जीवसृष्टीची निर्मिती सुमारे पावणेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर दीर्घ काळापर्यंत सजीव हे स्वतः निर्माण केलेल्या अन्नावर जगत होते. सजीवांची थेट ‘दुसऱ्याच्या जीवा’वर जगण्याची सुरुवात ही सुमारे सव्वा अब्ज वर्षांपूर्वी झाली असावी. परंतु त्या काळातले सर्व भक्षक हे अतिशय लहान आकाराचे सजीव होते. चौपन्न कोटी वर्षांपूर्वीपासून ते एकोणपन्नास कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या ‘कॅम्ब्रिअन’ काळात अनेक नवनवीन जाती-प्रजातींची निर्मिती होऊन जीवसृष्टीचं स्वरूप बदलून गेलं. त्यामुळे आजच्या प्राण्यांचे पूर्वज म्हणता येतील, अशा पहिल्या भक्षक सजीवांची निर्मिती ही कॅम्ब्रिअन काळातच झाली असावी, अशी शक्यता दीर्घ काळ व्यक्त केली जात होती. या शक्यतेला छेद देणारा शोध अलीकडेच लागला आहे. ब्रिटिश जिऑलॉजिकल सर्व्हे या संस्थेतील फिलिप विल्बी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी, आजच्या प्राण्यांचे पूर्वज असणारे भक्षक प्राणी कॅम्ब्रिअन काळ सुरू होण्याच्या अगोदरच निर्माण झाल्याचं दाखवून दिलं आहे. फिलिप विल्बी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘नेचर इकॉलॉजी अँड इव्होल्युशन’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.
फिलिप विल्बी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शोधला गेलेला भक्षक प्राणी हा किमान छप्पन कोटी वर्षांपूर्वी, म्हणजे कॅम्ब्रिअन काळ सुरू होण्याच्या किमान दोन कोटी वर्षं अगोदरपासून अस्तित्वात होता. आणि मुख्य म्हणजे हा प्राणी आज आपल्याला सुपरिचित असणाऱ्या जेलिफिश या सागरी प्राण्याचा प्राचीन नातेवाईक असावा. कॅम्ब्रिअन काळाच्या अगोदरचा काळ हा ‘एडिअॅकरन’ या नावे ओळखला जातो. या काळातच बहुपेशीय प्राणी उत्क्रांत झाल्याचं मानलं जातं. असं असलं तरी त्या काळातला, आज अस्तित्वात असणाऱ्या एखाद्या प्राण्याचा पूर्वज सापडणं, ही एक आश्चर्याची बाब आहे. कारण कॅम्ब्रिअन काळाच्या अगोदरच्या काळातल्या सजीवांचं, आजच्या काळातल्या सजीवांशी अजिबात साम्य नव्हतं. आज अस्तित्वात असलेल्या सर्व प्राण्यांचे पूर्वज हे कॅम्ब्रिअन काळात निर्माण झाले असावेत. त्यामुळे या सजीवाचा शोध हा लक्षवेधी ठरला आहे.
इंग्लंडमधील लेस्टर जवळचं चार्नवूड फॉरेस्ट हे ठिकाण एडिअॅकरन काळातील जीवाश्मांसाठी प्रसिद्ध आहे. इथे अनेक ज्वालामुखीजन्य खडक आढळतात. हे खडक अतिप्राचीन काळी सागरी ज्वालामुखीच्या उद्रेकात निर्माण झालेल्या एका बेटाचे भाग असावेत. ज्वालामुखीच्या उद्रेकात त्यावेळी उसळलेल्या राखेबरोबरच इथल्या समुद्रतळावरचे प्राणी या खडकांवर ढकलले गेले असावेत. त्यानंतर त्यांच्यावर राखेचे थर जमा होऊन कालांतरानं या प्राण्यांचं रूपांतर जीवाश्मांत झालं असावं. या जीवाश्मांचा शोध एकोणीसशे पन्नासच्या दशकात लागला. त्यावेळी इथे एका खडकाच्या पृष्ठभागावरील, नेच्यासारख्या वनस्पतीच्या आकृतीनं एका मुलाचं लक्ष वेधून घेतलं. एडिअॅकरन काळातल्या सजीवाच्या जीवाश्माचा, या परिसरातला हा पहिला शोध होता. जीवाश्माच्या या पहिल्या शोधानंतर, संशोधकाना इथे याच काळातल्या अनेक सजीवांचे जीवाश्म सापडले.
या शोधाला पाच दशकं उलटल्याननंतर, २००७ सालच्या एका मोहिमेत, ब्रिटिश जिऑलॉजिकल सर्व्हे या संस्थेतील फिलिप विल्बी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इथल्या एका प्रचंड खडकाचा, जीवाश्म शोधण्याच्या दृष्टीनं शोध घेतला. जमिनीबाहेर डोकावणारा हा ज्वालामुखीजन्य खडक सुमारे छप्पन्न कोटी वर्षांपूर्वीचा असल्याचं माहित होतं. शेवाळानं भरलेल्या आणि धुळीनं माखलेल्या या खडकाची, पाण्याचा मारा करून तसंच विविध प्रकारचे ब्रश वापरून जेव्हा साफसफाई केली गेली, तेव्हा तिथे वीसाहून अधिक प्रकारच्या सजीवांचे सुमारे एक हजार जीवाश्म आढळून आले. या संशोधकांनी इथल्या सुमारे शंभर चौरस मीटर पृष्ठभागाचा एका रबरी पदार्थावर ठसा घेतला व तो ठसा नॉटिंगहॅम येथील ब्रिटिश जिऑलॉजिकल सर्व्हे या संस्थेच्या संग्रहालयात आणून ठेवला.
या ठशावर दिसणारे बहुतेक सर्व जीवाश्म हे नेचे किंवा पामसारखी पाने असणाऱ्या वनस्पतींचे होते. यांतील सुमारे वीस सेंटिमीटर लांबीचा एक जीवाश्म मात्र इतरांपेक्षा खूपच वेगळा होता. फिलिप विल्बी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अलीकडेच या वैशिष्ट्यपूर्ण ठशाचा तपशीलवार अभ्यास हाती घेतला. मूळ सजीवांवर पडलेल्या राखेच्या दाबामुळे, हे सर्व जीवाश्म जवळपास सपाट स्वरूपात निर्माण झाले होते. त्यामुळे हा वेगळा जीवाश्म ज्या सजीवापासून तयार झाला आहे, त्याची मूळ त्रिमितीय रचना कशी असावी याची कल्पना येत नव्हती. या सजीवाची रचना कळण्यासाठी या संशोधकांनी, या ठशांवर विविध दिशांनी विविध कोनांतून प्रकाश पाडून, या ठशाची छायाचित्रं घेतली. विविध बाजूंनी तिरका प्रकाश पडल्यामुळे, छायाचित्रांत त्या पृष्ठभागावरील उंच-सखल भाग अधिक स्पष्ट दिसू लागले. या सर्व छायाचित्रांवर संगणकीय प्रक्रिया करून, त्यावरून या संशोधकांनी या जीवाश्माची त्रिमितीय संगणकीय प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीवरून या आगळ्यावेगळ्या जीवाश्माचं स्वरूप स्पष्ट झालं.
या सजीवाच्या प्रतिकृतीवरून, हा सजीव म्हणजे समुद्रतळाला चिकटून एकाच ठिकाणी स्थिर उभा राहणारा सजीव असल्याचं दिसून येत होतं. या जीवाश्माच्या शरीरात मजबूत सांगाडा होता. आपलं शरीर सांभाळून स्थिर उभं राहण्यासाठी त्याला त्याच्या शरीरातील या मजबूत सांगाड्याचा आधार मिळत असावा. असा शरीरांतर्गत आधार असणारा, आतापर्यंत शोधला गेलेला हा सर्वांत पुरातन सजीव ठरला. या सजीवाच्या शरीराला दोन शाखा होत्या. प्रत्येक शाखेच्या वरच्या बाजूला सुमारे पाच सेंटिमीटर आकाराचा, एक चषकासारखा भाग होता. त्यातल्या एका बाजूच्या चषकातून, जेलिफिशला असतात तसे अनेक शुंडक बाहेर डोकावत होते. असे शुंडक भक्षक सजीवाला असतात! भक्षक सजीव या शुंडकांद्वारे आपलं खाद्य मिळवतो. आता शोधला गेलेला हा शुंडकधारी सजीव प्लवक आणि काही एकपेशीय प्राणी खाऊन जगत असावा. हा पुरातन प्राणी म्हणजे दुसऱ्या जीवांवर जगणारा, आतापर्यंत शोधला गेलेला सर्वांत जुना भक्षक सजीवही होता!
या सजीवाच्या शरीराचं स्वरूप, हा प्राणी आजच्या जेलिफिशसारख्या, छत्रीसारखा आकार असणाऱ्या आणि शुंडक धारण करणाऱ्या सागरी प्राण्यांच्या, मेडूसोझोआ या प्रकारचा प्राणी असण्याची शक्यता दिसून आली आहे. याचा शोध लावणाऱ्या संशोधकांनी या सजीवाला ‘ऑरालुमिना अॅटेनबरोई’ हे जीवशास्त्रीय नाव दिलं आहे. या नावातील पहिला भाग असणारा ‘ऑरालुमिना’ हा लॅटिन शब्द म्हणजे पहाटेची मशाल. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या पहाटेच्या काळात अस्तित्वात आलेल्या, मशालीसारखा आकार असणाऱ्या या सजीवाला पूरक असं हे नाव आहे. या नावातला ‘अॅटेनबरोई’ हा दुसरा शब्द प्रख्यात निसर्गअभ्यासक डेव्हिड अॅटेनबरो यांच्या गौरवार्थ वापरला आहे. अॅटेनबरो यांनी या प्रदेशातल्या एडिअॅकरनकालीन जीवाश्मांकडे संशोधकांचं लक्ष वेधलं होतं.
या वैशिष्ट्यपूर्ण प्राण्याला आपलं नाव दिलं गेल्याबद्दल डेव्हिड अॅटनबरो यांनी आनंद व्यक्त केला आहे. पण याच संदर्भातली (त्यांनीच सांगितलेली) एक गमतीशीर गोष्ट अशी आहे… डेव्हिड अॅटेनबरो यांचा जन्म १९२६ सालचा. त्यांचं बालपण याच परिसरात गेलं. या पहिल्या भक्षकाचा जीवाश्म जिथे सापडला, त्या परिसरात डेव्हिड अॅटेनबरो आपल्या शालेय वयात जीवाश्मांचा शोध घेत अनेकवेळा फिरले होते. मात्र हा जीवाश्म ज्या खडकात सापडला, तशा प्रकारच्या खडकांत मात्र त्यांनी जीवाश्मांचा शोध घेतला नव्हता. कारण त्या काळातल्या तज्ज्ञांच्या मते, हे खडक इतके प्राचीन होते की त्याकाळी जीवसृष्टी निर्माण झालेली नव्हती. अर्थात काही वर्षांतच – एकोणिसशे पन्नासच्या दशकात – इथल्या खडकांवरच्या जीवाश्मांचा शोध लागला आणि तज्ज्ञांचं म्हणणं साफ चुकीचं ठरलं… हे खडक म्हणजे चौपन्न कोटी वर्षांच्याही अगोदरच्या काळातल्या जीवाश्मांची ‘संग्रहालयं’ असल्याचं दिसून आलं!
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: Simmon Harris / Rhian Kendall / BGS / UKRI, BGS / UKRI
Leave a Reply