भाषा हे अनादिकाळापासून चालत आलेलं संपर्क माध्यम. जगातल्या प्रत्येक जमातीची स्वतःची भाषा असते. काही जमातींची एकच कॉमन भाषा असते. देशानुसार भाषा बदलते तशी राज्यानुसारही बदलते आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात तर वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी बोली भाषा ऐकायला मिळते.
मराठीच्याच बोली भाषा म्हणजे कोकणी, खानदेशी, वर्हाडी, घाटावरची, मुंबईची, पुणेरी वगैरे.
थोडं मुंबई, महाराष्ट्र आणि त्याही पलिकडे जाउन बघू.
जगात जवळपास ७००० भाषा आहेत असं म्हटलं जातं. त्यातल्या बर्याच भाषा नष्ट होतायत किंवा त्या मार्गावर आहेत. काही भाषा बोलणारी तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच मंडळी आहेत.
याच पार्श्वभूमीवर थोडी शोधाशोध केली तेव्हा लक्षात आलं की मराठी माणूस जगातल्या किमान ५० देशांमध्ये जाउन पोहोचलेला आहे. त्यामुळे तिथे तो मराठी भाषेत बोलत असणारच. इतरांशी नाही तरी घरात तर नक्किच. मग मराठी संपतेय वगैरे बोलणार्यांसाठी थोडी मोलाची माहिती बघा….
इंग्रजी भाषा जगातील ५७ देशांत बोलली जाते. फ्रेंच ३३ देशांत, अरबी २३ देशांत, तर स्पॅनिश २१ देशांत बोलली जाते. या देशांमधल्या त्या अधिकृत भाषा तर नसणार म्हणजे केवळ बोली भाषाच.
मग ५० देशांमध्ये बोलली जाणारी मराठी संपतेय कशी? मराठीला संपवायचं तर हे राजकारण नसेल? कारण हे असं बोलणार्यांची पोरंबाळं टाय लावून इंग्रजी शाळेत जाताना आपण बघतो.
थोडा विचार जरुर करायला हवा…..
मराठी भाषेसाठी आता शासनाने नवं – कोरं भाषा धोरण आखलंय. त्याचा मसूदा सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विनोदाचा भाग असा की यातील सगळ्या सूचना महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत अमलात आणायला शासनाला कोणी अडवलं होतं का असा प्रश्न पडतोय. जे कायद्यात आणि नियमात आहे तेसुद्धा करायची टाळाटाळ केली सरकारने. त्यावर पुन्हा कधीतरी लिहायलाच हवंय.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत म्हणे. मुळात महाराष्ट्रात मराठीला मानाचं स्थान मिळूवून द्या, अभिजात वगैरेच्या गप्पा नंतर मारुया.
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply