ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री चिंतामणी कारखानीस हे एक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ मानले जातात. शिक्षकांना शिकवण्याचे तंत्र, विद्यार्थ्यांशी संबंध, शालेय व्यवस्थापन, पालकांशी संवाद, अभ्यासक्रम आणि इतर गोष्टींचा समन्वय आदींबाबात विशेष मार्गदर्शन करणारी त्यांची ही लेखमाला या साईटवर नियमितपणे प्रकाशित करण्यात येत आहे.
शैक्षणिक क्षेत्राचा आधारस्तंभ म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध. हे नातेसंबंध कसे निर्माण होतात, किती बहरतात, वाढतात, का खुरटेच राहतात, यावर त्या दोघांचे आणि शाळेचेही भवितव्य अवलंबून असते. हे नातेसंबंध रुजतात शिक्षक व विद्यार्थी यांच्या पहिल्या भेटीतच. म्हणूनच शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गावर जाताना प्रत्येक शिक्षकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज ते जे बोलतील, जसे वागतील त्याचेच पडसाद वर्गात वर्षभर उमटणार आहेत. यामुळे पहिल्याच भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जाणून घेण्याचा, जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास हा प्रयत्न नक्की यशस्वी होऊ शकतो.
वर्गावर येणार्या शिक्षकाबाबत त्याचे नाव काय? हा प्रश्न तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतोच, पण त्याचबरोबर आपल्या शिक्षकांच्या आवडीनिवडी, त्यांचे छंद, विशेष कार्य याविषयीही मुलांच्या मनात कुतूहल असतेच. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरचा संवाद सुरू करताना तुमचे नाव सगळ्यात आधी सांगा आणि मग स्वत:विषयीची अवांतर माहितीही द्या. आठवड्याचे सहा दिवस, दिवसाचे पाच तास मुले तुमच्या सहवासात रहाणार आहेत, तेव्हा तुमच्याबद्दल प्रेम, आदर, विश्वास निर्माण करायला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. तुमची ओळख वर्गाला करून दिल्यानंतर वर्गातील विद्यार्थ्यांची ओळख करुन घ्यायला विसरू नका. हजेरीपटलातील त्यांची नावे वाचून तुम्हाला त्यांची पूर्ण ओळख होणार नाही. त्यापेक्षा त्यांना त्यांची नावे सांगू द्या.
वर्गातील मुलांची संख्या बघता, प्रत्येक विद्यार्थ्याला नावाने लक्षात ठेवणे अवघड झाले
असले तरी अशक्य नाही. प्रयत्नपूर्वक त्यांची नावे लक्षात ठेवून, त्यांना नावाने हाक मारण्याची सवय करा. आपले शिक्षक आपल्याला वैयक्तिकरीत्या ओळखतात ही भावना विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारी असते, तशीच त्यांच्यावर दबाव टाकणारीही असते. विद्यार्थ्यांवर पकड ठेवायला या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते. शिक्षक आणि विद्यार्थी यांची एकमेकांशी ओळख जशी महत्त्वाची असते तशीच वर्गातील विद्यार्थ्यांची आपापसात होणारी ओळखही आवश्यक असते. ही ओळख घडवून आणण्याची जबाबदारी शिक्षक म्हणून तुमचीच आहे हे विसरू नका.
वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात करण्याआधी त्यांचा “आय क्यू” जाणून घेणे आवश्यक असते. काही साध्या, सोप्या मार्गानी तुम्ही हे करू शकता. बुद्धीला खाद्य देणारी चमकदार कोडी मुलांना विचारून त्यांच्या बुद्धिमत्तेचा अंदाज घेऊ शकता. गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमातील त्यांना काय काय आवडतं, आठवतं हे विचारा. अवतीभोवतीच्या घडामोडींबाबतचे त्यांचे सर्वसाधारण ज्ञान पडताळून पाहा.
विद्यार्थ्यांची बौद्धिक, मानसिक क्षमता जाणून घेतल्यावर त्यांना या वर्षीच्या अभ्यासक्रमाची ढोबळ कल्पना द्या. या वर्षी ते गेल्या वर्षीपेक्षा काय जास्त शिकणार आहेत, त्याचा त्यांना कसा उपयोग होणार आहे हे समजावून सांगा. आपण जे शिकत आहोत ते केवळ परीक्षेपुरतेच महत्त्वाचे नसून सदैव उपयोगी पडणारे आहे, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणे आवश्यक असते. या भावनेमुळे विद्यार्थी अधिक उत्साहाने, मनठपूर्वक अभ्यास करतात. त्याचबरोबर आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी परीक्षेचे तंत्र आणि मंत्रही त्यांना समजावून सांगा. विषयाची तयारी करताना त्यातील कोणत्या भागावर अधिक लक्ष केंद्रित करायचे, त्याची तयारी कशी करायची याच्या टिप्स जरूर द्या.
वर्गातील विद्यार्थ्यांकडून तुमच्या कोणकोणत्या बाबतीत काय काय अपेक्षा आहेत हे पहिल्याच दिवशी स्पष्गट करा. पहिलाच दिवस आहे म्हणून विद्यार्थ्यांना अति मोकळीक देऊ नका तसेच शिस्तीचा बडगाही एकदम उगारू नका. पण वर्गात वागण्या-बोलण्याचे संकेत, नियम त्यांना समजावून सांगा. शालेय वयापासूनच सर्वजनिक जीवनात दाखवायाची शिस्त त्यांच्या अइगी बिंबवा. आदर्श विद्यार्थ्यांमधूनच आदर्श नागरिक घडतो आणि ते घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्येच असते. विद्यार्थ्याच्या प्रत्येक कृत्यावर, वागण्यावर तुमची नजर आहे याची त्यांना सदैव जाणीव करुन द्या. तुमच्या तुमच्या मनाविरुद्ध, वर्गाची शिस्त भंग करणारे वर्तन करण्याचा मुलांचा नामोल्लेखन करून प्रसंगी त्यांना योग्य ती शिक्षा द्या.
शाळेच्या सुरुवातीलाच तुम्ही योग्य तर्हेने स्वत:ला मुलांसमोर सादर केलेत, काही पथ्ये पाळलीत, सावधगिरीचे उपाय योजलेत तर विद्यार्थ्यांबरोबर तुमचे विधायक, सशक्त नाते नक्कीच निर्माण होते. त्यासाठी प्रसंगी शिक्षकाची भूमिका विसरून कधी मित्राची, कधी मार्गदर्शकाची तर कधी चक्क विद्यार्थ्याची भूमिका करण्याची मनोभूमिका तयार करा. प्रथम भेटीत पडणारी छाप चरकाल टिकते. त्यासाठी ती चांगलीच पडेल असा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या कार्यात निश्चितच यशस्वी व्हाल आणि विद्यार्थ्यांबरोबर तुमचे अक्षय नाते निर्माण होईल.
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply