मुंबईचे प्रसिद्ध फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांचे ३ मार्च २०२५ रोजी निधन झाले.
पद्माकर शिवलकर यांचा अल्पपरिचय.
१९६० आणि ७०च्या दशकात जेव्हा मुंबईचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा होता तेव्हा शिवलकर यांचे नाव मोठे होते. १९६२पर्यंत त्यांनी आपल्या गोलंदाजीने बोर्ड अध्यक्षीय संघात स्थान मिळवले. तो संघ त्यावेळी भारताला भेट देणार्या आंतरराष्ट्रीय संघाबरोबर सामना खेळणार होता. त्या आंतरराष्ट्रीय संघात रिची बेनॉ,एव्हर्टन विक्स, बॉबी सिंप्सन व कॉलिन काउड्रे यांसारखे मातब्बर खेळाडू होते. त्या पहिल्याच सामन्यात शिवलकर यांनी पहिल्या डावात पाच बळी गारद केले. त्या सामन्यात त्यांनी एव्हर्टन विक्सला दोन्ही डावांत बाद करून आपल्या डावखुर्या फिरकी गोलंदाजीची चुणूक सर्व जगाला दाखवली. पण गंमत अशी बघा, की त्यावेळेला मुंबई रणजी संघात स्थान मिळायला इतकी स्पर्धा होती की पद्माकर शिवलकरांसारख्या उत्तम फिरकी गोलंदाजाला मुंबई संघातही स्थान मिळणे अवघड होते! कारण? कारण त्यावेळी मुंबईच्या संघात आधीच एक डावखुरा फिरकी गोलंदाज होता. तो म्हणजे बापू नाडकर्णी! बापू नाडकर्णी हे थोडीफार चांगली फलंदाजीसुद्धा करू शकत असल्यामुळे भारतीय संघातही ६०च्या दशकातल्या पूर्वार्धात पद्माकर शिवलकरांच्या ऐवजी बापू नाडकर्णी यांचीच वर्णी लागत होती. त्यामुळे १९६७-६८पर्यंत पद्माकर शिवलकर यांना मुंबईचा बारावा गडी म्हणूनच बहुतेक वेळा खेळावे लागले. पण त्यादरम्यान ज्या काही तुरळक संधी शिवलकरांच्या वाट्याला आल्या त्यांचे त्यांनी अगदी सोने केले होते. उदाहरणार्थ, १९६५च्या सिलोनविरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात त्यांनी परत एकदा पाच गडी एका डावात गारद केले होते.
निवृत्ती घेतल्यानंतर शिवलकर यांनी मुंबई रणजी ट्रॉफी संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील काम केले.
२०१७ मध्ये शिवलकर यांना बीसीसीआय सीके नायूडू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
शिवलकरांच्या २८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ते एकूण १२४ प्रथम दर्जाचे सामने खेळले. त्यांपैकी ४२ सामन्यांत, म्हणजे तीनपैकी एका सामन्यात त्यांनी एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला होता.
पद्माकर शिवलकर यांना गाण्याचा छंद होता. ते ‘चढता सूरज…’ ही कव्वाली जबरदस्त गात. नव्हे, ते एका वाद्यवृंदात नेमाने गाणी गात असत. योग हा की, ‘हा चेंडू दैवगतीचा’ हे शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेले गाणे त्यांनी गायले होते, त्याची ध्वनिमुद्रिकाही निघाली होती.
‘हा चेंडू दैवगतीचा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तक पद्माकर शिवलकर यांनी लिहीले आहे. पद्माकर शिवलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply