नवीन लेखन...

पैस दाखवणारा मालकंस

रस्त्यासमोरील प्रचंड डोंगर चढताना, अंगावर पाउस झेलत आणि डोळ्यासमोरील धुकाळ वाटेत आपली वाट चाचपडत आणि शोधत, डोंगरमाथा खुणावत असतो. हळूहळू आजूबाजूच्या झाडांचा सहवास कमी होत जातो आणि वातावरण अत्यंत निरव, प्रशांत होत जाते. अखेरच्या टप्प्यात तर साधी झुडुपे देखील आढळत नाहीत आणि तरीही अनामिक ओढीने आपण, अखेर डोंगरमाथ्यावर येउन पोहोचतो आणि खाली नजर टाकतो!! खालचा विस्तीर्ण परिसर इतका अप्रतिम आणि मन गुंगावणारा असतो की क्षणभर, आपण समाधिस्त व्हावे, अशीच जाणीव मनाला चाटून जाते. नजरेच्या आवाक्यात न सामावणारा असा तो परिसर आणि त्या परिसराने मनावर पसरवलेली विलक्षण धुंदी, हे सगळे मालकंस राग ऐकताना अनुभवता येते. खरतर हा राग इतक्या प्रचंड आवाक्याचा आहे की यात काहीवेळा “वर्जित” स्वर घेऊन देखील, “संपूर्ण मालकंस” असा आगळावेगळा राग ऐकायला मिळतो.
“पंचम” आणि “रिषभ” स्वरांना इथे आरोही/अवरोही सप्तकात स्थान नाही. परंतु “षडज” आणि “मध्यम” स्वरांचा प्रभाव इतका आहे, की बाकीचे स्वर मवाळ वाटतात. अर्थात, वरती मी म्हटल्याप्रमाणे, काही कलाकार “वर्जित” स्वरांना किंचित स्थान देतात. इथे मला मारवा रागाची आठवण आली. मारवा रागात देखील, “षडज” स्वराचे अस्तित्व जवळपास नसल्यातच जमा असते किंवा नाममात्र असते आणि त्याचा वापर जितका कमी होईल, तितका मारवा राग अधिक खुलतो. “संपूर्ण मालकंस” माश्ये, “रिषभ” आणि “पंचम” या वर्जित स्वरांचा वावर अशाच प्रकारे होत असतो. असो,
सा” आणि “म” या वादी/संवादी स्वरांनी हा राग भारलेला आहे. शास्त्रकारांच्या मतांनुसार, रात्रीचा दुसरा प्रहर, या रागासाठी योग्य आहे.
मुळातला भीमसेन जोशी यांचा धीरगंभीर, खर्जातला आवाज, प्रत्येक स्वराला फुलवून मांडायची सवय आणि स्वरविस्तारला भरपूर वाव, यामुळे “पग लागन दे” ही रचना कशी अप्रतिम रंगली आहें. अगदी सुरवातीपासून, मंद्र सप्तकात, या गायकाचा आवाज भलताच विलक्षण लागलेला आहे. गमक, मिंड, बोलताना, क्वचित एखादी मूर्च्छना या आगळ्या अलंकाराने विभूषित, अशी ही समृद्ध रचना, मालकंस राग, त्याचे चलन, वजन, त्यातील स्वरांचे अलौकिक सौंदर्य, या सगळ्याचे यथोचित दर्शन घडवते. जवळपास ४३ मिनिटांची रचना असल्याने, रागविस्तार कसा करावा, रागाची बढत कशी करायची आणि हळूहळू द्रुत लयीत कसे शिरायचे, या सगळ्या बाबी इथे दृग्गोचर होतात.
मघाशी मी, ज्या “संपूर्ण मालकंस” या रागाचा उल्लेख केला, या रागाची खास बंदिश “तुम बीन कौन संवारे” ही बंदिश म्हणजे “संपूर्ण मालकंस” रागाचे अप्रतिम उदाहरण आहे. किशोरीताईंचा स्वच्छ, नितळ आणि सगळ्या सप्तकात सहज विहार करणारा आवाज, त्यामुळे ही रचना भलतीच खुमारेदार झाली आहे. तसे ऐकायला गेलो तर, दोन्ही रागांचा तोंडावळा जवळपास सारखा आहे, म्हणजे रागाची बढत, स्वरविस्ताराच्या जागा यात फारसा फरक दिसत नाही पण, समेवर येण्याच्यावेळी फरक स्पष्ट होतो आणि त्याच जागेवरून उमटणाऱ्या ताना, बदलत जातात, बदल तसा सूक्ष्म आहे, पण आहे.रागदारी संगीत बुद्धीगामी मानले जाते, ते असे. स्वरांच्या थोड्याशा फरकाने रागाचा चेहराच बदलून जातो. वास्तविक, हे दोन्ही राग, म्हणजे जुळी भावंडे, असे म्हणता येईल परंतु तरी देखील, चेहऱ्याच्या ठेवणीत अतिशय सूक्ष्म फरक असतो आणि तोच फरक, दोन चेहऱ्याची खूण ठरते. इथे असेच घडते. समेवर उतरताना, वर्जित स्वराचा उपयोग केला जातो पण तो इतका अस्पष्ट आहे की बारकाईने ऐकला तरच ध्यानात येतो पण ध्यानात घ्यावाच लागतो कारण त्याच्याच अनुषंगाने पुढील स्वरविस्तार होत आहे.
“निजल्या तान्ह्यावरी माउली,
दृष्टी सारखी धरी”.
हे प्रसिद्ध भावगीत याच रागावर आधारित आहे. वसंत प्रभू, आता काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला संगीतकार पण एकेकाळी आपल्या सहज, साध्या आणि गुणगुणता येतील अशा अवीट गोडीच्या चालींचा जनक. भा. रा. तांब्यांची कविता म्हणजे काव्यात गेयता कशी असावी, याचे उत्तम उदाहरण. कविता वाचत असताना, शब्दात दडलेली अनुस्यूत अशी लय, सहज उलगडत जाते आणि त्या योगे कवितेत दडलेला आशय. तसे बघितले तर तांब्यांनी, कवितेत तसे फार काही प्रयोग केले नाहीत. विषय समयोचित, संस्कृत साहित्याच्या आधाराने वाढत गेलेली आहे. त्यामुळे त्यांची कबिता वाचताना, एक प्रकारचा “राजस” अनुभव येतो. प्रस्तुत गाण्यात हाच अनुभव येतो.
या गाण्यात, या रागातील सूरांचा आढळ बऱ्याच प्रमाणात ऐकायला मिळतो. अगदी पहिलीच ओळ ऐकली तरी. “निजल्या तान्ह्यावरी माउली” हीच ओळ मालकंस रागाची ओळख पटवते. गाण्याची चाल तशी फारशी आडवळणी नाही परंतु लताबाईंनी घेतलेले “खटके”,”मुरक्या” मात्र गाण्याला विलक्षण सौंदर्य प्राप्त करून देतात.
या रागात तशा गझला कमी ऐकायला मिळतात. “लोग कहेते है अजनबी तुम हो” ही गायक हरिहरनने गायलेली अप्रतिम रचना आहे.
“लोग कहते है अजनबी तुम हो,
अजनबी मेरी जिंदगी तुम हो”.
बऱ्याचशा गझल गायनात, पहिला शेर गायच्या आधी बरीच आलापी असते आणि त्यातून पुढील चालीचे सूचन असते. एकदा रचनेत शायरी अवतरली की मग, काव्याच्या अनुषंगाने गायन करायचे, असा एकूण पायंडा दिसतो. इथेही याच अंगाने गझल गायली गेली आहे. हरिहरनचे वैशिष्ट्य असे, गाण्याचे सुरवातीचे शिक्षण कर्नाटकी संगीताने झाले पण पुढे उत्तर भारतीय संगीत देखील तितक्याच अधिकाराने आत्मसात करून, त्यात प्राविण्य मिळवले. गमतीचा भाग म्हणजे इथे ही गझल गाताना. कुठेही कर्नाटकी संगीताचा लवलेश देखील आढळत नाही. कर्नाटकी गायकी शिकलेल्या बहुतेक गायकांना असा फरक करून गाणे जमत नाही. अतिशय सुरेल, मोकळा आवाज आणि गाताना शब्दांचे औचित्य शक्यतो सांभाळून गायचे, असा विचार स्पष्ट दिसतो. गायनातील हरकती देखील इतक्या सहज असतात की ऐकताना त्यातले “काठिन्य” फारसे जाणवत नाही आणि हीच या गायकाच्या गायकीची खरी खुबी आहे. इथे पहिल्याच आलापित मालकंस रागाची ओळख पटते आणि पुढील सगळी रचना, बहुतांशी याच अंगाने विस्तारित होत जाते.
“बडा आदमी” या चित्रपटात “अन्खीयन संग अखिया” हे गाणे म्हणजे मालकंस रागाचे लक्षण गीत म्हणावे लागेल. अगदी पहिल्या सुरापासून याच रागाची आठवण करून देणारे गाणे आणि संपूर्ण गाणे याचा रागाच्या सावलीत बांधलेले आहे.
“अखियन संग अखिया लागी आज,
झुमे बार बार मेरे मन मे प्यार,
नित ऐसा तोहे मौसम आये ना,
अखियन संग अखिया लागी आज”.
तालाच्या दृष्टीने बघायला गेल्यास, गाण्यात सरळ, सरळ दोन ताल दिसतात आणि त्यात तसे फारसे प्रयोग दिसत नाहीत. नेहमीचा त्रिताल आणि केरवा ताल ऐकायला मिळतो. गाण्याच्या सुरवातीला. “मन तरपत हरी दर्शन” या प्रसिद्ध गाण्याची झाक दिसते परंतु नंतर मात्र गाणे वेगळे होते. एकाच रागातील ही दोन्ही गाणी असल्याचा हा परिणाम. गाणे जसे द्रुत लयीत जाते, तशी गाण्यात सरगमचा सुंदर उपयोग केला आहे. हे गाणे त्या दृष्टीने रागाचे लक्षण गीत म्हणून म्हणता येईल.संगीतकार चित्रगुप्त यांनी राग डोळ्यासमोर ठेऊन चाल बांधली असल्याने, तसा रचनेत फार प्रयोग करायला वाव राहिला नाही, तरी देखील मोहमद रफींच्या गायनाने गाणे खूपच श्रवणीय झाले आहे, यात शंकाच नाही.
व्ही. शांताराम दिग्दर्शित “नवरंग” चित्रपटात “तू छुपी है कहां” हे अतिशय प्रसिद्ध झालेले गाणे मालकंस राग्ची आठवण करून देणारे आहे. संगीतकार सी. रामचंद्र यांनी मात्र गाण्याची रचना करताना खूपच  प्रयोग केले आहेत. एकतर जरी रचना सुरवातीला रागाच्या छायेत फिरत असली तरी ननतर रागाची बंधने सोडून चाल संपूर्ण सुटी होते. इतकी की हे गाणे मालकंस रागात खरोखरच आहे का? असा मनाला विस्मय पडावा.  यामुळेच हे गाणे मला फार आवडते.
“तू छुपी है कहां, मैं तडपता यहां,
तेरे बिन फिका फिका है दिल का जहां”
गाण्याचा कविता म्हणून विचार केला तर फार काही दर्जेदार वाचायला मिळत नाही पण गाण्याच्या चालीच्या “मीटर” मध्ये शब्दकळा चपखल बसली आहे.
या गाण्याची गंमत म्हणजे इथे केरवा ताल वापरला आहे पण, तरीही ऐकताना पारंपारिक ताल ऐकायला मिळत नाही आणि ही किमया सी. रामचंद्र यांची. चित्रपटातील गाणे कशाप्रकारे सजवता येते, यासाठी हे गाणे अभ्यासावे, इतक्या तोलामोलाचे आहे. गंमत म्हणजे जरी गाणे रागाची बंधने सोडून जात असले तरी प्रांत समेवर येताना, मालकंस ऐकायला मिळतो. सुगम संगीतात, रागाचे नियम तोडून रचना केली तरी अखेर त्या रागाशी नाते जुळवून घ्यावेच लागते. गाण्यातील वाद्यांचा अनोखा वापर, हे या गाण्याचे आणखी वैशिष्ट्य सांगता येईल. खरतर गाण्याची सुरवातीची चाल आणि पुढे विस्तारित झालेली चाल, यात बरेच अंतर आहे पण, ज्या हिशेबात चाल आणि लय बदलत जाते, ते सगळेच अनुभवण्यासारखे आहे.
मराठी नाट्यसंगीतात “उगवला चंद्र पुनवेचा” हे गाणे विशेष लोकप्रिय आहे आणि हे गाणे मालकंस रागाची आठवण करून देते. “पाणिग्रहण” नाटकातील हे पद, आचार्य अत्र्यांनी लिहिले असून याची चाल, श्रीनिवास खळ्यांनी बांधलेली आहे. तशी चाल पारंपारिक नाट्यगीताच्या कुळशीलाशी नाते सांगणारी आहे पण बकुल पंडित या गुणवान गायिकेने या चालीचे चीज केले आहे.
“उगवला चंद्र पुनवेचा,
मम हृदयी दरिया, उसळला प्रीतीचा”.
तसे पाहिले तर शब्द काही असमान्य ताकदीचे नाहीत पण गाण्याला योग्य असे आहेत. थोडे बारकाईने ऐकले तर गाण्याची चाल बरीचशी भावगीताच्या अंगाने गेलेली आहे. गाण्यात “गायला” खूप मोकळ्या “जागा” आहेत पण इतपत जागा बहुतेक भावगीतात आपल्याला सापडू शकतात. आता, इथे रंगमंचावर गाणे सादर करायचे असल्याने, गायकी दाखविण्याला बराच वाव मिळतो. गाताना, ताना स्वच्छ आहेत तसेच शब्दांच्या अंगाने बोलताना घेतल्या आहेत.
मालकंस राग हा खरे तर मैफिलाचाच राग, अफाट विस्तार क्षमता आणि कलाकाराला अनेक प्रकारचे स्वातंत्र्य घेण्याची मुभा देणारा.
— अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..