विदुषी पद्मा तळवलकर यांचा वाढदिवस. यांचा जन्म दि. २८ फेब्रुवारी १९४९ रोजी झाला.
पद्मा तळवलकर या माहेरच्या पद्मा सहस्रबुद्धे. पद्मा तळवलकर या जयपूर-अत्रौली घराण्याच्या लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका आहेत. पद्मा तळवलकर यांचे आजोबा काणेबुवा हे कीर्तनकार होते. त्यामुळे घरात गाणे होते. गाणे शिकण्यासाठी पद्मा तळवलकरांना घरातून आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. पुढे शिष्यवृत्ती मिळवून मुंबईला गाणे शिकायला गेल्यावर त्यांचा संगीताचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. अनुभवासाठी वयाच्या तेराव्या वर्षापासून त्या छोटेखानी मैफली करू लागल्या. ग्वाल्हेर आणि किराणा या घराण्यांचेही शिक्षण तळवलकर यांनी सुरुवातीला घेतले. त्यामुळे त्यांच्या गायकीचे तिन्ही घराण्यांचे मिश्रण आहे. ग्वाल्हेर व किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक गंगाधर पिंपळखरे यांच्याकडे वयाच्या दहाव्या वर्षी पद्माताईंनी संगिताचे धडे घेण्यास सुरूवात केली. त्यांनी नंतरच्या काळात जयपूर, ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याचे नामवंत गायक पंडीत गजाननराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचे सांगीतिक ज्ञान अधिक प्रखर बनवले. मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडूनही त्यांनी जयपूर घराण्याचे वैविध्य आत्मसात केले असून, किशोरीताई आमोणकर यांच्यासह काम करून त्यांनी मैफली रंगवण्याची कलाही आत्मसात करून घेतली. पद्माताई जेव्हा मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे गाणे शिकायला गेल्या तेव्हा त्यांनी ‘नाट्यपदे सोडणार असशील, तर शिकवेन’ असे बजावले. पद्मा तळवलकरांनी तत्क्षणी नाट्यपदे गाणे सोडले आणि मोगूबाईंचे शिष्यत्व पत्करले. एक उत्कृष्ट कलाकार म्हणून मंच रंगवताना त्यांच्या व्यक्तीगत स्पर्शाने प्रत्येक रागदारीमध्ये एक वेगळेपण भरले जाते. जेष्ठ तबला वादक पंडित सुरेश तळवळकर हे त्यांचे पती. त्यांचा मुलगा सत्यजित हाही आता तबलावादक म्हणून रसिकांसमोर आला आहे आणि कन्या सावनी हीही तबलावादक म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करीत असल्याने सतत गायनात आणि त्याच्या विचारात डुंबलेले हे एक आगळे वेगळे कुटुंब आहे. पद्मा तळवलकर यांना २०१७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या समूहातर्फे पद्मा तळवलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply