नवीन लेखन...

गृहनिर्माणातील पागडी संस्कृती

‘पागडी’ हा शब्द घरासंदर्भात वापरला जातो. मुंबईकरांच्या अतियंत जिव्हाळ्याचा असलेला हा शब्द, हल्लीच्या पुनर्विकास आणि त्यातून मिळणाऱ्या ओनरशिप घरांच्या काळात हळुहळू विस्मृतीत चाललाय. पण एकेकाळी मुंबईत कुठेही घर घ्यायचे असलं, की ते पागडीनेच मिळायचं. आजची वैभवशाली मुंबई घडवलीय, ती अशाच पागडीच्या घरात राहून कष्ट करणाऱ्या मुंबईकरांना. या अर्थाने ‘पागडी’ या शब्दाशिवाय मुंबईचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.

‘पागडी’ची घरं म्हणजे सोप्या शब्दांत सांगायचं तर भाड्याने घेतलेलं घर. घर मालक किंवा चाळमालक कुणीतरी एक असायचा व तो गरजुंना त्याच्या मालकीच्या जागेवरची किंवा चाळीतली घरं भाड्याने द्यायचा. मालक कायम असायचा, भाडेकरू बदलत असायचे. तेंव्हा मालकीची घरं ही संकल्पना नसायची, कारण त्या काळात मुंबईत माणसं यायची, ती फक्त रोजगारापुरती. ती ही बहुतेक सर्व एकटी. कुटुंबं गांवाकडेच असायची. दिवसभर गिरणीत नाही तर गोदीत राबायचं आणि रात्री पाठ टेकायला घरी यायचं. महिन्याचा पगार झाला, की आपल्या खर्चापुरते पैसे बाजुला काढून उर्वरीत सर्व रक्कम कोकणातल्या किंवा घाटावरच्या गावातल्या आपल्या कुटुंबाकडे मनीआॅर्डरने पाठवून द्यायची, हा बहुतेकांचा जीवनक्रम.

रिटायर झालं की आपल्या गांवी परत जायचं, आपण काही मुंबईचे कायमचे रहिवासी नव्हेत, या उद्देशाने त्याकाळचे बहुतेकजण मुंबईत नोकरी करत असल्याने, त्यांना मुंबईत स्वत:च्या मालकीचं घरं नको असायचं आणि त्यामुळेच पागडीच्या घरात राहायचं, अशी सर्व व्यवस्था असे. सरकारी फाॅर्म्सवरही याच उद्देशाने ‘सध्याचा पत्ता’ आणि ‘कायमचा पत्ता’ असे दोन स्वतंत्र रकाने पत्त्यांसाठी असत, ते याच मतलबाने. अजुनही हे रकाने असेच असलेले पाहायला मिळतात.

या सर्व नोकरदारांना चाकरमानी म्हणायचे. पण मुंबंई हा असा एक पिंजरा आहे, की ज्यात एकदा आत शिरलेला माणूस बाहेर म्हणून काही पडू शकायचा नाही. आपल्याला काही या पिंजऱ्यातून बाहेर पडायला जमत नाही हे लंक्षात आल्यावर, मग जमेल तसं आपलं कुटुंबही मुंबईत आणायचं आणि मुंबईत पागडीच्या घरात राहून कायमचं मुंबईकर व्हायचं, असा जणू त्याकाळच्या लोकांचा शिरस्ताच झाला होता..!

मी ही असाच अंधेरीच्या एका बैठ्या चाळीतील पागडीच्या खोलीत राहायचो. तेंव्हा ‘घरं’ नसायची, ‘खोल्या’ असायच्या, पण त्यांना लांबी-रुंदी व खोलीही फारशी नसायची. वडील नोकरी करायचे व त्यांनी ही खोली पागडीने घेतलेली होती. ४ हजार रुपये पागडी आणि १०-१२ रुपये महिन्याचं भाडं. ‘पागडी’ हा शब्द तेंव्हापासूनच माझ्या कानावरुन गेला होता व मला त्याचं कुतुहलही वाटायचं. पुढे जरा कळता झाल्यावर ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय असावा, हा विचार मनात यायचा, परंतु तो तेवढ्यापुरताच. पुढे जीवनचक्रात अडकल्यावर ह्या शब्दाचा विचार थोडा मागे पडला, तरी विस्मृतीत गेला नव्हता. अधुन-मधून कारणपरत्वे हा शब्द माझ्यासमोर येऊन मला त्रास द्यायचा. मी ही अनेकांना विचारुन, पुस्तकांतून, शब्दकोशांतून शोधुनही मला त्याचा मला पटेल असा अर्थ काही सापडत नव्हता..!

असंच एकदा मुंबईवरील जुनी पुस्तकं वाचताना, ‘पागडी’ हा शब्द कुठून आला असेल याचा मला एक धागा सापडला. माझ्या मनाने कौल दिला, की इथेच पागडी या शब्दाचा जन्म झाला. हा धागा सोळाव्या शतकात मुंबईत अस्तित्वात असलेल्या पोर्तुगीज सत्तेच्या व नंतरच्या ब्रिटिश ईस्ट इंडीया कंपनीच्या चलनाकडे ‘पागडी’चा जन्मदाता म्हणून बोट दाखवतो. ‘पागडी’ शब्द कसा अस्तित्वात आला असावा, हे समजण्यासाठी आपल्याला प्रथम पोर्तुगीज व नंतरच्या ब्रिटिश भारतातील चलनाचा धावता आढावा घ्यावा लागणार हे ओघानेच येतं.

इसवी सन १५३० पासून पोर्तुगीजांचा अंमल मुंबईवर सुरु झाला होता. पण पोर्तुगीजांचं मुख्य ठाणं होतं वसई आणि मुंबई हा भाग त्याच्या दृष्टीने दुय्यम होता. तशी ही बेटं होतीही ओसाड. म्हणून मुंबईतल्या जमीनी पोर्तुगीज शासन कर्त्यांनी त्यांच्या देशातल्या बड्या लोकांना भाडेपट्ट्यांने दिल्या होत्या. अशा लोकातलाच एक होता मेस्टी डायगो (Meste Diago-काही ठिकाणी हे नांव Mestre Diago असंही नोंदवल्याचं दिसतं. त्यातील Mestre किंवा Meste हे इंग्रजी Mister सारखं संबोधन असावं आणि डायगो हे नांव असावं). ह्या डायगोला दिलेल्या जमीनीचं भाडं होतं वर्षाला १४३२.५ पारडो(Pardaos). पोर्तुगीज़ अंमलाखाली असलेल्या पश्चिम किनार्याच्या भागात १६व्या शतकात, Fedea-Fuddea, Tanga, Pardao इत्यादी नावाची नाणी वापरात होती. Fedea हे सर्वात लहान चलन. ह्याचाच मराठी अपभ्रंश पुढे ‘फद्या’ असा झाला. फद्या हा शब्द माझ्या वयाच्या लोकांनी लहानपणी कुठे न कुठे ऐकला असेल, त्याचा उगम अशा रितीने पोर्तुगीज काळातील चलनात सापडतो. ‘फद्या’ हे पोर्तुगीजकाळातील दुय्यम चलन असल्याने, हा शब्द एखाद्याच्या कमकुवतपणाची टिंगल करण्यासाठी देखील वापरला जातो.

‘Fedea’च्या थोडं वरच्या दर्जाचं चलन म्हणजे ‘Tanga’ किंवा ‘Tanka’. ह्याचा मराठीतला उच्चार साधारण ‘टांगा’ किंवा ‘टॅंगा’ किंवा ‘टंका’ असा होतो. हाच शब्द पुढे अपभ्रंशीत होऊन ‘टका’ किंवा ‘टका’ म्हणून रुढ झाला. (संजय पवारांचं एक नाटक होतं, ‘कोण म्हणतो टका दिला’ या नांवाचं. त्यातला ‘टका’ बहुतेक हाच असावा. मराठीतला ‘टक्का’ किंवा ‘टक्के’ हा प्रतिशत या अर्थाचा शब्दही बहुतेक याच्याच पोटातून जन्मला असावा, कारण हे चलन पोर्तुगीजांच्या काही काळ अगोदर गुजरातेत प्रचलीत होतं व याची किंमत साधारणत: नंतरच्या काळातल्या रुपयांचा एक भाग, म्हणजे १/१०० एवढी होती.). चार fedea म्हणजे एक tanka आणि पांच ‘टका’ म्हणजे पोर्तुगीज चलनातला एक ‘पारडो (Pardao)’ किंवा २० fedea म्हणजे एक pardao असंही म्हणता येईल.

मुंबई बेटांवरील पोर्तगीजांची सत्ता १६६१ साली संपुष्टात येऊन, सन १६६५ पासून ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीची सत्ता मुंबई बेटांवर आली. तत्पूर्वी ईस्ट इंडीया कंपनीचं अस्तीत्व दक्षिणेतल्या राज्यांमधे होतं आणि दक्षिणेत असलेल्या भारतीय राजसत्तांचं काही चलन ब्रिटीशही वापरत असत.

ईस्ट इंडीया कंपनीची मुंबईवर सत्ता आल्यावर काही पोर्तुगीज मुंबईत वास्तव्याला होते. त्यांना पोर्तुगीज राज्यकर्त्यांकडून लिजवर मिळालेल्या जमीनीही त्यांच्या ताब्यात होत्या. फक्त आता त्यांना ईस्ट इंडीया कंपनीला त्यांच्या चलनात भाडं द्यावं लागत असे. आणि त्या पैकी एक चलन होतं Pagoda. दक्षिणेतल्या मद्रास प्रांतातलं हे चलन, १७ व्या शतकाच्या मध्यावर मुंबईतही अस्तित्वत होतं, असं अनुमान ‘मुंबईचा वृत्तांत’ ह्या पुस्तकातल्या माहितीवरून काढता येतं. पोर्तुगीज चलनातले साधारणत: ३.५ पारडो म्हणजे ब्रिटीश काळातील १ पॅगोडा, अशी याची किंमत होती.

ज्या पोर्तुगीजांना, पोर्तुगीज मुंबईत ‘पाराडो’मधे जमीनीचं भाडं भरावं लागत हथं, त्या पोर्तुगीजांना आता ब्रिटीश मुंबईत ‘पॅगोडा’मधे जमीनीचं भाडं भरावं लागत होतं. जमीन अमुक अमुक ‘पॅगोडा’ भाड्याने घेतली किंवा दिली, असं तेंव्हा बोली भाषेत बोललं जात असणं शक्य आहे. पुढे पुढे कालौघात, ‘भाड्याने’ हा शब्द लयाला जाऊन, जमीन ‘पॅगोडा’ने घेतली असं त्याचं रुपांतर झालं असाव. ‘भाडे’ या शब्दाला ‘पॅगोडा’ हा समानार्थ शब्द प्राप्त झाला असावा व पुढे तो ‘पागडी’ म्हणून स्थिर झाला असावा, असं अनुमान बांधलं तर चुकीचं ठरू नये, कारण ‘पागडी’ या शब्दाची समाधानकारक व्युत्पत्ती मला अद्याप कुठेही मिळालेली नाही.

पुढे पोर्तुगीज गेले, ब्रिटीशही गेले, त्यांची जुनी चलनंही गेली, पण त्याकाळातल्या ‘पॅगोडा’या चलनाचे अवशेष ‘पागडी’ या शब्दांच्या रुपात मागे उरले, असं माझं मत आहे. ’पागडी’ची जागा म्हणजे ‘भाड्या’ची जागा हा त्या काळातला अर्थ आजही बदललेला नाही.

— ©️नितीन साळुंखे
9321811091
13.03.2019

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा- लेखांक ३४ वा

संदर्भ\टिपा-

1. चलनाच्या विनिमयाचा दर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असतो. सबब, इथे दिलेला दर केवळ माहितीसाठी दिलेला आहे. त्या काळातली चलनं माहित असावी व त्यांचा एकमेकांशी कसा संबंध होता, हे दाखवण हा मर्यादित हेतू इथे आहे.

2. ज्यांना जुन्या काळातल्या चलनाबद्दल अधिक माहिती हवी आहे, त्यांनी http://www.aisiakshare.com/node/1068 या वेबसाईटवरील श्री. अरविंद कोल्हटकर यांचा दिनांक २४.०७.२०१२ रोजीचा लेख अवश्य वाचावा.

3. Pagoda या चलनाविषयी अधिकच्या माहितीसाठी https://en.m.wikipedia.org/wiki/Pagoda_(coin) या वेबसाईटला भेट देऊन, त्या साईटवर दिलेले संदर्भ अवश्य अभ्यासावेत.

4. Bombay in the msking (1661-1725)- लेखक फिरोज मलबारी.

5. मुंबईचा वृत्तांत- लेखक श्री. मोरो विनायक शिंगणे

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..