आ मच्या घराजवळच श्री घंटाळी देवीचे प्रसिद्ध मंदिर होते आणि मंदिराला लागूनच घंटाळी मैदान होते. घंटाळी मित्र मंडळ नावाची संस्था सुप्रसिद्ध कलाकारांचे कार्यक्रम या मैदानात सादर करीत असे. आज सर्वांना परिचित असलेले योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे, श्री.रेडकर आणि इतर अनेक मंडळी यात कार्यरत होती. हे कार्यक्रम सर्वांना विनामूल्य असत. या कार्यक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे सगळे कार्यक्रम अगदी वेळेत सुरू होत आणि वेळेत संपत असत. एकाही कार्यक्रमाला कधीही उशीर होत नसे. या कार्यक्रमांना मोठ्यांबरोबरच आम्हा लहान मुलांचीही हजेरी असे. कार्यक्रम उशिरा सुरू न होता, अगदी वेळेवर सुरू होण्याचे महत्त्व लहानपणीच माझ्यावर परिणाम करून गेले. पण कोणताही कार्यक्रम वेळेवर सुरू होण्यासाठी आयोजकांना किती कष्ट घ्यावे लागतात, हे नंतर कार्यक्रम सादर करायला लागल्यावर उमगले. याच मैदानावर पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी सादर केलेला ‘मुकेश, लता आणि मी’ हा कार्यक्रम माझ्या आजही लक्षात आहे. सुप्रसिद्ध गायक श्री. मुकेश यांचा अमेरिका दौऱ्यावरच मृत्यू झाला. लता मंगेशकर यांच्या बरोबरीने या दौऱ्यावर पं. हृदयनाथ मंगेशकर हे देखील उपस्थित होते. यानंतर लगेचच हा कार्यक्रम सादर झाला. गायक श्री. मुकेश यांच्या अनेक हृद्य आठवणी मंगेशकरांनी सांगितल्या आणि या दौऱ्यावरील त्यांनी लतादीदींबरोबर सादर केलेले त्यांच्या आयुष्यातील शेवटचे गाणे ‘आजा रे अब मेरा दिल पुकारा’ हे रेकॉर्डिंग त्यांनी सादर केले. मैदानावर उपस्थित असलेल्या शेकडो श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. एका कलावंतावर रसिकांचे किती मनापासून आणि निरपेक्ष प्रेम असते हे तेव्हा जाणवले. पुढे अनेक मोठमोठ्या कलाकारांबरोबर प्रत्यक्ष काम करताना मी त्याचा अनुभव देखील घेतला. पण त्या रात्री त्या मैदानावरचा तो प्रसंग कायमचा लक्षात राहिला. याच घंटाळी मैदानावर कवी मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, वसंत बापट, विंदा करंदीकर, अभिनेते रमेश देव आणि सीमा देव, श्रीकांत मोघे, माणिक वर्मा, सुप्रसिद्ध साहित्यिक वि. आ. बुवा, व.पु. काळे, रमेश मंत्री, मधु मंगेश कर्णिक आणि अशा अनेक ख्यातनाम मंडळींना प्रत्यक्ष पाहिले आणि ऐकले. याच मैदानावर बाबासाहेब पुरंदरे यांची छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्याने तर आम्हा सर्व मुलांना मिळालेला आनंदाचा ठेवा आहे.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply