तीन दिवसांचा मुक्काम संपवून स्वामींच्या पादुकांसह पालखी रवाना झाली.
दरवर्षी पालखी गेल्यावर होते तशी शंकरराव व सुषमाताईंची अगदी सैरभैर अवस्था झाली. स्वामींवर त्यांच्या घराण्याची अतूट श्रद्धा..तीन पिढ्यांपासून. आज गेले चाळीस वर्षे स्वामींच्या पादुका तीन दिवस त्यांच्या घरी मुक्कामी असायच्या. ते तीन दिवस त्यांच्या घरी जणू उत्सव असायचा. दूरदूरवरुन नातेवाईक व आप्तेष्ट दर्शनाला यायचे..दर्शन घेउन तृप्त व्हायचे.
पण पालखी गेल्यावर घर एकदम भकास भासायचे. घरी मुलगा, सून व दोन नातवंडं असतानाही काही दिवस दोघांना खूप अवघड जायचे.
“स्वामी पुन्हा लवकर या..आम्ही पिकले पान..पुन्हा श्रीचरणांची भेट होईल न होईल” अशी विनंती निरोप देताना ते दोघे करायचे.
पालखी गेल्याच्या दुस-यादिवशी शंकरराव व सुषमाताई टेरेसमधे बसून होते. शंकरराव खालची वर्दळ शून्यपणे पहात होते. सुषमाताई डोळे झाकून एका खुर्चीत नामस्मरण करत होत्या.
एवढ्यात दबक्या पावलाने सात वर्षाचा नातू आशिष टेरेसमधे आला. तो हळूच म्हणाला
‘आजी..आजोबा..मी तुमच्यासाठी एक गंमत बनवलीय..’
‘हो का..? अरे वा..! काय आहे दाखव बघू..’ शंकरराव नातवाला कौतुकाने म्हणाले.
‘असं नाही..तुम्ही दोघे पहिले डोळे बंद करा..’ आशिष म्हणाला.
‘ ए काय रे आशु..!’ सुषमाताई लटक्या रागाने नातवाला म्हणाल्या…पण नातवाचे मन कसे मोडणार म्हणून म्हणाल्या
‘ बरं..हे बघ डोळे मिटले..अहो तुम्हीही डोळे मिटा बरं..’
दोघांनी डोळे मिटले तसे आशिषने ‘नो चिटींग हं’ म्हणत खिशातून एक गोष्ट काढून समोरच्या टिपाॕयवर ठेवली व म्हणाला
‘ आजी आजोबा..आता उघडा डोळे..’
शंकरराव व सुषमाताईंनी डोळे उघडले…
अन समोर जी वस्तू होती ते पाहून दोघांच्या डोळ्यात झरझर पाणी आले.
आशिषने एक छोटी मिनीएचर पालखी बनवली होती व त्यात अंथरलेल्या छोट्याशा रेशमी कापडावर ठेवल्या होत्या..
त्याने बनवलेल्या स्वामींच्या छोट्या पादुका…!!
-सुनील गोबुरे
Leave a Reply