झोरोस्टराईन संस्कृतीमध्ये एक शब्द आहे- ” हुश्बमी ” पहाटेची शांतता आणि सौंदर्य या शब्दात टिपलेली आहे. त्यांनाही वाटते-
मला पहाटेबरोबर डोळे उघडू देत. शरीर स्वच्छ करू देत आणि माझ्यातील चैतन्याला प्रार्थनेचे स्नान घडवू देत. उगवता सूर्य मला हाकारण्यापूर्वी मी माझ्या दैनंदिन कामकाजासाठी सिद्ध होऊ देत.
पहाटक्षणांमधील सुंदरता, भुरळ, जादू, उत्साहवर्धक जोम आणि प्रेरणा लोळण्यात/पेंगण्यात/आळसात वाया मी घालवू नये. उलट मला माझ्या उरलेल्या आयुष्यात हे पहाटेचे ” अधिकचे ” जीवन सामावून घेऊ देत.
पहाटक्षणांमध्ये मन ताजेतवाने,उत्फुल्लित, ग्रहणक्षम करण्याची ताकत असते आणि लक्ष विचलित करणारे विभ्रम नसतात. चोवीस तासांच्या दिवसात विविध आवाजांमध्ये , ओझ्यांमध्ये स्वतःला गाडून टाकण्यापूर्वी किमान एक निवांत तास स्वतःसाठी बाजूला काढून ठेवावा असे आम्ही आवर्जून ” वेळेचे नियोजन “(टाइम मॅनेजमेंट) या प्रशिक्षणादरम्यान बजावून सांगतो म्हणजे उरलेले तेवीस तास चांगल्या प्रकारे “कारणी” लावता येतील.
व्यक्तिगत प्रभावात वाढ, मनानुभूती, मनःशांती, अध्यात्मिकता आणि प्रसन्नतेमध्ये भर घालण्यासाठी या ” मातब्बरी ” कडे गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झालीय.
गंमत म्हणजे हे सर्व ” मोफत ” टाळून, प्रचंड पैसे खर्च करून, आपण विविध अभ्यासक्रमांना हजेरी लावत असतो.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply