आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे,
मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे…
भैरवीला, आप्पा ठाकूरांच्या सुप्रसिद्ध गजलेच्या ओळी दस्तुरखुद्द आप्पांच्याच करारी वाणीतून, कानावर पडताच श्रोतृवृंदातून जोशपूर्ण टाळ्यांचा एकच गजर होत ‘गुंतलेले पाश’ हा लालित्याने नटलेला कार्यक्रम संपन्न झाला आणि प्रेक्षकांमधून आज भरून पावलो अशी लखलखित प्रतिक्रिया उमटली.
दिनांक २४ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘बांधण जनप्रतिष्ठान’ आणि मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ’ वाशी आयोजित, ज्येष्ठ गजलकार श्रीयुत आप्पा ठाकूर यांचा ‘गुंतलेले पाश’ हा मराठी गजलांचा हृदयस्पर्शी कार्यक्रम वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात मोठ्या दिमाखात सादर झाला.
गुंतलेले पाश थोडे सैलसे करणार आहे,
आणि काही रंग गहिरे त्यात मी भरणार आहे…
या संमोहित करणाऱ्या गजलेने कार्यक्रमाची नांदी झाली. येथून पुढे कवयत्री शिल्पा देशपांडे या आकर्षक युवतीने तितक्याच मनभावनं निवेदनाद्वारे गजलचे, आप्पांच्या भावविश्वाचे, मानवी जीवनातील द्वैत-अद्वैताचे, सुख दु:खाचे, कधी बोचणारे तर कधी लोभस आलिंगनासम भासणारे शब्दकळ्यांच्या सुगंधित आभूषणाने अलंकृत अदाकारीने नटलेल्या समयोचित निवेदनाद्वारे गजलविश्वाचे रेशीमबंध अलगद उलगडत नेले.
आयुष्याचे अवघड ओझे खूप दिवस मी पेलत आहे,
आणिक त्याच्या मोहापायी वृद्धत्वाला झेलत आहे…
सांजवेळी, उन्हाच्या उतरणीच्या शांत पर्वाला, लांबलेल्या सावल्या जसजशा धूसर होत जातात, परंतु कुठेतरी तळ्यामध्ये पाण्यात पिकलेले पान पडते आणि चकचकणारे तरंग उमटत जातात, तशाच!
ते तरंग का प्रवाहित होत असतील बरे? याच आशयाच्या पुढच्या ओळींमध्ये आप्पा म्हणतात…
बालपणीची स्वप्ने माझ्या मागे मागे धावत होती,
आणि आता मी मावळताना स्वप्नामागे धावत आहे…
उलिग्नतेतून लगेचच श्रोत्यांना सावरत, दर्दी प्रेक्षकांसाठी प्रेमभरल्या विद्रोहाची पुढची गजल पेश होते…
तुझे ऋतू…
सरळपणाने राहावयाचे तुझ्यात कुठे इमान होते
मी जन्माचा फकीर आणिक तुझे इरादे महान होते…
या विरक्तीने आप्पा मनमानातल्या प्रेयसीला आव्हानात्मक साद घालतात.
आप्पांचा पत्नीवियोग सर्व सुजाण श्रोत्यांनी अनुभवाला तो प्रौढत्व आलं त्याचं काय, या पुढील सादरीकरणात…
आपल्या सुविद्य पत्नीप्रती कृतज्ञतेने व्यक्त होताना ते म्हणतात…
तिच्या सावलीत सदा बहरलो कधीच गलबललो नाही
वादळ वारे होते, तरीही थरथरलो नाही…
आठवांच्या कळवळ्याने भावविवश होत, आपल्या सुसंस्कृत पत्नीकडून अलौकिक विवेकाची शिकवण मिळाल्याचे ते आवर्जून नमूद करतात,
संस्काराने हळूहळू मग विवेक मजला तिने दिला
म्हणून तर मी अतिमोहाने कधीच भरकटलो नाही…
हृदयातून प्रसवलेल्या या ओळीतील आत्मिक रुदनाने, आप्पांसह सर्व सभा गलबलून गेली, अन् श्रोत्यांच्या पापण्या नकळत ओलावल्या.
दु:खालापाचे अश्रु-मोती असेच घरंगळत राहतात.. पुढील गजलेत…
कफन बांधुनी फिरतो आहे,
तरी जगावे म्हणतो आहे…
प्रेक्षकांचा कंठ गहिवरतो, आवंढा गिळताना कष्टी होतात. परंतु आप्पा नवचैतन्याचे मर्म मांडताना वाळूचे घर बांधण्याचा सल्ला देतात.
दिवस उद्याचा घेत उशाला,
स्वप्ने पुढची बघतो आहे…
हळूहळू गजल आणि श्रोत्यांची गुंतलेल्या पाशांची वीण अधिकाधिक घट्ट होत जाते.
आपल्या ओघवत्या निवेदन शैलीने श्रोता आणि गजलकार आप्पा यांच्यामधील सुरेख दुवा साधण्याचे आणि उत्तरोत्तर कार्यक्रम खुलवित नेण्याचे कसब आत्मसात केलेल्या निवेदिका शिल्पाने मग मोर्चा वळविला तो आप्पांच्या कवितेकडे…
इतर काही जागतिक दिनांप्रमाणे
जागतिक महिला दिनही साजरा करतील, हे तुझ्यासाठी
आणि दुसऱ्याच दिवशी
यांच्या नजर तुझ्या देहाच्या
आकृतिबंधावर स्थिरावतील…
अशा परखड भाष्याने प्रेक्षक दिग्मूढ होऊन गेले. निवेदिका शिल्पाने पुढील गज़लेच्या प्रास्ताविकेत म्हटले…
माझ्याच माणसाशी मज बोलता न आले,
त्यांच्या उरात माझे घर बांधता न आले…
आप्पांनी या गज़लेच्या मतला पेश करताना म्हटले..
तसा विश्वास कोणाचा कुठे होताच माझ्यावर,
नको ते यायचे कानी जराशी पाठ फिरल्यावर…
आप्पांच्या या एकापेक्षा एक सरस रचनांच्या आस्वादात सर्वांगाने डुंबत असलेल्या श्रोत्यांना आश्चर्याचा धक्का दिला तो शिल्पाने.
आता आप्पा विठ्ठलालाच धारेवर धरणार आहेत आणि काही आदेशवजा सूचना करणार आहेत. प्रेक्षकही कान टवकारून बसले, तर आप्पा बोलते झाले…
तूर्तास विठ्ठलाने आता असे करावे
सोडून वीट मागे थोडे पुढे सरावे…
बांधून ठेवलेले सोडून हात दोन्ही
आता खुशाल देवा कामात गुंतवावे…
पुढे, समाजातील दंभावर आसूड ओढताना आप्पा विठ्ठलाला साकडे घालतात.
दारातल्या तुझ्या तू हटवून दांभिकांना
संपूर्ण पंढरीचा वारस मला करावे.
ही गजल सादर होतानाच प्रेक्षकांची कधी हसून मुरकुंडी वळली तर कधी आप्पांनी, भक्त पुंडलिकाने विठ्ठलाला जसे वीटेवर ताटकळत उभे राहण्याचे फर्मान सोडले होते तत्सम आता वेळ आली आहे विठ्ठलाने वीट मागे सोडून थोडे पुढे सरतानाच कटीवरील हात सोडून कार्यप्रणव होण्याचे निर्देश दिलेत ते केवळ त्यांच्या गजलेप्रती असलेल्या प्रतिभासंप्पन्न निस्सीम भक्तीमुळे आणि चोखंदळ रसिकवत्सल भावनेने.
भक्तवत्सल विठ्ठलाच्या प्रेमापोटीच साक्षात ईश्वराला म्हणजेच पंढरीच्या विठूरायाला जनोद्धाराची कास धरण्याचे बाळकडू पाजतानाच आख्ख्या पंढरीचा वारस आपल्यालाच करावे अशी सूचना आप्पा करू शकले ते गजलप्रान्तातील त्यांच्या एकमेवाद्वितीय चारित्र्यसंप्पन्न संतशिरोमणी प्रतिमेमुळेच.
या प्रसंगी, सूर निरागस हो… या गाण्यावर सहजहस्ते श्रीगणरायाचे सुंदर चित्र रेखाटणारे चित्रकार श्री. प्रकाश पाटील यांचा सत्कार ‘बांधण प्रतिष्ठान’तर्फे गज़लप्रेमी विश्वस्त श्री. नाना लोडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच आप्पांच्या आग्रहास्तव नुकत्याच नवी मुंबई अभिमान पुरस्काराने सन्मानित झालेल्या श्रीयुत ललित पाठक आणि सुभाष कुलकर्णी यांचा सत्कार माया ठाकूर यांचे मानसपुत्र आणि ठाणे महानगरपालिका उपायुक्त, श्री. संदीप माळवी, यांचे शुभ हस्ते करण्यात आला. आभारप्रदर्शन श्री. दिलीप जांभळे यांनी केले. या प्रसंगी सर्वश्री सर्जेराव कुईगडे, महादेव देवळे, पल्लवी देशपांडे, विजय दाते, भूषण मालवणकर, वसंत साळी, डॉ. राम पंडित, प्रमोद कर्नाड, संदीप माळवी, डॉ. अशोक पाटील, नाना लोडम, सुभाष कुळकर्णी, ललित पाठक, अशोक भगत, प्रा. वर्षा भोसले आणि विद्या तांबवे यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने गुणग्राहक रसिक श्रोते उपस्थित होते.
लेखक – श्री घनश्याम परकाळे
श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/
किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/-
Leave a Reply