आज खूप दिवसांनी बेसनाची वडी केली, अगदी सहजच आणि अनाहूतपणे पाय देवघरा कडे वळले, देवाला नैवेद्य दाखवायला. खूपच छोटीशी कृती पण इतकं समाधान देऊन गेली आणि पार भूतकाळात घेऊन गेली. अर्थात लहानपणात रमायला कोणाला नाही आवडणार? घरी काहीही गोड केलं की आई-बाबांचा शिरस्ता होता आधी नैवेद्य देवाला, मग घरातल्या सगळ्यांना. कधी कधी फार राग यायचा, एक दोनदा आईशी त्यावरून वाद सुद्धा घातल्याची आठवण आली. पण तरीही घरातली रीत / परंपरा कधी मोडली नाही. मला खात्री आहे आजही अगदी साधा शिरा भाजला तरी आई त्याचा नैवेद्य देवाला दाखवत असणार.
सगळ्यात जास्त त्रास व्हायचा तो दिवाळीत. रोज नवं-नवीन पदार्थांचे वास घरभर दरवळायचे, शाळेला सुट्टी त्यामुळे तर सतत लक्ष स्वंयपाक घराकडे जायचं, पण कधीही एकही पदार्थाची चव बघायला मिळाली नाही. नरकचतुर्दशीला देवापुढे नैवेद्याचे ताट ठेवले जायचे आणि मगच सगळ्या फराळाच्या डब्यांची झाकणं आमच्यासाठी उघडायची. मला आठवतंय की अगदी बाहेरून जरी काही गोड आणलं (जे फारच क्वचित व्हायचे) तरी आधी देवाला मगच घराला.
प्रत्येक कृतीमागे विचार हवाच. हल्ली आया म्हणतात घरातल्या मुलांना अतृप्त ठेवून देवाला नैवेद्य का? अगदी बरोबर. मी ‘श्रावणी सोमवारची खुलभर दुधाची गोष्ट’ अगदी मनापासून वाचली आहे आणि ती कृतीत सुद्धा उतरवते. गोष्ट अशी आहे ‘ की एक राज्यात राजा दवंडी पिटवतो सोमवारी गावातल्या महादेवाला दुधाचा अभिषेक करणार सगळ्यांनी आपापल्या घरातलं दुध आणावे. सगळ्या गावातले दूध गोळा होते पण गाभारा दुधाने भरत नाही, दुपारी एक म्हातारी खुलभर दूध घेऊन येते आणि वाहते गाभारा पूर्ण भरतो. असं पुढचे दोन सोमवार होतं. राजाचे शिपाई त्याला सगळं वृत्तांत सांगतात. राजा म्हातारीला विचारतो, ती सांगते मी सगळ्या लेकरांना, बछडयांना पोटभर दूध पियू देते मग उरलेलं दुध घेऊन येते.’ पण आताची परिस्थिती खरंच अशी आहे का? आता पदार्थ व्हायला सणांची वाट पाहावी लागत नाही, ते केंव्हाही होतात. पण मग देवच का राहतो मागे. आठवड्याला पार्ट्या करणारी आपली पिढी, मग त्याचं काय कौतुक. पण मग जर आठवड्याला देवाला नैवेद्य झाला तर बिघडलं कुठे??
थोडक्यात समाधान मानणारी ती पिढी आणि तिचे विचार आपल्या पर्यंत पोहचू शकले नाही का? समाधान एवढ्या साठी की जरा जरी चांगलं झालं की दोन हात लगेच जोडले जायचे आणि त्या अगाध शक्तीचे आभार मानले जायचे. रोजची जीवनसरणी अगदी साधी असायची, गोड-धोडाचे जेवण एकतर सणाला नाहीतर कोणी पाहुणा दारात आला तरच व्हायचं, मग लागलीच देवाला नैवेद्य. आम्हाला नक्की कुठल्या मोठ्या बातमीची वाट असते माहिती नाही, पण देवाच्या पाया पडायला जायला आमचे पाय उचलतच नाही. घरात सगळ्याची सुबत्ता असते पण देवापर्यंत ती पोचवता येत नाही.
हल्लीच दुसरं महत्वाचं कारण म्हणजे स्वंयपाक अंघोळ करून होतोच कुठे मुळी, त्यामुळे देवाला नैवेद्य फक्त सणावरीच. सगळं आवरून शेवटी अंघोळीला जातो आपण म्हणजे घराबाहेर पडतांना मस्त टापटीप. पण त्यामुळे देव बिचारा भुकेला राहू लागला. ??.
हा विचार झालाच नसेल असं नाही, पण तो नक्कीच पुढे आला नाही. मग आमच्या आधीची पिढी उगाच कर्म-कांडात अडकली का? मला असं वाटतं ती जास्त खुल्या विचारांची होती, म्हणून आपल्यापेक्षा कोणाचे तरी मोठेपण तिने सहज स्वीकारले होते. आताच्या पिढीला वाट पाहायला आवडत नाही, आपल्या आधी कोणाला दयायला आवडत नाही आणि तिसरं महत्वाचं म्हणजे नाही ऐकायला आवडत नाही. परवा एका मैत्रिणीने सांगितले तिच्या ओळखीत एका मुलाने घर सोडले जेव्हा घरात एका क्षुल्लक गोष्टीसाठी नकार देण्यात आला. आई-वडील ती वस्तू घेऊन रात्रभर रडले, हिंडले, मुलगा दुसऱ्या दिवशी सापडला तेंव्हा त्याला आधी ती वस्तू दिली. आमच्या पिढीत जवळपास घरं एककुलते एक असलेले, वस्तू वाटून घायची गरजच नाही, निदान दोनक्षण थांबायला तर शिकायलाच हवे ना?
— © सोनाली तेलंग
०९/०८/२०१८
Leave a Reply