लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही म्हण हनुमंत केंद्रे यांनी प्रत्याक्षात आणली आहे.भगिरथाने प्रयत्नाने स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली हे आपण पुराणात ऐकले होते. पण दुष्काळी गावाला सुजलाम सुफलाम करण्याची किमया जलदूत म्हणून ओळखले जाणारे हनुमान केंद्रे यांनी केली आहे.दुष्काळ हा काही काही गावासाठी पाचवीला पुजलेला असतो, पण स्वप्नं बघण्याचा आशावादी दृष्टिकोन ठेवला तर काय होऊ शकते याचा वस्तुपाठ हनुमान केंद्रे यांनी सिद्ध करून दाखवला आहे. पाणी टंचाई मुळे गावकरी गांव सोडून जात असतांना गावातच राहून पाणी आणून लोकांना परत यायला भाग पाडणारे हनुमंत केंद्रे हे प्रेरणेचे स्तोत्र आहेत. होरपाळणाऱ्या दुष्काळाची ही गोष्ट आहे. पाणी आणण्याची आणि त्याच्या संघर्षाची कहाणी इतर दुष्काळग्रस्त गावांनीही अनुकरण करावी अशी आहे. यशोगाथा नुसत्या माहीत असून चालत नाही तर एखाद्या प्रेरणादायी व्यक्तिमत्व असेल तर लोकं त्या व्यक्तीची पायवाट चालायला लागतात. कुणीतरी घनदाट जंगलातून रस्ता शोधण्यासाठी धाडस करून चालणं आवश्यक असतं. पायवाट असल्याशिवाय काही माणसें पायच उचलत नाहीत. हनुमंत केंद्र यांनी लोकांना एकत्र करून श्रमदान आला प्रवृत्त करून पाणी गावामध्ये आणलं.
एखाद्या गावाचं स्वरूप बदलवून टाकणं आणि कायापालट करणे यासाठी भीष्मप्रतिज्ञाच आवश्यक असते.पाणी नाही म्हणून रडायचं नाही तर लढायचं हा संदेश देणारे हनुमंत केंद्रे. लोकांना एकत्र आणून श्रमदान करायला लावून गावात पाणी आणण्याचा निर्धार करणं आणि आधी पाणी आणि मग लग्न यावर ठाम राहुन गावाला पाण्या बाबतीत स्वयंपूर्ण करून जवळपासच्या१४ -१५गावाला ही पाणीपुरवठा करणारा प्रेरणादायी तरुण हनुमंत केंद्रे ज्याच्यावर पाणी हा चित्रपट तयार झाला आहे.
महाराष्ट्रातील पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीवर मराठवाड्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणाचा हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना जलदूत म्हणून ओळखतो. होणाऱ्या बायकोला आधी गावात पाणी आणणार आणि मगच लग्न करणार हा शब्द त्यांनी खरा करून दाखवला. पाण्याचा जो विषय आहे तो सगळ्यांनाच अस्वस्थ करणारा विषय आहे, सगळ्यांनीच या विषयाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. दुर्दैव असे आहे की पाण्याच्या टंचाईची झळ आत्तापर्यंत आपल्यापर्यंत म्हणजे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचली नाही .नांदेड जिल्ह्यातील नागदरवाडी या गावाचा तो एक साधा घराण्यातला माणूस आहे. नांदेड जिल्ह्यातलं नागदरवाडी हे गाव दुष्काळग्रस्त गावांपैकी एक गाव आहे. त्या गावात २००१ साली कोणी आपली मुलगी देत नव्हतं ,त्या गावातल्या मुलांचे लग्न होत नव्हते,कां?तर त्यांच्या गावात पाणीटंचाई आहे म्हणून, हनुमंत केंद्रे यांची सुवर्णा सोबत एंगेजमेंट झाली होती,सुवर्णा ही नांदेड जवळच्या एका गावातली मुलगी आहे. सुवर्णाच्या आई-वडिलांना जेव्हा माहिती पडलं की नागदरवाडी या गावात पाणीटंचाई आहे, आपल्या मुलीला चार पाच किलोमीटर लांब जाऊन पाणी आणावे लागेल तेव्हा त्यांनी लग्न मोडलं. त्या गावात नेहमीच पाणी टंचाईमुळे लग्न तुटायची. कोणी आपली पोरगी त्या गावात देत नसे.पण हनुमंत केंद्रे यांना ही गोष्ट पटली नाही ते जाऊन सुवर्णाला भेटले आणि सुवर्णाला बोलले मला तुझ्या सोबतच लग्न करायचं आहे मी आणतो माझ्या गावात पाणी, तुम्ही थांबाल का तोपर्यंत. पुढे जे काही झालं तीच गोष्ट आहे पाणी या चित्रपटाची. त्या गावाची आजची परिस्थिती सांगायची झाली तर आज नागदरवाडी या गावांमध्ये बारा महिने चोवीस तास पाणी असते आज हे गाव आजूबाजूच्या चार गावांना पाणीपुरवठा करते.ही प्रेरणादायी गोष्ट महाराष्ट्राच्या लोकांपर्यंत पाणी विषय पोहोचवण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी चित्रपट करायचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सुवर्णा आणि हनुमंत केंद्रे यांची प्रेम कहाणी साकारली. प्रेमासाठी त्या व्यक्तीने दुष्काळग्रस्त गावात पाणी आणले. ही अनोखी प्रेम कहाणी प्रेरणादायी आहे.
नागदरवाडीला सुजलाम सुफलाम करणारे जलदूत म्हणून हनुमंत केंद्रे यांची ओळख आज झाली आहे. जिद्दीन गावचा दुष्काळ हनुमंत केंद्रे यांनी सामूहिक प्रयतनातून हटवला. मनात दुष्काळ नसेल तर आकाश आपलंच आहे कवेत घ्यायला.
नक्षत्रांचे देणंच आयुष्य फुलवत नाही तर काही जणांमुळे श्रावण पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात चैतन्याची पालवी आणतो.
डॉ. अनिल कुलकर्णी
Leave a Reply