नवीन लेखन...

पैज (संक्षिप्त रूपांतरीत कथा २)

मूळ कथा – द बेट
लेखक – ॲन्टोन चेकॉव्ह (१८६०-१९०४)

या कथेचे संक्षिप्त भाषांतर केले आहे श्री अरविंद खानोलकर यांनी. इंग्रजीतील अनेक उत्कृष्ट कथांना मराठीत भाषांतरित करुन त्या संक्षिप्त स्वरुपात मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम.


हिवाळ्यांतील एका मध्यरात्री रावसाहेब आपल्या अभ्यासिकेमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या घालत होते.
राहून राहून त्यांना वाटत होते की पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी ती पैज लावायला नको होती.
पण आता सुटका नव्हती.
ती पंधरा वर्षांपूर्वीची संध्याकाळ व त्यावेळी घडलेल्या गोष्टी रावसाहेबांना अगदी स्पष्ट आठवत होत्या.
त्यांनीच दिलेल्या पार्टीत कशावरून तरी चर्चेला विषय आला होता फांशी बरी की आजन्म कारावास बरा.
बऱ्याच जणांचे मत होते फाशीची शिक्षा रद्द व्हावी व केवळ आमरण कारावासाची शिक्षाच ठेवावी.
एक प्रौढ गृहस्थ म्हणाले, “दोन्हीही शिक्षा वाईटच.
दोन्हीत माणसाचा अंत केला जातो.
शिक्षा म्हणूनही दुसऱ्याचा जीव घेणं, हे अनैतिक आहे.
देवाचा हक्क मानवाला नसावा.”
रावसाहेब म्हणाले, “फांशीमध्ये माणसाची क्षणात सुटका होते तर आजन्म कारावासांत तो कणाकणाने झिजून मरतो.
तेव्हां फाशीच बरी.”

यावर एक पंचविशीतला तरूण म्हणाला, “दोन्ही शिक्षा अनैतिकच.
परंतु मला जर दोनातील एक निवडायची असेल तर मी आजन्म कारावास निवडीन.
मरणापेक्षा कसेही जगणे हे केव्हांही बरे.”
रावसाहेबांची त्यावरची प्रतिक्रिया तीव्र होती, “खोटं. प्रत्यक्षात तू पांच वर्ष सुध्दा कारावास भोगू शकणार नाहीस, मी पांच लाख रूपयांची पैज लावायला तयार आहे.”
तरूण वकील म्हणाला, “पांच लाख रुपयांसाठी तर मी पांच काय पण पंधरा वर्षे कारावास भोगायला तयार आहे.”
पैज लागली.
आतां पंधरा वर्षांनी रावसाहेबांना वाटत होते, “झक मारली आणि अशी पैज लावली.
काय साधले मी ह्या पैजेने ?
त्याची उमेदीची पंधरा वर्षे चार भिंतीआड वाया घालवली आणि हे पाच लाखाचं देणं उरावर घेतलं.
ह्याने लोकांची खात्री पटणार होती की फाशी रद्द करावी ?
छे, छे. पैज हा माझ्या श्रीमंतीचा गर्व आणि त्या तरूणाची हांव.”

त्यानंतर त्या पैजेचं मित्रांच्या साक्षीने एका लेखी करारात रूपांतर झालं.
पैजेच्या सर्व बारीकसारीक अटींची नोंद झाली.
कराराप्रमाणे त्या तरूण वकिलाने रावसाहेबांच्या बंगल्यातीलच एका बाजूच्या खोलीत राहून ती शिक्षा भोगायची होती.
खोलींतून दोन क्षणासाठीही तो बाहेर येऊ शकणार नव्हता.
त्याला कुणाही माणसाबरोबर संभाषण करता येणार नव्हतं, त्याला पत्रव्यवहार करता येणार नव्हता.
वृत्तपत्रेही मिळणार नव्हती.
एखादे वाद्य त्याला मिळणार होते.
वाचायला हवी ती पुस्तके मिळणार होती.
लिहिण्याचे साहित्य त्याला पुरवले जाणार होते.
त्याच्या खाण्यापिण्याची सोय होणार होती.
हवे ते मद्य त्याला पुरवले जाणार होते व धूम्रपानाचीही परवानगी होती.
मात्र हे करतांना मानवी चेहरा त्याला दिसणार सुध्दा नाही अशी दक्षता घेतली जाणार होती.
त्याला काय हवे ते त्याने एका लहानशा खिडकीत चिठ्ठी लिहून ठेऊन कळवायचे होते.
खिडकीतून दिसेल तेवढे पहायचे होते. कारावास त्याला एकटा पाडेल याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती.
ही कैद १४ नोव्हेंबर १८७०च्या दुपारी बारा वाजता सुरू होणार होती आणि १४ नोव्हेंबर १८८५ च्या दुपारी बारा वाजता संपणार होती.

पहिल्या वर्षी कैदी एकटेपण आणि कंटाळवाणेपणा यांनी त्रस्त असावा, असं त्याच्या चिठ्ठ्यांवरून वाटत होतं.
त्याच्या कक्षांतून दिवसरात्र पियानोचा आवाज यायचा.
मद्य आणि तंबाखू त्याने वर्ज्यच केली.
“मद्य”, त्याने एका चिठ्ठीत म्हटलं होतं, “वासना प्रबळ करते आणि वासना कैद्याच्या प्रमुख शत्रू आहेत.
शिवाय चांगले मद्य एकट्याने पिण्यात मजाच नाही.
धूम्रपानाने खोलीभर धूर पसरतो.”
पहिल्या वर्षी कैद्याला धाडस, रहस्य, विनोद, प्रेम यांवरील ललित साहित्य दिलं.
दुसऱ्या वर्षी कैद्याने अभिजात साहित्य मागवून घेतलं.
पियानोचा आवाज बंद झाला.
पांचव्या वर्षी पुन्हां पियानोचा आवाज ऐकू येऊ लागला.
त्याच्यावर लक्ष ठेवणाऱ्यांनी सांगितले की तो खातो, पितो आणि दिवसभर पलंगावर पडून असतो.
सतत जांभया देतो.
कधी रडतो.
स्वतःशीच रागारागाने बोलतो.
वाचन मुळीच करत नाही.
कधी कधी तो लिहीत बसे.
सकाळ होतांच सगळं फाडून टाकत असे.

सहाव्या वर्षापासून कैदी तत्त्वज्ञान, वेगवेगळ्या भाषा आणि इतिहास यांचा अभ्यास करू लागला.
त्याचा वाचण्याचा वेग इतका होता की त्याने मागवलेली पुस्तके पुरवताना रावसाहेबांची धावपळ होऊ लागली.
चार वर्षांत त्याने सहाशे ग्रंथ मागवले.
मग एके दिवशी त्याची चिठ्ठी आली.
त्यांत लिहिलं होतं, “प्रिय जेलर, मी हा मजकूर सहा भाषामध्ये लिहिला आहे.
तो त्या त्या भाषेच्या तज्ञाला दाखवावा.
त्यामध्ये त्यांना एकही चूक सांपडली नाही तर माझ्या समाधानासाठी बाहेर बागेमध्ये बंदुकीचे दोन बार काढावेत.
जगांतले ज्ञानी लोक वेगवेगळ्या भाषांत बोलतात, तरीही त्यांच्यात तीच ज्ञानज्योत तेवत असते.
मी वेगवेगळ्या भाषांतील ज्ञानी लोकाच्या भाषा वाचू शकतो याचा मला झालेला स्वर्गीय आनंद तुम्हाला समजणार नाही !”
तज्ञांचे मत घेऊन रावसाहेबांना बागेत बंदुकीचे दोन बार काढण्याची व्यवस्था करावी लागली.
दहाव्या वर्षापासून कैदी एक वर्ष फक्त भगवद्गीताच वाचत होता.
रावसाहेबांना आश्चर्य वाटत होते की सहाशे ग्रंथ दोन वर्षात वाचणारा माणूस भगवद्गीता वाचायला इतका वेळ कां घेत होता !
त्यानंतर कैदी वेगवेगळ्या धर्मांचा आणि अध्यात्माचा अभ्यास करू लागला.
शेवटच्या दोन वर्षांत कैद्याने प्रचंड वाचन केले परंतु त्या वाचनाला दिशाच नव्हती.
एकाच चिठ्ठीत शेक्सपियरचे नाटक, कवितासंग्रह, वैद्यकीय पाठ्यक्रमातलं पुस्तक, रसायनशास्त्रावरील पुस्तक, कादंबरी आणि तत्त्वज्ञानावरील पुस्तक मागत असे.
बुडत्या नांवेतून वाचलेला माणूस जसा जीव वाचवण्यासाठी मिळेल ते लांकडाचे तुकडे पकडायचा प्रयत्न करत असतो तसा तो मिळेल ते पुस्तक वाचत होता.

रावसाहेबांना हे सर्व आठवलं आणि विचार आला, “उद्या बारा वाजतां त्याला त्याचे स्वातंत्र्य मिळेल आणि मला पांच लाख रूपये द्यावे लागतील.
त्याने मी कायमचा डुबणार.
माझा सर्वनाश होणार.”
पंधरा वर्षांपूर्वी रावसाहेबांकडे करोडो रूपयांची संपत्ति होती.
परंतु पंधरा वर्षात परिस्थितीत खूप फरक पडला होता.
अनेक व्यवहारात नुकसान झाले होते.
गुंतवणूकी बुडाल्या होत्या, शेअर मार्केट कोसळल्यामुळे नुकसान झाले होते.
रावसाहेब कर्जबाजारी झालेले होते.
ह्यांतून सांवरले नाहीत तर नादारी मागण्याची पाळी त्यांच्यावर येणार होती.
“ती पैज म्हणजे दुर्बुध्दीच.
पण हा कैदी पंधरा वर्षात मेला कां नाही ?
तो केवळ चाळीस वर्षाचा आहे.
तो माझे उरलेसुरले सगळं घेऊन जाईल.
लग्न करेल. मजा करेल.
जीवनाचा मनसोक्त उपभोग घेईल आणि मी वृध्दत्व, दारिद्रय यांत कुजत पडेन.
मला त्याच्यापुढेच हात पसरण्याची वेळ येईल.
नाही, असे होतां कामा नये.
मला बेअब्रू आणि नादारी ह्यांतून सुटका मिळण्यासाठी हा माणूस मेलाच पाहिजे.”

घड्याळाने तीनचे टोले दिले.
बाहेर थंड वारा सुटला होता.
झाडांची सळसळ होत होती.
पंधरा वर्षांपूर्वी कपाटाच्या तिजोरीत ठेवलेली कैद्याच्या खोलीची चावी त्यांनी थरथरत्या हातांनी काढली आणि रावसाहेब अभ्यासिकेतून व्हरांड्यात आले.
तिथून खाली डाव्या बाजूला कैद्याची खोली होती.
खोलीवरचा पहारेकरी अपेक्षेप्रमाणेच गायब होता.
आडोशाला झोपला असावा.
माझा हेतु साध्य झाल्यावर कैद्याला मारल्याचा आळ प्रथम पहारेकऱ्यावरच येईल.
खोलीच्या दाराकडे जातांना खोलीची उघडी खिडकी रावसाहेबांना दिसली.
रावसाहेबांनी आत डोकावून पाहिलं.
खोलीत एका कोपऱ्यात मेणबत्ती मिणमिणत होती.
मधल्या टेबलापाशी कैदी बसला होता.
त्याची खिडकीकडे पाठ होती.
त्याने हात टेबलावर ठेऊन त्यावर डोकं ठेवलं होतं.
रावसाहेबांना फक्त त्याचे केस, पाठ, हात दिसत होते.
टेबलावर, खुर्चीवर आणि जमिनीवर सर्वत्र उघडी पुस्तके पसरलेली होती.
रावसाहेबांनी खिडकीवर टकटक आवाज केला.
पण कैद्याने तो ऐकला नसावा.
ते हलकेच दाराकडे सरकले.
त्यांनी कुलूप काढून दार हलकेच ढकलले.
पंधरा वर्षे न उघडलेल्या दाराने कुरकुर केलीच.

रावसाहेबांना वाटले, त्या आवाजाने कैदी उठेल, आश्चर्याने ओरडेल.
पण तसे कांहीच झाले नाही.
रावसाहेब पुढे आले.
कैदी टेबलावर डोकं टेकून थकल्यासारखा झोपला होता.
त्याचे केस स्त्रियांच्या केसासारखे वाढलेले होते.
त्यावर पांढरी झांक मारत होती.
केस अकाली पिकले होते.
गालांचे खळगे झाले होते.
कातडी फिक्कट पडली होती.
हाडांच्या सापळ्यागत तो देह दिसत होता.
कुणाही शहाण्याने ती व्यक्ती केवळ चाळीस वर्षांची आहे ह्यावर विश्वास ठेवला नसता.
त्याच्या हातांत एक कागद दिसत होता.
व त्यावर कांहीतरी लिहिलेले होते.
रावसाहेब मनाशी पुटपुटले, “बिच्चारा !
बहुदा हा झोपेत लाखांची स्वप्ने पहात असावा.
पण माझं काम फारच सोपं आहे. हे अर्धमेलं शरीर उचलून बिछान्यावर आडवं टाकायचं आणि तोंडावर उशी दाबून ह्याला मारून टाकायचा.
अगदी नैसर्गिक मृत्यू वाटेल.
पण त्या आधी ह्या कागदावर त्याने काय लिहिलय ते वाचावं.”
रावसाहेबांनी तो कागद उचलला व ते वाचू लागले.

“उद्या बारा वाजता मला माझे स्वातंत्र्य परत मिळेल आणि परत लोकांच्यात जाता येईल.
परंतु ही खोली सोडून जाण्यापूर्वी आणि सूर्य पहाण्यापूर्वी तुम्हाला दोन शब्द सुनावणे जरूरीचे आहे.
ईश्वराला आणि माझ्या अंतरात्म्याला स्मरून मी तुम्हाला सांगतो की मला तुमच्या जगांतील स्वातंत्र्य, जीवन, आरोग्य, ऐश्वर्य, इ. वरदान समजल्या जाणाऱ्या गोष्टी तुच्छ वाटतात.
पंधरा वर्षे मी पुस्तकांचा खूप मेहनतीने अभ्यास केला. मी बाहेरच्या जगांतील लोकांना भेटलो नाही पण ह्या पुस्तकांत मी गाणी ऐकली, धाडसी शिकार केली, डोंगर पाहिले, समुद्र पाहिले, सुंदर सुंदर स्त्रिया भेटल्या, माझ्यावर त्यांनी प्रेम केलं, कवींनी त्यावर कविता केल्या.
मी हिमालयाच्या शिखरावर पाय रोवून उभा राहिलो आणि तिथून सर्व जग पाहीलं.
माझ्या डोक्यावर ढग होते, वीज चकाकत होती आणि मला हिरवी जंगले, शेते, नद्या, तलाव, शहरे, सगळं सगळं दिसत होतं.
मी पुस्तकात यक्षांचे सुंदर आवाज ऐकले.
त्या यक्षांनी माझ्या कानांत देवाबद्दल सांगितले.
तुमच्या पुस्तकांत मी स्वतःला खोल खोल दरींत झोकून दिले आणि चमत्कार घडवून आणले, मी शहरे बेचिराख केली.
नवे धर्म निर्माण केले, सर्व प्रदेश जिंकले.
तुमच्या पुस्तकांनी मला शहाणपण दिलं.
जगांतलं सर्व ज्ञान, कल्पना माझ्या कवटीच्या कोपऱ्यात भरल्या.
पण मी आता ह्या पुस्तकांना, तुमच्या जगाला आणि शहाणपणालाही तुच्छ लेखतो.
हे सर्व काल्पनिक आहे, भ्रामक आहे, मिथ्या आहे, अशाश्वत आहे.
माणसाने कितीही प्रौढी मारली तरी मृत्यू त्याला पृथ्वीवरून नष्ट करणार आहे.
मानवी इतिहासही मिटणार आहे.
तू आणि तुझ्यासारखी माणसे चुकीच्या मार्गाने जात आहांत.
तुम्ही साधन-संपत्तीची निवड करून, यश, मान, पैसा यांना महत्त्व देऊन तुम्ही असत्त्याला सत्त्य आणि कुरूपतेला सौंदर्य समजून बसला आहांत.
तुम्ही स्वर्गाऐवजी नरकाची निवड केलीत.”
रावसाहेबांचे डोळे ओलावू लागले.

ते पुढे वाचू लागले, “माझी तुमच्या या जगाविषयीची घृणा व्यक्त करण्यासाठी मी जाहीर करतो की जी पैजेची रक्कम मला एके काळी भारी वाटत होती ती द्यायला तुम्ही बांधील नाही.
मी पैज जिंकल्याबद्दल मिळणाऱ्या रक्कमेचा त्याग करत आहे. मी तुम्हाला तुमच्या वचनांतून मुक्त करत आहे. एवढचं नव्हे तर ते सिध्द करण्यासाठी मी ठरलेल्या वेळेच्या कांही काळ आधीच माझी कोठडी सोडून जाणार आहे आणि करार मोडून पैज हरणार आहे.”
वाचून पूर्ण झालेली चिठ्ठी रावसाहेबांनी परत टेबलावर ठेवली.
त्या नवीनच वाटणाऱ्या व्यक्तीच्या मस्तकाचं हलकं चुंबन घेतलं आणि रावसाहेब रडू लागले.
ते त्या कक्षांतून बाहेर पडले.
तसेच येऊन ते स्वतःच्या बिछान्यावर बराच वेळ तळमळत पडले.
त्यांना स्वतःची कींव वाटत होती, स्वतःबद्दल इतका तिरस्कार त्यांना आयुष्यात पूर्वी कधीही, आर्थिक व्यवहारात चुकले तेव्हा किंवा शेअर मार्केटमध्ये आपटी खाल्ली तेव्हाही, वाटला नव्हता.

सकाळी बिचारा पहारेकरी धांवत धांवत त्यांना सांगायला आला.
तो खोलीतला माणूस सकाळीच खिडकीतून बाहेर आला आणि कक्षाच्याही बाहेर आलेला दिसला.
मग तो बागेच्या फाटकातून बाहेर गेला आणि दिसेनासा झाला.
रावसाहेब तात्काळ त्या कक्षात गेले व त्यांनी दोन जणांच्या साक्षीने खोली रिकामी असल्याची म्हणजेच बंदीवान पळून गेल्याची व करार मोडल्याची नोंद केली.
अफवांना कोणताही वाव राहू नये म्हणून कैद्याने पैजेच्या रक्कमेवरचा हक्क सोडल्याचे लिहिलेला कागद टेबलावरून उचलला आणि आपल्या खोलींतील तिजोरीत बंद करून ठेवला.

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – द बेट
लेखक – ॲन्टोन चेकॉव्ह (१८६०-१९०४)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..