नवीन लेखन...

पद्मभूषण उस्ताद अहमदजान थिरकवा खाँसाहेब

हरि ॐ
पद्मभूषण उस्ताद अहमदजान थिरकवा खाँसाहेब

बालगंधर्वांच्या गाण्यातील लयची गंमत म्हणजे थिरकवा तर; थिरकवांच्या वाजवण्यातील लालित्य म्हणजे बालगंधर्व ! असे हे थिरकवा बालगंधर्वांनी महाराष्ट्राला दिले तर बालगंधर्वांच्या गुरूनी भास्करबुवा बखल्यांनी ते बालगंधर्वांना दिले.

बालगंधर्व हे मराठी रंगभूमीला पडलेले सुंदर स्वप्न होते. तर त्या स्वप्नातील लकेरीचे स्वप्न म्हणजे थिरकवा खाँसाहेब. त्याकाळी ‘एकच प्याला’ ‘मानापमान’ नाटकाचे बोर्ड लागलेले असायचे व नाटक मंडळी मुद्दाम सांगत असत की ‘आज तबल्याच्या साथीला थिरकवा खाँसाहेब आहेत आणि काय सांगता बालगंधर्वांच्या नाटकाला दुग्ध शरकरा योग जुळून आल्या कारणाने नाटकाच्या गर्दीत भर पडायची.

उ.अहमदजान थिरकावा खाँसाहेबांचा पेहरावही अगदी ऐटदार असे. शेरवानी चुडीदार डावीकडे कललेली गोंडयाची लाल ‘फेजकॅप’ जयपुरी चढाव नि हातात काठी अशा भारदस्त वेशातील थिरकवा खाँ ठराविक पदांच्या वेळी स्थानापन्न व्हायचे आणि कादरबक्षांच्या सारंगीची सुंदर किनार असलेल्या बालगंधर्वांच्या दैवी गाण्याला आपल्या फरूकाबादी नजाकतदार तबल्याने उचलून धरायचे. थिरकवांच्या साथीतली नारायणरावांची ‘प्रभू अजि गमला’ ‘कशि या त्यजू पदाला’ ‘मला मदन भासे…’ अशी पदे कालवर विजय मिळवून आजही इतक्या वर्षांनी कानात येतात आणि बेभान करून जातात.

उ.अहमदजान थिरकवा खाँसाहेब आज आपल्यात नाहीत. ते उत्तर प्रदेशातील मुरादाबादचे. त्यांचा जन्मदिवस नोंदलेला नाही. कोण म्हणतो २१.३.१८८४ किंवा १८८६.

उस्तादांचे घराणे कलाकारांचे गायन सारंगी व तबला यांचे पिढयांन् पिढया वास्तव्य त्यांच्या घरात होते. वडिल हुसेनबक्ष उत्तम सारंगिये काका शेरखाँ उत्कृष्ट तबलिये ‘पूरब फरूकाबाद बाजाचे. असा जोर नि जोष होता त्यांच्या वादनात की एकदा त्यांचा तबला कानावर पडताच पागेतले घोडे उधळले म्हणे !

उस्तादांना त्यांच्या लहानपणी हाती प्रथम सारंगी देण्यात आली परंतू आजूबाजूस कोणी बसले की ते तबला डग्गा काढून वाजवू लागत. त्यांच्या तबल्यातील कल बघून त्यांना तबला शिकवण्याचे ठरले. नऊ दहा वर्षांच्या अहमदजानना तबल्यातील चारही बाज ज्यांच्या हातात होते अशा विद्वान निर्व्यसनी साधुवत उस्ताद मुनीरखाँ यांचा गंडा बांधण्यात आला आणि ते मुंबईत आले.

मुनीरखाँ यांचे वडिल हे तबल्यातले उस्ताद होते. अहमदजान यांचे शिक्षण सरू झाले तेव्हां उस्तादंाच्या लक्षात आले की या मुलाचा हात निसर्गतःच खुबसूरत आहे. ते म्हणाले “क्या अजीब ढंगसे चैनसे इसका हात थिरकता है आणि अहमदजान थिरकवा झाले. मुनीरखाँ कडून थिरकवा साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने सुमारे चाळीस वर्षे विद्या घेतली. चारही बाज हस्तगत केले. अहमदजान थिरकवा खाँसाहेब त्यावेळेस मजेने म्हणत “मुनीरखाँची याद माझ्यामुळे जास्त राहिली आहे”.

शिक्षणाच्या काळात थिरकवांनी जो अद्भूत रियाज केला त्याला तोड नाही. अर्थात याचे सर्व श्रेय उस्ताद अहमदजानांचे वडील बंधू मियाजान यांना जाते. मियाजाननी तो जिद्दीने उस्तादजींकडून करून घेतला. मियाजान हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी उस्तादजींना अजमेरशरीकच्या शहेनशा गरीबनवाझ या सत्पूरूषाच्या दर्ग्याला नेले. तिथे थिरकवांनी दुवा मागितला “मुझको किसी चीजके काबील बनादो” उस्तादजी तबला वाजवण्यापूर्वी गरीबनवाझ यांचे न चुकता स्मरण करत आणि म्हणत “उनकी दुवासेही मै बजाताहू”.

या मेहेनतीच्या काळात थिरकवांनी नऊ वर्षांचा “चिल्ला” बांधला मशिदीत जाऊन शपथ घेतली “मी दररोज तबल्याचा रियाज करेन त्यात काही झाले तरी खंड पडू देणार नाही”. त्यांनी दररोज पंधरा ते अठरा तासांचा रियाज केला. त्यांच्या वडीलभावाची साथही होती व सक्तीही होती.

अविश्रांत अशा रियाजाला ताकद कमी पडू नये म्हणून प्रत्येक दिवशी पाच शेर दूध बदाम पिस्ते उत्तम तुपातले ‘चिकन’ किंवा ‘मटण’ असा खुराक त्यांनी थिरकवांसाठी जारी केला. थिरकवा साहेबांना एकटयाला तबला वाजवून कंटाळा येऊ नये म्हणून मियाजान स्वतः त्यांच्याबरोबर लेहेर्‍याला बसत. थकलेल्या थिरकवांचे अम्ग रगडून देत असत. बसलेले थिरकवा घामाने निथळत आणि रियाजानंतर जेव्हां आडवे होत तेव्हां घामाने त्यांची पूर्णाकृती जमिनीवर उठत असे.

आता थिरकवांचा हात तयार झाला होता. एक साक्षात्कारी तबला वाजू लागला. त्याला परंपरेची शिस्त होती क्रम होता वजन व गोडवा होता. तसेच सहजता व व्यक्तिगत वैशिष्ठय होते. “बाया” व “दाहिना” यांचे असे नेमके वजन साधल होते की वाजताना एक जोड वाद्यच वाटावे. ‘तिरकिटतक धिरकिटतक धा ति धा’ एवढेच जरी वाजवले तरी त्या डौलाने मन मोहरून जाई. ञत जलद चालवण्यापेक्षा स्वच्छ स्पष्ट बोल निघण्यावर त्यांचा भर असे ते स्वतः मजा घेत वाजवत असतं. गाण्याला जसा क्रम तसाच क्रम

पेशकार रंग कायदे रेले गत तुकडे मग लग्या इ. अशा क्रमसिद्ध रचनेतून जी आकृती बांधली जाई. जी वास्तू उभी राही तो कए नजराणाच असे. पुर्वसुरींचा बुजूर्गांचाच तबला ते वाजवत तीच त्यांच्या तबल्याची भाषा सगळी सुलक्षणे घेऊन आलेली. गंभीरतून निर्माण होणारी सुंदरता म्हणजे थिरकावा !

‘सोला’ तबला वादनाची प्रथा थिरकवांपासून सुरू झाली. आधी वर्णिलेल्या गुणवत्ता व निसर्गसिद्धता यामुळे ‘गाण्याबजावण्याच्या बैठकी’ प्रमाणे तीन तीन तासांची तबल्याची बैठक लोक ऐकू शकले. एवढेच नाही त्याला त्यांनी उत्तम दादही दिली.

मोठमोठया कॉन्फरन्सिस्मध्ये उत्तम धृपद धमारानंतर नृत्यानंतर थिरकवा साहेबांनी तबला ‘सोलो’ वाजवला आहे. एक आठवण अशी सांगतात. एकदा बेळगावला थिरकवांनी रंग जमल्यावर बडे गुलामअल्ली सारख्या ‘सबरंगी’ कलाकार गायला बसला नाही ! यातच काय ते सगळं आलं.

फैयाजखाँ मुश्ताक हुसेन विलायत हुसेन अशासारख्या मोठमोठया गवैयांबरोबर साथ केली आहे. तसेच मोठमोठया वादकांबरोबर उदा.अल्लाउद्दीनखाँ हफीजअल्ली अलीअकबर इ. नामवंत सरोदिये पं.रविशंकर सतारिये विलायतखाँ यांच्या बरोबर साथ केली आहे. नृत्यात अच्छनमहाराज जयलालजी बिर्जुमहाराज अशा श्रेष्ठ नर्तकांची साथसंगत केली आहे.

लखनौ मेरठ अजराडा फरूखाबाद अश्या सगळया घराण्यांचा बाज त्यांना लक्षात होता. परंतू ते दिल्ली आणि फरूखाबाद घराण्याचा तबला वाजविण्यात सिद्ध हस्त होते. तबला वाजवताना ज्या संगीत प्रेमी चाहत्यांनी उस्तादजींचे बोल ऐकले असतील त्या सर्वांना लक्षात असेल की जेवढे सुंदर ते वाजवीत तेवढेच सुंदर व स्पष्ट बोल त्यांच्या तोंडून निघत असत. कठीण ताल सुद्धा अगदी सुंदरतेने वाजवीत असत.

थिरकवांचे कोणकोण शिष्य आहेत असे कुणी विचारले तर त्यांच्या वादनाचा प्रभाव कुणावर नाही ? ‘धाकड् तिध्धा धिन्’ या खेरीज कुणाही लहान मोठया तबलजीचा पेशकार सुरू होत नाही. हाचतर थिरकवा साहेबांचा प्रभाव. थिरकवा साहेबांच्या जीवनातील एक आठवण / किस्सा सांगण्याचा मोह आवरत नाही.

वैमनस्य किंवा मत्सर हा मनुष्याचा जन्मजात विशेष आहे की काय कोण जाणे ! थिरकांवाचे गुरूबंधू नजरखाँ हे मध्यप्रदेशातल्या रायगढचे. तिथे त्यांचे भरपूर नातेवाईक नि चाहते. थिरकवांचे खूप नाव झालेले. टे एका मैफलीत भाग घेण्यासाठी रायगढला येणार होते तेव्हा कट ठरला. थिरकवांना कुणीही दाद द्यायची नाही ! जो कोणी ही कसम मोडून दाद देईल त्याच्या मुलीला शिक्षा होईल. ही विलक्षण धमकी होती. मैफलीला सुरूवात झाली. प्रथम नजीरखाँनी वाजवले ‘बाहव्वा’ चा पाऊस पडला. नंतर थिरकवा बसले. त्यांच्या बरोबर लेहेर्याला नजीरखाँचे मामा सारंगीवर बसले. थिरकवांचा असामान्य तबला बोलू लागला. पण पुढे हलचल नाही. सारे शांत ‘पेशकार’ झाला दाद नाही थिरकवा साहेब रंगाकडे वळले तरीही सारे कसे शांत आणखी थोडा वेळ गेला आणि एकदम उद्रेक उव्देगाचा झाला. सारंगीवाले म्हणाले ‘कसमकी ऐसी की तैसी अपना तो जी नही मानता अरे तबला तो अब शुरू हुवा है’ अशी गडयातूनच दिलखूलास दाद आल्याबरोबर सार्‍या श्रोत्याच्याकडूनच इतका वेळ दडपून ठेवलेली गुदमरलेली दाद दण्कन् उसळली.

थिरकवा आता खूप थकले होते. त्या वयात इतका वेळ बसणे त्यांना शक्य होत नसे पण वृद्धावस्थेत सुद्धा थिरकवा साहेब तबला वाजवत असत. त्यावेळेसही बांया सुंदर घुमत असे. वाजवण्यात तीच ऐट टिकून होती. बुजूर्गांच्या ‘गती’ रूंजी घालतात लिहायला वाचायला न येणार्‍या थिरकवांच्या डोक्यात सारा तबला लिहीलेला आहे. त्यांच्या हातालच जणू सारे पाठ आहे. डोक्यातला मेंदू जणू त्यांच्या हातातच येऊन राहिला आहे.

उ.अहमदजान थिरकवा यांना १९५४ साली दिल्लीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. आणि नंतर ‘पदम्श्री’ तसेच १९६५मध्ये उस्तादजींना ‘पदम्भूषण’ किताबाने सन्मानित करण्यात आले.

दुनियेने व निसर्गाने लाड केलेले अलौलिक थिरकवा असे होते. असे थिरकवा पूर्वी नव्हते आज नाहीत आणि उद्याचे कोणाला माहित.

उस्ताद अहमदजान थिरकवा खाँ आपल्या सर्व आठवणी सोडून या जगाचा निरोप ११.०१.१९७६ साली घेऊन आपल्यातून गेले. पैगंबरवासी झाले.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..