‘गिरिजाकाकू! शरदची बिल्कुल चिंता करू नका! धन, कनक, सुलक्षणी कांता नि अखंड लक्ष्मी भरभरून वाहणारी शुभयोगाची पत्रिका आहे त्याची…’ भविष्यवेत्ते दामले गुरूजी आईला सांगत होते…
‘अहो गुरुजी! पुढचं काय सांगताय? दोन दोन अर्थशास्त्रातल्या पदव्या घेऊनसुद्धा तो अजून बेकार बसलाय घरात… तांबडा पैसा मिळवून घरी आणेल तर शप्पथ… हातपाय हलवल्याशिवाय का चार पैसे मिळणार आहेत? का पैश्याचं झाड लावून पैसे उगवतात! नोकरी कधी लागेल ते सांगा आधी?’
‘अहो गिरिजाकाकू! सोन्यारूप्याच्या मोहरांचा वर्षाव करणार आहे शरद तुमच्यावर… तुमच्या पंचाहत्तरीला आहात कुठे?’
‘आधी चार दिडक्या नीट मिळू दे! मस्त लंकेत सोन्याच्या विटा असतील, पण त्या इथे कशा येतील कामाला! नाही ना? मुलगा हा असा आणि नवरा तो तसा… कंजुष… धंद्यात खोऱ्यानं पैका मिळवतो पण घरात आणा पैच्या हिशेबानुसार खर्च पाहील… वरकड खर्चाला म्हणून कधी चवली, पावली नि अधेलीच्यावर कर्ण उदार झाला नाही… रोख पैसे नाहीतर नाही निदान अडीनडीला, वेळप्रसंगाला लागले पैसे तर एखादं एटीएम कार्ड तरी घरात ठेवायला काय हरकत आहे? मोबाईलवर एसएमएस येतोय की प्रत्येक व्यवहाराचा. मग वेगळा हिशेबठिशेब सांगायची गरजच नाही… तरी तेसुध्दा हातून सुटलं नाहीच..’ गिरिजाकाकू फणफणत म्हणाल्या…
दामले गुरुजींचा आणि आपल्या आईचा संवाद शरद ऐकत असताना त्याच्या मनात अर्थशास्त्रातले विचारवलय फिरू लागले… तांबडा पैसा, सोन्यारूप्याच्या मोहरा, दिडक्या, आणा-पै, चवली, पावली नि अधेली… आणि एटीएम कार्ड… व्यवहारातल्या चलनाचा प्रवास कसा सुरू होत गेला असेल…
…त्याला आठवलं पैसा हे एक जगण्याचं साधन आहे हे खरं. तरी पैसा चलन एक व्यवहारी नाण उदयाला येण्यापूर्वी देखील लोकांत व्यवहार तर होत होतेच की. पण त्यावेळेला वस्तूला वस्तू वा सेवेला वस्तू अदलाबदल होत असे. (BARTER SYSTEM) अशी प्रमाणपद्धत अमलात होती. त्यावेळी बारा बलुतेदारीची ग्राम व्यवस्था असल्याने वर्षासनाच्या घेतलेल्या कामाचा मोबदला हा शेतातल्या उगवणाऱ्या पिकाच्या सुगीत केला जात असे… अर्थात याला आधारभूत असे मोजमाप नसल्याने कधी कमी जास्त देणे-घेणे होत असे, तर कधी बेभरवशाच्या शेतीचे उत्पन्न जास्त झाले किंवा घटले (ओला/सुका दुष्काळ) तर व्यवहारसुद्धा तंगी/तेजी होत असे… सोनं, चांदी, जड जवाहिरे, पशुधन, गोधन मौल्यवान किंमती वस्तू यांची उलाढाल अशीच होत असे वतनदार, जमीनदार, राजदरबारी लोकांची पतप्रतिष्ठादेखील जमिनीच्या मालकी हक्कावरून, बारा/सोळा मनसबदारीच्या मानपत्रावरून ठरविली जात होती. घोडे, रथ, पालख्या वाहतुकीच्या अपुऱ्या साधनांमुळे स्व-देशापुरता व्यवहाराला मर्यादा पडत होत्या…
राज्यविस्तार निधर्मविस्ताराच्या लालसेने परकीय टोळ्यांनी रयतेवर विविध कर लादून धनधान्याच्या रूपातील शेतसाराबरोबर सोनं, चांदी, जड जवाहिरे, पशुधन गोधन मौल्यवान किंमती वस्तू लुटून नेल्या जात… तेव्हाही याला आधारभूत असे मोजमाप नसल्याने कधी कमी जास्त देणे-घेणे होत असे.. कोवळं, निवळं, चिपटं, मापटं, शेर, अडीचसरीपायली ही प्रमाणभूत मापं धान्य मोजणीला एकीकडे होती. त्याचवेळेला व्यवहाराला दुसरं प्रमाणभूत चलन मापं तसं अस्तित्वात नव्हतं..
…मग काही राज्यकर्त्यांनी आपली राजमुद्रा मोहरा चलन म्हणून व्यवहारात आणण्यास सुरुवात केली… त्यास होन हे प्रमाणभूत मोजमापन पद्धत वापरू लागले… सोन्या, चांदी, तांब्याच्या मोहरा चलनात आल्या आणि इथून पुढे पैसा चलनाचा उगम सुरू झाला..
इंग्रजांच्या राजवटीपासून संबध देशभर चालणारे सर्वमान्य आणि राजमान्य असे चलन सुरू झाले असे म्हणता येईल… सुटी नाणी, कागदी नोटांचा उदय झाला… सुरुवातीच्या काळात राजा पंचम जॉर्ज आणि राणी एलिझाबेथ यांच्या छापाची सगळी नाणी नि नोटा बाजारात आणल्या गेल्या..
सन 1935 पासून आरबीआय (RESERVE BANK OF INDIA) पूर्वीची सेंट्रल बँकने पैसा चलनावर नियंत्रण ठेवणे सुरू केले. नवीन रुपये छपाई, वितरण, रद्द करणे याबरोबर त्याला किमतीचा मूलाधार सोनं रूपात संचय करून ठेवत गेली. धातूच्या नाण्याचा आकार, वजन. धातूची शुद्धता इत्यादी इत्यादी बाबी काटेकोरपणे तपासू लागली. तसेच कागदी नोटांच्याबाबतीत आकार, रंग, खास उच्चप्रतीचा अंतरभूत लवचिक तारेचा कागद वगैरे वगैरे बाबीचा विचार करण्यात आला… पण प्रत्यक्षात असा अनुभव येत गेला की, बहुसंख्य लोकांच्या पैसा हाताळणीच्या विविध सवयीने कागदी नोटा लवकर बाद होत गेल्या, जसे नोटांना घड्या घालणे, स्टॅप्लरपिना मारणे, नोटेवर काहीबाही लिहिणे इत्यादी इत्यादी. जी गोष्ट लोकांची तीच सवय बँकेत कॅश काऊंटरवरच्या कशियरची… देशाचं चलन खराब करणे म्हणजे पर्यायाने त्या देशाचा, त्या नोटेवरील असलेल्या राष्ट्रपित्याचा अवमान करण्यासारखे आहे, ही साधी गोष्ट सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आली नाही. नोटांच्या बेमालूम नकला करणे, खोटी नाणी, रुपये तयार करून बाजारात आणणे या सारखेही प्रकार करणारे देशद्रोही इथे निघू लागले… तर कुठे वाममार्गाने मिळवलेली बेहिशोबी रोकड रक्कमेचा साठा होऊ लागला…त्याचा फटका आर्थिक चलनवलनाला बसून फसवी तुट भासू लागली…सरकारने वेळोवेळी ठोस योजनेद्वारे आळा घालण्याचे प्रयत्न केले. पण ते बहुतांश अयशस्वी ठरल्याने अर्थमंत्रालयाने आरबीआयला नोटबंदीचा आदेश देऊन काही नोटा रद्द केल्या तर काही नव्याने बाजारात आणाल्या.. त्यातील दहा हजार, पाच हजार, हजार रूपायांच्या नोटा आजवर रद्द झाल्या आहेत. तर कागदाची बचत, छपाईचा वाढता भरमसाठ खर्च, खराब नोटाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्याच्याऐवजी नाणी बाजारात आणली. एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये इत्यादी.
तसेच अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार या पैसा चलनावर देश विदेशातले बाजाराचे सतत अनुकूल प्रतिकूल संवेदनशील झालेले परिणाम पाहायला मिळतात… मागणी पुरवठ्याचे तत्त्व आणि चलनफुगवट्याचा तात्पुरता इलाज, आक्रसलेली गंगाजळी, विदेश विनिमयातले चढउतार ही सर्व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पैसा या चलनाला तारक/मारक ठरू लागली… विसकसित देश अविकसित आणि विकसनशील देशांचे आयात-निर्यातीतून आर्थिक शोषण करू लागले… अशा देशातील चलनवलनाचे (रुपयाचे) अवमूल्यन होत गेले… ऋणको देशांची संख्या झपाट्याने वाढत गेली…आणि IMF (INTERNATIONAL MONETARY FUND), UNO सारख्या परकीय बलाढ्य आर्थिक संस्थाची भरमसाठ नफेखोरी वाढली… कर्जाच्या जाचक अटी नि शर्ती दुर्बल अविकसित नि विकसन देशाला प्रगतीस अवरोध ठरल्या… पर्यायाने महागाईच्या भस्मासुराने देशाला विळखा घातला…
…बँकेच्या कामकाजाच्या दिन/वेळे व्यतिरिक्त रोकड काढणे/ठेवणे, रोकड एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाणे जोखीमीचे झाले,यावर बँकेत संगणकाचा शिरकाव झाल्याबरोबर डिजिटल बँकिंग प्रणाली सुरू झाली त्यात मुखत्वेकरून ATM (AUTOMATED TELLER MACHINE) ची सुविधा उपलब्ध झाल्याने Any Time Money लोकांना मिळू लागले… डेबिट/क्रेडिट कार्डद्वारा जगात कुठेही, कधीही आपल्या खात्यावरचे पैसे रोखीने काढता येऊ लागले तसेच बाजारात देखील मनी ट्रान्सफरद्वारे व्यवहार करणे सोयीचे ठरले…रोकड वागविण्याची काळजी मिटली.. रजिस्टर मोबाइल नंबरवर एसएमएस आल्याने निश्चिंतता मिळाली. कार्डाची योग्य अशी काळजी घेणे मात्र क्रमप्राप्त ठरले…
अलीकडच्या काळात तर UPI या डिजिटल प्रणालीने सगळ्या प्रकारची बिल, रिजर्व्हेशन, गुगल पे, फोन पेद्वारे प्रत्यक्ष कॅशचा वापर न करता भुगतान करता येतात… तात्काळ बिलं भरली जातात, वेळेवर पावती प्रदान होते. शिवाय लोकांचा वेळ आणि श्रमाची बचतही होते. अशी ही सुविधा आता पैसा या चलन संकल्पनेला दुसरा पर्याय उभा झाला आहे… म्हणजे नाणी, नोटांबरोबर आता प्लॅस्टिक मनीचा सर्रास वापर होऊ लागला आहे… या प्लॅस्टिक कार्डाची जागा अॅण्ड्रोइड मोबाईल फोनने घेतली आहे… काही पेमेंट्स अॅप्स हे व्यवहार सुलभपणे करू लागल्याने कार्डदेखील मागे पडले आहे… अर्थात यामागे लोकांनी तितकीच जागरूकपणे काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा संभाव्य धोके हानी पोहोचविल्याशिवाय राहणार नाहीत. आता पावसाला ‘ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा’ असं न म्हणता तुला गुगल/फोन पेने देतो पैसा असं निदान आजतरी म्हणता येईल…उद्याचा पैसा कोणत्या स्वरूपात समोर येईल काहीही सांगता येत नाही…
-नंदकुमार वडेर
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply