नवीन लेखन...

‘जनकवी’ पी. सावळाराम

कल्पवृक्ष कन्येसाठी, गंगा यमुना डोळ्यात उभ्या कां?, लिंबलोण उतरता, जिथे सागरा धरणी मिळते, सप्तपदी ही रोज चालते, रिमझिम पाउस पडे सारखा, घट डोईवर, अशा एकसे एक सुंदर गाण्यांचे जनक म्हणजे नामवंत गीतकार म्हणजे कवी पी. सावळाराम. त्यांचा जन्म ४ जुलै १९१४  रोजी झाला.

पी.सावळाराम यांचे खरे नाव निवृत्ती रावजी पाटील. पी.सावळाराम यांना शालेय वयापासूनच काव्याची गोडी लागली होती. पुढे ते शिक्षणासाठी सांगलीला महाविद्यालयात दाखल झाले, तेथे त्यांना तिथे शिक्षक लाभले, ते थोर कवी माधव ज्युलियन म्हणजेच प्रोफेसर माधवराव पटवर्धन तेथेच ह्या सर्जनशील मनाच्या पी.सावळाराम यांची काव्यकळा फुलू लागली. त्यांच्या संपर्कात ते आले, तेव्हा त्यांनी ‘सौंदर्य नसते रंगात। सौंदर्य असते अंतरंगात। उघडुनि पाही।’ या ओळी असलेली ‘काळा गुलाब’ शीर्षकाची कविता लिहिली. ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णाने काळी, परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती.

पी.सावळारामांपाशी विलक्षण प्रतिभा होती. पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. महाविद्यालयीन शिक्षण झालेले निवृत्ती पाटील, ठाणे येथे रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. काव्याची उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हती. एच. एम.व्ही. कंपनीच्या वसंत कामेरकरांनी पाटलांना संधी दिली आणि ह्या पी.सावळाराम यांची गट्टी जमली ती संगीतकार वसंत प्रभू ह्यांच्याशी. त्यांची पहिली दोन गाणी प्रसिद्ध झाली, निवृत्ती पाटील ह्या नावाने, पण त्याचवेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर निवृत्ती पाटील नावाचेच बासरीवादक कलाकार होते, ह्या नामसाधर्म्यातुन त्यांना बाहेर यायचे होते, त्यावेळी पी. सावळाराम ह्यांचे एक मित्र उपयोगाला आले. ते मित्र होते, विधानसभेचे माजी अध्यक्ष वि. स. पागे होय. तर ह्या पागे यांना, ह. ना. आपटे ह्यांच्या त्यावेळी गाजत असलेल्या, “उषःकाल” ह्या कादंबरीमधील “सावळ्या” ह्या व्यक्तिरेखेने भारावून टाकले होते. पागे ह्यांना, आपला मित्र निवृत्ती पाटील ह्याच्या व्यक्तिरेखेत ह्या “सावळ्या”चे साधर्म्य जाणवायचे. ते निवृत्ती पाटील ह्यांना “सावळ्या” नावाने हाकारायचे. झाले. अशा रीतीने निवृत्ती पाटील ह्यांनी आपले “पी.सावळाराम” हे नाव धारण केले.

पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. १९४९ साली ‘राघु बोले मैनेच्या कानात ग’ हे पहिले गीत त्यांनी लिहिले. वसंत प्रभू, माधव शिंदे व दिनकर पाटील हे त्यांचे स्नेही होते. मराठी चित्रपटांचा तो ऐन बहराचा काळ होता. जिथे चित्रपटगृहे होती, तिथे प्रदर्शित होणाऱ्या बऱ्याच चित्रपटांतून पी. सावळारामांची गाणी असायची. सर्वसामान्य लोकांपर्यंत ती अशी थेटपणे पोहोचली होती. परंतु पी. सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह फार उशिरा म्हणजे १९९१ साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. पण त्याआधी कित्येक वर्षे तुकारामांच्या अभंगांप्रमाणे सावळारामांची गीते लोकांच्या मनात आणि कंठात कायमची बसली होती. त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. १९६४-६५ साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. येऊर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टमसंबंधी त्यांनी विशेषत्वाने लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेल्या. शिक्षकांच्या पगारात त्यांच्याच काळात वाढ झाली. ६३-६४ साली ते शिक्षण समितीचे सभासदही राहिले. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेत इतरांबरोबर त्यांचाही सहभाग होता. त्यांच्याप्रतीच्या कृतज्ञतेने या कॉलेजने ‘पी. सावळाराम गौरवग्रंथ’ प्रकाशित केला.

पी. सावळाराम यांची गीते अशी लोकमानसात त्यांचा ठेवा म्हणून स्थिरावली आहेत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या अभंग व ओव्यांना हे भाग्य लाभले होते. अलीकडल्या काळात ग. दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने कवी पी. सावळाराम यांना ते लाभले. या अर्थाने ते ‘जनकवी’ आहेत.

‘गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गीतातील भावना लग्न होऊन सासरी जाणाऱ्या कुणाही मुलीच्या आईच्या आहेत. आपल्याला दुरावणार म्हटल्यावर होणारे दु:ख अतिशय अल्पाक्षरी, पण अर्थपूर्ण शब्दांत त्यांनी साक्षात् उभे केले आहे. म्हणूनच त्यातली भावना कुणा एका ‘क्ष’ आईची न उरता कुणाही आईची असू शकते. त्यांच्या गीताच्या या सामर्थ्यांमुळेच ते महाराष्ट्रात अजरामर झाले आहेत.

‘ज्ञानदेव बाळ माझा’, ‘विठ्ठल तो आला आला’ व ‘सखू आली पंढरपुरा’ ही गीते. ती लोकभाषेला सहजपणे जवळ जाणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिपणारी आहे. पण त्याचबरोबर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो, तिथे नायिकेची प्रेमासंबंधातली जी धिटाई असते ती ते नेमक्या शब्दांमध्ये टिपतात. उदाहरणार्थ, ‘काल रातीला सपान पडलं’ किंवा ‘तुला बघून पदर माझा पडला’ या त्यांच्या लावण्या पाहाव्यात.

सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. मा.पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे..‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे. सावळारामांनी गद्यलेखनही केले. आकाशवाणीच्या ‘कामगार सभे’साठी ‘सहज सुचलं म्हणून’ कार्यक्रमात त्यांनी संहितालेखन केले.

‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटाचे लेखन, ‘माणसा आधी हो माणूस’ व ‘मंगल कलश’ हे लघुपट व एस. टी.वर ‘सारे प्रवासी घडीचे’ हे वार्तापत्र त्यांनी लिहिले. याशिवाय त्यांनी ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘नांदायला जाते’, ‘कन्यादान’, ‘सलामी’ आणि ‘बेरडाची अवलाद’ या चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. १९८२ सालच्या ‘गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मा.पी. सावळाराम यांचे २१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..