चित्रकार रावबहादूर माधव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म १८ मार्च १८६७ रोजी कोल्हापूर येथे झाला.
कोल्हापूरचे कलासंस्कार असलेल्या या कलावंताला आबालाल रेहमानांसारखे गुरू लाभले. १८९० ते १९३१ अखेर धुरंधरांनी जे. जे. कला महाविद्यालयात अध्यापन केले. ब्रिटिश सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ही पदवी दिली. सामाजिक भावनांची जाण आणि रंगरेषेवरील अतुलनीय प्रभुत्व या बळावर त्यांनी हजारो चित्रे रेखाटली. जलरंगांची सखोल जाण हे त्यांचे वैशिष्टय़. आपल्या निष्ठांशी आणि कलेशी प्रामाणिक राहिलेल्या या कलावंताने हिंदुस्थानात प्रथमच १८९५ मध्ये, बॉम्बे आर्ट सोसायटीचे सर्वोच्च असे सुवर्णपदक मिळविले. मेयो मेडल, बेंबल पारितोषिक यांसह अन्य पाच सुवर्णपदके मिळविणाऱ्या धुरंधरांनी भारतीय धार्मिक सण, उत्सव, दरबार, प्राचीन काव्ये व ऐतिहासिक प्रसंगांची शेकडो चित्रे रेखाटली. विजयी शिवछत्रपतींचे तैलरंगातील त्यांनी काढलेले चित्र हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय होता.
माधव विश्वनाथ धुरंधर यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने माधव धुरंधरांना रावबहादूर हा किताब दिला होता. माधव विश्वनाथ धुरंधर यांनी ‘कलामंदिरात एकेचाळीस वर्षे’ हा ग्रंथ लिहिला.
माधव विश्वनाथ धुरंधर यांचे १ जून १९४४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply