ओसरून जाई लाट
भव्य जरी कलकलाट
धरावी लागते वाट
संयमाची!!
अर्थ–
सुख आपण काही काळचं लक्षात ठेवतो पण, दुःख मात्र अनंतकाळ चघळत बसतो. काय हे किती संकटं येतायत नुसती एका मागून एक सुरूच आहेत. कसा निभाव लागायचा देवास ठाऊक आता. हे देवा तूच सांभाळून घे रे आता. अशा विनवण्या आपण सतत करत रहातो. पण जर कुणी सांगितले की, संयम ठेव होईल सगळं व्यवस्थित, थोडा वेळ दे परिस्थिती नीट व्हायला. तर त्यावर मनुष्याचे उत्तर ठरलेले असते, अरे काय संयम ठेव, तुला काय माहिती माझ्यावर काय वेळ आल्ये.
जर खरंच संयम ठेवला तर उत्तर तर मिळतेच पण त्याचबरोबर दिसणारा त्रास हा नक्कीच कमी होऊ शकतो.
समुद्रात उसळणारी प्रत्येक लाट काही किनाऱ्या पर्यंत पोचत नाही. त्यासाठी लाटांना सुद्धा बराच प्रवास करावा लागतो. त्यामुळे किनाऱ्यावर येणारी लाट ही शांत होण्यासाठी आलेली असते. ती काही किनाऱ्यालगत येऊन अचानक उसळी मारत नाही.
तसेच संकटं खरंच आपल्यावर आले आहे का? की कुणा दुसऱ्याचे आपण ओढावून घेतोय? आकांडतांडव करण्यापेक्षा थोडं संयमाने वागलं तर संकट आपल्या गळ्या पर्यंत येण्याऐवजी पायापाशी येऊन निवळू शकते का? हा विचार करायला वेळ मिळेल. प्रत्येक लाट ही सुनामीच आहे असा जर समज करून घेतला तर मच्छीमार सुद्धा शहरात नोकरी करायला येईल.
म्हणून, आधी विचारात संयम असावा, मग तो क्रियेत यावा, असा दृढनिश्चय करावा, विजय मिळतो!!
— सुमंत परचुरे.
Leave a Reply