भल्या पहाटे कोकीळ नावाचा भाट गाऊ लागतो
त्याच्या भैरवाचे सूर मनात रूंजी घालू लागतात थंडगार झुळुकांनी आम्रवृक्षांचा गंधित धूप दरवळू लागतो..
उगवत्या सूर्यबिंबाच्या मस्तकी टिळ्याने शुचिर्भूत आकाश अधिकच तेजस्वी दिसते
पक्ष्यांच्या कूजनाने काकडआरती होते
पुराणपुरुष डोंगरही आळस झटकून वेदऋचा म्हणण्यास ताजेतवाने होतात
आणि हा निसर्गाचा व्यापार पाहत मी जागी होते…
पौर्णिमेचे चंद्रबिंब उत्तररात्री डोळ्यात साठवून मिटलेल्या पापण्याही आता चांदणतेजाने माखून गेलेल्या असतात….