ठाण्याच्या नाट्य परंपरेला साजेशा, ठाणेकरांना अभिमान वाटाव्या अशा काही घटना, आज काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या आहेत. पण म्हणून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. सोलापूर येथे नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेले बालनाट्य संमेलन पहिले बालनाट्य संमेलन मानले जाते. पण २५ वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने ठाण्यात भरलेलं बालनाट्य संमेलन हे कालक्रमानुसार पहिले ठरते. ठाण्यामध्ये बालरंगभूमी रुजवणारे ‘नवल रंगभूमी’ संस्थेचे संस्थापक, पत्रकार नरेंद्र बल्लाळ हे बालरंगभूमी या संघटनेचे अध्यक्ष असताना ९० साली त्यांनी पुढाकार घेऊन ठाण्यात एकदिवसीय बालरंगभूमी संमेलन आयोजित केले होते. बालरंगभूमी ही संस्था अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न होती. त्यामुळे साहजिक या संमेलनाच्या आयोजनात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मुख्य सहभाग होता. या संमेलनाला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष राजाराम शिंदे आणि त्यावर्षीच्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष शाहीर साबळे उपस्थित होते. या बालनाट्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कलाकार माधव वझे होते, तर उद्घाटक होते महाराष्ठ्र राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री अरुण गुजराथी. ठाणे शहराचे तत्कालिन महापौर मोहन गुप्ते हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. सहयोग मंदिर येथे भरलेल्या या संमेलनात परिसंवाद आणि चर्चासत्र आयोजित केले होते.
उद्घाटनाचे भाषण करताना अरुण गुजराथी यांनी ‘बालनाट्य आणि बालरंगभूमीचे महत्त्व मी जाणतो, नवीन अभ्यासक्रमात बालनाट्याला स्थान मिळवून देण्यासाठी मी स्वत तुमच्या सोबत प्रयत्न करेन. तसेच किमान महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये बालनाट्याला सवलत मिळावी म्हणून आपण प्रयत्न करू या,’ असे उद्गार काढले होते. ‘श्यामची आई’ या राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या चित्रपटामध्ये श्यामची भूमिका बहारदारपणे करून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणारे आणि पुणे विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात कार्यरत असलेले माधव वझे या पहिल्या बालनाट्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे होते. या संमेलनाच्या मंचावरून बोलताना माधव वझे म्हणाले, ‘बालनाट्य म्हणजे काही घटकाभरची करमणूक नाही, तर मुलांचे अनुभवविश्व समृद्ध करणारी, त्यांच्या जीवनाची कक्षा रुंदावणारी ती एक चळवळ आहे. याचे भान पालकांनी ठेवायला हवे. आजच्या पालकांना आपला मुलगा टीव्हीच्या पडद्यावर चमकावा एवढीच अपेक्षा असते. पण केवळ टीव्हीवर दिसल्याने मुलाची प्रगती होत नाही, तर टीव्हीच्या तंत्रातील काय-काय गोष्टी तो आत्मसात करतो, आपल्या नाटकातल्या भूमिकेशी तो किती एकरूप होतो, हे अधिक महत्त्वाचं आहे. कुठेतरी चमकण्यासाठी बालनाट्याचा वापर हे चुकीचं समीकरण आहे.’
या बालनाट्य संमेलनात ‘पाठ्यपुस्तकात बालरंगभूमीचे स्थान’ या विषयावरील परिसंवादात मूक-बधीर मुलांसाठी काम करणाऱ्या कांचन सोनटक्के म्हणाल्या, ‘बालरंगभूमी या विषयाचे ज्ञान शिक्षकांना होण्यासाठी त्यांची शिबिरे घेतली पाहिजेत, तसेच या विषयासाठी काही तासिका राखीव ठेवल्या पाहिजेत. रंगभूमीचा विचार करताना नृत्य, नाट्य, कला या सगळ्यांचा विचार व्यापक करायला हवा. मुलांना शिकविण्याची भूमिका न घेता, शिक्षकांनी त्यांच्या अभिव्यक्तीला महत्त्व दिले पाहिजे. एखाद्या संहितेवर अवलंबून न राहता पाठ्यपुस्तकातील धड्याचेच नाट्यरूपांतर करावे. यामुळे धड्याचे आकलन चांगल्या प्रकारे होईल.’
राजीव तांबे म्हणाले की, ‘मुलांच्या सूचनांचा शिक्षकाने आदराने विचार करावा. केवळ तो विद्यार्थी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. मुलांना नाटकाविषयी लिहितं, बोलतं, पाहतं करणं हे आवश्यक आहे. मुलांमधील कलागुण ओळखून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली तर मुले अधिक तन्मयतेने काम करतात. प्रत्येक मुलगा नट असेलच असं नाही, पण आजचा बालक हा उद्याचा सुजाण प्रेक्षक आहे याची जाण पालकांना असावी.’
परिसंवादाचा समारोप करताना नाडकर्णी म्हणाले, ‘नाट्य ही जिवंत गोष्ट आहे, याचा जाणीवपूर्वक विचार करायला हवा. धड्याचे नाट्यरूपांतर केल्यानं मुले एकाच गोष्टीचा विचार अनेक प्रकारे करू शकतात. नाट्याविष्कार करताना जर त्यांच्यावर शिक्षकांचे दडपण नसेल तर ती अधिक जबाबदारीने वागतात.’
‘बालनाट्य निर्मिती’ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्ष होते ‘नवशक्ती’चे संपादक, नाटककार आत्माराम सावंत आणि या परिसंवादात सहभागी झाले होते बालनाट्य निर्माते राजू तुलालवार, जयवंत देसाई आणि विजयकुमार जगताप. यावेळी बालनाट्य निर्माते म्हणून आपली बाजू मांडताना तुलालवार म्हणाले, ‘मला बालनाट्य निर्माता व्हावं लागलं ही माझी शोकांतिका आहे. मी लिहिलेली बालनाट्ये दर्जेदार असूनही रंगमंचावर आणणारा निर्माता मिळेना म्हणून मी नाट्यनिर्माता झालो. बालनाट्य निर्मात्यांपुढे अनेक अडचणी कायम उभ्या असतात. शाळा बालनाट्यांनी आश्रय देत नाहीत, तालमींसाठी जागा मिळत नाहीत, नेपथ्य आणि रंगभूषा खर्चिक असते, शिवाय थिएटरचे भाडे परवडत नाही. त्यामुळे आम्ही कलाकारांना मानधन देऊ शकत नाही. बालनाट्यांच्या प्रयोगासाठी थिएटरच्या तारखा मिळवणे जिकिरीचे आहे. गडकरी रंगायतन वगळता इतर थिएटरवाले बालनाट्याला व्यावसायिक नाटकांच्या तागडीतच तोलतात. शिवाय पालक बालनाट्याकडे आपल्या मुलाला टीव्हीची संधी देणारं प्रवेशद्वार म्हणून पाहतात.’
या चर्चेचा समारोप करताना आत्माराम सावंत म्हणाले, ‘आत्तापर्यंत जी बालनाट्ये यशस्वी झाली ती त्यातील नाट्य वस्तूमुळेच. प्रसिद्ध नट, प्रसिद्ध लेखक यापेक्षाही मुलांना आकर्षित करते ती रंजक कथावास्तू. मुलांना फसवणे सोपं नसतं, तसेच नेपथ्यात वास्तवतेपेक्षा सूचकता हवी. सूचकतेमुळे मुलांच्या बुद्धीला चालना मिळते.’
या संमेलनात पुढील ठराव मंजूर झाले : दूरदर्शनवरील ‘नाट्यधारा’ या कार्यक्रमात बालनाट्यांचा समावेश असावा, प्रत्येक जिह्यात बालरंगभूमीसाठी एक थिएटर असावे, तसेच किमान तालमींसाठी तरी जागा उपलब्ध व्हावी, बालनाट्यांना नाट्यगृहे सवलतीच्या दरात मिळावीत, वृत्तपत्रांच्या जाहिरातींच्या दरातही बालनाट्यांना सवलत मिळावी.
या संमेलनाचा समारोप करताना बालरंगभूमी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बल्लाळ म्हणाले, ‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे संमेलन झाले असून, त्यानिमित्ताने बालरंगभूमीकडे पुन्हा सर्वांचे लक्ष वेधले जाईल आणि बालरंगभूमीला नवी दिशा मिळेल अशी आशा मात्र या संमेलनाने निर्माण केली आहे.’
बालरंगभूमीच्या चळवळीत ठाण्याचा सहभाग नेहमीच आघाडीचा राहिला आहे. गेली तीन दशके सातत्याने महाराष्ट्रातला एकमेव बालनाट्य महोत्सव ठाणे महापालिकेकडून साजरा केला जातो. त्याच ठाणे शहरात महाराष्ट्रातले पहिले बालनाट्य संमेलन भरले हेते, याचे विस्मरण होऊ नये म्हणून ही आठवण!
Leave a Reply