स्वयंपाक घर म्हटल्यावर खरं तर ते आरशाप्रमाणे स्वच्छ आणि चकचकीत असायला हवं कारण कुटुंबाचं आरोग्य सांभाळण्याचं महत्त्वाचे काम स्वयंपाकघरातच होत असते. प्रत्येक पदार्थाची निर्मिती इथूनच होत असते. तेव्हा सर्व घराबरोबर स्वयंपाक घराची आणि ओट्याची स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यासाठी काही किरकोळ गोष्टींकडे लक्ष दिल्यास स्वयंपाक घर आणि त्याची स्वामिनी दोन्ही नीटनेटके दिसू शकतात.
प्रसन्न स्वयंपाक घरात अन्नपूर्णेचे अस्तित्व नसणार तर कोणाचे? स्वयंपाक घराची खरी -ओळख म्हणजे त्या घरातील स्त्री. स्त्रीकडे बघून स्वयंपाकघराची ओळख पटते.
गोष्टी साध्याच असतात पण कामाच्या धावपळीत लक्षात येत नाहीत.
कधी कधी असं होतं आपण भाजी चिरत असतो. टोमॅटोसारख्या भाजीने हात ओले होतात. रस हाताला लागतो. त्यावेळेस लक्षात येतं भाजी फोडणीला टाकली आहे, पण डाव घेतलेला नाही. मग त्या रसाच्याच हाताने ट्रॉलीचा ड्रॉव्हर उघडून आपण डाव काढतो किंवा कपाटाची दारं, फ्रीजचे दार आपण उघडतो. घाईत लक्षात येत नाही पण टोमॅटोच्या रसाची चिन्हे आपलं अस्तित्व तेथे ठेवतात. लगेच पुसायला वेळ नसतो. मग असेच काही तरी आणखी थरावर थर वाढत जातात. जे नंतर स्वच्छ करणं वेळखाऊ असते.
सुरुवातीलाच टोमॅटोचे हात क्षणभर सिंकच्या नळाखाली धरून जवळच्या टॉवेलला पुसून ड्रॉव्हर उघडला तर दोन क्षणच वेळ लागतो पण ड्रॉव्हर्स, कपाटाची दारं मुळात स्वच्छ राहून पुढचा सफाईचा वेळ वाचतो.
पदार्थाने चिकट झालेले किंवा खरकटे असलेले हात न धूता कपाटांच्या दारांना ड्रॉव्हर्सना लागले तर दारांवर ते डाग वाईट तर दिसतातच शिवाय सफाईचं काम वाढतं ते वेगळंच.
– सौ निलीमा प्रधान
क्रमश:
Leave a Reply