खूप शांत आणि बहुप्रतीक्षित झोप झाली की पहाटजाग अपरिहार्य असते. मेंदूतल्या विचारचक्रांना विश्रांती मिळालेली असते. छान ध्यान लागते मग.
गांवोगावीचे चिरपरिचित कोलाहल भिन्न असले तरी प्रत्येक ठिकाणी तीच शांतता भेटते. ” आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले ” वाली- सुमनताई कल्याणपूर यांच्या सदैव शांत,प्रदीर्घ आवाजातली. मनात कबीर दोहे अखंडपणे गात असतो.
हे डोह साधारण पहाटे तीन ते पाच भेटायला येतात- खोलवर, घनगंभीर, दिवसभराचे सारं काही आत पचवलेले!
समुद्र अथांग, नदी खळखळ वाहती तर डोह एकाजागी स्थिरावलेले आणि स्तब्ध !
जी ए म्हणायचे – “डोहकाळिमा “. अशा गूढ शब्दांचा उलगडा होतो अशाच क्षणी ! इतरवेळी ते डोळ्यांना फक्त छापील स्वरूपात दिसतात आणि आपण पानं उलटलेली असतात. पण पुस्तकं जाणवतात, समजतात ती अशा काही क्षणी !
काल इथे येताना बेगुसराय, मोकामा, पूर्णिया सारखे पुस्तकांच्या पानांवर दिसलेले परिचित शब्द रस्त्यावरील माईलस्टोन्स बनून दिसले.
आठवले- वडिलांनी भुसावळला आवर्जून हातात दिलेलं अनिल अवचटांचे ” पूर्णिया “. म्हणाले होते- ” वाच, तुला बिहार दिसेल.” नंतर सोलापूरला असताना वडिलांनी ” अंकुर, निशांत ” सारखे बेनेगलचे चित्रपट आवर्जून दाखविले. महाविद्यालयात पाय ठेवताना सवंग, तात्पुरत्या करमणुकीच्या शोधात असलेल्या मला ते नावडते अनुभव नकळत भोवंडून गेले.
वडिलांनी कधी भाषणं दिली नाहीत की तासनतास गप्पा मारल्याचे आठवत नाही. हा त्यांचा मार्ग होता माझे डोळे विशाल करण्याचा, जीवन भेटविण्याचा!
तसाच हमोंच्या कथेत यूपी चा रिक्षावाला भेटला- अमिताभच्या इलाहाबाद निवडणुकीचा साक्षीदार! म्हणजे पूर्णिया फक्त बिहार मध्ये नाही तर! हे निरीक्षण जाता जाता वडिलांकडे सहज नोंदविले तर ते समंजस हसले- डोहासारखे!माझ्या प्रवाहाला दिशा मिळाल्याच्या समाधानात!!
काल बरोनीला येताना जागोजागी दिसलेल्या रिक्षा, टपऱ्यांवर लालू युगाचे साक्षीदार “कुल्हड ” आणि त्यातला मातकट चवीचा चहा ! शाली/चादरी, मिळेल ते अंगावर लपेटून हिंडणारे, थंडीचा /शीतलहरींचा सामना करणारे आबालवृद्ध-जगणं स्वीकारलेले. मी मात्र कारमध्ये हीटर, अंगावर तऱ्हेतऱ्हेच्या उपाधी लेवून स्वसंरक्षणात प्रवास करतोय. अवचटांचा ग्रामीण बिहार त्याच चेहेऱ्याचा ! पाटण्यात भलेही फ्लाय ओव्हर्सचे जाळे, मॉल्स, आणि बार्बेक्यू नेशन्स पसरले आहेत.
इथे – अजून प्रत्येक टपरीभोवती कुल्हड चा ढिगारा. भल्यामोठ्या वखारी- त्यांत ओंडक्यांचे साठवण. आजही निसर्ग तोडून चालली आहे गुजराण. अवचट तुम्हांला दिसलेला बिहार अजूनही मला तसाच दिसला काल !
वाहनचालक मात्र अभिमानाने सांगत होता- इथे गंगामैय्याच्या कृपेने पाण्याची टंचाई नाही, वीज क्वचितच लपंडाव खेळते. तिकडे आम्ही-सो कॉल्ड प्रगतिशील पुणेकर पाण्याच्या टँकरवर निमूट गुजारा करायला शिकलोय आणि युगानुयुगांपूर्वी घरी इन्व्हर्टर्स विराजमान झालेले आहेत. नैसर्गिक संसाधने असून हे विषम चित्र कां ?
रात्री डोहाला विचारले- तो स्थितप्रज्ञ ! झोप म्हणाली- ” तूच शोध ना तुझी उत्तरे ! आता मोठा झाला आहेस ना?”
(बिहार डायरी- पृष्ठ क्र ३ : मु पो -बरोनी )
ता. क .- ही पोस्ट लिहिता लिहिता हॉटेलचे लाईट दोनदा गेले.(हाहाहा).
आणि चक्क कालचा माझा फोटो बघून माझ्या इस्लामपूरच्या विद्यार्थ्याचा (बिमलेशकुमार) फोन आला. तो इथे पूर्णियाच्या तंत्रनिकेतन मध्ये प्राचार्य आहे. भेटू या म्हणाला सर, तुम्ही इतक्या जवळ आला आहात तर !
डोह ढवळला गेला.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply