऊ दाजी लाड मित्र परिवारात ‘भाऊ’ या नावाने परिचित होते. त्यामुळे पुढे ‘भाऊ दाजी’ हे नाव रूढ झाले. त्यांचे वडील पार्से (गोवा) येथे शेती तसंच कारकुनीचे काम करायचे. व्यवसायानिमित्त १८३२ मध्ये लाड कुटुंब मुंबईला गेले. तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करून विकत असत. भाऊ दाजींचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. पुढे एल्फिन्स्टन विद्यालय व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. खासगीरीत्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती झाली. या सुमारास त्यांचा पार्वतीबाई या मुलीबरोबर विवाह झाला. त्यांना विठ्ठल व द्वारकानाथ हे दोन मुलगे होते. द्वारकानाथ याचे तारुण्यातच निधन पावला. वडिलांनी संन्यास घेऊन एलिफंटा (घारापुरी) येथे वास्तव्य केले.

भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला. निबंधस्पध्रेत त्यांना ६०० रुपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उधृत केला आहे. मुंबईत १८४५ मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. तेव्हा भाऊंनी शिक्षकाची नोकरी सोडून त्यात नाव घातले. फॅरिश शिष्यवृत्ती मिळवली आणि वैद्यकशास्त्रात पदवी घेतली (१८५१). कॉलेजमध्ये असताना त्यांनी ग्रंथपालाचेही काम केले. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अचूक निदान व शस्त्रक्रियेतील हातोटी (कौशल्य) यांमुळे त्यांना लोकप्रियता लाभली व पैसाही मिळू लागला. त्यांनी कुष्ठरोगावर खष्ठ नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून तयार केलेले एक देशी औषध शोधून काढले. पुढे दादाभाई नैरोजींनी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था काढली. तिच्या मुंबई शाखेचे भाऊ अध्यक्ष झाले. सामाजिक सुधारणांबरोबर त्यांनी औद्योगिक सुधारणांकडेही लक्ष दिले. मुंबईत कागद व कापूस यांच्या गिरण्या काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला. १८५४ मध्ये ते वेस्टर्न इंडियन कॅनल अँड इरिगेशन या कंपनीचे संचालक झाले.

जुन्या रूढी व परंपरा यांना डावलून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अनेक वर्षे आर्थिक झीज सोसली. स्त्रियांना शिक्षण देणा-या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होते. या संस्थेतर्फे मुलींच्या तीन शाळा चालवल्या जात. विधवा विवाहाच्या चळवळीलाही त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. लोहार चाळीतील कन्याशाळेला ते दरमहा आर्थिक साहाय्य देत. याच शाळेला पुढे ‘भाऊ दाजी गर्ल्स स्कूल’ हे नाव देण्यात आले. जातीव्यवस्थेचे निर्मूलन करावे आणि अंधश्रद्धेला फाटा द्यावा या मताचे ते होते. त्यांचे सार्वजनिक कार्य लक्षात घेऊन सरकारने त्यांची शेरीफ पदावर नियुक्ती केली. वनस्पती व प्राचीन इतिहास यांच्या संशोधनात त्यांनी विशेष लक्ष घातले. राणी बाग (जिजामाता बाग), अल्बर्ट म्युझियम, नेटिव्ह जनरल लायब्ररी, पेटीट इन्स्टिटय़ूट इ. संस्था स्थापन करण्यात ते अग्रेसर होते. जिजामाता बागेत त्यांच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालयही उभारले आहे. कारण ही वास्तू उभारण्यासाठी त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली होती. त्यांच्या या योगदानाची दखल म्हणून त्या संग्रहालयाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मीळ चित्रं, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. मुकुंदराज, हेमाद्री, हेमचंद्र इ. व्यक्तींचे तसेच कालिदासांचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यावरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते. माक्स म्युलर व रा. गो. भांडारकर यांनी या शोधनिबंधांविषयी गौरवोउद्गार काढले आहेत. कालिदासाचे कुमारसंभव व मेरुतुंगाचार्याचा प्रबंध, चिंतामणी हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. तथापि त्यांनी लिहिलेला एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. त्यांच्या मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिद्ध केले. तसेच रायटिंग्ज अँड स्पिचिस ऑफ डॉ. भाऊ दाजी या शीर्षकाने त्र्यं. गो. माईणकर यांनी त्यांचे समग्र लेखन संपादित करून प्रसिद्ध केले. मुंबईचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या भाऊ दाजी संग्रहालयाची ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने घेतली होती. पर्यटकांच्या दृष्टीने मुंबईमधील महत्त्वाच्या ठिकाणांच्या यादीमध्ये पहिल्या पाचमध्ये डॉ. भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाचा समावेश न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे. भाऊ दाजी लाड यांच्या स्मरणार्थ संस्कृत विषयात बी. ए. ला पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांला भाऊ दाजी हे पारितोषिक देण्यात येते.

भाऊ दाजी लाड यांचे ३१ मे १८७४ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..