नवीन लेखन...

पडद्यामागचे ठाणेकर

नाटक हा एक सांघिक कलाप्रकार आहे. लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांचा मेळ तर जमून यावा लागतोच, पण त्यांना नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा याची साथही मिळावी लागते. मात्र या सगळ्या तांत्रिक बाजू सांभाळणारे रंगकर्मी नेहमी पडद्यामागे राहतात. त्यांचे चेहरे फार क्वचित प्रेक्षकांना दिसतात, पण त्यांचे कला कौशल्य, तंत्रावरील हुकूमत नाटकाची परिणामकारकता वाढवण्यासाठी निश्चित महत्त्वाची असते. अशाच काही पडद्यामागच्या ठाणेकरांची ही एक झलक.

‘पडद्याला टाळी’ या शब्दप्रयोगाला मराठी नाट्यपरंपरेत काही आगळे महत्त्व आहे. आपल्या नेपथ्याला हमखास दाद घेणाऱ्या नेपथ्यकारांच्या यादीतले ठाणेकर नाव म्हणजे दत्ता चोडणकर. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून फाइन आर्टचा डिप्लोमा घेतलेले दत्ताभाऊ हे गणपतीच्या सजावटींपासून ते रांगोळी काढण्यापर्यंत अनेक बाबतीत माहीर होते. त्यांना रंगभूमीकडे वळवलं ते नाना कुलकर्णी यांनी. ठाण्याच्या भालचंद्र रणदिवेंशी, लिटल थिएटरच्या सुधा करमरकरांशी, रंगभूषाकार बाबा कदम यांच्याशी दत्ताभाऊंची ओळख झाली आणि मराठी रंगभूमीला नवा नेपथ्यकार गवसला. १९६६ साली ठाण्याच्या नाट्यमन्वंतरने स्पर्धेत सादर केलेल्या ‘आसक्ती कसली मजला’ या नाटकाचे नेपथ्य करून दत्ता चोडणकरांनी आपली कला कारकीर्द सुरू केली. या पदार्पणात त्यांनी पारितोषिक मिळवले. आचार्य अत्रे यांच्या अत्रे थिएटर्ससाठी ‘मी मंत्री झालो’, ‘पराचा कावळा’ या नाटकांचे नेपथ्य त्यांनी केले. ‘पराचा कावळा’ मधील चौपाटीच्या नेपथ्याला चोडणकर टाळी घेत. १९६९ मध्ये त्यांनी मधुसूदन कोल्हटकरांच्या ‘हा स्वर्ग सात पावलांचा’ या नाटकाचे अत्यंत आकर्षक नेपथ्य उभारले. ‘झडप’ या नाटकात तर कारागिरीची कमाल दाखवून त्यांनी प्लायवूडची फियाट गाडीच रंगमंचावर आणली होती. नाटकवाल्यांची गरज ओळखून हलक्या वजनाचे, सहज सुटे होणारे, फोल्डिंगचे, सहज जोडता येणारे नेपथ्य बनवण्यात दत्ताभाऊ वाकबगार होते. राज्य नाट्यस्पर्धेपासून ते व्यावसायिक रंगमंचापर्यंत शंभरहून अधिक नाटकांचे नेपथ्य दत्ता चोडणकरांच्या कलेतून साकारले गेले आहे.

नाट्याभिमानीच्या नाटकांचे नेपथ्य करण्यापासून ते मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या चित्ररथाचे नेपथ्य करण्यापर्यंत आपल्या कलाकौशल्याचे चौफेर प्रदर्शन मांडणारा नेपथ्यकार म्हणजे कै. प्रकाश टिपणीस. नाट्याभिमानीच्या ‘का असंच का?’, ‘अर्ध्याच्या शोधात दोन’, ‘पत्यात पत्ता’ या नाटकांचे नेपथ्य अतिशय प्रभावीपणे साकारले ते प्रकाश टिपणीसांच्या कलात्मक कौशल्यामधूनच. गणेश कल्चरल अॅकॅडमीच्या गोपीकृष्ण महोत्सवासाठी टिपणीसांनी १५ वर्षे साकारलेलं नेपथ्य त्यांच्या अभिनव कल्पनांची आणि अप्रतिम कलेची साक्ष देणारं होतं.

राज्य नाट्यस्पर्धा जोरात होती तेव्हा बहुदा प्रत्येक संस्थेचा एक नेपथ्यकार ठरलेला असायचा. म्हणजे ‘मित्रसहयोग’चं नेपथ्य मधुसूदन ताम्हाणे करणार, नंतरच्या काळात अशोक कार्लेकर; तर ‘कलासरगम’साठी विश्वास कणेकर आपले कौशल्य पणाला लावणार असं ठरलेलं असायचं. त्यात स्पर्धेची चुरस असल्याने एकदम ‘आउट ऑफ द बॉक्स’ कल्पना लढवून प्रेक्षकांना आणि परीक्षकांना चकित करण्यावर भर असे. त्यातूनच ‘अश्वमुद्रा’चे सायकलच्या रिम्सचा वापर करून केलेलं नेपथ्य अवतरलं. राहायला ठाण्यात नसूनही ठाण्याच्या नाट्यवर्तुळात मिसळलेलं नाव म्हणजे सुरेश मगरकर. ‘दर्शन दिग्दर्शन’ ‘काजळडोह’, ‘अदृष्टाच्या वाटेवर’ मधील त्यांचं नेपथ्य आजही जाणकारांच्या लक्षात आहे. ‘कॅलिग्युला’तलं रोमन शैलीतले नेपथ्य, ‘अमॅड्युअस मधून युरोपमधलं नेपथ्य, ‘विठ्ठला’त शिडीचे झाड असे वैविध्यपूर्ण नेपथ्य त्यांनी उभारले होते.
नेपथ्यानंतर नाटकाची परिणामकारकता वाढवणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाशयोजना. नाटकातील प्रसंगांना उठाव देण्यासाठी, त्यातील भावभावना अधोरेखित करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचे टाकलेले झोत म्हणजेच प्रकाशयोजना नव्हे बरं. व्यक्तिरेखा लिहिताना आणि ती साकारताना नाटककार, दिग्दर्शक जसा आणि जितका सूक्ष्म विचार करतात, तितकाच सखोल विचार करून प्रकाशझोतांना व्यक्तिरेखेचं स्थान मिळवून देतो तो खरा प्रकाशयोजनाकार. कुमार सोहोनीने केलेली ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ ची प्रकाशयोजना, अशोक साठें नी केलेली ‘चक्रावर्त’ची (४८ का ५५ स्पॉट्स?) प्रकाशयोजना अशा काही संस्मरणीय प्रकाशयोजना राज्य नाट्यामुळे ठाणेकारांना पाहायला मिळाल्या. ठाण्याच्या प्रकाशयोजनाकारांची परंपरा पुढे नेणारं आणि व्यावसायिक रंगभूमीला स्थिरावलेलं नाव म्हणजे योगेश जगन्नाथ केळकर. १९९२ पासून योगेश मराठी, हिंदी, इंग्रजी रंगभूमीवर प्रकाशयोजना करीत आहे. एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्यस्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या योगेशने २००३ साली ‘सवाई प्रकाशयोजनाकार’ म्हणून बक्षीस मिळवले होते. २५ पेक्षा अधिक नाटकांची प्रकाशयोजना करणाऱ्या योगेशला राज्य व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘दांडेकरांचा सल्ला’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकांसाठी सलग तीन वर्षे पारितोषिक मिळाले आहे. याखेरीज ‘ती आई होती म्हणुनी’, ‘किमयागार’, ‘यंदा कदाचित’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, ‘मिस्टर अॅण्ड मिसेस ३६’, ‘अनधिकृत’, ‘रज्जू’ इ. नाटकांसाठी योगेशने प्रकाशयोजना केली आहे.

नाटकाच्या प्रकृतीनुसार प्रसंगांना उठाव देण्याचे आणि प्रेक्षकांच्या मनात तो भाव जागा करण्याचे काम पार्श्वसंगीतामधून केले जाते. मुळात मराठी रंगभूमीचा उगमच संगीत रंगभूमी म्हणून झाला असल्याने संगीता शिवाय नाटक ही कल्पनाच प्रेक्षकांना रुचत नाही. ठाण्याच्या नाट्यवर्तुळात रेकॉर्डेड पार्श्वसंगीताची मिरास सांभाळली ती प्रभाकर साठे यांनी. पोलिसांच्या सायरनपासून ते वारकऱ्यांच्या नामघोषापर्यंत आणि कोंबड्यांच्या आरवण्यापासून ते हृदयाच्या ठोक्यापर्यंत कोणताही आवाज हमखास मिळायचा तो प्रभाकर साठेंच्या ‘स्टॉक’मध्ये. पाषष्ठपासून पार्श्वसंगीताची जबाबदारी पेलणाऱ्या प्रभाकर साठें चा ‘मिनी स्टुडिओ’ हा ठाण्यातला पहिला स्टुडिओ मानला जातो. राज्य नाट्यच्या नाटकांसाठी हौशी नाट्यसंस्थांना नेहमीच सवलतीच्या दरात (क्वचित चकटफू देखील) म्युझिक देणाऱ्या प्रभाकर साठें नी ‘मंतरलेली चैत्रवेल’, ‘कथा कुणाची व्यथा कुणा’, ‘झाला महार पंढरीनाथ’, ‘एक दिवस अचानक’, ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘अबोल झाली सतार’, या व्यावसायिक नाटकांची रंगतही पार्श्वसंगीताने वाढवली होती. ऑस्ट्रेलियातून आलेल्या ‘टिक टू’ या पपेट शो साठी पार्श्वसंगीत देण्यापासून ते प्रजासत्ताकदिनाच्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला पार्श्वसंगीत देण्यापर्यंत साठेंनी चौफेर कामगिरी बजावली आहे. नाटकांसाठी म्युझिक अरेंजर म्हणून सुरुवात करून,

आज मराठी चित्रपटांसाठी साउंड डिझायनर म्हणून काम करणारा रंगकर्मी म्हणजे अभिजीत केंडे. यदाकदाचित, जाणून बुजून, हलकं फुलकं या नाटकांसाठी म्युझिक अरेंजमेंट करणाऱ्या अभिजीतने ‘गोजिरी’, ‘तुला शिकविन चांगलाच धडा’, ‘शर्यत’, ‘ती रात्र’ इ. चित्रपटांसाठी साउंड इंजिनीयर म्हणून काम करून पारितोषिके मिळवली आहेत.‘रंगायतन महोत्सव’ एकांकिका स्पर्धेच्या संयोजनात अभिजितचा पुढाकार असतो. नंतर प्रफुल्ल आठवले, विष्णू आव्हाड, रोहित प्रधान, केनिथ डिसोझा यांचे ध्वनिमुद्रणाचे स्टुडिओ ठाण्यात सुरू झाले.

नाटक म्हणजे एक आभासी वास्तव, जे नाही ते आहे असं भासवणाऱ्याचा खेळ. हा खेळ हुबेहूब वठवायचा तर रंगभूषा अर्थात मेकअप करायलाच हवा. ठाण्याच्या नाट्यवर्तुळात मेकअपच्या संदर्भात सर्वात जुने नाव म्हणजे राजाभाऊ गद्रे. गणेशोत्सवातल्या नाटकांपासून ते व्यावसायिक नाट्यप्रयोगांपर्यंत राजाभाऊंनी शेकडो कलाकारांची रंगभूषा जाणकारीने केली. ठाण्याच्या नाट्यवर्तुळातील तीन पिढ्या राजाभाऊंनी रंगवल्या असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

राजाभाऊंकडून ‘मेकअप’चे धडे घेतलेले दीपक लाड गेली ३१ वर्षे रंगभूषाकार म्हणून काम करत आहेत. ठाण्याच्या सरस्वती विद्यामंदिरमध्ये शिकत असतानाच गॅदरिंगच्या कार्यक्रमांसाठी दीपक मुला-मुलींचा मेकअप करू लागला. राजा भाऊंप्रमाणेच अशोक पांगम, बाबा वर्दम, नाना जोगळेकर, कृष्णा बोरकर या मान्यवर रंगभूषाकारांचे मार्गदर्शन दीपकला लाभले आहे. कलासरगम, मित्रसहयोग, नाट्य परिषद ठाणे शाखा, सावित्री कला केंद्र, माता अनुसया, चंद्रकला अशा विविध संस्थांच्या नाट्य प्रयोगांची रंगभूषा दीपक लाड यांनी साकारली आहे.

रंगभूषेप्रमाणेच वेशभूषाही महत्त्वाची असते. सर्वसाधारण हौशी नाट्यसंस्थेत वेशभूषेची जबाबदारी एका व्यक्तीवर सोपवलेली नसते, तर बहुतेक वेळा तालमीत होणाऱ्या चर्चांमधून वेशभूषा कशी असावी हे ठरते आणि मग ती जमवायला सुरुवात होते. ‘पीरिएड प्ले’ करताना नाटकाचा नेमका काळ कोणता, त्या काळात पुरुषांचे कपडे कसे असत, महिला काय परिधान करीत, पायात पादत्राणे असायची का? डोक्यावर काय असायचे? अशा गोष्टींचा बारकाईने विचार करून वेशभूषा नक्की व्हायची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वेशभूषेची सवय कलाकारांना व्हावी म्हणून तालमीपासूनच ते कपडे अंगावर चढवले जायचे. अर्थात इतकं करूनही ऐनवेळी रंगमंचावर धोतराचा काष्टा सुटणं, डोक्यावरचा शिरपेच पडणं, पायघोळ अंगरख्यामुळे धडपडणं हे प्रकार व्हायचेच. या ‘नाटकातल्या नाटकामुळे’ प्रेक्षकांची करमणूक व्हायची ती निराळीच.

कोणताही नाट्यप्रयोग सुरळीत, सुविहीत होण्यासाठी गरज लागते ती ‘बॅक स्टेज कामगारांची.’ हौशी नाट्यसंस्थांमध्ये या पडद्यामागच्या कामगारांची कमी नसते. ज्या कुणाला नाटकात रोल मिळालेला नाही, तो बॅक स्टेजला, हा तर अलिखित नियमच. पण नाटकात भूमिका करणारे कलाकारही प्रसंगी लेव्हल्स ओढण्यापासून ते नेपथ्याची मांडणी करण्यापर्यंत कोणतेही काम मनापासून करत असत. आता काही वेळा उत्साहाच्या भरात बॅक स्टेजवाल्यांकडून (चुकून) विंगेतली प्रॉपर्टी उचलण्याचा किंवा सेटवर नको तो बदल करण्याचा प्रमाद घडायचा; पण नाटक म्हटलं की हे सगळं आलंच. असो.
ठाण्याच्या रंगपरंपरेत नवे रंग भरणाऱ्या पण अनेकदा प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष समोर न येणाऱ्या रंगकर्मींची आठवण जागी करण्याचा हा प्रयत्न. कदाचित यात काहीजणांची नावे निसटली असतील तर क्षमस्व!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..