नवीन लेखन...

ओवाळूं आरती : भाग – ४/५

भाग

अवतारकल्पना हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्याचें प्रतिबिंब आरत्यांमध्येही दिसतें. ‘दशावतारांची आरती’ तर आपल्याला दिसतेच, पण इतर आरत्यांमध्येही अवतारांचा उल्लेख येतो. ज्ञानदेवांच्या आरतीत ‘अवतार पांडुरंग’ असा उल्लेख आहे, तसाच तो नामदेवांच्या आरतीतही आहे (‘पांडुरंगे अवतार’). रामदासांच्या आरतीत, शंकर-मारुती-रामदास असा अवतारांचा उल्लेख आहे,   ‘साक्षात शंकराचा अवतार मारुती । कलिमाजी तेचि जाली । रामदासाची  मूर्ती ।’. खंडोबाच्या आरतीत, ‘… शंकर हृदयीं निवाला । तो हा मल्लतिक अवतार झाला ।’ असे शब्द  आहेत. दत्ताच्या आरतीत, ‘त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा’ अशा शब्दांचा समावेश आहे . ( दत्त हा, ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तीचें रूप आहे, असें मानलें जातें ). शिरडीच्या साईबाबांच्या आरतीत, ‘कलियुगीं अवतार’ हे शब्द समाविष्ट आहेत. साईबाबांना त्यांचे भक्त दत्ताचा अवतार मानतात, याचा उल्लेख आपण आधी केलेलाच आहे. नवनाथांच्या आरतीत ‘नवनारायण अवतार नवनाथ संत ।’ असा निर्देश आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ दत्तपंथी आहेत, त्यांच्या आरतीत, ‘त्रैगुण-परब्रह्म तुझा अवतार’ असा उल्लेख आहे. पावसच्या स्वरूपानंद स्वामींच्या आरतीमध्ये,     ‘… दत्तगुरूंनी फल दिधलें थोर । तुझिया वंशीं अंश आमुचा येइल जन्मासी’ असा अवतार-निर्देश आहे. नृसिंह सरस्वतींच्या आरतीत, ‘विश्वरूपें तया (भक्तश्रेष्ठ त्रिविक्रम यति याला) दिधलें दर्शन’ असे शब्द आहेत. नृसिंह सरस्वती हे दत्तपंथीय आहेत. मात्र, ‘विश्वरूपदर्शन’ या उल्लेखावरून, भगवद्.गीतेमधील श्रीकृष्णानें दिलेल्या ‘विश्वरूपदर्शना‘चा संदर्भ स्पष्ट दिसतो. गीतेतील, ‘संभवामि युगे युगे’ या शब्दांमध्ये ‘अवतार-कल्पना’च अनुस्यूत आहे. त्यामुळे, नृसिंह सरस्वतींवरील आरतीतही ‘अवतार-कल्पने’चा अंतर्भाव अध्याहृत आहेच.

कोणत्या वेळी आरती म्हणायची, आरतीला कुठली मुख्य वस्तू (जसें, दीपक, कापूर वगैरे) वापरायची, अशा गोष्टींवरून  आरत्यांना विविध नांवें आहेत, जसें कांकड-आरती, शेजारती, धूपारती, दीपारती, नैवेद्यारती, कर्पूरारती, निरांजनारती, वगैरे.

प्रत्येक आरती-कार्यक्रमात, कांहीं आरत्या त्याच (same) म्हटल्या जातात, तर कांहीं भिन्नही असतात. तसेंच, जेव्हां जेव्हां आरतीचा कार्यक्रम होतो, तेव्हां साधारणपणें विविध आराध्यांच्या आरत्या म्हटल्या जातात.

आरती ही मोठ्याने (loudly) म्हणण्याचीच गोष्ट आहे, आणि शक्यतो सामुहिकपणें. या मोठ्यानें म्हटल्यामुळे, तसेंच सामुहिकरीत्या म्हटल्यामुळे,  ‘नादगर्जन’ घुमतें (resonating sound), व त्याचा श्रद्धाळू मनांवर सकारात्मक परिणाम होतो.

मराठी आरत्यांच्या साधारणपणें चार-सहा चाली आहेत, त्यांवरच आरत्या रचल्या व म्हटल्या जातात. त्यातही, कांहीं चाली जास्त लोकप्रिय आहेत, व त्या विशिष्ट चालीवर रचलेल्या बर्‍याच आरत्या आढळतात. जसें की, ‘दुर्गे दुर्गट भारी’ ही महिषासुरमर्दिनीची आरती ; ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही गणपतीची आरती ; ‘लवथवती विक्राळा’ ही शंकराची आरती ; ‘युगें अठ्ठावीस विटेवरी उभा’ ही विठ्ठलाची आरती ; अशा अनेक आरत्यांची मूळ चाल एकच आहे.  हिंदी आरत्यांची चाल मराठीपेक्षा भिन्न  असते (जसें, हिदी आरती.  ‘ॐ जय जगदीश हरे’, ही हिंदी आरत्यांची एक लोकप्रिय चाल. बर्‍याच हिंदी आरत्या याच चालीवरच्या असतात).

मात्र, भाषा कुठलीही असो, चाल कुठलीही असो, आरतीतील भक्ती तीच, आणि मनांवर परिणाम तोच असतो.

आरतीनंतर भजन / प्रार्थना , व  देवे/ मंत्रपुष्पांजली असते. या ‘प्रार्थने’तील कांहीं भाग मराठी तर कांहीं संस्कृत आहे. ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ हें पद मराठीत आहे, पण प्रार्थनेतील पुढील भाग ‘त्यमेव माताच पिता त्वमेव’ वगैरेपासून ते ‘हरे राम हरे राम’ पर्यंत भाग संस्कृतमध्ये आहे. ‘मंत्रपुष्पांजली’  (‘देवे’) हा भाग नुसता संस्कृतमध्ये आहे असें नाहीं, तर त्यात पुरातनकालीन संदर्भही आहेत. मंत्रपुष्पांजलीची सुरुवातच अशी होते –  ‘ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवा: ….’ .  आपल्याला माहीत आहे की, वैदिककालीन यज्ञसंस्कृतीचा लोप, रामायण-महाभारतकालानंतर, म्हणजे प्रागैतिहासिक काळींच झालेला आहे. म्हणजेच, मंत्रपुष्पांजलीतील या उल्लेखाचा संदर्भ अति-पुरातनकालीन आहे. मंत्रपुष्पांजलीमध्ये, नंतर, ‘कुबेर’ या दैवताला नमन आहे. कुबेराचा उल्लेखही ‘दैवत’ म्हणून गेल्या बर्‍याच शतकांमध्ये झालेला नाहीं. पुरातन काळातील, व त्यातल्या-त्यात-नंतरच्या-काळातील, उल्लेख पहायचा तर, आपल्याला हा कुबेराचा उल्लेख श्रीरामचंद्राच्या काळात, रावणाच्या संदर्भात दिसतो, आणि तिथेंही तो उल्लेख  ‘तारीफ़ेक़ाबिल’ (praiseworthy) नाहीं, कारण, ‘रावणानें कुबेराला त्याच्या राजधानीतून हुसकून लावलें’ असा तो उल्लेख आहे.  मंत्रपुष्पांजलीमधली पुढली एक ओळ पण पुरातनकाळाची द्योतक आहे. तिच्यात,  ‘ॐ स्वस्ति साम्राज्यम्,भौज्यम्, स्वाराज्यम्, वैराज्यम्, पारमेष्ठ्यम्, राज्यम्’ असा उल्लेख आहे. कौटल्याच्या (कौटिल्याच्या) ‘अर्थशास्त्रा’त ज्या वेगवेगळधया प्रकारच्या राज्यांचा उल्लेख आहे, त्यातील कांही नांवे या, मंत्रपुष्पांजलीतील वाक्यात समाविष्ट आहेत. अशी राज्यें कौटल्यापूर्व काळात, व कौटल्याच्या काळात, अस्तित्वात होती.

याचा आपण कदाचित असा अर्थ काढूं शकूं की, पूर्वी ( जुन्या काळीं ) या अर्चनेतील फक्त  संस्कृत भागच  म्हटला जात असावा ; आणि नंतर, काळानुसार मराठी भागही त्या अर्चनेत जोडला गेला (add झाला) असावा. आरत्या तर मध्ययुगीन आहेत, हें आपण पाहिलेंच आहे. त्यामुळे, असा निष्कर्ष काढायला हरकत नाहीं की, आरत्यांनंतर म्हणायचा, ‘प्रार्थना’ व ‘मंत्रपुष्पांजली’ हा जो संस्कृत भाग आहे, केवळ तोच, पूर्वीच्या काळीं अर्चनेचा मूळ गाभा  असावा.

(पुढे चालू )

 

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

सांताक्रुझ (प), मुंबई.  Santacruz (W), Mumbai.

Ph-Res-(022)-26105365.  M – 9869002126

eMail   : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

 

 

लेखकाचे नाव :
सुभाष स. नाईक
लेखकाचा ई-मेल :
vistainfin@yahoo.co.in
सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..